नवीन लेखन...

मनांत घर केलेलं तरंगतं अदभुत खेडं – पेरु – उरोस

लहान असताना आपल्या मनात किती गंमतशीर कल्पना असतात आणि तेंव्हा त्या अगदी ख-याखु-याही वाटतात.आता माझ्याच मनात पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात रहाणा-या माणसांबद्दल किती गंमतीदार कल्पना होती बघा!

मुळात पृथ्वी सरळ सपाट नसून गोलाकार आहे हे शाळेत गेल्यावर कळले. नंतर पृथ्वीचा गोल हा अखंड नसून दोन गोलार्ध जोडून बनलेला आहे, दोन गोलार्धांचा जुळलेला बेस—विषुववृत्त– म्हणजे माणसांना पाय ठेवण्यासाठी उपयोगात येणारी जमीन गोलाच्या मध्यभागी आहे ह्या गोष्टींची नंतर माहिती झाली. मग डोक्यात प्रश्न डोकावला की आपण वरच्या गोलार्धात आहोत म्हणून आपण सरळ जमिनीला पाय व वरच्या बाजूला डोके असे उभे असतो पण त्या मधल्या जमीनी खाली म्हणजेच कल्पनीक विषुववृत्ता खालच्या भागात रहाणारी माणसे उभी रहाताना आपल्यासारखी सरळ उभी असतात का खाली डोके वर पाय करून उभी असतात ….छताला चिकटणा-या पालीसारखी..? ही लहानपणची कल्पना मात्र खूप दिवस मनात पक्की होती.ती खरी का खोटी ते पहाण्यासाठी विषुववृत्त ओलांडून जाणे भाग होते.

विषुववृत्ताच्या खाली नाही पण त्याच्या खूपच जवळ असलेल्या सिंगापूरच्या वास्तव्यामुळे प्रवास करण्याच्या संधी उपलब्ध होत गेल्या,नवीन माहिती गोळा करण्याची इच्छा मनात उत्पन्न झाली तसा भूगोलासारखा अत्यंत नावडता विषय वाचनात समाविष्ट करावाच लागला. त्यातूनच पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांची ओळख होत गेली व मुख्य म्हणजे विषुववृत्ताच्या रेषेखालील भागाबद्दल मनात कुतूहल निर्माण झाले.आफ्रिकेचा दक्षिण भाग, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण अमेरिका…. अशा ब-याच विषुववृत्ताखालील देशांविषयी माहिती वाचली होती. यातील बरेचसे देश तसे सिंगापूरला जवळ. पण दक्षिण अमेरिका खूपच दूर. इग्वासू सारखा महाकाय धबधबा,ऍमेझोनसारखी विस्तीर्ण नदी, माचूपिचू, नास्काच्या रेषा… काय अन काय…! अशी बरीच आश्चर्ये दक्षिण अमेरिकेत एकवटली होती म्हणून आम्ही तिथे जायच ठरवल. दक्षिण अमेरिका प्रचंड मोठा व ब-याच देशांचा मिळून बनलेला आहे हे कळल्यावर तिथे जायचा विचार नाही म्हटल तरी थोडा लांबणीवरच पडत होता. पण शेवटी तिकडचे सगळे देश जरी नाही तर नाही पण बरच काही दाखवणारी “अनुभव हॉलीडॆज”ची टूर आम्ही घेतली.

अर्जेंटिना,चिले,पेरू आणि ब्राझिल असे चार देश एकवीस दिवसात आम्ही पाहिले. अकरा जणांचा आमचा आजी आजोबा झालेला सिनीयर सिटीझन्सचा चमू “अनुभव”चे अनुभवी व उत्साही संचालक मयुरेश भट यांच्यासह मुंबईहून निघाला. जाहीर न करताही आमची ही “सिनीयर सिटिझन्सची स्पेशल“ टूर होती . सहलीतील मंडळी पहिल्या दिवसापासूनच एकमेकात पूर्ण मिसळून गेली. सगळ्यांच्याच गरजा, छोटी छोटी दुखणी, औषधे, पथ्ये सारखीच असल्याने संकोच वा ओढाताण नव्हती. उलट खूप मोकळेपणा होता. राहता राहिला जेवणाचा प्रश्न ! मयुरेशच्या उत्तम कोऑर्डिनेशने सर्वांच्या – माझ्या सारख्या शाकाहारीच्या- बाबतीतही तो सहज सुटला- अगदी भरल्या पोटाने.

