माणसांना काही तरी छंद असतोच. काहींना क्रिकेट बघण्याचा छंद असतो, काहींना सिनेमा बघण्याचा, नाटकाचा, काहींना लिखाणाचा तर वाचनाचा छंद असतो. काहींना टीव्ही बघण्याचा तर काहींना तासन् तास मोबाईलवर खेळण्याचा छंद असतो. मला देखिल वाचण्याचा व लिहिण्याचा छंद आहे. तसेच माझे पती ‘टॉनिक’ अंकाचे संपादक मानकरकाका यांना भारतातील प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा खूप छंद होता. लग्नानंतर आम्ही भ्रमंती केली. काश्मीर ते कन्याकुमारीला नेलं. काशी विश्वेश्वराचं दर्शन घडवलं. कलकत्त्यातील रवींद्र टागोरांचं ‘शांती निकेतन’ ही पाहिले. नेपाळमध्ये चार दिवस फिरलो. पशूपती मंदीर पाहीलं. तिथे १०८ शिवलिंगांना प्रदक्षिणा घातल्या. जगन्नाथपुरीला गेलो. प्रयाग, गयाला गेलो. संपूर्ण ‘केरळ’ पाहिला. महाराष्ट्रातील बरीच स्थळे पाहिली. गोव्याला तीन वेळा गेलो. ऋषीकेशचं दर्शन घेतलं. महाबळेश्वर व पाचगणीला गेलो. पुणे, नाशिक, कोल्हापूरची महालक्ष्मी, वाईचा व सिन्नरचा गणपतीला गेलो. दार्जिलिंग, मसुरी पाहिलं. इतकी स्थळे पाहिली की आता नावेही आठवत नाहीत. मी शाळेत ८ वी ला असताना माझ्या एका मैत्रिणीच्या वडीलांनी आमच्या चार मैत्रिणींचा हात पाहून भविष्य सांगितलं. त्यांनी माझाही हात पाहिला व मला म्हणाले, ‘तू परदेशात फिरुन येशील, मी म्हटंल, ‘ मी अजून दादर स्टेशनच्या पुढे गेले नाही. तर परदेशात कशी जाणार? ‘ ते म्हणाले, तुझ्या तळहातावर माश्याची आकृती आहे आणि मासा सातासमुद्रापलीकडे जातो, तू जेव्हा जाशील तेव्हा माझी आठवण कर; त्यांच भाकित खरं ठरलं. आणि आम्ही दोघे २०१२ साली सिंगापूर व मलेशियाला ‘सचिन’ ट्रॅव्हलमधून आठ दिवस फिरायला गेलो. म्हणजे जोशीकाकांच्या भविष्याप्रमाणे मी परदेशात गेले. तेव्हा मला त्यांची खूप खूप आठवण आली. आता ते या जगात नाहीत, पण ते जिथे असतील तिथे माझी त्यांना आदरांजली वाहाते. विमानाचा प्रवास मी दुसऱ्यांदा केला.
१९७६ साली मिस्टरांच्या मित्राने आम्हाला कच्छमध्ये नेलं. ते जैन समाजाचे आहेत. त्यांच्या गावी देवपूरमध्ये नेलं. त्यांच्या गावात सर्व जैनधर्मीयांचा उत्सव होता. त्यांच्या देवळात मूर्ती होती व देवळाच्याबाहेर कलश होता व बाजूला देवाच्या, कृष्णाच्या मूर्त्या होत्या. तिथे गेल्यावर आम्ही दोघांनी त्या मूर्त्या रंगवल्या. त्या मित्राने मणिलाल त्यांच नाव, त्यांनी सगळा आमचा खर्च केला. आम्ही चाळीस दिवस तिथे राहिलो. त्या देवळाबाहेरील मूर्त्या रंगवण्यासाठी आम्ही दोघे शिडीवर उभे राहून रंगकाम करायचो. त्या गावातील बायका, मुले व पुरुष आमच्याकडे आश्चर्याने पहायचे. त्यांना कौतुक वाटायचं की एक बाई शिडीवर उभी राहून रंगकाम करते. त्यांच्या कौतुकामुळे मलाही अभिमान वाटायचा. चाळीस दिवसाचा पाहुणचार घेऊन आम्ही विमानाने मुंबईला आलो. विमानात बसायची माझी ती पहिली वेळ होती.
दरम्यान, सावरकर संघ संस्थेतर्फे ‘अंदमानला’ दोघे गेलो. तिथे सारखं बोटीतून, होडीतून प्रवास करावा लागला. स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्या खोलीत ठेवलं होतं. ती अंधारी खोली आम्ही पाहिली आणि डोळे भरुन आले. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी त्यांनी किती हालअपेष्टा सहन केल्या त्या जागेचे दर्शन घेतलं. अंदमान म्हणजे काळे पाणी! त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागली. सावरकरांना मनोमन शतशः प्रणाम करुन आम्ही निघालो. अंदमानला पोर्टब्लेअरला इंडियन नेव्हिचं ऑफिस आहे. काही सेलरना शिक्षा करायची असल्यास त्याला अंदमानला पाठवतात. मी इंडियन नेव्हीमध्येच सर्व्हिसला होते. मी तिथल्या सेलरना भेटले त्यांना आनंद वाटला. घरचं माणूस भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसला. अंदमानला जाताना आम्ही रेल्वेने चेन्नईला गेलो व तिथून विमानाने अंदमान विमानतळावर उतरलो. या ट्रिपमध्ये गुजराथी कुटुंबे होती. तसेच महाराष्ट्रीयनही होते. प्रवास खूप चांगला झाला. बोटीतून फिरण्याची हौस पूर्ण झाली.
