जॉईन झाल्यापासून बरोबर 100 व्या दिवशी मी शुक्रवारी येणाऱ्या क्रु चेंज बोटं ने जहाजावरुन उतरणार होतो. जहाजावरुन अकाउंट्स क्लियर करून झाल्यावर कॅप्टन आणि चीफ इंजिनियर कडून सगळे आवश्यक ते कागदपत्र सह्या करून झाले, बॅग पण भरून झाली, फ्लाईट डिटेल्स आले. शनिवारी सकाळी साडे अकरा वाजताची जकार्ता कोलंबो आणि कोलंबोहुन रात्री साडे आठची मुंबई करिता श्रीलंकन एअरवेज ची फ्लाईट होती. उद्या घरी जायचंय या कल्पनेने नुसतं आनंदाचे उधाण आले होते. मागील तीन महिने प्रत्येक शुक्रवारी जहाजावर येणारी क्रु चेंज बोट आणि त्यात घरी जाणारे क्रु मेंबर बघितले की मेरा नंबर कब आयेगा हाच विचार यायचा. सकाळी साडे दहा वाजता बोट यायची आणि क्रु चेंज होता होता अर्ध्या तासाने निघायची. शुक्रवारची बोट आमच्या जहाजावरुन निघाली की जहाजापासून सहा सागरी मैलांवर असलेल्या एका बेटावर जायची. तिथे असलेल्या गॅस पॉवर प्लांटचा क्रु चेंज झाल्यावर आणि इंधन वगैरे भरून दुपारी एक वाजता निघायची. इंधन भरण्यासाठी त्या बेटावर साडे अकरा ते एक वाजेपर्यंत सगळ्यांना बोटीतून खाली उतरवण्यात यायचे.
उद्या जहाजावरुन उतरायचे आहे या विचारांनी रात्रभर झोप लागली नाही कधी एकदा सकाळ होते आणि बोट येते असं होऊन गेलं होत. सेकंड इंजिनियर म्हणून पहिलेच जहाज आणि पहिल्यांदाच तीन महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट आणि त्यातल्या त्यात पहिल्यांदाच 100 दिवसाच्या आत साईन ऑफ.
शेवटी दिवस उजाडला, बोट आली आणि जहाजावरील भारतीय आणि इंडोनेशियन सहकाऱ्यांचा निरोप घेऊन निघालो. मागील तीन महिन्यात जहाजावरुन दिसणाऱ्या बेटाचे ज्याचे नाव पेबेलॉकॉन आयलंड आहे त्याच्याबद्दल सगळ्यांकडून खूप ऐकले होते. जहाजावरुन आयलंड दिसायचं पण थोडंसंच. पाण्याच्या वर तरंगणारी थोडीशी हिरवीगार झाडी आणि एका चिमणीतून जळणाऱ्या गॅसची एक तांबडी फडफडणारी ज्वाला. रात्रीच्या निरव शांततेत आणि अंधारात तर ही ज्वाला आणखीनच प्रखर दिसायची. जहाजावरुन पेबेलॉकॉन आयलंड वर क्रु बोटला पंधरा ते वीस मिनिटं लागायची. मी जहाजावरुन बोटीत उतरलो, बोटीच्या वरच्या मजल्यावर एका सीटवर हँड बॅग ठेवली आणि बाहेरच येऊन उभा राहिलो. जहाज मागे मागे जात होतं, जवळच असलेले ऑइल प्लॅटफॉर्म सुद्धा मागे आले. बोटीने चांगलाच स्पीड पकडला होता आणि बघता बघता पेबेलॉकॉन आयलंड जवळ येऊ लागले. क्रु बोट लागण्यासाठी जेट्टी बांधली होती पण बोट जेट्टीवर जाण्यासाठी पाण्याची खोली वाढविण्यासाठी एक चॅनल बनवला होता. चॅनल कडे बोटीने दिशा वळवली आणि बोटीवरचा खलाशी बाहेर उभे असलेल्या सगळ्यांना आत जाऊन बसायला सांगू लागला. माझ्यासोबत बाहेर आणखीन तीन चार जण होते, मी आयलंड कसं दिसतंय ते बघायला बाहेर उभा होतो तर इतर सगळे सिगारेट ओढायला उभे होते.
नारळाची उंचच उंच झाडे आणि इतर मोठमोठ्या झाडांनी पेबेलॉकॉन आयलंड हिरवगार दिसत होते. गॅस पॉवर प्लांट चा आवाज वातावरणात घुमत होता तर कामगारांसाठी असलेल्या तीन मजल्यांच्या इमारती झाडांच्या गर्दीतून डोकावत होत्या. बोट थांबल्यावर पुढे जकार्ताला जाणाऱ्यांचे सामान बोटीतच ठेऊन सगळ्यांना उतरायला सांगितले होते. आमच्या जहाजावरुन पंधरा जण निघाले होते, प्रत्येकाला दुपारच्या जेवणाचे पार्सल बांधून दिले होते. पेबेलॉकॉन आयलंड वर सगळे जण दुपारचं पार्सल आणलेले जेवण करून बोटीत बसणार होते.
