नवीन लेखन...

पत्रप्रपंच – जेष्ठ नागरिकांच्या ‘पत्ररूपी’ मनोव्यवहारांचा परिचय

पत्रप्रपंच – ‘पुस्तक परिचय’ नव्हे, जेष्ठ नागरिकांच्या ‘पत्ररूपी’ मनोव्यवहारांचा परिचय !!!     

“दिलासा” जेष्ठ नागरिकांचे व्यासपीठ

लोकमान्य सेवा संघ विलेपार्ले यांच्या जेष्ठ नागरिकांसाठी (सीनियर सिटीजन) असलेले व्यासपीठ म्हणजे दिलासा शाखा. या शाखेच्या अनेक सदस्यांपैकी चव्वेचाळीस सदस्यांनी आपल्या हृदयात आणि मनात जिवापाड जपलेल्या आपल्या आठवणींना आणि आपल्या विचारांना, पत्रांद्वारे वाट करून दिली आहे. या पत्रांमध्ये आपल्याला प्रेरणा देणाऱ्या आणि दुःखात आणि आनंदात सहभागी होणाऱ्या, आपल्या जीवनाला आदर्श ठरलेल्या व्यक्तींच्या आठवणींना या पत्राद्वारे अभिव्यक्ती दिली आहे.  या पत्रांचा संग्रह, आपल्या आठवणी, आपल्या व्यथा, आपली दुख्खे, आठवणी आणि आनंद, प्रतीकरूपाने, वर्षानुवर्षे लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या  ‘पोस्टमनला’ हा संग्रह समर्पित केला आहे. प्रकाशित संग्रह 2017 चा आहे.

2017 साली प्रसिद्ध झालेले हे पुस्तक मी वाचले होते आणि मला ते भावले होते. पण ‘कोविद’ १९, च्या महामारीत, माझे , मीच कपाटात ठेवलेल्या पुस्तकाकडे लक्ष गेले. आतुरतेने मी ते पुन्हा उघडले. भावनांचा आणि विचारांचा पूरच माझ्या मनात वाहू लागला. काळाच्या उदरात विलय होऊ पाहणाऱ्या या पुस्तकाला उजेडात आणले तर ‘पत्रे’ लिहिणाऱ्या या ‘सिनिअर’ सिटिझन्स’ना न्याय मिळेल या हेतूने याचे परीक्षण करण्याचा हा ‘प्रपंच’!

‘पत्रप्रपंच’,  मासिकाच्या संपादिका रश्मी फडणवीस यांनी या पुस्तकाची प्रस्तावना केली आहे. सर्व ‘दिलासा’  सदस्य आपल्या आठवणींच्या  पावसात भिजून ओलेचिंब होत असतात. आपल्या व्यक्तिगत जीवनातील या आठवणींना उजळा देण्यासाठी आणि संवादाचे धागे जोडण्याच्या उद्देशाने हा पत्रलेखनाचा घाट घातला. आज ‘व्हाट्सअँप’, मोबाईल,  हे संवादाचे महत्त्वाचे साधन झाले आहे. पण, आपली खुशाली, हुरहूर, आपुलकी यांचे माध्यम असलेल्या, पोस्टमन द्वारे घरोघरी पोहोचवल्या जाणाऱ्या १५ पैश्यांच्या या पोस्टकार्डची सर, व्यक्त होणारा ओलावा या माध्यमांमध्ये नाही. आपले उराशी बाळगलेले विचार प्रकट करणे, हाच या पत्रप्रपंच्याचा उद्देश आहे. ‘राजहंसीपणा” म्हणजे जीवनाकडे पाहण्याची दृष्टी. हंस जसा तळ्यातील पाण्यात पाहून आपल्या प्रतीबिंबाच्या प्रेमात पडतो, तसेच प्रत्येकाने व्यतीत केलेल्या जीवनाचे प्रतिबिंब या ‘दिलासा सदस्यांच्या’ लिहिलेल्या पत्रात आढळते.

