
#पाठलाग
©अर्चना बोरावके”मनस्वी”
त्यांच्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस होता… हॉटेलमध्ये मोठी पार्टी ठेवली होती समीरने. ऑफिस मधले आणि बिझनेसशी संबंधित अनेक लोक बोलावले होते. सगळं भव्यदिव्य करण्याच्या समीरच्या हट्टाने, हा आनंदाचा क्षण, जो फक्त तिला समीरबरोबर साजरा करायचा होता, तो हातातून निसटून गेला होता. असेच किती तरी हळुवार क्षण मुठीतून वाळूसारखे निसटून चालले होते… कितीही घट्ट पकडून ठेवायचा प्रयत्न केला तरी!
आलेल्या लोकांची ती खोटी स्तुती, त्यांच्या तितक्याच वरवरच्या शुभेच्छा आणि फायद्यातोट्याचे गणित जुळवून आणलेल्या त्या भेटवस्तू या सगळ्याचा सईला उबग आला. तिला ही दुनिया नकोशी झाली. कसातरी तो समारंभ पार पडला. सगळे पाहुणे गेले. सर्व भेटवस्तू गोळा करून मुलांनी गाडीत ठेवल्या. घरी येतायेता पहाटेचे दोन झाले होते. मुले लगेच झोपायला गेली… समीर थकून गेला होता. आलेल्या प्रत्येकाशी हसून बोलता-बोलता आता मात्र त्याचं हसू मावळून गेलं होतं. तोही झोपायला निघाला. जाताना सईला इतकंच म्हणाला, ” उद्या महत्त्वाची मीटिंग आहे… नऊच्या आत घराबाहेर पडायचंय… जाग नाही आली तर उठव मला.”
लग्नाचा वाढदिवस संपला. पार्टी आणि पाहुणे हे सोडून ते दोघे आज एकमेकांशी काहीही वेगळं बोलले नव्हते. इतका खास दिवस पण तोही रोजच्यासारखा आला आणि गेला. सईला झोप येईना. ती हॉलमध्ये आली…. मागची सारी वर्षे आज तिच्यापुढे उभी राहिली होती. ती विचार करत किती तरी वेळ बसुन राहिली.
सकाळी तिने समीरची सर्व तयारी करून दिली. त्याची फाइल हातात दिली. दारात उभी राहून त्याला हात हलवून बाय करत होती.. पण समीरचं तिकडे लक्षही गेलं नाही. घाईने गाडीत बसताना ड्रायवरला “लवकर पोहोचव” असं सांगुन त्याने मीटिंगची फाईल काढली… मीटिंगपूर्वी एकदा सर्व मुद्दे डोळ्याखालून पुन्हा घालायची त्याला सवयच होती. तोच फाईलमधून एक चिट्ठी पडली. त्याने उघडली.
समीर,
इतक्या वर्षात कधी असा पत्र लिहिण्याचा प्रसंग आला नाही… कारण आधी मी न बोलताही माझ्या मनातलं तुला सर्व कळायचं. आणि नंतर मला तुझ्या मनातलं तुझ्या स्वप्नांचं स्थान कळू लागलं होत, म्हणुन काही बोलले नाही… पण आज बोलते आहे.. अंह.. लिहिते आहे… कारण ती वेळ आली आहे.
आपण बरोबर सव्वीस वर्षापूर्वी भेटलो होतो… एका प्रदर्शनात! माझ्या पेंटिंगचा स्टॉल तुमच्या कंपनीच्या स्टॉलच्या समोरच होता. माझी पेंटिंग पाहायला तू आलास, आणि माझ्या हृदयाच्या कॅनव्हासवर तुझी छाप उमटवून गेलास. ते चार दिवस पुरे होते आपल्याला एकमेकांच्याजवळ यायला. त्या चार दिवसांनी आपलं आयुष्य बदललं . तुझ्या कंपनीचा चांगला सेल झाला… तुला प्रमोशन मिळाले आणि मला आयुष्यभरासाठी तू!
तू म्हणाला, ” सई, तुझे माझ्या आयुष्यात येणे किती शुभ आहे बघ. तू माझी लकी चार्म आहेस.. माझ्या आयुष्यालाही असंच चार्मिंग बनवशील?”
आपल लग्न लवकरच झालं. मी तुझ्या घरी आले. चाळीतल्या त्या दोन खोल्यांच्या जुनाट घराला तू आपली चंद्रमौळी झोपडी म्हणायचा. घर छोटं पण आनंद आभाळाएव्हढा होता. सुखाच्या सरींची एकमेकांवर बरसात करत आपण प्रेमाच्या वर्षावात चिंब भिजत होतो. तुझे ते रोज ऑफिसला जाणे , माझं तुझी वाट पहात दिवसभर तुझ्या आठवणीत रमणे आणि तू आल्यावर त्या क्षणांना कवेत घेत नव्या आठवणी गोळा करत प्रत्येक दिवस मनात साठवणे ! सगळंच अनोखं, सगळंच हवंहवंस!
माझ्या सुखासाठी काय वाट्टेल ते करायला तू धडपडायचा. प्रत्येक दिवस खास करण्यासाठी नवे काहीतरी करायचा. कधी येताना गुलाबाची फुले, तर कधी मोगऱ्याचे गजरे, कधी सिनेमाची तिकिटे, तर कधी समुद्राकाठची भटकंती…. ती ओली भेळ, ते हातात हात गुंफून वाळूत चालणं, मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून पाहिलेली ती स्वप्नं! तुझ्या डोळ्यात मला कायम तो सूर्य दिसायचा, ज्याला पूर्ण तेजाने तळपण्याची ओढ लागली होती. संध्याकाळच्या वेळी जरी तो शांत झालेला दिसायचा पण त्याच्या आतली ती खळबळ मला जाणवायची. . वाळूवर उमटलेली ती तुझी पाऊले, तुला इतकी घट्ट रोवायची होती की, त्या पावलांचा ठसा कुणी पुसून टाकूच शकणार नाही.
मीही तुला मग तुझ्या स्वप्नांच्या पाठीमागे धावायला प्रोत्साहन दिले. घरातील सर्व जबाबदाऱ्यांचे पाश मी तुझ्यापासून सोडवले . तू मुक्त होऊन उडावे म्हणुन आपल्या छोट्याशा जगातून तुला मी अशा जगात जाऊ दिले, जिथून परतायचा रस्ताच तुला आता सापडत नाहीये. दिवसरात्र तू मेहनत करू लागला, छोटी धाव घेत-घेत, उंच झेप घेऊ लागला, स्वतःचा बिझनेस उभा केला. आणि कामात आकंठ बुडाला.
मुले मोठी होत गेली, तुझी स्वप्नेही मोठी होत गेली, आपलं घरही मोठं झालं. तुला हवं होतं ते सगळं तू निर्माण केलंस. आयुष्य सुखाने जणू भरून टाकायचा तू ध्यासच घेतला. घर किमती वस्तूंनी भरले… आपल्या आयुष्यातील महत्वाच्या दिवसांचे मोठे सोहळे होऊ लागले… या सोहळयांचा दिखाऊपणात मनातले प्रेमही जणू ओशाळले… ते कुठे तरी लांब जाऊ लागले … माझ्या दर वाढदिवसाला मला नवा दागिना तू आणतोस, मोठं सेलिब्रेशन करतोस. लग्नाचा वाढदिवस तर खूपच मोठा केला. पण समीर तू काल मला एकदाही प्रेमाने जवळ घेऊन आपल्या खास दिवसाच्या शुभेच्छा आपल्या नेहमीच्या पद्धतीने दिल्या का? मी एक दोनदा मोठ्या आशेने तुझ्याजवळ आले, पण तीही संधी भोवतालच्या गर्दीने हिरावून घेतली.