अर्जेंटिना-चिले मार्गे पेरूला आम्ही कधी पोहोचलो ते कळलेच नाही इतके हे दोन्ही देश सुंदर आहेत.आमचे डोळे व कॅमेरा पूर्ण तॄप्त होऊन गेले.आता पेरू काय गंमती दाखवतो ते पहायची उत्सुकता लागली होती. पेरु हा देश निसर्गरम्य व सुंदर आहे. ऍमेझॉन व तिच्या काठच्या जंगलांमुळे एक प्रकारची निसर्गसौंदर्याची उधळणच झाली आहे. किती पहाल तेवढं थोडंच अशी स्थिती होऊन जाते. लीमा, इंकांच्या संस्कृतीमुळे गाजलेलं कुस्को, ही देखणी शहरं पाहून आम्ही ऍमेझॉनची उपनदी ‘तंबोपाटा’च्या काठावरील नैऋत्य ऍमेझोनियन रेझर्वा (राखीव जंगल) पहाण्यासाठी ‘इंकाटेरेन’ या ठिकाणी वास्तव्य केले. दोन दिवस जंगलात व रात्री नदीपात्रात भरपूर भटकंती करून नवीन वनस्पती, प्राणी व पक्षी मनात व फोटोत बंदिस्त केले. कॅनोपी वॉकला तर जमिनीपासून शंभर फूट उंचीवरून झाडांच्या मेघडंबरीतून चालताना छातीत धडधडत होते आणि मजाही येत होती. पेरूमधील माणसे गरीब असली तरी खूप प्रेमळ, अगत्यशील व प्रवाशांची व्यवस्थित काळजी घेणारी असल्याने जंगलात रहाणे खूपच सुखद झाले. मंगोलियन नाही पण तिबेटी लोकांशी साम्य असणारी ही माणसे बेताची उंची व अंगलटीची पण काटक दिसली.