पेबेलॉकॉन आयलंड काही फार मोठे नव्हते, आयलंडच्या परिघाभोवती चालत चालत एक राऊंड मारला तर जेमतेम चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं लागली असती. आयलंड च्या सभोवती पसरलेला अथांग समुद्र, आणि समुद्राच्या पाण्यावर जशी काय आकाशाची निळाई पसरलेली. आयलंड आणि ह्या निळ्या पाण्याला पांढऱ्या स्वच्छ नितळ पाण्याने विभागले होते.जवळपास पन्नास एक मिटर पर्यंत आयलंडचा उथळ भाग होता आणि त्यावर पांढरी स्वच्छ वाळू आणि दगड गोटे. पाणी एवढ स्वच्छ आणि नितळ की तळाला सुई जरी पडली असेल तर सहज दिसावी अर्थात आयलंडच्या किनाऱ्याजवळ तेवढी खोली नव्हती तसेच भरती ओहोटी मुळे पाण्याची पातळी सुद्धा कमी जास्त होत असे.
लहान लहान मासे झुंडीच्या झुंडीने किनाऱ्याजवळ येत होते. दक्षिणेकडच्या भागात किनाऱ्याजवळ समुद्राच्या भरतीला थोपवण्यासाठी दगडाचे बांधकाम केले होते. झाडांना पार बांधले होते त्यावर आणि भिंतीच्या कठड्यावर बसून दुपारचे जेवण केले. चुकून माझ्या पार्सल मध्ये इंडोनेशियन पदार्थ टाकले गेले होते कारण आम्हा भारतीयांचे जेवण बनवणारा इंडोनेशियन कुक सुद्धा माझ्यासोबतच चालला होता आणि आम्ही एकत्रच जेवायला बसलो होतो , त्यानेच माझे पार्सल बघून दिलगिरी व्यक्त केली.
जेवायला बसलो आणि तेवढ्यात खाली वाळूतून हातभर लांब असलेली घोरपड जिभल्या चाटत सावकाश एक एक पाऊल टाकत पुढे पुढे येत होती, तिला बघून एक इंडोनेशियन खलाशी बोलला की इथं मोठं मोठ्या मगरीच्या आकारा एवढ्या घोरपडी आहेत, आणि त्या कोणाला काही करत नाहीत. सेकंड यू डोन्ट वरी, नो फिअर, असं मगरी एवढ्या मोठ्या सांगायचं आणि नो फिअर पण बोलायचं असं ऐकून वेगळंच वाटलं. लंच झाल्यावर बोट निघायला अजून एक तास शिल्लक होता.
मग काय पेबेलॉकॉन आयलंडचा फेरफटका सुरु, तिथल्या इमारतीत जाऊन आलो, नीटनेटक्या खोल्या, मोठीच्या मोठी मेसरूम, टेनिस कोर्ट , व्हॉलीबॉल आणि बॅडमिंटन कोर्ट.
बाहेर पश्चिमेला एक मोठं आणि मोकळं मैदान, त्याच्या मधोमध एक हेलिपॅड. एक सुंदर स्विमिंग पूल. स्विमिंग पूल तर एखाद्या सेव्हन स्टार हॉटेल सारखा, समुद्राला खेटून, स्विमिंग पूल चे पाणी स्वच्छ आणि नितळ की स्विमिंग पूलच्या खाली असलेलं समुद्राचे पाणी नितळ आणि स्वच्छ असा देखावा.
ब्राझिल आणि युरोप मध्ये कितीतरी सुंदर आणि आकर्षक लहान मोठ्या बेटांजवळून जहाज गेले होते. हिरवीगार आणि पाण्यातून सुळक्यासारखी बाहेर आलेली बेटं आणि त्यांचे सौंदर्य डोळ्यात मावत नसायचे. अशा बेटांवर कधी जायचा प्रसंग आलाच नव्हता. परंतु पेबेलॉकॉन आयलंड वर क्रु बोट मध्ये इंधन भरण्याच्या निमित्ताने का होईना एक थांबा असल्याने. या बैठ्या बेटा वरील अप्रतिम निसर्ग सौंदर्य अनुभवता आले. एखादी मोठी लाट जरी आली तरी ती बेटाला तिच्या पोटात घेईल एवढंच जेमतेम समुद्राच्या पाण्याच्या पातळी पासून वर असलेलं हे बेट. आमच्या जहाजावरून आणि या बेटावरून दूरवर दिसणाऱ्या एका पर्वतावर इंडोनेशियातील एक जिवंत ज्वालामुखी आहे असं पण कोणीतरी सांगितलं होतं. पण मागील चाळीस वर्षात तरी या आयलंड आणि आजूबाजूला समुद्रात उभ्या असलेल्या तेल विहिरींना काहीच झाले नाही.
दुपारी साडेबारा वाजता लाऊड स्पीकर वर आझान झाली, सगळे इंडोनेशियन मुसलमान आयलंड वर असलेल्या मशिदीत नमाज पढायला गेले. अर्ध्या तासाने बोट निघणार याची अनाउन्समेंट झाली. आम्ही पंधरा जण आणि पेबेलॉकॉन आयलंड वरील जवळपास सव्वाशे जण बोटीत चढले. पुढे सव्वा दोन ते अडीच तासात बोट जकार्ताला पोचणार होती. आयलंड मागे गेल्यावर पुन्हा बाहेर उभं राहायला आलो. बोट निळ्या समुद्राला वेगाने कापत निघाली होती. पाठीमागे पांढरे फेसाळणारे बुडबुडे आणि लाखो सूक्ष्म तुषार उडत होते आणि माझ्या मनात आनंदाच्य उकळ्या फुटत होत्या.
© प्रथम रामदास म्हात्रे.
मरीन इंजिनियर,
B. E. (Mech), DIM
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply