नवीन लेखन...

पत्रिकेतील ‘मंगळ’दोष व नाहक अडलेली लग्न..!

जन्मकुंडलीतील ‘मंगळ दोष’ अनेक गुणी मुला-मुलींच्या लग्नात आडवा येतो व अशा लग्नाळू मुला-मुलींचे लग्न काही ठोस कारण नसताना रखडते. मुळात हा खरोखरच एक अशुभ दोष असतो का, तर याचे माझे उत्तर नाही असेच आहे. आपल्या सर्वांच्याच पत्रिकेत इतर ग्रहांप्रमाणेच मंगळ हा ही एक ग्रह असतो. पण १,४,७,८ व १२ या स्थानात मंगळ असल्यास तो ‘मंगळ दोष’ मनाला जातो व तो हटकून लग्नाला आडवा येतो.

मंगळाच्या मुलाचे लग्न मंगळ असलेल्या मुलीशीच होणे आवश्यक मानले जाते. ते तसे झाले नाही तर त्यांच्या वैवाहिक जीवनात काहीतरी अशुभ घडते या श्रद्धेपायी – खरं तर अंधश्रद्धेपायी- अशा मुला-मुलींची, एकमेकांना सर्वार्थाने अनुरूप असूनही, लग्नं होत नाहीत किंवा घरातल्यांच्या रेट्यामुळे होऊ दिली जात नाहीत. यात अशिक्षितांपासून उच्च शिक्षितांपर्यंत व गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वच प्रकारच्या माणसांचा समावेश आहे.

काय असतो हा मंगळ दोष, तो असुनही लग्न केल्याय काय परिणाम होतो किंवा कसे यावर आपण सुशिक्षित लोकांनी डोळसपणे विचार करण्याची वेळ आता आलीय..!

माझा अनुभव सांगतो की मंगळाची पत्रिका म्हणजे १,४,७,८ व १२ या स्थानात मंगळाचं अस्तीत्व असणा-या व्यक्ती, स्त्री किंवा पुरूष, आपल्या भावना वा वासनांच्या बाबतीत अतिशय तीव्र किंवा आग्रही असतात. यांना ‘पेशन्स’ नसतात आणि पेशन्स नसलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत जे जे घडू शकते ते ते आणि तेवढेच मंगळ व्यक्तींच्या बाबतीत घडू शकते. यात मंगळाचा ग्रह म्हणून काहीही दोष नसतो.
मंगळ तशा अर्थाने बघायला गेलं तर एकप्रकारचा शुभ ग्रहच मानायला हवा. मंगळ म्हणजे अमाप उत्साह, जोश, ताकद..! मंगळ म्हणजे बाॅर्न लिडर..! मंगळाच प्रेमही धुसमुसळं असतं..! मंगळाला हळुवारपणा, चर्चा, लाडे-लाडे बोलणं वैगेरे हिन्दी सिनेमातल्या हिरोंप्रमाणे वागणं जमत नाही..!

मंगळ म्हणजे जातीवंत लढवय्या ! अन्यायाचा प्राणपणाने प्रतिकार..! न पटणारी गोष्ट कोणत्याही परिस्थितीत करणार नाहीत. एखादा गुंड मंगळाच्या प्रभावाखाली असू शकतो तसाच एखादा निष्णात सर्जनही..! मंगळाचे हे गुणधर्म आपल्या सर्वांच्याच कुंडलीत असतात पण ज्यांना मंगळ आहे असे म्हटले जाते त्या व्यक्तीत या क्वालिटी उठावदारपणे असतात एवढंच !

खरतर या विषयावर विस्तृतपणे लिहीण्यासारखं आहे पण इथे एवढच सांगू इच्छितो की जन्मपत्रीकेत असलेला मंगळदोष फारसा विचारात घेतला जाऊ नये. फक्त एवढंच लक्षात ठेवावं की, या ‘मंगळी’ व्यक्तींची वागण्याची त-हा खुप स्ट्रेट असते. ते नालायकाला थेट नालायकच म्हणणार, उगाच शब्दांचा घोळ घालत बसणार नाहीत. त्यांचं प्रेम आणि राग, दोनीही अतिशय तीव्र पण मनापासून असतं. त्यांना रोमॅंटीक होणं जमत नाही. ‘मंगळ्यां’चा हा स्वभाव नीट समजून घेतला तर या व्यक्ती पत्नी व नंतर कुटुंबीयांसाठी अतिशय प्रोटेक्टीव्ह ठरू शकतात.

‘मंगळ’वाल्या व्यक्तीला दुसरी ‘मंगळ’वालीच व्यक्ती समजून घेऊ शकते, या विचारातून मंगळयुक्त पत्रीकेची जुळणी मंगळयुक्त पत्रीकेशी करावी असा आग्रह धरला जातो. मंगळाचं धुसमुसळं रांगडं प्रेम, रोखठोक बोलण्याचा स्वभाव,गाडी ८०-१०० पेक्षा कमी वेगाने चालवणे गुन्हा आहे हा विश्वास, चर्चेने प्रश्न सुटू शकतो यावरचा प्रचंड अविश्वास, पटलेली गोष्ट कोणाचाही -अगदी स्वत:च्या जीवाचाही- मुलाहीजा न ठेवता करणे या गोष्टींमागील एक निरोगी व नि:स्वार्थी मन लक्षात घेतल्यास ‘मंगळ’ पत्रीकेएवढी लग्न करण्यास योग्य दुसरी पत्रीका नाही. हे विधान मी अतिशय जबाबदारीने करत आहे. मी नुसतं सांगत नाहीत तर ज्योतिषी या नात्याने मी जवळच्या नातेवाईकांची लग्न करण्यास पुर्ण जबाबदारीने अनुमती दिलेली आहे व अशा जोडप्यांचे संसार आजतागायत व्यवस्थीत चालू आहेत..!!

आता मंगळ व्यक्तीने मंगळ नसलेल्या व्यक्तीशी लग्न केल्यास काय अशुभ घडू शकतं? तर, मंगळाचा दे-धडक मेंढा स्वभाव न समजल्याने मग त्या नवविवाहतांमध्ये खटके उडू लागतात. वर म्टल्याप्रमाणे मंगळाचा शांतपणे चर्चा याप्रकारावर विश्वास नसल्याने हे गडी वा बाई थेट लढाईच्या मैदानात उतरतात. हे विवाह बंधन काही काळाने त्या दोघानाही नकोसं वाटू लागतं व शेवट त्यांनी विभक्त होण्यात होऊ शकतो.
या व्यक्तींचा जोडीदार त्याच्यासारखाच ‘मंगळ’ असेल तर दोघेही लढतात, भांडतात, प्रसंगी मारामारीही करतात व काही वेळाने तेवढं जोरात प्रेमातही येतात. मंगळ असलेल्या व्यक्तींनी बीन मंगळाच्या वा मंगळ नसलेल्यानी मंगळाच्या पत्रीकेशी लग्न करण्यास कोणतीही हरकत नाही मात्र मंगळाचा ‘लाल’ स्वभाव समजून घ्यावा..! तर मग हे लग्न काकणभर जास्तंच यशस्वी होऊ शकतं. अशा विवाहांमध्ये बीन मंगळाच्या व्यक्तीने थोडासा जास्त समजूतदारपणा दाखवणं गरजेचं असतं.

शेवटी लग्न म्हणजे काय तर दोन व्यक्तींनी एकमेकावा समजून घेत आयुष्याचा मार्ग काटणे. जोडीदारांतील बेटर अंडरस्टॅण्डींग प्रत्येक लग्न टिकण्यासाठी अत्यावश्यक असतो, मंगळाला नाहक बदनाम करण्यात काही अर्थ नाही..’मंगळ’ खरतर ‘मंगल’ शब्दाचा अपभ्रंश आहे. गणपती प्रसन्न व्हावा म्हणून मंगळवार करता ना, लग्न झाल्याची निशाणी म्हणून ‘मंगळयूत्र’ घालता ना, मग थेट ‘मंगळ’च गळ्यात घालून घेण्यास काय हरकत आहे..?

-गणेश साळुंखे
ज्योतिषी
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

2 Comments on पत्रिकेतील ‘मंगळ’दोष व नाहक अडलेली लग्न..!

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..