मुळात, पेट्रोल रंगहीन असते व पाण्यासारखे दिसते. पण अन्य पेट्रोलियम पदार्थांपासून त्याची सहज ओळख पटावी म्हणून त्यात नारिंगी रंग मिसळला जातो. उच्च ज्वलनक्षमतेच्या पेट्रोलला लाल रंग दिला जातो, तर लष्करात वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट पेट्रोलला निळा रंग असतो.
त्यात असलेली हायड्रोकार्बन रसायने ३०० से. ते २१०० से. या तापमानाच्या दरम्यान उकळतात. त्यातील विविध हायड्रोकार्बन प्रमाण संयुगांचे संतुलित केलेले असते व त्यामुळे विशिष्ट तापमानाला त्याचा ठरावीक अंश उकळून त्याचे बाष्पात रूपांतर होते. पेट्रोलचे हे उत्कलन त्याच्या गाड्यातील इंजिनाच्या कार्याशी निगडित असते. या इंधनाची घनता ७२० ते ७७५ कि.ग्रॅम प्रति लिटर असायला हवी. तसेच त्यातील सेंद्रिय रसायने, असंपृक्त असेंद्रिय रसायने व बेंझिन या रसायनांच्या प्रमाणावर देखील आवर घालून ठेवावा लागतो. गाड्यांच्या इंजिनातली पेट्रोलची ज्वलनक्षमता ऑक्टेन क्रमांकाने मोजली जाते.
सध्या आपल्याकडे ९१ आणि ९७ या ऑक्टेन क्रमांकाची पेट्रोल इंधने विक्रीस उपलब्ध असतात व जितका ऑक्टेन क्रमांक जास्त तितके ते जास्त खर्चिक असते. पेट्रोल हे स्फोटक इंधन असून, ते इंजिनात जळत असताना धड… धड… आवाज येतो व त्याला ‘नॉकिंग’ असे म्हणतात. या धडधडण्यावर आवर घालण्यासाठी पूर्वी त्यात टेट्राथाइल लेड नावाचे संयुग मिसळीत; परंतु इंजिनाच्या धुराड्यातून बाहेर पडणारी शिशाची संयुगे वातावरण प्रदूषित करू लागली, तेव्हा त्या संयुगाचे उच्चाटन करून बिनशिशाचे (अनलेडेड) पेट्रोल बाजारात आले.
अलीकडे, त्यात एकतर मिथाइल बुटाइल इथर (एम.टी.बी.ई.) सारखी सेंद्रिय रसायने मिसळतात किंवा पेट्रोलची निर्मिती Bear करताना त्यातील चक्रीय शृंखलायुक्त हायड्रोकार्बन रसायनाचा अंश वाढवितात. ही सारी अँटी-नॉकिंग रसायने इंधन जळत असताना ऑक्टेन- बूस्टर म्हणून काम बजावतात व वाहनाचे कार्य हळुवार करण्यास हातभार लावतात. या इंधनात भेसळ झाल्यास त्याच्या कार्याचे संतुलन बिघडते आणि गाडीच्या इंजिनाच्या नासधुशीसोबतच वातावरणातील हवेचे प्रदूषणदेखील वाढते.
जोसेफ तुस्कानो (वसई)
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply