ही स्कंदपुराणाच्या मानसखंडातील कथा आहे. त्रेता युगात सूर्यकुलोत्पन्न चक्रवर्ती राजा ऋतुपर्ण अयोध्येवर राज्य करीत होता. एके दिवशी नल राजा आपली पत्नी दमयंती हिच्याबरोबर सारीपाट खेळत असताना खेळात हरला. शरमलेला नल राजा आपला मित्र राजा ऋतुपर्ण याच्याकडे आला व एखाद्या अज्ञात स्थळी आपल्याला लपवून ठेवण्याची ऋतुपर्ण राजाला विनंती करू लागला. ऋतुपर्ण राजा नल राजाला घेऊन हिमालयातील एका दुर्गम स्थळी आला. नल राजाला हवी तशी जागा मिळाली. ऋतुपर्ण राजाने त्याचा निरोप घेतला व मागे फिरला. परतीच्या प्रवासात राजाला एक हरीण दिसले. शिकारीसाठी राजाने हरणाचा पाठलाग सुरू केला. पाठलाग करत तो दारूक पर्वतावर पोहोचला. पण हरीण काही मिळाले नाही. थकलेला, दमलेला राजा विश्रांतीसाठी खाली बसला व बघता बघता कधी निद्राधीन झाला ते समजलेच नाही. झोपेत ते हरीण राजाच्या स्वप्नात आले व आपल्याला न मारण्याची विनंती करून त्याने राजाला क्षेत्रपालाची आराधना करण्यास सांगितले. स्वप्नात हरणाने सांगितल्याप्रमाणे ऋतुपर्ण राजा क्षेत्रपालाची आराधना करू लागला. क्षेत्रपाल प्रगट झाले व त्यांनी राजाला एका अद्वितीय गुहेची माहिती व गुहेकडे जाण्याचा मार्ग सांगितला.
क्षेत्रपालांच्या मार्गदर्शनाप्रमाणे राजा गुहेच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचला. द्वारपालांनी त्याचे स्वागत केले. राजाने गुहेत प्रवेश केला. सर्व गुहा नागमण्यांच्या प्रकाशात झगमगत होती. नागकन्या राजाला सोबत करत होत्या. रत्नजडित सिंहासनावर आरूढ झालेल्या शेषनागराजासमोर राजा उभा होता. शेषनागांनी ऋतुपर्ण राजाचे स्वागत केले. सर्व गुहा फिरून दाखवली व सांगितले, हे श्रीशंकराचे निवासस्थान असून तेहतीस कोटी देवदेवता, यक्ष, किन्नर, दानव, नाग या ठिकाणी वास्तव्य करून श्रीशंकराची आराधना करून त्याची कृपा संपादन करतात. ऋतुपर्ण राजाने श्रीशंकराचे, देवदेवतांचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. ऋतुपर्ण राजाने गुहेत सहा महिने वास्तव्य केले. एका शुभ दिनी शेषनागाने राजाला अपरंपार दिव्य आभूषणे, रत्ने देऊन निरोप दिला. निरोप देताना या गुहेचे रहस्य कोणालाही न सांगण्याचे बजावले. अन्यथा राजाला मृत्यू येईल, असे सांगितले.
ऋतुपर्ण राजा अयोध्येला परत आला. त्याने आणलेली दिव्य रत्ने, आभूषणे पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले व त्याबद्दल विचारणा करू लागले. खूप दिवस राजाने त्याबाबत मौन पाळले. पण एके दिवशी अनवधानाने तो राणीकडे सर्वकाही बोलून गेला. त्याक्षणी शिवदूत तेथे आले व ते राजाला शिवलोकी घेऊन गेले.
दिवसामागे दिवस उलटत होते. पण राणीच्या मनातील गुहेबद्दलची उत्सुकता कमी होत नव्हती. तिने गुहेचा शोध घेतला. राणीने गुहेत प्रवेश केला. पण तिला कुठेच चैतन्य दिसत नव्हते. सर्वत्र मूर्ती व निरनिराळ्या आकाराचे पाषाणखंड पसरले होते. राणी निराश झाली. आहे त्यावर समाधान मानून तिने मूर्तीचे दर्शन घेतले. राणी परत फिरली. सहज मागे वळून बघितले. गुहेचा दरवाजा बंद झाला होता. काहीच खुणा दिसत नव्हत्या.
