हल्लीच्या पिढीला हा मायना कळणारच नाही, आणि त्यात त्यांची काही चुकी आहे असे मला तरी वाटत नाही. आजच्या इंटरनेटच्या जगात, व्हाट्सअँप, ट्विटर, इंस्टाग्राम, सिग्नल, स्नॅप-चॅट, वगैरे अँप्स वरून क्षणार्धात हव्या असलेल्या व्यक्तीशी कॉन्टॅक्ट, म्हणजे संपर्क करणे त्यांना सोपेच वाटणार. गेल्याच वर्षी, माझ्या एका मित्राने त्याच्या घरी गणपतीनिमित्ते जमलेल्या नातेवाईकांच्या जवळ जवळ नऊ दहा मुलांना एका खोलीत बसलेले असतानाचा फोटो पाठविला होता. सर्वांच्या सर्व मुले, आपापल्या मोबाईलमध्ये दंग होती. कोणी गेम खेळत होते तर कोणी चॅट करत होती, आणि मित्राने सांगितले कि मजा अशी कि त्यातलीसुद्धा दोघे तिघे एकाच खोलीत बसून, एकमेकांशी चॅट करत होती. आता काय म्हणावे ह्या कर्माला? ह्या संपर्कातून संवाद हरवलाय हे कसे कळणार त्यांना. सहवासाविना वाद नाही, आणि वादाविना संवाद होऊ शकत नाही. तू सांगतोय ते बरोबर का मी सांगतोय ते बरोबर, अश्या एख्याद्या गोष्टीवरून हिरहिरीने वाद घालणे संपलय आता. कुठल्याही प्रश्नाचे अचूक उत्तर द्यायला गूगलबाबा सदैव उभेच असतात. अर्थात, ह्या सर्व तांत्रिक प्रगतीविषयी माझ्या मनात कुठलाच आकस नाही, असलाच तर मानवाने घेतलेल्या ह्या अफाट झेपेबद्दल प्रचंड आदर आहे. पण म्हणून माणसाने यंत्राच्या इतक्या अधीन व्हावे हे मनाला पटत नाही.
आमचा सोनू मोबाईल हातात दिल्याशिवाय जेवायलाच तयार होत नाही, असे जेंव्हा एखाद्या सोन्या, छकुल्याची आई अभिमानाने सांगते तेंव्हा वाटते सांगावे, कि बाई आत्ताच आवर, नाहीतर तुझ्याचवर पश्चातापाची पाळी येईल. पण आपण काही बोलत नाही आणि तिलाही काही कळत नाही. आणि असेच सोनू, शकू, मोबाईलच्या जाळ्यात गुंगत जातात, आणि आधी कौतुक करताना न थकणारे आई वडील हताश होतात्से बघत रहातात. आजकाल घरा घरातून संवाद हरवले आहेत. इंटरनेटचे महाजाल, त्यावर पोसणारे स्मार्ट टीव्ही, वेब सिरीस, निरनिराळे अँप्स, प्रत्येका हाती असणारे मोबाईल, लोकांना वेळच नाही आहे दुसऱ्या कुणाकडे बघायला. वाढदिवसाच्या, कुठल्याही महत्वाच्या दिवसाच्या वा सणासुदीच्या दिवशी हल्ली भेटणे दुर्मिळ झालंय. त्यापेक्षा पटकन एक व्हाट्सअँप केला कि आपली इतिकर्तव्यता होते.
मुद्दा असा कि हल्ली सहवास हाच दुर्मिळ झालायं. भेटगाठी सटीसमाशी व एखाद्या कार्यानिमित्ते होतात. लहानपणी सुट्टीच्या दिवसात आजोळी जाणे आता संपलंय. मामाच्या गावाला जाऊया पेक्षा चौकोनी कुटुंबे लॉन्ग टूर्स वर जातात. लोकांकडे एकंदरीतच पैसा बहू होऊ घातलाय. ह्यात वाईट काहीच नाही, पण हे सर्व करताना ओलावा जपायला काय हरकत आहे.