काही स्वप्ने इतकी मोठी असतात का रे? की त्यांचा पाठलाग करताना आधी पाहिलेली छोटी-छोटी स्वप्ने हरवून जातात! चाळीतल्या त्या दोन खोल्यांच्या घराला आपण आपली चंद्रमौळी झोपडी म्हणायचो. पावसाळ्यात घरात पाणी टपकायचे तेव्हा तू छत्री घेऊन राज कपूर व्हायचास आणि मी नर्गीस बनून त्या परिस्थितीतही आनंदाचे साम्राज्य पसरवायचो . निरभ्र रात्री छताच्या छिद्रांतून अंगावर येणारे चांदणे पांघरुन आपण एकमेकांच्या बाहूत विसावून जायचो…. आयुष्यभर असंच प्रेम करत रहाण्याचं वचन आपण चंद्रकिरणांच्या साक्षीने एकमेकांना द्यायचो. तेव्हा वाटायचं, सुख म्हणतात ते हेच! मी आपल्या सुखी संसाराची चित्रे रेखाटत होते आणि तू त्यात रंग भरत होता. तुझ्या स्वप्नांच्या दुनियेत माझी हक्काची जागा होती….
पण आपली सुखाची व्याख्या कधी बदलली हेच मला आज समजेनासे झाले आहे. स्वप्ने बदलत गेली की मी दुरावत गेले? इतक्या मोठ्या बंगल्यात आज मला तो आनंद वाटत नाही जो आपल्या चाळीतल्या चंद्रमौळी खोलीत वाटायचा. सुखाच्या पाठीमागे पळताना आनंद आपल्यापासून दूर गेला आणि आपण तो जाऊ दिला. आज खूप वाटतंय पूर्वीची सई आणि पूर्वीचा समीर आपल्यात पुन्हा दिसावा… खूप धावलास समीर. आता थोडा थांब. काही क्षण जरा मागोवा घेऊ आपण. परत भूतकाळात जाऊ. भूतकाळ विसरण्यासाठी नसतो तो आठवण करून देण्यासाठी असतो, की आपण कुठून आलो ! आपली दोघांची स्वप्ने आता परत एक होऊ दे. पुढची पंचवीस वर्षे आता कोणताही पाठलाग नको. आपल सुख एकमेकांच्या जवळ असण्यात आहे. ते आपण परत निर्माण करू.. एकमेकांच्या साथीत, अगदी पहिल्यासारखे!
तुझी वाट पाहत आहे..
तुझीच
सई
पत्रातील एकेक ओळ समीरला जाणीव करून देत होती की, एकत्र सुरू केलेल्या त्यांच्या प्रवासाने कधीच दिशा बदलली होती… या प्रवासाचा अंत दिसतच नव्हता . धावत-धावत यापेक्षाही कुठेतरी लांब जाऊन परतीचा रस्ता बंद होण्याआधी मागे फिरायला हवे. त्याने ड्रायवरला यूटर्न घ्यायला सांगितला.
समीर घरी आला. घर एकदम शांत वाटत होते… मुलेही आपापल्या कामाला निघून गेली होती. सई कुठे दिसेना.. तो तिला शोधत त्यांच्या बगीच्यात आला. सई चित्र काढण्यात गुंग होती…. तिने कॅनव्हासवर तेच चित्र काढले होते, जे त्यांच्या मनात अनेक वर्षांपूर्वी कोरले गेले होते. त्यांची ती चंद्रमौळी खोली… खिडकीत बसलेली ती दोघे… खिडकीतून दिसणारा पौर्णिमेचा चंद्र आणि त्या चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालेले दोन प्रेमी जीव…. एकमेकांच्या नजरेत हरवलेले!
ज्या सुखाचा पाठलाग करत इतकी वर्ष तो पळत राहिला, ते तर त्याच्याजवळच होतं..सई हेच त्याचे जग आहे, त्याच्या स्वप्नांच्या दुनियेत फक्त सई आहे, बाकी सारे फक्त मृगजळ! हे त्याला कळून चुकले. आणि समीरचा पाठलाग कायमचा संपला.
©अर्चना बोरावके”मनस्वी”
वाचकहो कशी वाटली माझी कथा ? तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या.
माझे सर्व लेख आणि कथा वाचण्यासाठी ‘मनस्वी’ या माझ्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या. मला like आणि follow ही करू शकता.
Leave a Reply