नवीन लेखन...

पासपोर्ट-व्हीसा-दूतावास

आजकालचा महत्त्वाचा दस्तावेज आणि परवलीचा शब्द म्हणजे पासपोर्ट. याच्या नावामध्येच त्याचा अर्थ दडला आहे. पासपोर्ट म्हणजे पारपत्र. आपला देश पार करून दुसऱ्या देशात जर आपणाला जायचे असेल तर आपल्या सरकारकडून मिळालेली रितसर लेखी परवानगी म्हणजेच पासपोर्ट. कोणत्याही भारतीय नागरिकास हा पासपोर्ट मिळू शकतो. यासाठी हा पासपोर्ट मिळवण्यासाठी कुठे अर्ज करायचा, काय काळजी घ्यायची याबद्दलची माहिती जाणून घेण्यापूर्वी या पासपोर्ट संदर्भातली काही रोचक माहिती देतो.

या पृथ्वीतलावर आजमितीस एकूण २३१ सार्वभौम देश आहेत. प्रत्येक देशाच्या पासपोर्टचा आकार साधारणतः एकच असला तरी त्याचे रंग विविध आहेत. लाल, निळा, हिरवा आणि काळा अशा ४ रंगांचे पासपोर्ट जगभरात वापरले जातात. अमेरिकेच्या पासपोर्टचा रंग निळा आहे, कॅरेबियन देशांचे रंग देखील निळे आहेत. युरोप खंडातील अनेक देशांच्या पासपोर्टचा रंग जांभळा, गुलाबी, लाल अशा विविध रंगांमध्ये सजला आहे. चीन, रशिया, पोलंड, जार्जिया इत्यादी देशांच्या पासपोर्टचा रंग लाल आहे, मुस्लीम धर्मिय राष्ट्रांच्या पासपोर्टचा रंग हिरवा तर आफ्रिका खंडातील काही देशांच्या पासपोर्टचा रंग काळा आहे व न्यूझीलंडचा रंग देखील काळाच आहे. आपल्या भारताचा पासपोर्ट मात्र विविध रंगात (निळा, पांढरा, लाल) सजला आहे. असे रंग का याची वेगवेगळी कारणं आहेत.

• सर्व देशांपैकी सध्या जपानचा पासपोर्ट हा सर्वात शक्तिशाली समजला जातो कारण तेथील नागरिकांना जगभरातील तब्बल १९० देशामध्ये विना व्हिसा किंवा पासपोर्ट नसल्यावरही प्रवास करता येतो किंवा त्यांना ऑन अरायव्हल व्हिसा ही सुविधा लागू आहे.

● यानंतर सिंगापूर देशाची पासपोर्ट पॉवर जास्त समजली जाते. तेथील नागरिकांना केवळ ३२ देशांमध्ये जाण्यासाठी व्हिसा घ्यावा लागतो. यानंतर डेन्मार्क, फ्रान्स व फिनलंड या देशांचा नंबर लागतो.

आपल्या भारताचा विचार करता या यादीमध्ये आपल्या देशाचा ७९ वा नंबर लागतो. असो.

प्रत्येक भारतीयाला शिक्षण, नोकरी, पर्यटन, वैद्यकीय उपचार, समारंभ, कार्यक्रम वगैरे कारणासाठी परदेशात जावे लागते. त्यावेळी पासपोर्ट काढणे हे अत्यावश्यक असते. दुसरा कुठलाही पर्याय नसतो.

पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया समजून घेतली तर होणारा त्रास, मनस्ताप वाचतो. ही प्रक्रिया थोडक्यात समजून घेणे गरजेचे आहे. देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये पासपोर्ट ऑफिस असते.

• आजचे युग हे संगणक युग आहे. पूर्वी अर्ज हे हाताने भरावे लागायचे. आता मात्र सारे काही अर्ज ऑनलाईन आणि पारदर्शक पद्धतीने भरले जातात. आपल्या घरी जर इंटरनेट फॅसिलिटी असेल तर संबंधित वेबसाईटवर जाऊन ते अर्ज घरच्याघरी भरू शकता किंवा तसे नसेल तर एखाद्या एजन्ट मार्फतही वेगळे शुल्क भरून अर्ज ऑनलाईन भरू शकता.