जंगलवास्तव्य संपवून आम्ही कुस्कोला परतलो. माचुपिचू, कॅथिड्रल, कोरिकांचा (इंकांचे प्राचीन सूर्यमंदिर) पाहून ‘पुनो‘च्या दिशेने निघालो. संपूर्ण दिवसाचा बसचा प्रवास तसा रखरखीतच. डोंग, द-या, नद्या पार करत, रेल्वे लाईनच्या सोबतीने, मध्ये मध्ये थांबत, काहीतरी वेगळे पहात आम्ही संध्याकाळी पुनोला पोहोचलो. एवढं करून इथं बघायचं काय,.. तर ‘लेक टिटिकाका’ व त्यातील तरंगती खेडी ! बहुतेकांना हॉंगकॉंग बॅंकॉकचे तरंगते बाजार, तरंगती घरं, व्हेनिस शहरात पडावातून फिरणे आठवत होतेच. त्यामुळे लेक टिटिकाकातल्या तरंगत्या वस्त्या पहायला इतका त्रास सहन करून येण्याची गरज काय असे वाटणे स्वाभाविकच होते.त्यात पुनो हे समुद्रसपाटीपासून ११०००-११५०० फुट उंचीवर लेक टिटिकाकाच्या किना-यावर वसलेलं छोटस गाव. त्यामुळे तिथे पोहोचल्यावर दिवसभराच्या प्रवासाने थकले भागलेले आम्ही सगळे हाय आल्टिट्युड सिकनेसने बेजार झालो. हेलपाटत, हा- हूः करत सगळे जेमतेम खोल्यांत पोहोचलो. गाव पहायला जाण्याची एनर्जी कुणातच नव्हती व गावातही प्रथमदर्शनी काही आकर्षक वाटलं नव्हतं.
दुस-या दिवशी सकाळी “आता आलोच आहोत तर पाहू काय आहे ते’’ म्हणून सगळे बाहेर पडलो. तसे टिटिकाका तळे पुनोत शिरल्यापासूनच आमची सोबत करत होते. पण त्याची विशालता व सौंदर्य पुनोतल्या डॉकयार्डच्या शेजारील उंच टॉवरवरून बघायला मिळाले. ‘टिटिकाका’चा अर्थ रानमांजर किंवा बिबळ्या. खूप उंचावरून आकाशातून पाहिल्यास या तळ्याचा आकार सश्यावर झेप घालणा-या रानमांजरासारखा दिसतो. पण शेकडो वर्षांपूर्वी मनुष्याला उंचावरून उडण्याची क्षमता नव्हती तेव्हा त्यांना या आकाराचे आकलन कसे झाले हे एक न उलगडणारे कोडेच आहे. समुद्रसपाटीपासून ११५०० फूट उंचीवरचं हे विशाल तळं अजूनही बोलिव्हिय़ा आणि पेरू या दोन देशांमधील दळणवळणासाठी वापरलं जातं. अबब! केवढा प्रचंड विस्तार ! अंदाजे ८३०० चॊरस किमी एवढा तर खोली ३५० ते ९५० फुटापर्यंत! खर तर याला तळं म्हणण चूकच आहे.समुद्रामधल्या उंचच उंच लाटा नाहीत एवढे सोडले तर हे समुद्रापेक्षा विशालतेत जराही कमी नाही. जवळ जवळ २५-२६ नद्या आपले जलवैभव याच्या ओटीत अविरत रिते करीत असतात. आणि ते मुक्त करणारी एकच नदी! तीही इतकी अरुंद की येणा-या जेमतेम दहा टक्के पाण्याचा निचरा करते. पण अविरत वाहणारा वारा व उंचीमुळे मिळणारी सूर्याची दाहक उष्णता यामुळे उरलेले नव्वद टक्के पाणी बाष्परूपाने परत हवेत मिसळते. त्यामुळे या तळ्याची मर्यादा कायम राहिली आहे – ऐकून मोठीच मजा वाटली. १०-१२ अंश सें. तपमानाचे काळसर निळे स्वच्छ पाणी व पोटात अनेक जलचर, वनस्पतींना आसरा देणारे हे तळे आपले दोन्ही काठ एका दृष्टिक्षेपात दाखवत नाही
जेमतेम दोन बसगाड्या एकावेळी जाऊ शकतील अशा रत्यातून दुतर्फा उभी असणारी एक मजली , दुमजली घरे ओलांडत आम्ही तळ्याच्याकाठी पोहोचलो.तिथे उभ्या असणा-या बोटीत बसून लेक टिटिकाका बघायला निघालो.१२-१५ जणांना आरामात बसता येईल अशा बोटी उरोस बेटांपर्यंत प्रवाशांची ने-आण करतात. पुनोमधला वाटाड्याने सहास्य मुद्रेने आमचे स्वागत केले.जवळपास २०-२५ मिनिटांचा हा प्रवास एका बाजूला डोंगरावर चढत जाणारी वस्ती आणि दुसरीकडे दूर दूर जाणारा तळ्याचा काठ यामधून चालला होता. काळपट निळसर दिसणारं पाणी उन्हात चमकत होतं. मधूनच तोतोरा- पाणलव्हाळ्यांची शेवाळी हिरवी बेटे लागत होती. त्यांचे पाण्यावर डुलणारे पुंजके नयनमनोहर दिसत होते. दूरवर निळसर डोंगर धूसर दिसत होते. हळूहळू वस्ती मागे पडली व क्षितीजावर तपकिरी रंगाचे काहीतरी तरंगताना दिसू लागले. जसजसे ते जवळ आले तसतसे तरंगणारी बेटे, त्यावरील झोपड्या, वॉचटॉवर, कमानी, बोटी स्पष्ट होऊ लागले.कॅमे-यांची भिंगे पुढे मागे करून सर्वजण ती दृश्ये अधाशासारखी टिपत होते. बघता बघता बोट दोन बेटांच्यामधून पुढे जात एका बेटाच्या किना-याला लागली.

“हीच ती जगप्रसिध्द उरोस बेटे बरं का” गव्हाळी रंगाचा, मध्यम बांध्याचा, उमदा, चुणचुणीत वाटाड्या आम्हाला माहिती पुरवत होता. इंग्रजी भाषेचा फारसा प्रसार नसूनही वाटाड्याचे इंग्रजी उच्चार स्वच्छ व खूपच छान होते.मदतीचा हात देण्यातही तो तितकाच तत्पर होता.

