दुपारची वेळ होती. सोसायटीत थोडी सामसूमच होती. सौभाग्यवती स्वयंपाकघरात कामात होती. अमित संगणकावर कांही काम करत होता. मीही पेपर वाचत होतो. माझ्या लाडक्या संपादकाचा अग्रलेख वाचण्यात मग्न होतो. त्यांनी धनदांडग्या उद्योगपतींवर चांगलं झणझणीत लिहिलं होतं. खरं तर ते दिवाळीचे दिवस होते. त्या दिवशी कांही सण असा नव्हता. पण रविवार होता. अशी सर्व आघाड्यांवर शांतता असतांना आमच्या अमितच्या नांवाने समोरच्या बिल्डींगमधून जोराजोरांत हाका येऊ लागल्या.
◼
खर तर ह्यात कांही विशेष नाही. कारण आमच्या सोसायटीत ब्लाॕक संस्कृती आणि चाळ संस्कृती एकत्र नांदतात. म्हणजे कांही कुटुंब फोन करूनच भेटायला जाणारी आहेत. पण बरीचशी अशी बालकनीतून ओरडून हांका मारणारी आहेत. पण आज ह्या हाकांत एक घाई दिसत होती. अमित खरंच कांही महत्त्वाचं करत असावा. तो पटकन आमच्या बालकनीत गेला नाही. पण हाका वाढल्या तसा तो बालकनीत गेला. समोरच्या बिल्डिंगमधून अरूण त्याला कांहीतरी खाणाखुणा करत होता. अमितला कांही बोध होईना. मीही बाहेर गेलो. आम्ही पहिल्या मजल्यावर रहातो. तो खाली पार्कींगच्या जागेकडे बोट दाखवत होता. एवढे कळले की पार्कींगमध्ये अमितची स्कूटर असते, तिच्याबद्दल तो कांही सांगत होता. अरूणच्या खाणाखुणावरून वाटलं की अरूण आम्हाला सावध करतोय.
◼
शेवटी तो म्हणाला, “अरे, तुझ्या स्कुटरचं पेट्रोल चोरतोय बघ तो.” अमितला ते खरं वाटेना. त्याला वाटलं मित्र त्याची फिरकी घेतायत. पण शेवटी काय आहे, हे जाऊनच बघू या, म्हणून तो निघाला. तेवढ्यांत दुस-या मित्राने फोनवर त्याला तेच कळवलं. मग अमित चिडला. रागारागाने खाली गेला. आमची सौ. मारामारी, चोरी, भांडण, इ. प्रसंगामध्ये एकदम हळवी होते. आमच्या अमितला कोणी मारेल, अशी भीती तिला वाटली नाही. पण अमित त्या मुलाला उगाचच मारेल या विचारांनी ती कळवळली. तिच्या डोळ्यांत पाणी तरळू लागले. तिने अमितच्या मागे मला त्यासाठी पिटाळले. खाली येऊन पाहिलं तर खरंच अमितने त्याची मानगुट पकडली होती. तो एक पंधरा-सोळा वर्षांचा मुलगा होता. किरकोळ होता. अमितच्या दोन झांपड्यांनी कोलमडून पडला असता. अमितने त्याला अगदी चोरी करताना रंगेहाथ पकडले होते. स्कुटरमधलं पेट्रोल सायफन करून डब्यांत भरत असतानाच पकडला होता. बाकीचे मित्रही जमा झाले होते.
◼
आतां तो थरथरू लागला होता. खूप भ्याला होता. पहिली थप्पड पडण्याचाच अवकाश होता, मग तो खूप मार खाणार होता. वरून आमच्या घरून सौभाग्यवती कांही तरी सांगत होती. पण काय ते गोंगाटात ऐकू येत नव्हते. शेवटी ती स्वतः खाली आली. “त्याला मारू नका हो. त्याला घरी घेऊन चला.” ती कळकळीने म्हणाली. तिच्या मते ते दिवाळीचे, आनंदाचे दिवस होते. त्या गरीब मुलाला दिवाळीत मार खायला लावायचा? अर्थात् इतर दिवसांतही तिने असेच कांही कारण देऊन अशीच त्याची बाजू घेतली असती हे मला ठाऊक होतं. तिच्या डोळ्यांतून गंगाजमुना वाहणार अशी भीती मला वाटू लागली. अमितने समंजसपणा दाखवत त्याला गर्दीतून बाहेर काढले आणि त्याला धरून घरी घेऊन आला.