एक खरी झालेली गोष्ट सांगतो. जर्मनीला असताना, औस्टेंड (म्हणजे इंग्लीश मध्ये इस्ट एंड) ह्या तिथल्या एका टुमदार शहरात अचानक एका जुन्या मित्राची भेट झाली. औस्टेंड शांत, विलक्षण पण आरामदायी आहे व अनेक कुटुंबे, तरुण व्यावसायिक आणि आंतरराष्ट्रीयरित्या प्रवासी लोकांमध्ये अतिप्रिय आहे. त्याच्या परिसरात, तुम्हाला सर्व जगातील रहिवाशांची संमिश्र गर्दी आढळेल. विविध कालखंड आणि प्रभावांनी प्रेरित असलेल्या वास्तुकलेच्या ‘नॉकअबाउट’ संग्रहासह हा परिसर देखील खूप वैविध्यपूर्ण वाटतो. कॉफी पीत जुन्या आठवणी जागल्या गेल्या. तो एका जर्मन मुलीशी लग्न करून तिथेच सेटल झाला होता. त्याने आवर्जून शनिवारी त्याच्या घरी जेवायला बोलावले. संद्याकाळी सातला नक्की पोच असे आग्रहाने बजावून सांगत त्याने आपला पत्ता दिला. मी शनिवारी गुगल मॅप वरून चेक करून बरोबर त्याच्या घरी पोचलो. साधारणपणे सव्वा सहा वाजले असावेत. उशीर नको करायला म्हणून थोडा लौकरच निघालो होतो. घर कसले, ती तर एक छोटीशी बंगलीच होती. सभोवताली छोटीशी पण निगा राखलेली बाग होती. मी पुढे शिरून दरवाजावरची बेल दाबणार इतक्यातच एका मुलीने दरवाजा उघडला. छोटेखनी अशी तिला बघूनच माझ्या लक्षात आले कि हि फिलिपिनो मेड असावी. मी माझे कार्ड तिला दिले, तर तिने व्हरांड्यातल्या खुर्चीकडे हात दाखवून मला बसायला सांगितले. मी विसावलो, तर ती बया दरवाजा बंद करून अदृश्श झाली. घड्याळाचा काटा पुढे सरकत होता, आणि मी अस्वस्थ होत होतो. पण बरोबर सातच्या ठोक्याला दरवाजा उघडून माझा मित्र आणि त्याची जर्मन बायको, असे दोघेही बाहेर आले. त्याने मला मिठीच मारली आणि मग आपल्या बायकोची ओळख करून दिली, व मला आत हॉल मध्ये ते दोघेही घेऊन गेले. पुढचे तीन तास खूप मजा आली. त्याच्या बायकोला इंग्लिश छान बोलता येत होते, त्यामुळे संभाषणाला अडचण न होता गती मिळत गेली. ड्रिंक्स व डिनर नंतर मी जेंव्हा निघालो, तेंव्हा माझा मित्र मला सोडायला फाटका पर्यंत आला. तिथं परत आम्ही थोड्या गप्पा मारल्या. तेंव्हा मी गंमतीने त्याला म्हटले, साल्या, मी पाऊण तास तुझ्या व्हरांड्यात एकटाच सडत होतो आणि तू काय बायकोला मिठ्या मारत बसला होतास कि काय, आणि त्यावर तो जे म्हणाला ते ऐकून मी गारच झालो. तो म्हणाला, आम्ही दोघेही साधारणपणे साडेसहा पर्यंत तयार झालो होतो, पण आपली अपॉइंटमेंट सातची होती, म्हणून ती जरावेळ पेपर वाचत बसली तर मी टीव्हीवर बातम्या बघत होतो. म्हणजे आजच्या संध्याकाळी आमची अपॉइंटमेंट होती? मी अवाक झालो होतो, पण त्याच्या ते लक्षात सुद्धा आले नाही. बोलावलेली टॅक्सी आली होती, म्हणून मी बाय करून रवाना झालो. आपल्याकडे असे होऊ शकते? आलेल्या पाहुण्याला बसवून ठेवून आपण घरामध्ये टीव्ही बघू का पेपर वाचत बसू? असेच एकदा सिंगापूरमध्ये, एका चिनी मित्राच्या घरी असताना, मी त्याला विचारले होते समजा आत्ता पटकन कोणी आले तर? त्यावर तो माझ्याकडे विचित्रप्रमाणे बघत म्हणाला, असे कसे कोणी येईल, इव्हन माझे आई वडील वा भाऊ सुद्धा येऊ शकत नाही, आणि मीही असा सहज म्हणून त्यांच्याकडे जाऊ शकत नाही. आम्ही एकमेकांची अपॉइंटमेंट घेतल्या शिवाय त्यांच्या घरी नाही जाऊ शकत, ना त्यांना ते खपेल, ना मला ते आवडेल. परदेशी प्रत्येकजण आपापली स्पेस जपतो. आपणही ती जपावी, पण म्हणून इतक्या टोकाची भूमिका आपल्या इथे घेतली जाईल? मला नाही वाटत.
महत्वाचा असतो तो सहवास, आणि त्याहूनही महत्वाचे असते कि तो कोणाचा असावा. आर्टफिशिअल इंटेलिजन्स आपल्याला किती आणि कसा कण्ट्रोल करेल, हे आपणच ठरवायला हवे, नाही तर आपण यंत्राहातची खेळणी कधी बनू हेच कळणार नाही.
-संजय शरद दळवी
(९८२०५४८२१८ / ७५०६४०५५३८)
Leave a Reply