योगरत्नाकर या ग्रंथामधील हा आणखी एक श्लोक पहा.
सायं प्रातर्मनुष्यानां अशनं श्रुतिचोदितम्।
नान्तरा भोजनं कुर्यात् अग्निहोत्र समो विधि:।।
शास्त्रात इतक्या स्पष्ट शब्दात लिहिले आहे.
सायंकाळी आणि सकाळी या दोन वेळा जेवले पाहिजे. जसे सूर्योदय आणि सूर्यास्त या वेळी अग्निहोत्र चुकत नाही, तसंच भोजन हे पण एक प्रकारचे अग्निहोत्रच आहे. या वेळेला जेवण्याचा नियम अजिबात चुकवू नये.
“काल भोजनम् आरोग्य कराणाम् श्रेष्ठः। ”
म्हणजे योग्य वेळी घेतलेले भोजन हे आरोग्य मिळवण्यासाठी योग्य असते. आपण काय जेवतोय, यापेक्षा किती वाजता खातोय, या वेळेला महत्त्व आहे.
हे सगळं ठीक आहे हो, पण आजच्या काळात हे तर्कसंगत वाटत नाही. पूर्वीच्या गोष्टी सांगून हे असं स्वप्नरंजनात जाणं आणि तिथे रमणं, हे वय वाढल्याचं लक्षण वाटते. असं काहीजण म्हणतात. विशेषतः वैद्यांनी म्हटले की यांच्या पराभूत मानसिकतेला काय म्हणावं कळत नाही.
आयुर्वेद समजून घेण्याच्या प्रक्रियेत चुक झाली की अश्या शंका निर्माण होतात. आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण घेताना रंजक आणि रोचक भाषेत न शिकवल्यामुळे शिक्षणाबद्दलचे प्रेम वाढत तर नाहीच उलट कमी होते, एखादी गोष्ट समजून सांगण्यासाठी वेगवेगळी रूपके वापरायची असतात, हे अजूनही शिक्षकांच्या लक्षात येत नाहीये. आपली जेवणाची वेळ सकाळ आणि सायंकाळ असावी हे एकच वाक्य आपण कितीतरी वर्षापासून तसे ऐकतंच आलोय, पण बदल झाला का ?
नाही. पण कालचक्राची गती फिरल्यामुळे हेच वाक्य पुनः पुनः पटवून द्यावे लागत आहे. आणि हे सांगण्यासाठी जर भारतीय संस्कृती प्रमाण मानली तर आपला गौरवशाली इतिहास देखील लक्षात येईल आणि मुख्य म्हणजे आयुर्वेद समजून घेतला जाईल ना ! पण पटतच नाही.
समजा आपण एका रस्त्यानं जातोय, आणि काळाच्या ओघात रस्ता चुकलो. आणि अगदी एकशे ऐशी अंशात चुकलो, तर काय करायचं ?
आता एवढं आलोच आहोत तर पुढेच जायला पाहिजे ना. असा विचार करून चालेल का ?
जिथून रस्ता चुकला आहे, तिथपर्यंत मागे आलंच पाहिजे. आणि परत योग्य दिशेने प्रवास सुरू केला पाहिजे. तरच आपण आपल्या ध्येयाच्या दिशेकडे वाटचाल करू.
‘काळ खूप पुढे गेला आहे. आता परत मागे फिरता येणे शक्यच नाही, प्रवाहाच्या दिशेत गेलंच पाहिजे,’ अशी नकारात्मक मानसिकता असेल तर काऽही शक्य नाही. जिवंत मासेच प्रवाहाच्या विरोधात पोहू शकतात, आणि मेलेले प्रवाहात वाहात जातात.
आणि आपला आपल्या शास्त्रावर, आपल्या स्वतःवर पूर्ण विश्वास असेल तर, अशक्य ते शक्य करतील स्वामी या उक्तीप्रमाणे, जे रोग कधीही बरे न होणारे असे पाश्चात्य मानसिकतेचे लेबल लावलेले रोग आपण मुळातून उखडून टाकू शकतो.
आरोग्यटीप लिहिण्याचा मुळ उद्देश भारतीय आयुर्वेद आणि त्यातील आरोग्य समजून घेणे हा असल्याने ते मी करणारच. त्याच पद्धतीने तो समजून घ्यावा लागेल. जी चुक आधीच्या पिढीने केली ती आता परत करायची नाही.
आता या टीपेमधे स्वामी समर्थांना आणि अग्निहोत्राला कशाला आणलं ? असा प्रश्न विचारू नका.
रुग्ण बदलायला तयार असतात. वैद्यांनी सांगितलेले सर्व मनापासून करतात, विश्वास ठेवून केले की परिणाम दिसतात. असा माझा अनुभव आहे. अर्थात त्या विश्वासाने वैद्यांनी पण सांगणे आवश्यक आहे. त्यासाठी वैद्यांनी आपल्यामधे सकारात्मक बदल केले पाहिजेत, असे वाटते. मी सांगतो म्हणून अजिबात नको. शास्त्रात काय सांगितले आहे, ते तरी परत एकदा अभ्यासूया.
अर्थात गरज आहे ती, आपलं चुकलंय, हे समजण्याची. आणि मान्य करायची !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
03.03.2017
Leave a Reply