◼
तो अजूनही थरथरतच होता. तो सराईत चोर नसावा. आमची सौ. कनवाळू. दिवाळीच्या दिवसांत त्याला मारलं तर ते बरं कां? तीने त्याला खुर्चीवर बसायला सांगितलं. तिचा कनवाळूपणा पाहून अमितही शांत झाला होता. मी त्याला म्हटले, “अरे वेड्या, एवढी दिवसा ढवळ्या चोरी करताना पकडले जाण्याची भीती कशी वाटली नाही तुला?” सौ.ने मात्र दिवाळीत घरी येणा-या एखाद्या पाहुण्याची करावी तशी सरबराई केली. एका थाळींत सर्व फराळ भरपूर वाढला व त्याच्यापुढे ठेवला.प्रथम तो हात लावेना. सौ. म्हणाली, “अरे, दिवाळीत आलेला पाहुणा तू आमचा. तुला उपाशी कसे जाऊ देऊ!” मग त्यानेही फारसा संकोच केला नाही. तो फराळावर तुटून पडला. बहुदा भूक हेच त्याच्या चोरी करण्याचे कारण असावे.सौ.ने फराळ झाल्यावर चहाही दिला. आता त्याची भीती चेपली होती. तो बोलू लागला. स्वतःचे नांव बबन म्हणून सांगितले. जवळच्याच एका झोपडपट्टीतून आलो असं म्हणाला. शाळा केव्हांच सोडली होती. घरी खायला पुरं पडतं नव्हतं. चैन तर सोडाच. मग एकदोन अशाच मुलांनी हा मार्ग दाखवला होता. मी आणि सौ.ने त्याला समजावले, “बाबारे, हा चोरीचा रस्ता तुला कुठे पोचवील, ते सांगता येत नाही.” मग त्याला पन्नास रूपये दिले. सौ. म्हणाली, “कुठें तरी काम बघ. मेहनत कर.”
◼
नेहमीच्या धांवपळीत आम्ही एक दोन महिन्यांत त्याला विसरून गेलो. पूर्ण वर्ष गेलं आणि दिवाळीच्याच दिवसांत हातांत एक छोटं बाॕक्स असलेल्या बबनने आमची बेल वाजवली. त्याला ओळखायला मला जरा वेळच लागला. किरकोळ बबन आता सशक्त झाला होता. “काका, मी बबन, ओळखलं नाहीत?” मग बबनचं स्वागत केलं. बबन म्हणाला, ” मी आतां एका मोठ्या गॕरेजमध्ये काम करतो.” सौ. बाहेर आली. दोघांच्या तो पाया पडला, म्हणाला, “तुमच्यामुळे मार्गाला लागलो.” सौ. ला खूप आनंद झाला. त्याने हातातला पेढ्यांचा बाॕक्स दिला. सौ.ने त्याला पुन्हां फराळ दिला. बबनच्या प्रगतीचा आम्हांला आनंद वाटला.
◼
पुन्हां बबन आला तो आणखी एक वर्षानें. नेहमीप्रमाणेच पाहुणचार झाला. आतां तो स्वतःचं छोटं गॕरेज चालवत होता. धंदा चांगलाच चालला होता. त्याचे पुढचे बेत चालू होते. पण ते आम्हांला कळले त्याच्याही पुढच्या दिवाळीला. तेव्हां त्याने गॕरेजच्या जोडीला ट्रॕव्हेल सर्व्हिसही सुरू केली होती. गॕरेज चालवायला, गाड्या चालवायला पगारी माणसं नेमली होती. आम्ही त्याची प्रगती पाहून चकित झालो होतो. आम्हाला आग्रहाने खाली उभी असलेली आपली इनोव्हा कार बघायला घेऊन गेला. जातांना “काका, कधी गाडी लागली तर आपला नंबर राहू द्या तुमच्याकडे”, असं म्हणून चक्क हातावर एक व्हीजीटींग कार्ड ठेऊन गेला.
◼
आता दर दिवाळीला त्याची वाट बघायची आम्हांला संवयच लागली. पण पुढल्या वर्षी तो आला नाही. पुढल्याच नव्हे तर पुढली चार वर्षे तोआला नाही. त्याच्या नंबरवर फोन केला तो लागलाच नाही. तो आला नाही तेव्हा पहिल्या वर्षी आम्हाला चुटपुट वाटली. ह्याच काय झालं? परत वाईट मार्गाला तर लागला नसेल ना? धंद्यात बुडाला तर नसेल ना? असे विचार आले. पण मग आम्ही त्याला पुन्हां एकदां विस्मृतीच्या कोषांत टाकून दिले. म्हटलं तर त्याचा आमचा काय संबंध होता?