आमची बोट तरंगत्या बेटाच्या म्हणजे खेड्याच्या किना-याला लागताच उतरण्यासाठी आमची एकच लगबग सुरू झाली. वाटाड्याने आम्हाला आवरले म्हणून बरे. तो प्रथम उतरला व त्या तरंगत्या जमिनीवर उतरताच भसकन त्याचा पाय ३-४ इंच जमिनीत रुतलाच की ! आम्ही तर त्याच्या पेक्षा खूपच वजनदार! काय झाले असते आमचे या भीतीने “पहिले आप पहिले आप”चे नाटक आपसात सुरू झाले. वाटाड्याने व नावाड्याने आम्हाला सावकाशपणे त्या बेटांवर उतरवले. आमचेही पाय खोलात जातच होते पण कसेबसे तोल सांभाळत होतो.जमीन नव्हतीच ती. वाळलेल्या ‘तोतोरा’ गवताचे भारे एकावर एक रचून व पसरून तयार झालेली पाण्यावरची चटई होती ती. त्यामुळे पाय रुतत होते व गवत तुटण्याचा आवाजही येत होता. आमच्या स्वागताला हसतमुखाने उभे होते – त्या गावचा ‘प्रेसिडेंट’ (प्रमुख), त्याची बायको व परिवारातील इतर सदस्य !

मध्ये मोकळी जागा व कडेने झोपड्या अशी या खेड्यांची रचना आहे.बोटीतून उतरून तोल सांभाळत आम्ही मोकळ्या जागेत येताच उपस्थित उरोसवासियांनी आमचे स्वागत गाणी म्हणून, नाच करून आम्हाला शुभेच्छा देऊन केले. त्यांच्या प्रमुखाने खेड्याची,कुटुंबाची,लेक टिटिकाकची माहिती तर दिलीच पण त्यांचे गवताच्या चटयांचे बेड कसे बनवतात, विणकाम, भरतकाम, करमणूकीचे कार्यक्रमही दाखवले. आम्हा सर्वांना आपल्या झोपड्या आतून दाखवल्या. काही लोकांना तर त्यांचे कपडे घालून मि. व मिसेस प्रेसिडेन्ट म्हणून फोटोही काढायला लावले. गवताची जमीन असल्याने हे लोक स्वयंपाक कसा करतात हा प्रश्न आमच्या मनात इथे पाऊल टाकल्यापासून डोकावत होताच.कसे विचारावे याचा विचार मनात येण्या अगोदर आमच्या चेह-यावर उमटला असावा.शिवाय त्या लोकांनाही आता प्रवाशांच्या कुतुहलाची सवय झाली आहेच. त्यामुळे त्यांच्या प्रेसिडेंटने खूण करताच दोन महिला पुढे सरसावल्या.त्यांनी मोकळ्या जागेच्या एका बाजूला गवताच्या जमिनीवर एक फुटभर उंचीच्या दगडांच्या भक्कम दोन उतरंडी रचल्या, त्यावर जाड पत्रा टाकून चुली मांडल्या व त्यावर सिरॅमिकची भांडी ठेऊन स्वयंपाकाचे प्रात्यक्षिक दाखवले.

“तुम्ही काय खाता” या प्रश्नाचे उत्तर लगेच “आम्ही तळ्यात मिळणारे मासे, बदके, बटाटे व पुनोहून कधीमधी आणला जाणारा तांदूळ शिजवून खातो” असे मिळाले.

“तुमचे बाथरूम कसे असते?” न रहाऊन आमच्यापैकी एकाने विचारला.

“आमच्या नित्यनैमीत्तिक गरजा भागवण्यापुरता गवताच्या चटयांचा आडोसा बेटाच्या मागच्या बाजूला तळ्याच्या काठावर उभारून आम्ही बाथरूम तयार करतो.चला. तुम्हाला दाखवतो” असे म्हणून आम्हाला वाटाड्याने खालच्या गवताच्या जाड चटईवर पुढच्याबाजूने थोडासा उंच व पाण्य़ाच्या बाजूने उतरता होत जाणारा जाड पत्रा टाकून केलेक्या बाथरूम दाखवून आमचे पुढचे कुतुहलही ओळखले.

“या पत्र्याच्या उतारामुळे पाणी व इतर गोष्टी खालच्या गवतावर न पाडता सरळ तळ्यात समर्पित होतात “ या वाक्याने सर्वांच्या चेहे-यावर एक हलकेसे स्मीत पसरले.