● ऑनलाईन अर्जात माहिती भरताना सर्व कागदपत्रे सोबत ठेवावीत. पूर्ण नाव, जन्मदिनांक, स्थळ, पूर्ण पत्ता, शिक्षण, नोकरी वगैरेची माहिती काळजीपूर्वक आणि शांतपणे भरावी. त्यापैकी पॅन कार्ड आणि आधार कार्ड याची लिंक पासपोर्ट ऑफिसशी जोडलेली असते. त्यामुळे तुम्ही दिलेली माहिती ही पूर्ण, अचूक आणि खरी असावी लागते. नाहीतरी पुढे होणाऱ्या चौकशांमध्ये अनंत अडचणी येऊ शकतात.

संपूर्ण वैयक्तिक माहिती भरून झाल्यावर पासपोर्ट शुल्क भरावे लागते. यामध्ये सामान्य पासपोर्ट आणि तात्काळ पासपोर्ट असे दोन प्रकार असतात. पासपोर्टच्या पृष्ठांप्रमाणे ( पेजेस प्रमाणे ) हे शुल्क बदलू शकते. सध्या ३६ पृष्ठांसाठी १५००/-, ६० पृष्ठांसाठी २०००/ – तर तात्काळ पासपोर्टसाठी ३६ पृष्ठांसाठी ३५००/- तर ६० पृष्ठांसाठी ४०००/ – इतके शुल्क आकारले जाते. हे शुल्क आपण ऑनलाईन बँकिंग पद्धतीने भरू शकता किंवा स्टेट बँकेच्या कुठल्याही शाखेत जाऊन चलनाद्वारे शुल्क भरू शकता. त्याची पोच मात्र सोबत जोडावी लागते.

● ऑनलाईन अर्ज आणि शुल्क भरल्यावर, सर्व बाबी पार पडल्यावर तत्क्षणी आपणास पासपोर्ट ऑफिसच्या भेटीची तारीख व वेळ दिली जाते. (अपॉइंटमेंट). यामध्ये आपल्या सोयीची वेळ देखील आपण स्वतः निवडू शकता. त्या तारखेस, वेळेपूर्वी आपणास प्रत्यक्ष संबंधित मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या झेरॉक्स प्रती घेऊन पासपोर्ट ऑफिस मध्ये जावे लागते. टोकन मिळाल्यावर साधारणतः एकूण तीन टप्प्यांमध्ये तुमच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी, आवश्यक ते प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. भरलेली माहिती आणि कागदपत्रे अचूक असतील तर आपले काम वेळेत पूर्ण होते. मात्र एखाद्या टप्प्यावर तुम्ही उत्तरे देण्यास अथवा कागदपत्रे देण्यास कमी पडल्यास सर्व प्रक्रिया ठप्प पडून तुम्हाला पुन्हा अर्ज करावा लागतो.

• सर्व यथासांग पार पडल्यावर पासपोर्ट ऑफिस कडून तुम्हाला एक रिसीट दिली जाते. या भेटीचा रेकॉर्ड तुमच्या जवळील पोलीस स्टेशनला दिला जातो. त्याप्रमाणे दोन दिवसातच आपणाला पोलीस स्टेशनमधून फोन येतो. त्यानंतर पोलीस स्टेशन मधून प्रतिनिधी तुमच्या घरी प्रत्यक्ष येऊन वास्तव्याच्या पुराव्यांची पडताळणी करतो व तसा रिपोर्ट तो पासपोर्ट ऑफिसला देतो. यानंतर काही दिवसातच संबंधित पासपोर्ट ऑफिस रजिस्टर पोस्टाने तुमच्या घरच्या पत्त्यावर तुमचा पासपोर्ट पाठवतात.

परदेशात जाताना हा पासपोर्ट कायम तुमच्या जवळ बाळगणे हिताचे असते. हीच तुमची खरी ओळख असते. पासपोर्टच्या अनेक झेरॉक्स काढून सामानातील विविध ठिकाणी ठेवणे गरजेचे असते. पासपोर्ट जपून ठेवणे हे देखील महत्त्वाचे असते. जर पासपोर्ट हरवल्यास सर्वात प्रथम तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनकडे रितसर तक्रार दाखल करणे. ज्या देशात आपण जाणार आहोत त्या देशातील भारतीय दूतावासाचा नंबर, पत्ता, माहिती जवळ बाळगणे अत्यावश्यक असते. तिथे तक्रार नोंदवल्यास भारतीय दूतावास तुम्हाला तात्पुरता पासपोर्ट (Temporarory पासपोर्ट) देतात.