◼
माणसामाणसांचे संबंध हे नियतीनेच ठरवलेले असतात की काय कोण जाणे? आतां ह्या गेल्या दिवाळीच्या आधी एक पांढरी शुभ्र मोठी गाडी आमच्या सोसायटीत येऊन उभी राहिली. ड्रायव्हरने उतरून दार उघडले आणि त्यांतून चकचकीत सफेत कपडे, गळ्यांत सोन्याची चेन घातलेला, अंगाने भरलेला बबनशेठ उतरला. अर्थात तोआमच्याकडेच आला होता. सौ. म्हणाली, “अजून फराळ तयार व्हायचाय. ह्यावेळी लौकर आलास तू?” मी म्हणालो, “अरे, मधली चार पांच वर्षे कुठे गायब होतास तू?” तो म्हणाला, ” सांगतो, सारं कांही सांगतो. मी आता दिवाळीच्या फराळासाठी आलो नाही. तुम्हांला निमंत्रण द्यायला आलोय. ह्या दिवाळीच्या मुहूर्तावर हायवेवर माझा पेट्रोल पंप सुरू होणार आहे. त्याचं उद्घाटन तुम्ही दोघांनी करायचयं. मी आज जो कांही आहे तो तुमच्यामुळे. मावशी, तुम्ही त्या दिवशी मी चोरी करतांना पकडला गेलो तरी दया दाखवून पाव्हण्याचा मान दिलात. माझी दृष्टीच बदलली. तोपर्यंत आईबापांनी पण कधी अशी माया दाखवली नव्हती.” मी म्हणालो, “ते ठीक आहे रे पण मध्ये होतास कुठे?” तो म्हणाला, “साहेब, ट्रॕव्हेलचा धंदा करतांना एका खूप मोठ्या माणसाशी ओळख झाली. ते आपल्या गांवी चल म्हणून आग्रह करू लागले. इथले गॕरेज दुस-याला चालवायला दिलं. इथली ट्रॕव्हेल कंपनी बंद करून टाकली. त्यांनी तिथे मला त्यांच्या कांही उद्योगात भागी दिली. माझा खूप नफा झाला. आता त्यांच्याच ओळखीच्या मंत्र्याकडून पेट्रोल पंपाच लायसन्सही मिळालं. मी आतां इथे परत आलो. माझ्या पेट्रोल पंपाच उद्घाटन मात्र तुम्हीच करायचं हं!” असं म्हणून तो निघाला.
◼
ह्यावेळी बबनशेठना गाडीपर्यंत पोंचवायला खाली गेलो. पेट्रोलचोर बबन्या ते पेट्रोलपंप मालक बबनशेठ हा केवळ नऊ वर्षांतला त्याचा प्रवास कौतुकास्पद होता. आपल्या सौ. ची मायाळू वागणूक ह्याला कारणीभूत झाली, ह्याचाही अभिमान वाटत होता. मी बबनला म्हटले, “बबन, हीच्या शब्दांमुळे आणि वागण्यामुळे तुझ्यांत इतका फरक पडेल असं कधी स्वप्नांतही वाटलं नव्हतं रे! फार छान झालं.” बबनशेठ म्हणाला, “काका, मावशींनी त्यादिवशी माया दाखवली त्याने माझ्यांत एकदम बदल झाला हे खरंच आहे. पण तुम्ही त्यादिवशी दिलेला सल्ला पण मोलाचा होता.” मी कोणता सल्ला दिला होता मला कांही आठवेना. मी म्हणालो, “कोणता रे?” तो म्हणाला, “तुम्ही मला म्हणाला होतात की अरे वेड्या, एवढी दिवसा ढवळ्या चोरी करताना पकडले जाण्याची भीती कशी वाटली नाही तुला? त्या प्रश्नाने माझ्या लक्षांत आलं की चोरी करताना पकडला गेला तरच माणूस चोर ठरतो. तेव्हांपासून ठरवून टाकलं की पकडली जाईल अशी चोरी करायची नाही. आता इतके धंदे केले, त्यांत काय लबाडी करायला लागली नाही. गॕरेजमधे आलेल्या कार्सचे पार्टस घालताना पन्नास रूपयांच्या पार्टला ५००रूपये घेतले तर ती चोरी होत नाही साहेब. भाड्याच्या गाडीचे भाडे अव्वाच्या सव्वा घेतले, तर ती चोरी होत नाही. तिकडे धंदे करतानाही हे करायलाच लागतं होतं, काका. पण हे बीनबोभाट केलं जातं. ह्या कानाची खबर त्या कानाला कळत नाही. तुम्ही सांगितल्यावर माझ्या माझी चूक लक्षांत आली. चोरी राजरोस करायची पण ती चोरी कोणाला कळणारच नाही अशी. किंवा तिला चोरी म्हणताचं येणार नाय अशी. मग धंद्यात यशच यश. पण काका हे मावशीना मात्र सांगू नका. त्यांची समजूत तशीच राहू द्या. धंद्यात यश मिळवायला जरी मी असं करत असलो तरी मावशींच्या मायेमुळे झालेला बदल खरा आहे. तुमच्या दोघांच्या हातून उद्घाटन केलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोलमधे भेसळ होणार नाही ह्याची खात्री बाळगा.” मी अवाक् होऊन एके काळच्या पेट्रोल चोराकडे आदराने पहातच राहिलो.
◼
एका मित्राकडे घडलेली थोडी सत्त्यकथा + थोडी कल्पना
अरविंद खानोलकर.
Leave a Reply