“कुणाला ट्राय करायचे आहे का?” त्याने मिश्किलपणे विचारले. पुनो सोडून जवळपास २-३ तास झाले होते. त्यामुळे तशी गरज वाटत होतीच तरीही ती तळ्याच्या अगदी कडेवर पाण्यावर हेलखावे खाणारी पुढून बंद पण तळ्याच्या बाजूने उघडी असणारी बाथरूम व त्यावरचा लटपटणारा पत्रा पाहून “ नो नो” म्हणत सगळ्यांनी पळ काढला.वाटाड्याच्या चेह-यावर हास्य पसरले. आमच्या मनात अजूनही प्रश्नांची मालिका तयार होतीच व त्यांच्याकडे उत्तरांची.मोकळ्या भगात या बेटाचे प्रेसिडेंट आमची वाटव पहात होते.

“य अशा बाथरूम मध्येच तुम्ही आंघोळही करता की काय?”

प्रेसिडेंट हसले व म्हणाले ”आम्हाला तुम्हा लोकांसारखी रोज अंघोळीची चैन करता येत नाही.कारण गवत कुजण्याचा धोका! म्हणून आम्ही महिन्यातून १-२ वेळा पुनोमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहात जाउन अंघोळ उरकतो.इतक्य उंचीवरच्या कोरड्या व थंड हवेला इतकी स्वच्छता पुरते. त्याच वेळी आम्ही कपडे धुण्याचा कार्यक्रमही उरकतो”

“आजुबाजूला वाढणा-या तोतोरा गवताचा बेड ,चटया तयार करण्या पलिकडे दुसरे काही उपयोग आहेत का?”आमचे प्रश्न संपतच नव्हते.

“हो तर!” प्रेसिडेंट साहेबांनी सांगायला सुरुवात केली.एक तोतोराचे गवत मुळापासून उपटून त्याच्या विविध भागांची माहिती ते देऊ लागले.

“ तोतोराचे गवत मुळापासून तोडले तर त्याचा खालचा वितभर उंचीचा भाग नारळाच्या आतल्या कोंबासारखा गोडसर,कुरकुरीत व पांढरा स्वच्छ असतो.खाण्यात उपयोगी येणारा हा भाग पोटाच्या तक्रारी व आयोडीनची कमतरता दूर करतो.थंडपणा हा याचा महत्वाचा गुण असल्याने तीव्र उन्हापासून आमचे रक्षण करणे व वेदनाशामक म्हणूनही प्रथमोपचारात भाग घेणे हेही या भागाचे काम. तोतोराच्या फुलांपासून बनवलेला चहा विरळ हवामानापासून आमचा बचावही करतो. इतकेच काय पण या गवताची मुळेही भक्कम आधार देण्याबरोबरच “वेस्ट मटेरीयल ’शोषून घेऊन तळे स्वच्छ ठेवण्याचे काम पार पाडतात.अशी ही तोतोरा पाणलव्हाळी कल्पवृक्षाप्रमाणे आमच्या गरजा भागवायला सदॆव सज्ज आहेत.”

आम्हालाही त्यांनी तोतोराच्या मुळाचा छोटा छोटा तुकडा खायला दिला. प्रथम कोणीच तयार होईना. पण ह्यांनी ते धाडस केले. व त्यांच्याकडॆ पाहून मीही. खरच, नारळाच्या कोंबाची गोडसर चव होती. “खूप प्रमाणात खाल्ला तर तुमचे पोट बिघडू शकेल “ या प्रेसिडेंटच्या इशा-यानंतर आणखी मागावेसे वाटत असूनही कोणीच ते धाडस केले नाही.
“ तुम्हाला निस्सान मधून जायचेय का मर्सिडिज मधून?”आता प्रश्न विचारण्याची पाळी प्रेसिडेंटची होती.
“मर्सिडीज नक्कीच आवडेल पण इथे पाण्यावर …..?”

प्रेसिडेंटने हसून वाटाड्याला खूण केली व पाण्यावर तरंगत एक सुबक आकाराची १०-१२ माणसांना सामावून घेणारी आकर्षक लाल रंगाची होडी बेटाजवळ आली.

“ईच आमची मर्सिडीज. पलिकडे दिसते ती निस्सान” प्रेसिडेंटचे उत्तर. ते पुढे सांगायला लागले

”बोटीचा प्रवास हा तर आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग. त्यासाठी याच तोतोरा गवताच्या घट्ट जुड्या एकमेकांना बांधून लहान मोठ्या होड्या केल्या जातात. ड्रॅगन, मासा, नाग, माकड यांचे आकार या होड्यांना देतात त्यामुळे त्या खूपच आकर्षक दिसतात.गंमत म्हणून आम्ही या होड्यांना निसान, मर्सिडीज,बीएमडब्ल्यु वगैरे नावे देतो. मुलांनाही लहानपणापासून या होड्या बनवण्याचे व चालवण्याचे शिक्षण दिले जाते.

