शरीरात एक बॅटरी असते. ती पुरवून पुरवून वापरायची असते. शरीराला रात्रौच्याच वेळी, पूर्ण विश्रांतीच्या वेळी ही उर्जा वापरायची असते.
मोबाईल बॅटरीमोडवर जातो, तेव्हा बॅटरी लवकर संपते. चार्जिंग ऑन असताना त्याच्यावर ऑडीओ ऐका, नाहीतर, व्हिडिओ पहा. बॅटरीवर लोड नाही. तसंच सूर्य असताना दोन्ही जेवणं संपली की शरीरातील बॅटरीवर लोड नाही, जी उर्जा अन्य महत्त्वाच्या अंतर्गत कामासाठी वापरली जाऊ शकते.
आणखी एक उदाहरण समजून घेऊया.
नीट शब्द शब्द वाचलेत तर समजेल.
जर मी माझ्या हातांचे काम वाढवले तर शरीरातील रक्त किंवा उर्ज़ा हातामधे आणली जाईल. पायांनी धावलो तर, हीच उर्जा पायात वळवली जाईल. डोक्याचे काम केले तर हीच उर्जा इतर अवयवांमधून काढून मेंदूकडे नेली जाईल, ( म्हणून जिथे उर्जा जाईल, तेव्हा इतर अवयवांमधील शक्ती तुलनेने कमी होईल, मेंदुचे काम वाढवले, अभ्यास केला, तर हातापायामधील शक्ती मेंदुकडे वापरली जाईल. हातापायामधील शक्ती तात्पुरती कमी केली जाईल. )
म्हणून पाठांतरासारखा अभ्यास पहाटेच्या वेळी करावा. मेंदुला रात्रभर रक्तपुरवठा व्यवस्थित झाल्याने मेंदु तरतरीत असतो. नीट लक्षात रहाते. पण दिवसभर विचार करून मेंदु दमलेला असतो, आणि रात्री झोप येते तेव्हा जागरण करून अभ्यास केला तर काऽऽही उपयोग होत नाही. झोप येणे, म्हणजे आतून येणारा सिग्नल आहे. “आता मी दरवाजा बंद करत आहे. बाहेरचे व्यवहार बंद. आम्हाला आतील दिवसभराची सर्व पेंडींग कामे करायची आहेत.” असं तो म्हणतो.
बॅन्क कशी दुपारी तीननंतर आतून बंद करून घेतली जाते. पण आतमधे बॅन्क बंद नसते. आतमधे काम सुरू असते. तसंच शरीराचं असतं. आतली कामे करायची असल्याने दरवाजा आतून बंद ! (म्हणजे झोप. )
आता पचनाचे काम आतील भागात सुरू झालेले आहे, तेव्हा हीच उर्जा पचनासाठी वापरली जाईल. म्हणजे “पेरीफेरल सर्क्युलेशन” कमी होईल. आणि “सेंट्रल सर्क्युलेशन” वाढवले जाईल. इथे सुद्धा हातापाय आणि डोक्यातील शक्ती पचन नीट होण्यासाठी आतमधे वळवली जाते. जेव्हा उर्जा आतमधे आहे, तेव्हा बाहेरची कामे कमीच करावीत.
आता एक गोष्ट लक्षात येतेय का पहा.
आज्जी सांगायची, “अरे आत्ता जेवला आहेस ना, धावतोस कसला, पोटात दुखेल. असं जेवणानंतर लगेच धावू नये ”
……. म्हणून जेवणानंतर लगेच धावू नये, लगेच मोठे काम करू नये, लगेच अभ्यास करू नये. कारण असं मोठे शक्तीचे काम बाहेर सुरू झाले तर आतील पचन बिघडते…….
जेव्हा पचनानंतर उर्जा तयार होणार असते, तेव्हा बाकीची सर्व कामे थांबवली तर शरीराला आतमधे लक्ष दिले जाईल. आतले काम पूर्ण झाले नाहीतर दुसऱ्या दिवशी पुनः काम सुरू करताच येणार नाही. म्हणून इतर सर्व कामे थांबवायची ऑर्डर काढली जाते, म्हणजेच आपणाला झोप निर्माण केली जाते. बाकी सगळी कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये विश्रांतीला गेली की मनाला मनसोक्तपणे आपली आतली कामे करता येतात. पोरं, नवरा शाळेत, कामाला गेली की कसं छाऽन कामं आवरता येतात. कोणाचाही अडथळा नाही.
तसं जर लवकरात लवकर पचनाचे काम पूर्ण करण्यासाठी, आपण जर लवकर जेवलो, आणि लवकर झोपलो तर पुढे तो मनसोक्त काम करवून घ्यायला मोकळा !!!
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
05.03.2017
Leave a Reply