सत्य घटना आहे ही . साधारण वीस ,बावीस वर्षांपूर्वीची गोष्ट . भराभर पायऱ्या चढणारी मी एकदम सावध झाले . हळूच डावीकडे, उजवीकडे, पाठी मला कोणी बघत तर नाही ना ? कोणी ओळखीचे दिसले नाही, असे पाहून मी पटकन आत शिरले . अहो मी चक्क पोलीस चौकीच्या पायऱ्या चढत होते , लहानपणापासूनची शिकवण, साध्या सज्जन माणसांनी कोर्टाची , पोलीस चौकीची पायरी कधी चढू नये त्यामुळे मी मनाने थोडी बिथरले होते. मी वरून हुशारी दाखवत होते पण आयुष्यात पहिल्यांदाच पोलीस चौकीत जात असल्यामुळे माझं मन काहीसं सैरभैर झालं होतं .
पण मी का पायऱ्या चढत होते? तर एका मुख्याध्यापिकेची जबाबदारी म्हणून . कारणच तसं होतं . आमची शाळा, एच एस सी (बारावी साठी ) परीक्षेचे प्रमुख केंद्र होती आणि अचानकपणे एक घटना घडली होती .दररोज तळमजल्यावरून पहिली घंटा वाजल्यावर परीक्षार्थी विद्यार्थी, एकापाठोपाठ, एका ओळीत वरती येत असत. साधारण दहा दिवस परीक्षा चालू असायची .प्रत्येक विद्यार्थी वर आल्यावर मी त्याला किंवा तिला, लक्षपूर्वक निरखून ठेवीत असे . दोनच दिवसानंतर मला सर्वांचे चेहरे लक्षात राहत असत . तिसऱ्या दिवशी जरा वेगळा वाटणारा ,तरतरीत , हुशार आणि स्मार्ट असलेला मुलगा माझ्या नजरेत भरला होता . परीक्षा सुरू झाल्यानंतर मुख्याध्यापिका आणि केंद्रप्रमुख या नात्याने थोड्यावेळाने ‘राउंड’ घेण्यासाठी मी प्रत्येक वर्गात जात असे. त्यामुळे ‘तो’ विद्यार्थी आठवी ‘अ’ च्या वर्गात बसतो ,तिथे त्याचा नंबर आला आहे, ते मी मनातल्या मला टिपले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी नेहमीप्रमाणे राऊंड मारायला वर्गा वर्गात गेले आठवीच्या वर्गात गेल्यानंतर माझे लक्ष त्या बाकाकडे गेले तर तिथे दुसराच मुलगा परीक्षेला बसला होता विद्यार्थी परीक्षेला बसला होता, तरी त्या दिवशी आम्ही काहीच बोलबाला केला नाही .कोणतीही ॲक्शन घेतली नाही कारण हॉल तिकीट वर त्याचाच फोटो होता
पण दुसरा दिवस उजाडताच, परीक्षा कधी सुरू होते असे मला झाले होते. आज परत तो स्मार्ट मुलगा परीक्षेला हजर झाला होता .थोड्यावेळाने क्लार्क, शिपाई व मी असे सर्वजण वरच्या आठवीच्या वर्गात गेलो . मी वर्गात शिरूर मुद्दामूनच काही विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे तपासली व नंतर त्याच्याजवळ गेले .हॉल तिकीट मागितले त्यांनी दाखवले . पहाते तो काय ? त्यावर त्याचाच फोटो होता . आता मात्र मी क्षणभर बुचकळ्यात पडले आणि माझ्या लक्षात आलं की त्याने दाखविलेले त्याच्या जवळचे तिकीट हे ‘ओरिजिनल’ नसून ते झेरॉक्स हॉल तिकीट आहे आणि त्या झेरॉक्स कॉपी वर त्यांनी स्वतःचा फोटो लावलेला आहे .मग मात्र आम्ही तिघेजण त्याला घेऊन पहिल्या मजल्यावरच्या ऑफिसला आलो
प्रथम तो काहीच कबूल करेना , तेव्हा मात्र परीक्षा केंद्रावरच्या पोलिसांनी जरा आवाज चढवून बोलल्यावर , तो बोलायला तयार झाला. त्यांनी त्याने त्याचा मित्र ‘मंदारसाठी हे सर्व अनावश्यक उद्योग केले होते .तो हुशार होता पण परिस्थितीमुळे त्याला घरातून पैसे मिळत नव्हते . पॉकेट मनी साठी तो नसत्या भानगडीत पडला होता. स्वतःच्या बाबतीत वृथा अभिमान बाळगणारा असाच तो मला वाटला, त्यात तारुण्याची भर .
आता मात्र माझ्यापुढे तो हात जोडून , डोळ्यात अश्रू आलेल्या अवस्थेत माझ्या पाया पडू लागला . गयावया करू लागला . दोघांचे पालक फोन करताक्षणीच भेटावयास आले . कारण पुढे तीन वर्ष परीक्षेला बसता येणार नाही याची त्यांनाही कल्पना आली होती , तीन वर्ष ,आयुष्याला स्वल्पविराम …… … ? छोट्या मोहासाठी एवढी ही शिक्षा !
माझ्या सहकाऱ्यांशी विचार विनिमय करून , मी मात्र नियमांच्या , कायद्याच्या चौकटीत राहून मला योग्य वाटलं तेच केलं. आणि पोलीस ठाण्याच्या पायऱ्या चढल्या. पुढील तीन वर्ष मी सुद्धा बेचैनीतच काढली .आजही दहावी ,बारावीच्या परीक्षा म्हटल्यावर इतर चांगल्या गोष्टींची आठवण येत नाही तर हेच विचार . तो आता काय करत असेल ? एक जबाबदार व्यक्ती आणि माझं पद लक्षात ठेवून त्यावेळी घेतलेला निर्णय योग्य होता का ? त्याने स्वतः:चे काही बरे वाईट तर करून घेतले नसेल ना? तर त्याला कोण जबाबदार ? आज सुद्धा हा प्रसंग आठवल्या नंतर मनाची घालमेल होते . ‘माणुसकी’ की ‘कर्तव्य’ या विचारांच्या ‘हिंदोळ्यावरच’ काही काळ मी उदासीन अस्वस्थ होते.
— वासंती गोखले
Leave a Reply