“मग या मुलांचे शिक्षण वगैरे?”

“एका त्यातल्या त्यात मोठ्या खेड्यात लहान मुलांची प्राथमिक शाळा आहे.अगदी छोटी छोटी मुलेही मजेत होड्या वल्हवत शाळेत जातात.त्यांचे प्राथमिक शिक्षण या शाळेत होते.पुढील शिक्षणासाठी मात्र पुनोशिवाय पर्याय नाही.”
“आणि कोणी आजारी पडले तर त्याच्यावर उपचार…?”दुस-या बेटावरचा दवाखाना दाखवून

“इथे जुजबी उपचार केले जातात पण मोठ्य़ा दुखण्यासाठी पुनो गाठावे लागते” असे उत्तर प्रेसिडेंट्ने दिले.
“तसेच उजव्या हाताला पहा. ते आमचे चर्च”.प्रेसिडॆंटने छातीवर हात ठेवत सांगितले.आणखीही बरीच मनोरंजक माहिती मिळाली.

खरच एका छोटेखानी बेटावर एक टुमदार गवती इमारत छपरावर क्रॉस मिरवत दिमाखात उभी होती. हस्तकलेचे नमुने,मासे शहरात नेऊन विकणे हा जरी या लोकांचा परंपरागत उपजीविकेचा मार्ग असला तरी वाढत्या पर्यटन व्यवसायाचाही ते उत्तम फायदा घेतात. (येणा-या प्रत्येक प्रवासी बोटीवर ‘टोल’ वसुली आहे.) प्रवाशांची खातिरदारी करणे, त्यांना आपल्या वस्तु विकणे,आसपासच्या खेड्यातून त्यांना ‘मर्सिडीज’ मधून चक्कर मारून आणणे व त्या सर्वातून धनप्राप्ती करून घेणे या सर्व गोष्टी हे लोक अगदी कुशलतेने हाताळतात. बोलिव्हीयात तोतोराच्या चटया,हस्तकलेच्या वस्तु विकणे हाही यांचा एक उद्योग.

ही खेडी कितीही भक्कम असली तरी शेवटी ते गवतच. आणि तेही पाण्यात रहाणारं. त्यामुळे ते हळूहळू तळाशी कुजतंच. आपल्यासारख्या प्रवाशांच्या वाढत्या वर्दळीमुळे वरचा थरही तुटतो त्यामुळे त्यावर निदान महिन्यातून एकदातरी नवीन चटयांची भर टाकत रहाव लागतं. एवढी काळजी घेऊनही ३५-४० वर्षांनी ही खेडी तळ्याचा तळ गाठतातच. त्यासाठी खेड्याला तीस वर्ष झाली की नवीन खेडं बांधायला सुरुवात करतात. ते पुरेसे भक्कम झाले की या जुन्या खेड्यावरच्या चांगल्या झोपड्या, सामानसुमान, वॉचटॉवर वगॆरे उचलून बोटीने नव्या खेड्यात नेतात.

अशी अंदाजे साठ-पासष्ट तरंगती खेडी आहेत म्हणे लेक टिटिकाकामध्ये.सगळी दहा ते बारा फूट खोल पाण्यात. तोतोरा गवत वाळवून त्याचे भारे उलट सुलट एकमेकावर पसरून व भक्कम लाकडांच्या व दोरीच्या साहाय्याने बांधून तयार केलेल्या सहा ते आठ फूट जाडीच्या चटया म्हणजे ही तरंगती खेड्याची जमीन. ही खेडी साधारण तीस ते तीनशे चौ. मीटरपर्यंत कोणत्याही आकाराची. त्यांचा आकार, त्यावरील घरे, माणसे या एकूणच वजनामुळे ‘तरंगती’ असली तरी खूपच सोसाट्याच्या वादळ वा-याशिवाय ‘वा-यावरती घेत लकेरी, दूर चालली उरोसची खेडी’ असे होत नाही पण थोडीशी तरी जागा बदलतेच. किती गंमत वाटत असेल ना ! सकाळी इथे तर संध्याकाळी दुसरीकडे. प्रत्येक खेड्यात त्याच्या व कुटुंबाच्या आकारमानाप्रमणे तीन-चार कुटुंबे रहातात.रहाण्याच्या झोपड्याही याच गवताच्या चटयांपासून केलेल्या असतात.त्यांची कुटुंबसंस्था भावाभावात भांडणे होईपर्यंत अगदी घट्ट व एकसंध असते. पण पटेनासे झाले की भल्या मोठ्या करवतीने तरंगती जमीन कापून मंडळी वेगळी होतात. कधीकाळी एकी झाली तर परत जवळ येऊन दोरीच्या सहाय्याने एकमेकांना बांधून व परत गवताचे थर रचून झाले की परत भाऊभाऊ एक.

