नवीन लेखन...

फिर वही ‘जाॅय’ लाया हूॅं

१९६० ते १९७० या कालावधीत जे चित्रपट गाजले ते त्या चित्रपटातील, सुमधुर व अवीट गीतांमुळेच!! मग त्यात पहिली वर्णी लागली ती ज्युबिलीस्टार राजेंद्र कुमारची!! त्या पाठोपाठ आला, जाॅय मुखर्जी.
वडील शशधर मुखर्जी यांचा फिल्मालय स्टुडिओ, काका सुबोध मुखर्जी हिंदी चित्रपटांचे यशस्वी निर्माते दिग्दर्शक. अशोक कुमार, किशोर कुमार व अनुप कुमार हे मामा, तरीदेखील जाॅयला अभिनेता व्हायचं नव्हतं. करायचा म्हणून ‘लव्ह इन सिमला’ चित्रपट, साधना सोबत केला आणि तो तुफान यशस्वी झाल्यानंतर पुढील ३० चित्रपट केले.
१९६२ साली जाॅयचा ‘एक मुसाफिर एक हसीना’ चित्रपट प्रदर्शित झाला. पुन्हा इथे साथीला साधनाच होती. गाणी ओपी नय्यर यांच्या संगीताने सजलेली असल्याने अप्रतिमच होती. चित्रपट कृष्णधवल असूनही रंगतदार होता.
‘फिर वही दिल लाया हूॅं’ चित्रपटात, आशा पारेख होती. खांद्यावर गिटार घेऊन, लाल टी शर्ट व पांढऱ्या पॅन्टमधील बागेतून गात चालणारा जाॅय, तरुणींच्या दिलाची ‘धडकन’ झाला. या चित्रपटातील सर्वच गाणी अप्रतिम आहेत. कितीही वेळा ती ऐकली किंवा पाहिली तरी ‘दिला’चं समाधान काही होत नाही.
नंतर आशा पारेख बरोबरचा त्याचा ‘जिद्दी’ चित्रपट आला. त्यातही धमाल गाणी होती. त्याकाळी चित्रपटांच्या कथा जरी साचेबद्ध असल्या तरीदेखील गाण्यांसाठी त्या चित्रपटाची अक्षरशः ‘पारायणं’ व्हायची.
‘लव्ह इन टोकियो’ हा जाॅय मुखर्जीचा चित्रपट सुपरडुपर हिट होता. त्याकाळी जपानमध्ये जाऊन चित्रीकरण केलेला एकमेव चित्रपट! यातील गाणी अप्रतिमच, त्यातूनही आशा पारेख व जाॅयचं ‘सायोनारा’ हे गाणं, केवळ अविस्मरणीय!!!
‘शागीर्द’ हा चित्रपट, सायरा बानू सोबतचा होता. जाॅय आणि आय एस जोहर या जोडगोळीने धमाल करमणूक केली. गाणी तर एकसे बढकर एक होती.
काॅलेजला असताना, मॅटीनी चित्रपट पहाण्याचं ‘वेड’ होतं. ‘एक बार मुस्कुरा दो’ हा चित्रपट त्या काळातील ‘मॅटीनी किंग’ होता. जेव्हा कधी तो लागला, मी आवर्जून पाहिला. ओपी नय्यरची ठेका धरायला लावणारी गाणी ऐकण्यासाठी मी आजही युट्युबवर हा चित्रपट पहातो.
१९७१ साली जाॅयने ‘लव्ह इन बाॅम्बे’ चित्रपटाची निर्मिती करण्यास घेतली. सिमला, टोकियो नंतर हे त्याचं तिसरं ‘लव्ह’ होतं. या चित्रपटाचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याला कर्ज बाजारी व्हावं लागलं. जेवढे पैसे कमवले होते ते सगळे संपले. दिवाळखोरीचे ३७ खटले सुरु झाले. अशावेळी राजेश खन्नाच्या ‘छैलाबाबू’ या चित्रपटाने साथ दिली व तो कर्जमुक्त झाला.
१९८५ साली ‘इन्साफ मैं करुंगा’ या चित्रपटातील कामानंतर जाॅय मुखर्जीने निवृत्ती घेतली. दोन्ही मुलं मोठी होऊन मार्गी लागली. राहिलेली २७ वर्षे, त्यानं भूतकाळ आठवत काढली.
९ मार्च २०१२ साली फुफ्फुसाच्या विकाराने, जाॅय मुखर्जी खांद्यावर गिटार घेऊन स्वर्गलोकातील अप्सरांना घायाळ करण्यासाठी निघून गेला.
तो गेल्यानंतर त्याचं स्वप्न ठरलेला चित्रपट ‘लव्ह इन बाॅम्बे’ २०१३ साली प्रदर्शित झाला. मात्र तो पर्यंत सिनेरसिकांची अभिरुची बदलून गेली होती. परिणामी चित्रपट चालला नाही.
आजही माझ्या पिढीतील सर्व रसिकांचं ‘बंदा परवर, थाम लो जिगर, बन के प्यार फिर आया हूॅं. खिदमत में आप की हुजूर, फिर वही दिल लाया हूॅं.’ हे स्वर कानावर पडले की, मन मोहरुन जातं.
जाॅय मुखर्जी यांच्या आजच्या स्मृतिदिनानिमित्त, त्यांना विनम्र अभिवादन!!!
— सुरेश नावडकर. 
मोबाईल: ९७३००३४२८४
९-३-२२.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..