नवीन लेखन...

पतंग

संक्रांतीचा दिवस असतो. एक आई आणि तिचा लहान मुलगा घराच्या गच्चीवर पतंग उडवायला जातात. आईने मुलासाठी छान रंगीत पतंग आणलेला असतो. मांजा बांधून आई आणि मुलगा पतंग उडवायला लागतात.

आजुबाजूच्या घरांच्या गच्च्यांतून असाच नजारा दिसत असतो. सगळीकडे रंगीबेरंगी पतंग उडत असतात. या मुलाचा पतंगही वर वर जात असतो. ते पाहून त्या मुलाला फार आनंद होतो.

त्या मुलाला आपला पतंग ढगांपर्यंत पोहोचवायचा असतो. तो प्रयत्न करतो परंतु मांजाच्या लांबीची मर्यादा येते. तो मुलगा आईला म्हणतो “हा मांजा त्या पतंगाच्या आड येतो आहे. तो कापला तर माझा पतंग अगदी सहज आकाशापर्यंत जाऊन पोचेल. ”

आई म्हणते “मांजामुळे पतंग वर वर जातो आहे. त्याची दोरी कापलीस तर पतंग वर जाऊ शकणार नाही.” मुलाला आईचे बोलणे पटत नाही. तो नाराज होतो. ते पाहून आई म्हणते “ठीक आहे. मी तुझ्या पतंगाची दोरी कापून टाकते. पाहू तुझा पतंग आकाशाला कसा भिडतो ते.”

आई पतंगाचा मांजा कापून टाकते. पतंग थोडावेळ उंच जात रहातो आणि अचानक खाली कोसळतो. मुलगा निराश होतो. तो आईकडे बघतो. आई म्हणते “मी तुला म्हणाले होते की पतंगाची ताकद मांजामुळे आहे. तुला ते पटले नाही. आता तुला त्याचे प्रात्यक्षिक बघायला मिळाले.”

आई त्याला समजावते “या पतंगाचे जसे आहे तसेच आपलेही असते. आपण आयुष्यात वर वर जातो म्हणजेच प्रगती करतो त्यासाठी आपल्याला आपल्या कुटुंबाचे, मित्रांचे व हितचिंतकांचे बळ मिळत असते. आपण त्यांची कदर केली नाही व यशस्वी झाल्यावर त्यांच्याशी संबंध तोडले तर ते पतंगाची दोरी कापण्यासारखेच होते. कुठल्याही माणसाचे यश एकटे नसते. त्यासाठी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष अनेक लोकांची मदत, शुभेच्छा, प्रार्थना व इच्छाशक्ती उपयोगी आलेल्या असतात. आपल्याला वाटते की आपणच एकट्याने सर्व काही मिळवले. प्रत्यक्षात तसे कधीच नसते.

एक गरीब कुटुंब आपल्या मुलाला मोठा बनविण्यासाठी अनेक त्याग करते. कदाचित त्या मुलाची मोठी बहिण आपले शिक्षण त्याच्यासाठी सोडून देते. आई वडील काटकसर करुन पैसे वाचवतात. ते सर्व त्याच्यासाठी. मुलगा यशस्वी होतो आणि मोठा होतो. त्यावेळेला तो असे म्हणू शकतो काय की मी स्वबळावर मोठा झालो? त्याची मेहनत निःसंशय महत्वाची आहे. परंतु त्याला खाणे पिणे, शिक्षण, इतर खर्च, वेळेच्या वेळी मिळाले नसते तर तो त्या पदापर्यंत पोचू शकला असता काय?

जसे या मुलाचे तसेच आपले सर्वांचे असते. निसर्गात सुध्दा सर्व घटक एकमेकांना मदत करत असतात, एकमेकांना पूरक असतात. म्हणूनच निसर्गाचा समतोल सदैव सांभाळला जातो. कोणीच असे म्हणत नाही की मी माझ्या शक्तीवर मोठा झालो आहे. वृक्षाला माहित असते की त्याला बिजापासून वृक्ष व्हायला माती, पाणी, उजेड, वारा इत्यादींची मदत झाली आहे. त्यामुळेच त्या बिजाचे वृक्षात रुपांतर होऊ शकले. पक्ष्यांना माहित असते की त्यांच्या अन्न व निवाऱ्याची सोय निसर्गातले इतर घटक करत असतात. निसर्ग जर या तत्वाला मानतो तर मानव का बरे एकटाच स्वतःला श्रेष्ठ समजतो? ”

आईचे बोलणे ऐकून मुलगा विचारात पडला. त्याला तिचे बोलणे पटले. तो दुसरा पतंग आणायला आणि त्याला मांजा बांधायला सिध्द झाला. त्याला आता खात्री वाटत होती की त्याचा पतंग नक्कीच आकाशात विहरेल.

— नीला सत्यनारायण

अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..