कावळ्याचिमणीची गोष्ट
गुरू दत्तात्रेयांनी 24 गुरू केले होते. त्यात एक क्षुद्र किटक, कोळी सुद्धा होता. भक्ष्याला पकडण्यासाठी तयार केलेलं जाळं तुटलं तरी जिद्द न हरता, परत परत तो तयार करीत होता. ज्याच्याकडून जे शिकता येईल ते शिकावं हे दत्तगुरूनी शिकवलं होतं. तसं हा कावळा पक्षी माझा गुरू झाला. खूप काही शिकवून गेला.
एकदा रात्री साडे दहा वाजता दवाखान्यातून घरी येत असताना, घरासमोरच रस्त्यावर एका बाजूला एक मांजर गाडीखाली सापडून मरण पावले होते. खूप वाईट वाटलं. पण….
दुसऱ्याच दिवशी सकाळी साडेसहा वाजता काही कामानिमित्त घराबाहेर पडलो, तेव्हा त्या मृत मांजराभोवती तीन चार कावळे बसून त्याला खात होते. माझी गाडी त्यांच्या जवळून गेल्यावर ते उडून गेले. मी पुढे गेल्यावर परत तिथे आले. माझे काम संपवून जेव्हा अर्ध्या पाऊण तासाने परत आलो तेव्हा जवळपास अर्धेअधिक मांजर त्यांनी फस्त केले होते.
गाडीतून उतरताना बुद्धीने विचार केला….
काल रात्रीपासून ते मांजर तिथे पडून होते, रात्रीची शांत निवांत वेळ खाण्यासाठी योग्य होती, वाहानांचा, माणसांचा कोणाचाही त्रास नव्हता, मग या कावळ्यांनी रात्रीच या मृत मांजराला का खाल्ले नाही ??????
तेव्हा, त्याने आखून दिलेला नियम आठवला आणि लक्षात आले. रात्रीचे खायचे नसते.
जे काही खायचे ते सूर्योदय झाल्यावर खावे. पोटभर खावे. भीती न बाळगता खावे आणि महत्त्वाचे म्हणजे खाल्ल्यानंतर काय खाल्ले होते, ते अजिबात आठवू नये. म्हणजे खाल्लेले सर्व सहज पचून जाते. खाल्लेल्या अन्नाविषयी मनात नकारार्थी भावना तयार व्हायच्या अगोदरच आहार पचून गेला पाहिजे.
सूर्यास्त झाल्यानंतर काहीही खाऊ नये, हे त्याच दिवशी संध्याकाळी चिमण्यांनीदेखील मला शिकवले. एका दुकानात सौ. बरोबर गेलो होतो. ती आत मधे खरेदी करताना मी गाडीत बसलो होतो. आणि दुकानाच्या बाहेर जमिनीवर पडलेले धान्य खाण्यासाठी येणाऱ्या चिमण्यांच्या थव्याकडे कुतुहलाने पाहात होतो.
सायकल वाला आला, चिमण्या भुर्रऽऽऽ,
रिक्शा आली पुनः चिमण्या भुर्रऽऽऽ
माणसं गेली तरी चिमण्या भुर्रऽऽऽ
कितीतरी वेळ असा पोटभरतीचा खेळ चालला होता. त्यांचा चिवचिवाट ऐकून बरं वाटत होतं.
तेवढ्यात सौ.चा निरोप आठवला, काळोख पडायच्या आत पिठाच्या चक्कीवरून दळण आणायचे आहे. म्हणून अगदी जवळच असलेल्या चक्कीवरून दळणाची पिशवी आणून गाडीत ठेवली. एव्हाना दुकानाबाहेर दिवे पण लागले होते आणि त्या संधीप्रकाशात मी परत चिमण्या शोधायला लागलो, पण एकही चिमणी दिसेना. चिमण्यांनी फुललेला बाजुचा गुलमोहर देखील अबोल झाला होता. एक विषण्णता मनात दाटून आली. सायकलवाला पण नव्हता, रिक्शावाला पण नव्हता, माणसांची वर्दळ पण थांबली होती, पण सर्व चिमण्या मात्र निमूटपणे परत फिरल्या होत्या……घराकडे अपुल्या….
कारण एकच होतं. तो “दिनकर” अस्ताला गेला होता.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
01.03.2017
Leave a Reply