नवीन लेखन...

जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 12

सायंकाळी सातला जेवण्याचा प्रयत्न केला. पण पुनः रात्री झोपताना भूक लागते. गेल्या अनेक वर्षांची सवय आहे. जात नाही.. पित्ताची प्रकृती आहे, काय करावे ? अशा सर्व सामुदायिक शंका लक्षात घेऊन ही सोयीस्कर टीप.

आपण आजच्या काळातील बिझ्झी लाईफमधील जेवणखाण कसे करतो ?
सकाळी उठतो आधी चहा. त्याबरोबर मैद्यापासूनचे टोस्ट, बटर, बिस्कीट, मारी, खारी. ती वचावचा खाऊन झाली की, आंघोळ वगैरे आटपून नाश्ता. काही जणांचा नाश्ता हा उपीट पोहे, तर काहींचा इडली, आंबोळी, तर काही जणांकडे चपाती भाजी तर काही जणांकडे पेज किंवा मऊ भात असतो. तर काही जण पावात टोमॅटो काकडी कांदा गुंडाळून खातात, तर काही जण चहात बुचकळून पाव खातात की झाला नाश्ता !

बायकोनं पहाटे लवकर उठून केलेला आणि आठवणीने बरोबर दिलेला डबा. बहुतेक वेळा डब्यात चपातीभाजीच असते. आणि भाजी म्हणजे सुक्या बटाट्याची. सांडायची भीती नाही. रसभाजी न्यायची म्हणजे पुलंच्या धड्यातील कोचरेकर मास्तर व्हायची भीती.

दुपारच्या वेळेत डबा खाणे म्हणजे, तिथल्या तिथे डब्यातल्या डब्यात दोन्ही हातानी चपाती ओढून तोडून भाजीबरोबर गिळायची. प्लॅस्टिकच्या बाटलीतले पाणी ढोसायचे, उरलेले पाणी हाताला लावून हात “शुद्ध” करायचे. वर फक्कड चहा मारायचा की झाले. चार पाच वाजता, कोणीतरी दिलाच तर वडापाव, समोसा सहज जातो. तब्येतीला बरा म्हणून ज्युसचा ग्लास पोटात रिकामा होतो. रंमत गंमत घरी येईपर्यंत आठ वाजतात.बूट साॅक्स फेकून दिले, शर्टची वरची दोन बटणं काढली की, सोफ्यावर आडवे राहात, पाय खुर्चीवर ताणून, चेहेऱ्यावर जमेल तेवढा दमल्याचा आव आणायचा आणि डोक्याला आठ्या घालत, अश्शी ताणून द्यायची, की बघणाऱ्याला वाटलं पाहिजे की, साहेब कोणत्यातरी मोठ्या लढाईहून घायाळ होऊन परतलेले सैनिकच आहेत.

तिथूनच पोरांवर ओरडत, पंख्याची गरगर सुरू करायची ऑर्डर द्यायची, आणि आपण आल्याची वर्दी स्वयंपाकघरात आपसूक जायची. गरमागरम चहा आयता हातात पडेपर्यंत, बाहेर गरम झालेलं डोकं घरातल्या कुणावर तरी राग काढून शांत व्हायचं.भरपूर भुक लागलेली असल्यामुळे चहाबरोबर काहीतरी कुरकुरीत चकली चिवडा फरसाणाचा डबाच घेऊन बसायचं. मग कुठेतरी जरा जीव शांत व्हायचा.

“टिव्ही समोर बसून खायचं नसतं” हे सकाळी पोरांना ऐकवलेलं वाक्य विसरून जात, चहा चकली पोटात विरून जाते. दिवसभराचा तथाकथित सगळा शीण, टीव्ही मालिकेतल्या सुंदऱ्यांनी आणि जाहीरातीतल्या चिचुंद्यांनी तासा दोन तासात घालवला, की टेबलावर ताट पाणी यायला सुरवात होते. “आता कसं शांतपणे जेवता येतं. एकत्र चर्चा होते.” हीच वेळ असते मुलांसोबत त्यांच्याशी अभ्यासपूस करायची. म्हणजे पोरं सुद्धा वाढलेल्या ताटाखालचं मांजर होतात. दिवसभर सगळं वचावचा खाल्लेलं असल्यामुळे रात्रीचे जेवण कसं साग्र संगीत बनवलेलं असतं, पुनः गरमागरम चपाती भाजी, आमटी, भात, सॅलेड, भाजी, उसळ, तळलेली दोन चार कापं, लोणचं पापड. ताट असं गच्च भरलेलं. भरल्या पोटानं उठून, हात धुवत, दात कोरत, हालत डुलत स्वारी थेट शयनकक्षात. स्वयंपाकघरातली आवराआवरी करून बाईसाहेब तासाभरात पुनः दुधाचा ग्लास घेऊन प्रवेशतात. आणि दुधाचा ग्लास रिता करून आमचा दिवस संपतो. भरल्यापोटी कशी मस्त झोप लागते ना.

हे एवढं खाताना आपण चार ते पाचवेळा तरी ढेकरा दिलेल्या असतात.

या जीवनपद्धती मधे आम निर्मिती, क्लेदामधे रूपांतरण या क्रिया अगदी सहजपणे घडत असतात. पहिले अन्न पचायच्या आतच दुसरा अन्नाचा गोळा वरून आत पडत असतो.

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत चारच वेळा आपण खाल्लंय असं गृहीत धरू.
सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, सायंकाळी नाश्ता आणि रात्री पुनः जेवण.

आता आपण कायदा केला, सकाळी आणि सायंकाळी जेवावे. या कायद्याची सोयीस्कर पळवाट पाहून ठेवू.

असं करता येतं काय पहा.

टीव्ही बंद, घरात सौ. ला थोडी हाताखाली मदत करायची, भाजी चिरून देणे, टेबल साफ करणे, नारळ खोवून देणे, ताटपाणी घेणे, कपबश्या विसळणे, अशी कामे जरा चुकली तरी फारसा ओरडा खावा लागणार नाही, मुलांची शाळा अभ्यास जेवताना बिलकुल नाही.आणि जेवणाचे कौतुक करतच जेवायचं.

सकाळी नाश्त्याऐवजी जेवण करूनच बाहेर पडायचं. दुपारी जेवणाऐवजी नाश्ता करायचा. सायंकाळी घरी आल्यावर परत जेवायचे. आणि रात्रौ झोपताना भूक लागली तरच नाश्ता करायचा ! तोही अगदी सुका. दूध नको, पाणी नको. कुठेतरी राजगिरा लाडू, लाह्या, पाॅपकाॅर्न, चुरमुरे, भडंग, सुका मेवा, चिक्की, काॅर्नफ्लेक्स इ. पचायला हलके असणारा पण इकडे तर पोट भरती करणारा……

हा नियम नाही, पण नियमातील प्रॅक्टीकल पळवाट आहे. पण शास्त्र तत्वाला कुठेही बाधा येत नाही.

म्हणजे सकाळी जेवण सूर्याबरोबर, दुपारचा नाश्ता सूर्याबरोबर, सायं भोजन सूर्याबरोबर ! आणि रात्रौचा नाश्ता “सौ” बरोबर !!
ये हो गया हिसाब बराबर, सौ साल के लिए !!!

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
07.03.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..