या पुस्तकाद्वारे दिलासा सदस्यांच्या मनाचा कवडसा लोकांसमोर येतो. या पत्रप्रपंचाचा उद्देश आपल्या सुखदुःखाची नाती आणि एकमेकांना जोडलेले संबंध प्रकट करणे हाच आहे, अशी प्रस्तावना डॉक्टर रश्मी फडणवीस यांनी दिली आहे.

शाळेत असताना अभ्यासक्रमात मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत औपचारिक आणि अनौपचारिक पत्र  आपण नेहमीच लिहीत असू ,पण ती कोणाला पाठवायची नाहीत हे आपल्याला माहित असायचे. त्यातली मजा काही औरच असायची.  ‘दिलासा’ शाखेने सुद्धा  पत्रलेखनाचा  घाट घातला, तेव्हा कुणा अमुक व्यक्तीला लिहा अशी अट नव्हती. तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही कोणालाही पत्र लिहू शकता असं सांगितल्यामुळे अगदी निश्चिन्त,  निसंकोचपणे प्रत्येकांनी पत्राद्वारे आपल्या विचारांना शब्दांमध्ये रेखाटले. ‘लिखे जो खत तुझे, तेरी याद में,  हजारो रंग के— किंवा,  हैरान हू की आपको खत मे क्या लिखु, —— अशी चित्रपटातील दृक्श्राव्य स्वरूपातील अनेक पत्रे आपल्या लक्षात राहतात. या ज्येष्ठ नागरिकांनी पत्रे वाचून त्यांनी केलेल्या प्रयत्नांना दाद दिल्याशिवाय नक्कीच राहता येत नाही.

अवघे शंभर पानी हे पुस्तक, पण नातवंडे म्हणजे दुधावरची साय!  अर्थात सगळ्यात जास्त पत्रे आपल्या मुलींना किंवा नातवंडांना लिहिलेली आहेत. आपल्या आई-वडिलांना, तर काही जणांनी मित्र-मैत्रिणींना, लता मंगेशकर, संगणक, इंटरनेट, ‘गुगल यांचा सर्व व्यापी विकास करणारे शास्त्रज्ञ, किती वेगळे वेगळे विषय. आपण कल्पनाही करू शकत नाही. एक पत्र ‘बिग बी’ला, एक लता मंगेशकर यांना . ‘होमी भाभां’सारख्या  प्रसिद्ध व्यक्तींना. तर एक पत्र साक्षात मृत्यूला आहे. पंचमहाभूतांना, तर तर दोघांनी ईश्वराला पत्रे लिहिली आहेत. एक पत्र आपल्या लाडक्या कुत्रीस, एक पत्र आपल्या लाडक्या पोपटाला. एक पत्र चक्क सासूबाईंना लिहून कृतज्ञता व्यक्त केली आहे. विचारांची उंची आणि आणि साधी सोपी सहज प्रकट झालेली भाषा. प्रत्येक पत्र पुढील पत्र वाचण्यास उत्सुकता जागृत करते, अनुभवातून आलेली परिपक्वता जाणवते.

‘दिलासा सदस्यांनी लिहिलेल्या काही निवडक ‘पत्रांचा’ हा धावता आढावा!

दिलासा चे सदस्य श्री श्रीराम शिवडेकर यांनी मुखपृष्ठावरील चित्र रेखाटले आहे आणि ते अतिशय बोलके आहे. या पुस्तकाच्या अंतरंगात काय असेल हे वेगळे सांगायची त्यामुळे गरज राहिलेली नाही आणि राहत नाही. प्रत्येक पत्र म्हणजे सदस्याच्या मनातील व्यक्त केलेल्या भावनांचं एक मोठं दर्शन आहे. आणि सर्व पत्रांचे संकलन म्हणजे एक साहित्य निर्मितीच्या  प्रयोगशाळेतच हजर असल्याचा  आपल्याला अनुभव येतो.

1)‘सुमा’,  म्हणजे मीरा पेंडसे  यांच्या घरातील कुत्री.  आठवणींचा समृद्ध खजिना कुटुंबासाठी ठेवून गेली! विद्युत दाहिनीत तिला ठेवताना अतोनात दुःख झाले. पण आठवणींनी गदगदून गेलेले मन म्हणत होते, “ Good Bye, ‘Suma’, bye forever, Let your loving soul rest in peace! हे पत्र वाचताना नकळत वाचकाचे डोळे सुद्धा भरून येतात.

2)एक पत्र आहे कै. वसंत नाईक यांनी, अभिनव पद्धतीने लिहिलेले! आईच्या उदरात वाढणार्‍या, बालिकेचा हा एक आईला उद्देशून केलेला टाहो आहे. पुरुष प्रधान संस्कृतीत वाढलेल्या एका आईने आपल्यात बाळाचा, वैद्यकीय  सल्ला निर्घुणपणे बळी देण्यासाठी घेऊन केलेले मनसुबे ऐकून हृदय हेलावून टाकल्याशिवाय राहत नाही. गर्भात वाढणाऱ्या स्त्री अर्भकाचा (छोट्या मुलीचा) आक्रोश पत्राद्वारे व्यक्त केला आहे. “अग आई, तुझ्या  उदरात वाढणार्‍या, तुझ्या रक्ता मासातून  जन्मास येणाऱ्या,  तुझ्या शरीराचा एक भाग असलेली मी,  तिला  तू नष्ट करावयास  करण्यास निघालीस?  हे वाक्य वाचून  आज सुद्धा आपलं काळीज पिळवटून निघत. ‘स्त्री जन्माची कहाणी’,  तिची अवहेलना संपणार नाही का? विचारांचे काहूर  मनात थैमान घालते.

3) तर शरद भाटवडेकर, आपल्या पत्रात ‘भारतरत्न गान साम्राज्ञी’ लतादीदीला’,  लिहितात-“ मिराबाई, ज्ञानेश्वर तुकाराम कसे दिसत असतील हे तुमच्या भजनातून स्पष्ट दिसते. सुरांची काय किमया असू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपला आवाज पंढरपूरचा विठोबा, हा संपूर्ण सुखाने भरला आहे, त्याच प्रमाणे आपला आवाज संपूर्ण जगाला सुखाने भारावून टाकतो. उगीच नाही मोठे मोठे गायक तुमच्या समोर नतमस्तक होत.  भारत आणि पाकिस्तान ह्यांच्यात ‘बंधुत्व’ निर्माण व्हावे म्हणून आपल्या ‘सांगीतिक’ प्रयत्नांना यश मिळू शकेल. माझी मुलगी सोनाली हिने एका महत्वाच्या स्पर्धेत एक लाखाचे बक्षीस आणि ट्रॉफी मिळवली.  तुमच्या हस्ते आमच्या सोनालीला मिळालेली ट्रॉफी सोन्यासारखी चमकते आहे.  आमच्या घरावर सोन्याची कौले चढवली असल्याचा भास आजही होतो.

4) आपली लाडकी लेक लग्नानंतर दूर अमेरिकेला जाणार या कल्पनेने सुजाता बुटाला,  आधीच हळव्या होतात. भारतीय उंबरठ्याचे माप ओलांडून, अमेरिकेत जाणाऱ्या मुलीस, ‘सुप्रियास’ काव्यात्मक स्वरूपात लिहितात.

“लाडकी लेक माझी जाणार दूरदेशी,      आवर घालू कशी मी माझ्या मनाशी?

नको नको रे मना,  असा धिंगाणा घालू ,     डोळा येई पाणी, त्याला कशी मी रोखू?”

5) चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वी निधन पावलेल्या आपल्या प्रिय आजीला, ‘ नीलम वऱ्हाडकर’ यांनी पत्र लिहिले आहे. त्या लिहितात “ आजोबा अचानक तुझ्या पदरात नऊ मुले टाकून देवाघरी निघून गेले एवढा मोठा धक्का तू कसा सहन केलास?” विचारांचे काहूर मनात माजते आणि “आजी तुझी आठवण येऊन , खूप, खूप रडू येते ग !”

6) वयाचा चौथ्या वर्षापासून आपल्या आईच्या  निधनानंतर, वडिलांच्या सावलीत वाढलेल्या,  अलका परळकर, अतिशय कृतज्ञतापूर्वक वडिलांबद्दल लिहितात. “तुम्ही माझे वडील नव्हतात, आई, बाबा, गुरु या सर्व भूमिकेत तुम्हीच होतात. माझ्या वयाच्या चौथ्या- पाचव्या वर्षी आई गेली आणि आम्हा भावंडांची तुम्ही आई झालात. आमचे केस विंचरून, वेण्या घालून, छान छान पदार्थ स्वतः करून खायला घालणं, सुंदर ड्रेस घालणे,, स्वतः हे सगळे अगदी निगुतीने केलं. तुमच्या संस्कारात वाढतांना, तुम्ही आमचे गुरू झालात, पण मी तुमच्या सावलीतच वाढले नाही,  तर आम्हाला बोट धरून तुम्ही जगण्याचा डोळस आणि स्वच्छ प्रकाशित मार्ग दाखवलात”.

7) बागेश्रीताई पारीख यांनी आपल्या ‘बाबांना’,  वडिलांनी,  शिकवलेल्या, निर्भीड व सचोटीचा,  शिकवणीचा मार्ग डोळ्यासमोर ठेवला. “ बांधून दिलेल्या या, शिदोरीची आठवण न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसताना सुद्धा प्रत्येक क्षणोक्षणी येते. तुमच्या समाज सेवेचे बाळकडू आणि माझा अनुभव व शिक्षणाचा उपयोग मी ‘दिलासा संस्थेसाठी’ करत आहे. तुमचा आशीर्वादाचा हात माझ्यावर सतत राहूद्या”.

8) तर वासंती गोखले आपल्या नवऱ्याची 1984 सालची गोष्ट सांगतात. नवरा आसामला कंपनीच्या कामाला टूरला  गेले असताना त्यांचा संपर्क वीस दिवस सुटला होता आणि आणि त्यांच्या मनाची घालमेल चालू होती. काळजीने त्रस्त झालेले ते दिवस आजही आठवतात! आणि नको त्या विचारांनी मनात काहूर माजले होते. नवरा सही-सलामत परत आल्यानंतर त्यांनी निश्वास टाकला! आज तब्बल तीस बत्तीस वर्षांनी,  इंटरनेट,  फेसबुक, गुगल सर्च यांच्या विकासाने जग अगदी जवळ केले आहे. शोधांनी निर्माण केलेल्या सुविधा तेंव्हा असत्या तर?  संगणकाचा शोध लावणारे शास्त्रज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञ याना त्यांनी सलाम ठोकला आहे. जगाच्या संहारासाठी नव्हे तर विधायक कार्याने ‘क्रांती’ घडविणाऱ्यांच्या कर्तुत्वाला सलाम!

9) विनता मारुलकर आपल्या कर्तृत्ववान आणि पावित्र आईबद्दल लिहितात,

“कधी तू मंदिरावरील कळस वाटतेस तर कधी तू वृन्दावनातील पवित्र तुळस वाटतेस!