मिस्टरांबरोबरचा शेवटचा प्रवास युरोप फिरायला गेलो. या प्रवासात खूप वाईट अनुभव आला. यात आमच्या दोघांची ताटातूट झाली. त्याचं असं झालं की ट्रॅव्हल्स पॅक्स या टूरमधून १७ एप्रिलला निघालो. त्यांचं सावरकर संमेलन लंडनला होतं. लंडनला विमानाने पोहोचल्यावर लंडन फिरायला निघालो. बऱ्याच ठिकाणी फिरल्यानंतर आम्ही ‘मादाम तुसा म्युझियम’ पहायला गेलो. तिथे सगळे मेणाचे पुतळे होते. सचिन तेंडूलकर, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या रॉय, सलमान खान, हृतिक रोशन, इंग्लंडची राणी, शास्त्रज्ञ आर्किमिडीज तसेच महात्मा गांधी, इंदिरा गांधी या सर्व पुतळ्यांबरोबर आम्ही फोटो काढले. हे सर्व पहात फिरत असताना आठ – दहा मुलांचा घोळका आमच्या दोघांच्या मधून मोठमोठ्याने ओरडत, गाणी गात निघून गेला.
सगळं लंडन फिरुन हॉटेलवर आलो. मग मी त्यांच्या शबनम पिशवीत पासपोर्ट सुरक्षित आहे का म्हणून पाहिलं तर पिशवीत पासपोर्ट नव्हता. सकाळी निघताना मी ह्यांना म्हणाले की, पासपोर्ट गळ्यात घाला. तर ते म्हणाले, तुझ्या पर्समध्ये ठेव. मी म्हटलं तुमचा पासपोर्ट तुमच्याकडे ठेवा, कारण चुकामुक झाली तर आपला पासपोर्ट आपल्या जवळच असावा. ते म्हणाले, पिशवीत ठेव. जर मी माझ्या पर्समध्ये ठेवला असता किंवा त्यांना गळ्यात घालायचा आग्रह केला असता तर पासपोर्ट त्या मुलांनी मारला नसता. त्या पिशवीत विमानाचं तिकीट होतं. सगळं गेलं. स्वा. सावरकर विश्व संमेलन लंडनमध्ये झालं. त्याचे अध्यक्ष टीव्हीवर अनेक नाटकातून, सिनेमातून कामे करणारे व सध्या झी प्रवाहवर चालू असलेली सिरिअल ‘अग्निहोत्र’ यात काम करणारे नटश्रेष्ठ ‘शरद पोंक्षे’ हे आमच्या बरोबर होते. आम्ही पुढच्या दौऱ्यावर स्वीत्झर्लंडला निघालो आणि पासपोर्ट नसल्याने हे लंडनला राहिले. त्यांची व्यवस्था वाय. एम. सी. या हॉटेलमध्ये करण्यात आली. त्या हॉटेलचं दिवसाचं भाड चाळीस पौंड होतं. मी ह्यांना म्हणाले की, मी पुढे जाणार नाही, तुमच्याबरोबर लंडनलाच राहाते. व तुम्हाला भारतात परत जाण्याचा पासपोर्ट मिळाला की दोघेही घरी जाऊ. मी खूप रडत होते. खूप हट्ट केला, म्हटलं मी एकटी पुढे जाणार नाही. आपण बरोबर आलो तर बरोबर जाऊ, मी खूप रडत होते. सगळ्या बायका मला समजवत होत्या. पण हे म्हणाले, माझा पासपोर्ट हरविल्याने मी पुढचा प्रवास करु शकत नाही. पण तू मात्र युरोपला जा. मी काय कधी तरी जाईन युरोप पहायला. पण घरच्या अडचणींमुळे तुला जमेलच असं नाही. हे जायला निघाले तेव्हा शरदजी पोंक्षे मला म्हणाले, “काकी माणूस एकटा येतो व एकटा जातो, मग तुम्ही कशाला रडता? तुम्ही सगळ्यांबरोबर जा. आपले एवढे एकशेविस लोक आहेत. काळजी करु नका. काकांना भारताचा पासपोर्ट मिळाली की ते येतील. मी रडत रडत बसमध्ये बसले. तासभर मी रडतच होते. बायका मला समजावत होत्या. त्या रात्री मी जेवले नाही. आम्ही बारामजली बोटीने युरोपला निघालो. प्रत्येक जण जेवावं म्हणून आग्रह करीत होते. माझी काळजी घेत होते.
फ्रान्समध्ये आम्ही आयफेल टॉवर पहायला गेलो. टॉवर बघायला भली मोठी लिफ्ट होती. नंतर स्वीत्झर्लंडला बर्फात एकमेकींच्या अंगावर बर्फ फेकून खेळले. यावेळी मला मिस्टरांची खूप आठवण आली. त्यांची आठवण पदोपदी येतच होती. एवढी लोकं बरोबर होते तरी मी एकटी आहे असं वाटत होतं. एवढा मोठा साता समुद्रापलीकडील प्रवास मी ह्यांच्याशिवाय करताना मन फार दुःखी झालं. त्यामुळे युरोपच्या प्रवासाचा मनसोक्त आनंद घेता आला नाही. पिसाचा कललेला मनोरा पाहिला. सात दिवसाने आम्ही भारतात पोहोचलो, त्याच दिवशी मिस्टरही सकाळी पाच वाजता भारतात आले. आणि मी अकरा वाजता आले. सात दिवसाने आमची घरी भेट झाली. असा हा आमचा युरोप दौरा काहीसा खिन्नतेत साजरा झाला.
-कथा मानकर
(व्यास क्रिएशन्स च्या पर्यटन दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)
Leave a Reply