द्वापार युगाचा अखेरचा कालखंड! पांडवांनी आपला अखेरचा प्रवास सुरू केला. नगाधिराज हिमालय त्यांना खुणावत होता. हिमालयाच्या कुशीत त्यांचे पदार्पण झाले. त्यांच्या आंतरिक मनाला या पवित्र गुहेची जाणीव झाली. आपल्या दिव्यदृष्टीने त्यांना सर्वकाही समजले. गुहेचे पावित्र्य व माहात्म्य त्यांनी ओळखले. त्यांची पावले गुहेकडे वळली. त्यांनी गुहेत प्रवेश केला. आनंदलेल्या पांडवांनी शंभू महादेवाचे, इतर देवतांचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. काही काळ त्या ठिकाणी वास्तव्य करून आपला पुढचा प्रवास सुरू केला. गुहेचा रस्ता बंद झाला.
कलीयुग सुरू झाले. हिंदू धर्माची प्रतिष्ठापना करण्यासाठी, अद्वैत तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आद्य शंकराचार्यांनी भारत भ्रमण केले. मठांची स्थापना केली. मंदिरांचा जीर्णोद्धार केला. मूर्तीची प्रतिष्ठापना केली. पुराणातील उल्लेखाच्या आधारे त्यांनी या गुहेचा शोध घेतला व एके दिवशी त्यांनी गुहेत प्रवेश केला. त्यांनी या स्थानाचे माहात्म्य ओळखले. आनंदलेल्या शंकराचार्यांनी देवदेवतांचे दर्शन घेतले. ताम्रशिवलिंगाची स्थापना केली व गुहेचा दरवाजा सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कायमचा उघडा ठेवण्यासाठी विश्वनाथाची प्रार्थना केली.
या गुहेचे स्कंदपुराणात तसेच लिंगपुराण व शिवपुराणात उल्लेख आले आहेत. साधारण १८ व्या शतकापर्यंत उत्तराखंडावर कत्युरी-चांदवंशीय राजे राज्य करत होते. पुराणातील उल्लेखांचा संदर्भ घेत इ.स. ११९१ मध्ये ज्ञानचंद्र या चांदवंशीय राजाने या गुहेचा शोध घेतला व काशीहून वेदशास्त्रसंपन्न भंडारी लोकांना या ठिकाणी आणले. त्यांना जमिनी इनाम दिल्या. त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय केली व वंशपरंपरेने पूजाअर्चेचे हक्क त्यांना दिले. आज हे स्थान ‘पाताळ भुवनेश्वर’ म्हणून प्रसिद्ध आहे व भंडारी लोकांची १८ वी पिढी या ठिकाणी कार्यरत आहे.
पाताळ भुवनेश्वर ही लाइम स्टोन गुहा आहे. जगात अशा प्रकारच्या गुहा फारच कमी प्रमाणात पाहायला मिळतात. इटली, युगोस्लाव्हिया, अमेरिकेत अशा प्रकारच्या गुहांचा शोध घेण्यात आला आहे. थरांच्या खडकात अशा प्रकारच्या गुहांची निर्मिती होते. थरांच्या खडकात असलेल्या चुनखडी किंवा डोलामाइट थरांच्या संपर्कात जेव्हा जमिनीत झिरपलेले पाणी येते आणि जर या पाण्यात कार्बन डायऑक्साइड वायूचे प्रमाण असेल तर हे थर या पाण्यात विरघळतात व पोकळ्या निर्माण होतात. हवेच्या घर्षणाने, वाऱ्याने या पोकळ्या रूंदावतात व परिणामी गुहांची निर्मिती होते. आत झिरपणाऱ्या पाण्यात निरनिराळ्या खनिजांचे क्षार विरघळलेले असतात. बऱ्याच वेळी पाण्याचे थेंब छताला चिकटून राहतात. पाण्याचे बाष्पीभवन होते. पण क्षाराचा कण छताला चिकटून राहतो. अशा कणांची संख्या वाढत जाते व शेवटी त्याला छताला लोंबकळणाऱ्या खडकाचा आकार प्राप्त होतो. अशा खडकाला STALACTITE असे म्हणतात. अशाच प्रकारे जमिनीवर पण निरनिराळ्या आकाराचे खडक निर्माण होतात. अशा खडकांना STALAGMITE असे म्हणतात. निरनिराळ्या धातूंच्या क्षारांमुळे अशा खडकांना निरनिराळे रंग प्राप्त होतात. जसे कॅल्शियममुळे पांढरा, लोहामुळे लाल, मँगेनीजमुळे काळा तर तांब्यामुळे निळसर छटा! काही कालांतराने हे खडक इतके मोठे होतात की त्यांचे रूप एखाद्या भिंतीसारखे होते. अर्थातच ही प्रक्रिया हजारो वर्षे सुरू असते.