व्हिसा

पासपोर्ट तितकेच प्रमाणेच व्हिसा प्राप्त करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक जणांना वाटते की पासपोर्ट हातात असताना व्हिसाची आवश्यकता का? पण तसे नाही. पासपोर्ट म्हणजे आपल्या देशातून दुसऱ्या देशात फक्त जाण्यासाठीचा सरकारी दस्तावेज असतो. तिथल्या भूमीवर तुम्ही उतरू शकता. मात्र कुठल्या कारणास्तव तुम्हाला तिथे जायचे आहे, का जायचे आहे? किती दिवस मुक्काम असेल? आणि तो कुठे असेल अशा सर्व बाबींसाठी व्हिसा मिळवणे अत्यावश्यक असतो. त्या देशाचा व्हिसा नसेल तर तेथील विमानतळाहून तुम्हाला परतीचे तिकीट का थेट घरीच यावे लागते. थोडक्यात काय ‘व्हिसा’ म्हणजे एखाद्या व्यक्तीस बाहेरच्या देशात राहण्यासाठी दिलेली परवानगी असते. व्हिसा देताना त्यात मुदतीचा स्पष्ट उल्लेख असतो. पासपोर्ट आणि व्हिसा या दोन्हींचे वेळोवेळी नूतनीकरण करून घेणे आवश्यक असते. आणखीन एक… व्हिसा आणि पासपोर्ट दरम्यान महत्वाचा फरक असा आहे की व्हिसा एक अधिकृत परवानगी आहे जो तात्पुरते आम्हाला परदेशात रहाण्यास अधिकृत करतो आणि पासपोर्ट म्हणजे आमच्या प्रवासादरम्यान, आमची ओळख प्रमाणित करते असा एक दस्तऐवज.

प्रत्येक देशाची व्हिसा देण्याची एक स्वतंत्र पॉलिसी असते. विविध शर्ती, अटी, कायदे ठरलेले असतात.

मात्र अनेकवेळा तो देश त्यांची पॉलिसी सतत बदलत अथवा सुधारत (Modify) असतात. त्याची अद्यावत माहिती करून घेणे आवश्यक असते. जगाच्या पाठीवर असे काही देश आहेत की व्हिसाच्या वेळी तो देश आपणास सर्व पातळीवरून तावूनसुलाखून घेतो.

आर्थिक, मानसिक, शारीरिक तयारी कशी आहे हे देखील तो देश जाणून घेत असतो. व्हिसा मिळवताना सर्व काही आलबेल आहे असे वाटत असतानाच शेवटच्या क्षणी आपला व्हिसा अचानक नाकारला जातो. त्यासाठी व्हिसा मिळवण्यापूर्वीची पूर्वतयारी, योग्य कागदपत्रांची जुळवाजुळव करणे, मानसिक तयारी करून जाणे अत्यावश्यक असते. उदा. अमेरिका, यूरोप खंडातले देश, ऑस्ट्रेलिया, जपान इ. तर असे अनेक देश आहेत की ते देश आपणाला ऑन अरायव्हल व्हिसा देतात. म्हणजे आपण आपला पासपोर्ट घेऊन त्या देशात उतरल्यावर विमानतळावर आवश्यक ती कागदपत्रे दाखवल्यावर, जुजबी प्रश्नांची उत्तरे दिल्यावर आपणास तात्काळ व्हिसा दिला जातो. कंबोडिया, थायलंड, इंडोनेशिया, श्रीलंका, जॉर्डन, केनिया, भूतान, मालदीव, नेपाळ इ. त्या त्या देशात जाण्यापूर्वी त्या देशांची पॉलिसी पुन्हा तपासून घेणे आवश्यक आहे.

आपला व्हिसा हा एक स्वतंत्र दस्तऐवज असू शकतो परंतु बहुतांशी तो प्रवाशांच्या पासपोर्टमध्ये मारलेला एक स्टँप असतो. तर काही जणांचे पेपर्स असतात.

विविध प्रकारचे व्हिसा आहेत, सर्वात जास्त वापरलेले खालील प्रकार आहेत:
१. पर्यटक व्हिसा:
खास करून ‘पर्यटन व्हिसा’ हा पर्यटनाच्या
हेतूसाठीच दिला जातो. कुठे राहणार, किती काळापर्यंत वगैरेची माहिती घेतली जाते. परंतु एक असे निरीक्षण आहे की व्हिसा देताना पर्यटकांना विशेष त्रास दिला

जात नाही. त्यांची अडवणूकही केली जात नाही. फक्त येण्यासाठी पुरेसे पैसे आहेत ना याची खातरजमा केली जाते. काही देश तर ‘प्रवासी व्हिसा’ (Tourist Visa ) देखील देतात. उद्देश हाच की या निमित्ताने तो देश पर्यटनाला चालना देतो.