मुळात चारेकशे वर्षांपूर्वी स्पॅनिश लोकांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी ‘इंकापूर्व’ लोकांनी तलावाच्या पाण्यात तरंगती घरे बांधून अशा त-हेने आश्रय घेतलेला असल्याने ‘वॉच टॉवर’ तर हवाच ! पूर्वीची दोन-तीन हजार कुटुंबाची संख्या आता पाच सहाशे कुटुंबापर्यंत आली आहे, कारण उच्च शिक्षण व रोजगाराच्या शोधात बरेच उरोसवासी पुनो, बोलिव्हीया व इतरत्र रहातात. मात्र कुठेही असले तरी हे सगळे आपल्य़ा इंकापूर्व संस्कृतीशी एकनिष्ठ आहेत. कुटुंबातील मोठ्या माणसांनी ठरवून केलेली विवाहपध्दत,पोषाख, रहाणी यातून त्याच्या संस्कृतीची कल्पना येते. पुरूष शर्ट,पॅंट,जाकी,हॅट या पोशाखात तर स्त्रिया स्कर्ट,ब्लाऊज,जाकीट, हॅट या वेशात असतात. आयमारा ही त्यांची सध्याची प्रचलित भाषा. इंग्रजीही कामचलाऊ येते पण सहसा बोलत नाहीत. प्रचंड सोसाट्याचा वारा, थंडी,प्रखर ऊन यापासून रक्षण व्हावे म्हणून कपड्यांचे एकावर एक थर घालण्याची पद्धत आहे.बायकांच्या घट्ट घातलेल्या २ वेण्या व टोकाला लग्न व्हायचे असेल तर रंगीत व झाले असेल तर काळे झुपकेदार गोंडे आपले लक्ष वेधून घेतात. गवतावरूनच दिवसरात्र ये जा असल्याने पायात बूट आवश्यकच.पाय फाकवून दोन्ही पायांवर भार देत डुलत डुलत चालण्याची उरोसच्या लोकांची पद्धत पेंग्वीनची आठवण करून देत होती. आमचेही थोड्याच वेळात आपोआप पेंग्वीन झाले.काही प्रगत व त्यातल्या त्यात श्रीमंत खेड्यात सोलार पॅनल्स बसवून वीज,रेडिओ वगैरे सोयी केलेल्या दिसल्या.

ही सगळी माहिती गोळा करताकरता वेळ कसा गेला कळलेच नाही. मर्सिडीजची परत एक मस्त चक्कर मारण्याचा मोह आम्हाला आवरता आला नाही.भाषा समजत नसतानाही आमच्याशी संवाद साधण्याची त्या साध्यासुध्या खेडुतांची धडपड पाहून उरोसची ही तरंगती वस्ती पहायला पुनोपर्यंत आल्याचं सार्थक झाले.येताना या आश्चर्याची काहिच माहिती नसल्याने येववत नव्हतं, पण जाताना मात्र प्रेमळ आदरातिथ्यामुळे जाववत नव्हतं. परतताना आम्हाला एकेकाने हातात हात घेऊन न कळणा-या भाषेतून “परत या बर का” म्हणुन दिलेला निरोप भाषेच्या माध्यमाविना अचुक हृदयाला भिडला.बोटीने वेग घेतला,पुनो दूरवर दिसू लागल. आम्ही मात्र परत परत मागे वळून एक आगळंवेगळ अद्भुत डोळ्यात साठवत होतो. नकळत ते आमच्या मनात खोलवर घर करत होतं.

 

— अनामिका बोरकर
९८१९८६९०९०
२, श्री राजराजेश्वरी कृपा, दातार कॉलनी,
भांडूप (पू), मुंबई ४०० ०४२.

 

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..