पाताळ भुवनेश्वर गुहा अशा प्रकारची आहे. गुहेतील खडकांना प्राप्त झालेल्या निरनिराळ्या आकारांशी निरनिराळ्या पौराणिक घटना, कथांचा, मिथकांचा संबंध जोडला आहे. हे कुणी केले, केव्हा रचले, कसे केले हे काहीच माहित नाही. पण आहे ते एक वेगळाच अनुभव देणारे. भव्य, दिव्य, पवित्र! निसर्गाचा हा एक अद्भुत चमत्कार आहे हे निश्चित. पुराणवस्तु संशोधन विभागानेसुद्धा हे स्थान संरक्षित स्थळ म्हणून जाहीर केले आहे.
हिमालयाच्या कुशीतील उत्तराखंड राज्याचा कुमाऊँ हा एक भाग. अनेक पौराणिक घटनांचा साक्षीदार. प्राकृतिक सौंदर्याने नटलेला! भगवान श्रीविष्णू आपल्या कुर्मावतारात इथेच प्रगट झाले म्हणून हा भाग कुर्माचल म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याचा अपभ्रंश म्हणजे कुमाऊँ. या कुमाऊँमधील पिठोरागड जिल्ह्यातील पाताळ भुवनेश्वर हे स्थान दिल्लीपासून साधारण ५०० कि.मी. दूर आहे. दिल्लीहून टणकपूर, चंपावत, गंगोलीहाट मार्गे किंवा अल्मोडा, सेराघाट मार्गे पाताळ भुवनेश्वरला पोहोचता येते. गंगोलीहाटपर्यंत बससेवा उपलब्ध आहे. गंगोलीहाट ते पाताळ भुवनेश्वर हा १४ कि.मी. प्रवास जीपने करावा लागतो. त्यासाठी गंगोलीहाटला जीप उपलब्ध असतात. पातळ भुवनेश्वर उंची आहे १३८० मीटर्स.
गंगोलीहाट! काही ठिकाणी या स्थानाला गंगवाली असे संबोधले आहे. उत्तराखंड राज्यात गंगोलीहाट प्रसिद्ध आहे ते येथील हाट-कालिका मंदिरामुळे कुमाऊँमध्ये असलेल्या देवीच्या प्रमुख अठरा मंदिरांमध्ये हे स्थान सर्वांत महत्त्वपूर्ण स्थान म्हणून समजले जाते. हे एक महत्त्वाचे शक्तिपीठ म्हणून ह्या परिसरात प्रसिद्ध आहे. या देवस्थानाची स्थापना शंकराचार्यांनी केली. ही देवी म्हणजे कलकत्त्याची कालीमाता असेच मानले जाते. हे पुरातन स्थळ आहे. पण ह्या मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार केला गेला. आज या मंदिराचे रूप नवीनच बांधलेल्या मंदिरासारखे आहे.
चीड, पाईन वृक्षांच्या दाटीत दडलेले मंदीर! मंदिरात जाण्यासाठी सुरेख पायऱ्यांचा रस्ता असून मुख्य प्रवेशद्वारापासून मंदिरात साधारण ५-१० मिनिटात पोहचता येते. हे सर्व वातावरण अतिशय प्रसन्न आहे. मुख्य मंदिरात काळ्या संगमरवरापासून बनवलेली साधारण ३ फूट उंचीची महाकालीची मूर्ती आहे. मुर्तीचा डावा पाय एक शवावर आहे. असे सांगतात की ह्या ठिकाणी देवीने महिषासुराशी युद्ध केले होते. ह्या युद्धात महिषासूर, चंडमुंड, रक्तवीर्य इ. अनेक राक्षस देवीने यमसदनाला पाठवले. मंदिराच्या परिसरात गणपती, भैरव, शिवपार्वती तसेच विष्णूची मंदिरे आहेत. मंदिरांच्या परिसरात एक छोटे वस्तुसंग्रहालय असून त्यात ८ व्या ते ११ व्या शतकातील काही मूर्ती तसेच शिल्पकलांचे नमुने ठेवले आहेत.
हे स्थळ सैन्यदलात विशेषत: कुमाऊँ व गढवाल रेजिमेंटमध्ये फार प्रसिद्ध आहे. कॅप्टन बिकाराम बात्रा हे तर कालिकादेवीला शौर्य देवता म्हणून पूजत. देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या सेनादलातील लोकांच्या सोईसाठी सेनादलातील लोकांनी या ठिकाणी एक विश्रामगृह बांधले आहे.
दर चैत्र व अश्विन महिन्यात या ठिकाणी खूप मोठी यात्रा भरते. हजारो लोक देवीच्या दर्शनासाठी येतात. इष्ट देवता म्हणून लोक श्रद्धेने तिचे दर्शन घेतात. चंदराजाच्या कारकिर्दीत हे एक समृद्ध देवस्थान होते. गंगोलीहाटमध्ये चानुंडा मंदीर व वैष्णवी मंदीर ही आणखी दोन प्रसिद्ध मंदिरे आहेत. वैष्णवी मंदिर एका डोंगरावर आहे. या डोंगराला ‘शैल्य पर्वत’ म्हणून ओळखले जाते. या ठिकाणाहून हिमालयाच्या पर्वत रांगांचे फार सुरेख दर्शन होते. गंगोलीहाटपासून जवळच असलेल्या हाटगाव या ठिकाणचे गंगनाथ मंदीर सुद्धा खूप प्रसिद्ध आहे.
विशेष म्हणजे गंगोलीहाट परिसरात खूप गुहा सापडल्या आहेत. पाताळ-भुवनेश्वर तर भुवैज्ञानिकांच्यात खूप प्रसिद्ध आहे. या शिवाय मुक्तेश्वर, कोटेश्वर, गुप्तेश्वर, शैलेश्वर या गुंफासुद्धा प्रसिद्ध होत आहेत. नुकतीच भुली गावाजवळ एक नवीन गुंफा मिळाली आहे. भुलेश्वर म्हणून आता लोक त्या गुंफेला ओळखू लागले आहेत.
गंगोलीहाट हे तालुक्याचे मुख्यालय आहे. कुमाऊँमधील सर्व मुख्य शहरापासून गंगोलीहाटसाठी बससेवा उपलब्ध आहे. सर्व प्रवासी सोई-सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत.
गंगोलीहाटपासून पाताळ भुवनेश्वर प्रवास जीपने करावा लागतो. चीड पाईन वृक्षांच्या दाटीतून जाणारा सुरेख रस्ता. उंच पर्वतशिखरे. खोल दऱ्या. वृक्षांच्या दाटीतून डोकावणारी आदी-अनादी, अनंत शाश्वत हिमालयाची बर्फाच्छादित पर्वत शिखरे. गूढरम्य शांतता, वाऱ्याची सोबत करणारा जंगली फुलांचा परिमल असा हा अतिशय रमणीय गंगोलीहाट ते पाताळ भुवनेश्वर प्रवास आहे. हा प्रवास म्हणजे पक्षी निरीक्षणासाठी सुवर्णसंधी आहे.
जीपमधून उतरले की समोरच्या पायऱ्या उतरायच्या व उजवीकडे वळायचे. समोर कुमाऊँ मंडळ विकास निगमचे विश्रामधाम आपले स्वागत करते. ठिकाणी राहण्याची तसेच जेवणाची माफक दरात सुरेख व्यवस्था आहे. पुढे हाच रस्ता गुहेच्या वेशद्वारापाशी पोहोचतो. त्या ठिकाणी मार्गदर्शक आपले स्वागत करतात.
साधारण ३ x ४ फूट प्रवेशद्वारातून आपण गुहेत प्रवेश करतो. खडकात कोरलेल्या पायऱ्या! पहिले १० ते १५ फूट वाट जरा अडचणीची आहे. मग मात्र वाट प्रशस्त आहे. पूर्ण वाटेवर साखळदंड बांधला असल्याने उतरतांना किंवा परतीच्या मार्गात काही अडचण येत नाही. परत सर्व मार्ग, तसेच गुहा विजेच्या प्रकाशाने उजळली आहे. पुढे सरकू तसे हा मार्ग विस्तारत जातो. त्यामुळे या ठिकाणी कोणताही धोका नाही.