२. ट्रान्झिट व्हिसा: हा एक अल्पकालीन प्रकारचा व्हिसा आहे. अतिशय थोड्याच दिवसासाठीचा.

३. बिझनेस व्हिसा: हा व्हिसा व्यावसायिक हेतूंसाठी दिला जातो, जेणेकरून व्यापार वृद्धी व्हावी.

४. वर्कर व्हिसा: हा व्हिसा कायम स्वरूपाच्या कामगारांना देण्यात येतो. जेणेकरुन ते कायदेशीररित्या तेथे आपले काम करू शकतील.

५. फियांसी व्हिसा: हा व्हिसा त्याला देण्यात येतो, ज्याचा विवाह दुसऱ्या देशातील व्यक्तीशी ठरला आहे आणि त्याला या देशात जायचे आहे. जर एखाद्या व्यक्तीला भारतातील महिलेशी विवाह करायचा असेल तर त्याला हा व्हिसा देण्यात येतो.

विविध प्रकारचे व्हिसा आपणास कोण देतात?
व्हिसा देण्यापूर्वी आपल्याला कुठले प्रश्न विचारतात?
काय काळजी घ्यावी याबद्दल थोडेसे काही.

दूतावास
विविध देशांची वाणिज्य वाणिज्य दूतावास, वकिलात (Embassies Consulates ) यांची कार्यालये आपल्या मुंबईत आहेत. ज्या देशाचा आपणाला व्हिसा मिळवायचा आहे त्या कार्यालयाकडे विहित नमुन्यात अर्ज केल्यावर ( Online Application) त्या ऑफिसमधून आपणाला विशिष्ट दिवशी बोलावण्यात येते. त्यावेळेस त्यांनी दिलेल्या यादीत नमूद केलेल्या मूळ कागदपत्रांसह आपणाला समक्ष मुलाखतीला दिलेल्या वेळेपूर्वी जावे लागते.

मुलाखतीला जाण्यापूर्वी आपणास सर्व प्रकारची पूर्वतयारी ही करावीच लागते. अनेकवेळा दुसऱ्या देशातले अधिकारी आपली मुलाखत घेतात तेव्हा भाषेची अडचण होऊ शकते आणि गडबड होऊ शकते. त्यासाठी आधीच सोबत दुभाषी नेल्यास ही अडचण दूर होते. मुलाखतीस प्रत्यक्ष जाताना सोबत मोबाईल, खाण्याचे पदार्थ, धारदार वस्तू नेण्यास मनाई असते. औषधे मात्र नेऊ शकता. तुमच्याप्रमाणेच अनेक मंड तिथे आली असतात त्यामुळे वेळ किती लागू शकेल हे सांगता येत नसते. त्याप्रमाणेच तयारी करून जाणे. प्रत्यक्ष मुलाखत देताना अजिबात गडबडून जाऊ नये, जे प्रश्न विचारले जातील त्याचीच फक्त उत्तरे द्यावीत. नसेल माहिती तर शांत राहावे. अतिरिक्त माहिती अजिबात देऊ नये. विचारतील तेवढीच कागदपत्रे दाखवावीत. समोरील अधिकाऱ्याची खात्री आणि समाधान झाल्यावर काही वेळातच आपणाला व्हिसा दिला जातो किंवा कार्यालयाने आपला व्हिसा नाकारला असेही लगेच सांगण्यात येते. जर व्हिसा नाकारला तर आपला पासपोर्ट लगेच दिला जातो. मात्र व्हिसा मंजूर झाला तर तीन दिवसात कार्यवाही पूर्ण करून व्हिसा व पासपोर्ट कुरियरने आपल्या घरी पाठवतात. व्हिसा हाती पडल्यावर तुम्ही विमानाचे बुकिंग करू शकता.

सध्याचे कॉम्पुटर युग आहे. प्रत्येक देशाची स्वतंत्र वेबसाईट आहे. तिथे गेल्यावर आपणास संपूर्ण माहिती मिळू शकते. ती अनेक वेळा सारखी बदलतही असते. ती माहिती करून घेणे अत्यावश्यक असते. तत्पूर्वी पासपोर्ट, व्हिसाबाबतची इतकी जुजबी माहिती असणे हे प्रत्येक पर्यटकांचे कर्तव्यच असते.

मित्रांनो सर्व प्रकारची योग्य काळजी घेतल्यावर आपला परदेशातला प्रवास सुखकारक हा होणारच. त्यासाठी आपल्या पाठीशी सदैव आमच्या शुभेच्छा असणारच आहेत.

— के. राजू

(व्यास क्रिएशन्स च्या पर्यटन दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..