10) सुलभा पाठारे, आपल्या पती-निधनानंतर, अमेरिकेत वास्तव्य करण्यासाठी गेलेल्या  आपल्या मुलीला भेटण्यासाठी तीन महिन्यांसाठी गेल्या. साश्रू नयनांनी आणि भरलेल्या हृदयाने आपल्या प्रथितयश ‘मानस-शास्त्रज्ञ डॉक्टर’ मुलीला  न्याहाळले.  व्यसनांच्या आहारी गेलेल्या ‘अमेरिकन’ मैत्रिणींना, मुलींचे तिने पुनर्वसन केले! तिच्या सौंदर्य दृष्टीचे “माता, गृहिणी,पत्नी आणि ‘करिअरिस्ट’ या सर्व भूमिकांचे दर्शन आपल्या मुलीमध्ये त्यांना झाले! ही तिची सर्वच मोहक रूपे पाहून सुलभा पाठारे,सद्गतीत झाल्या. “You should be  ‘”somebody” and Not ‘Anybody” या माझ्या ‘स्वप्नांना प्रत्यक्षात उतरविणाऱ्या मुलीच्या स्वभावाचे,  कर्तृत्वाचे पैलू आणि विविध रूपे पाहून आपल्या मुलीची त्यांना नवीनच ओळख झाली. हे पत्र वाचताना वाचकाला अवर्णनीय आनंद होतो आणि अभिमानाने मान उंचावते!

वानगीदाखल ही पत्रे ‘पुस्तकपरिचयात’ दिली आहेत पण सर्वच ४४, पत्रांचे ‘मूल्य’ मोठे आहे.

अखेरीस डॉक्टर रश्मी फडणवीस दोन स्फुटाके लिहिली आहे, एक दिलासा सदस्यांना उद्देशून आणि दुसरे ‘तमाम’ पोस्टमन दादांशी हितगूज”.त्यातल्या देविदास पोटे यांनी लिहिलेल्या कवितेतील एक कडवे उद्धृत करावेच लागेल. हे उद्देशिले आहे सर्व ‘दिलासा सदस्यांना!.

” बहु वाचली पुस्तके,  होते शब्दांचे कणीस”

थांबुनिया वाचू जरा,  आता ‘आतला माणूस”.

दिलासा सदस्त्यांतर्फे “प्रिय पोस्टमन दादांना लिहिलेले पत्रसुद्धा असेच भावुक आणि आपले डोळे उघडणारे आहे.

पोस्टमन म्हटलं की खाकी पॅंट त्यावर खाकीचा ‘ढगळ’ शर्ट, खाकी टोपी, खांद्यावर लटकणारी पत्रांची ओथंबून वाहणारी खाकी पिशवी, हातात सायकल असं चित्र आमच्या डोळ्यासमोर येते. “आपण दिसलात”, एखाद्याचा पत्ता सापडत नसेल, तेव्हा विचारला जायचा.  100% तो सापडणार याची खात्रीच.

दुर्गम भागात खेड्यापाड्यात आपल्याला दूतच मानतात लोक.  कारण मुलांची खुशालीची पत्रे, नुसते पोहोचवण्याचे  काम नाही तर, पत्रे वाचून दाखवून,  उलट टपाली उत्तर पण लिहून देण्याचं काम तुम्ही करत होतात. निरक्षर, अडाणी, आईबाप आणि बायको यांच्यातील दुवा बनून, ऊन- थंडी, पाऊस-वारा कशाचीही पर्वा न करता कधी सायकलवरून, तर कधी पायपीट करीत आपलं काम आपण निष्ठेने करीत आलात. तुटपुंजा पगार,  समाजाकडून उपेक्षित राहूनाही आपण निरलस सेवा करीत राहिलात. त्याच्यावर त्याच्यासाठीच आपल्याला मानाचा मुजरा. या ओळींमध्ये साठविलेला ओलावा आणि कळवळा ‘दिलासा’ सदस्यांचा आहे- पोस्टमन ‘दादांसाठी”.

— वासंती गोखले
०८/०१/२०२१

 

VASANTI ANIL GOKHALE
vasantigokhale@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..