साधारण ८० ते ८५ पायऱ्या उतरून आपण गुहेत येतो व मग जमिनीवर. छताला लोंबकळणारे, आजूबाजूला चित्रविचित्र आकाराचे खडक दिसू लागतात. या गुहेची खोली ९० फूट असून साधारण ३०० चौ. मीटर आकार आहे. गुहा आतून खूप प्रशस्त आहे. जमिनीवरील ठराविक अंतरावरील उंचवटे दाखवत मार्गदर्शक सांगू लागतो, हे शेषनागाच्या पाठीचे मणके. आपण शेषनागाच्या मुखातून गुहेत प्रवेश केलात. जवळच शेषनागाचा फणा, दात व विषग्रंथी दाखवून एक हवन कुंड दाखवले जाते. मार्गदर्शक सांगतो की या ठिकाणी जनमेजय राजाने उलंग ऋषींच्या आदेशानुसार सर्पयज्ञ केला होता. थोडे पुढे विघ्नहर्त्या गणेशाचे दर्शन होते. गणेशावर छताच्या सहस्रदल कमळातून अखंड जलाभिषेक होत असतो.
गणेशासमोरील जमिनीवरचे तीन उंचवटे लिंगरूपातील केदारनाथ, बद्रीनाथ व अमरनाथ म्हणून दाखवले जातात. थोडे पुढे काळभैरवाचे दर्शन होते तर छताला लोंबकळणारा एक खडक काळभैरवाची जीभ म्हणून सांगितला जातो. जवळच चार गुहांच्या वाटा दिसतात. त्यापैकी एक रणद्वार म्हणून ओळखले जाते. महाभारतातील धर्मयुद्धानंतर ही वाट बंद झाली तर दुसरी वाट पापद्वार म्हणून ओळखली जाते. ही वाट रावणवधानंतर बंद झाली. तिसरी वाट धर्मद्वार म्हणून ओळखली जाते. ती कलियुगानंतर बंद होईल तर चौथी वाट मोक्षद्वार सत्ययुगानंतर बंद होईल.
काळभैरवासमोर श्रीशंकराचे आसन, पाताळचंडी व वाघाच्या मुखाचे दर्शन होते. तर मोक्षद्वारासमोर पारिजातक वृक्ष पाहायला मिळतो. पुढे छताला चिकटलेले ब्रह्मदेवाचे शीर दिसते. या स्थानाला ब्रह्मकपाल म्हणतात. श्रद्धाळू भाविक आपल्या पितरांना या ठिकाणी तर्पण करतात. छतातून या ठिकाणी कायम पाणी झिरपत असते. त्याला कामधेनूची दुग्धधारा समजले जाते.
पुढे एक जलकुंड दिसते. या कुंडाचे पाणी फक्त सर्पच प्राशन करू शकत. या जलकुंडाच्या रक्षणाची जबाबदारी ब्रह्मदेवानी एका हंसावर सोपवली होती. पण एके दिवशी हंसाला मोह झाला व त्याने कुंडातील जल प्राशन केले. हे जेव्हा ब्रह्मदेवाला समजले तेव्हा त्यांनी हंसाची मान पिरगाळून उलटी करून ठेवली. या हंसाच्या दर्शनानंतर शंकराच्या जटांचे दर्शन होते. हे छताला लोंबकळणारे अजस्र खडक म्हणजे Stalactite Dripstone Formation चा एक उत्कृष्ट नमुना आहे. या पांढऱ्या काळसर रंगाच्या खडकावरून अखंडपणे पाणी झिरपत असते. या जटांखाली सर्व देवदेवता लिंगरूपात श्रीशंकराची आराधना करत असतात अशी श्रद्धा आहे. जवळच ताम्रपत्रजडित लिंग त्रिमूर्तीचे (ब्रह्मा, विष्णू व महेश) दर्शन होते. आद्य शंकराचायांनी इ.स. ८२२ मध्ये आपल्या कैलास मानस यात्रेवेळी या स्थानाला भेट दिली होती व त्यावेळी त्यांनी या लिंगाची प्रतिष्ठापना केली असे समजले जाते. जवळच काशीकडे जाणारा मार्ग दिसतो. त्यापुढे जमिनीवर चार उंचवटे दिसतात. मार्गदर्शक सांगतो, ही चार युगांची प्रतीके आहेत. त्यापैकी एकाचा आकार वाढत आहे. ते कलियुगाचे प्रतीक आहे. जेव्हा ते भिंतीला स्पर्श करेल तेव्हा प्रलय होईल. जवळच आणखी सात उंचवटे दिसतात. ते द्रौपदीसह पाच पांडव श्रीशंकराशी सारीपाट खेळत आहेत. मार्गदर्शक पुढे सांगतो, आपल्या वनवासाच्या काळात पांडवांनी याच ठिकाणी काही वेळ वास्तव्य करून श्रीशंकराची आराधना केली होती व इथूनच ते गुप्त मार्गाने बद्रीनाथला गेले होते.
जवळच एक गुहा दिसते. त्याच्यावर दोन मार्ग दिसतात. ते त्रेता व द्वापार युगाशी निगडित आहेत. तर जवळची गुहा रामेश्वर गुहा म्हणून सांगितली जाते. समोरील छताकडे नजर टाकली असता अनेक उंचवटे दिसतात. त्यांची ओळख ऐरावताचे सहस्र पाय अशी करून दिली जाते.
काही उघड्या तर काही वाटा बंद झालेल्या! तसेच खडकांना आलेले निरनिराळे आकार व त्या अनुषंगाने सांगितल्या जाणाऱ्या पौराणिक घटना व गोष्टी, मग त्या पटोत अथवा न पटोत! पण ही २०-२५ मिनिटांची सफर हा मात्र एक वेगळाच आनंद देणारा आहे, अद्भुत आहे, हे निश्चित! अनेक देशी-परदेशी प्रवाशांनी, संशोधकांनी या गुहेतील काही गुहांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही.
पाताळ भुवनेश्वर हे गुहेत स्थापलेले एक शिवमंदिर आहे. (Cave Temple) पण शैव, वैष्णव, शाक्त सांप्रदायांचे भाविक या स्थळी आवर्जून येतात. गुहेत सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजता प्रवेश दिला जातो. वर्षात कधीही या स्थानाला भेट देता येते. महाशिवरात्र व शनि प्रदोषाच्यावेळी येथे मोठा उत्सव असतो. त्यावेळी खूप भाविक येथे येतात.
गुहेपासून साधारण अर्धा कि.मी. अंतरावर पाताळ भुवनेश्वर ही ५०-६० घरांची वस्ती आहे. या ठिकाणी कत्युरी शैलीतील वृद्ध भुवनेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर १० व्या शतकात बांधले असावे असा अंदाज आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर द्वारपालांच्या भव्य मूर्ती असून जवळच शिव-पार्वतीची भग्न मूर्ती आहे. मंदिर परिसरात काळ, नीळ, भैरव व चामुंडा देवीची छोटी मंदिरे आहेत. या परिसरात विष्णू, सूर्य, महिषासूरमर्दिनी व इतर पुरातन मूर्ती पाहायला मिळतात.
अथांग हिमालयाच्या कुशीत विसावलेले पाताळ भुवनेश्वर हे हिरवाई व्यापलेले, सुंदर फुलांनी नटलेले पक्ष्यांचे गोड कुंजन ऐकत बसलेले, चीड-पाईन वृक्षात हरवलेले एक अतिशय रमणीय स्थान आहे. पंचचुली, पिंडारी, नंदादेवी, राजरंभा, अन्नपूर्णा, मत्स्यपुच्छ इ. भारत व नेपाळमधील अनेक हिमाच्छादित पर्वत रांगांचे इथून फार सुंदर दर्शन होते.
अंधाऱ्या रात्री काळ्या मखमलीचा पडदा आकाशावर पसरलेला असतो व त्यावर असंख्य नक्षत्रांचे, तारकांचे हिरेमोती जडवलेले असतात. काळ्या पार्श्वभूमीवर हे नक्षीकाम नेत्ररम्य वाटते. डोंगर दऱ्यात मधूनच दिवे चमकत असतात. वस्तीच्या खुणा सांगत असतात.
पहाट होते. चांदण्या निस्तेज होऊ लागतात. वातावरणात सुखद गारवा पसरलेला असतो. पक्षी किलबिल करू लागतात. पूर्वेकडून प्रकाशाचे संकेत येऊ लागतात. हळूच पर्वतरांगांच्या अस्तित्वाची जाणीव होऊ लागते. पूर्वा उजळू लागते. दऱ्याखोऱ्यात धुकं रेंगाळत असते. पूर्वा उजळते. उष:कालाची लाली ती आपल्या कपाळी लावते. काही वेळातच या मंगलमय गुलाबी रंगाची जागा सुवर्णकांती होते. हिमशिखरे तेजस्वी सुवर्णकांतीने झळकू लागतात. येणाऱ्या रविराजाच्या स्वागतासाठी साजशृंगार करून पूर्वा तयार होते. सर्व वातावरण प्रसन्न होते आणि काही क्षणात पूर्वेच्या भाळी कुमकुमतिलकासारखी बिंदी चमकू लागते. त्या हिरण्यगर्भाकडे पाहून नकळत हात जोडले जातात.
-प्रकाश लेले
Leave a Reply