“ काय गो मावशे ?? हॅलो ss .येतंय का ऐकू ?? अगं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला !“
“ ऐकू येतंय म्हणजे काय आप्पा?. चांगलं ऐकू येतंय मला.. तू झाला असशील साठीचा म्हातारा पण मी अजून ऐंशीची तरुणी आहे. काय समजलास !”.
“ हाहाहाss कमाल आहे मावशी तुझी!!”
“ पण आता माझा वाढदिवस सुफळ संपूर्ण झाला बघ. जो पर्यंत आंजर्ल्याहून अप्पाचा फोन येत नाही तोपर्यंत कुणाचाच वाढदिवस साजरा होत नाही!”. असे संवाद या आप्पांसाठी नित्याचेच होते.
हे आप्पा तरुणपणी जे दापोलीच्या पोस्टात लागले ते टपाल तिकीटासारखे चिकटूनच बसले. शक्य तेव्हा गरे, कोकम, आंबे असे कोकण मेव्याचे व्यवसाय आपल्या पत्नीच्या मदतीने करायचे. पण कामानिमित्ताने हेदवी, वेळणेश्वर, हर्णे, कर्दे, रत्नागिरी, राजापूर किंवा कधी अगदी पुण्या-मुंबईला जरी जावं लागलं तरी रात्री पुन्हा आप्पांचा मुक्कामपोस्ट आंजर्ले. “आंजर्ल्याचा कड्यावरचा गणपती” आणि “महानायक अमिताभ बच्चन” ही दोन आप्पांची दैवतं. अगदी श्रद्धास्थान, प्रेरणास्थान, स्फूर्तीस्थान वगैरे वगैरे.. . अमिताभजींची गाणी आणि सगळे संवाद अगदी तोंडपाठ असणारे आप्पा तितक्याच श्रध्द्धेने अथर्वशीर्षाची आवर्तनं सुद्धा करायचे. दर संकष्टीला कड्यावरच्या गणपतीच्या दर्शनास जाण्याचा नेम कधी चुकला नाही आणि बच्चन साहेबांचा कुठलाही सिनेमा बघायचा सोडला नाही. याशिवाय अजून एक गोष्ट आप्पा अगदी न चुकता करायचे ते म्हणजे सगळ्यांना वाढदिवसाचे फोन. मग ते नातेवाईक, मित्रमंडळी असोत, गावातले किंवा पोस्टातले सहकारी असोत ; वयस्कर असोत किंवा ५-६ वर्षांची मुलं-नातवंडं असोत. सगळ्यांना फोनवरून आवर्जून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे हा त्यांचा शिरस्ताच. बरं पुन्हा कसल्या अपेक्षा नाहीत. कुणी कौतुक करावं, गोडवे गावे किंवा आपल्यालाही फोन करावे असं काहीच मनात यायचं नाही कधी. त्यांची ही फोन कीर्ती इतकी पसरली होती की पंचक्रोशीत त्यांना आता सगळे “फोनाप्पा” नावानीच ओळखायचे.
आधीच आप्पांचा स्वभाव बोलका आणि मनमिळाऊ. भरीस इतक्या वर्षांच्या पोस्टातल्या नोकरीमुळे अनेक जणांशी संपर्क. त्यामुळे साहजिकच त्यांचा माणसं जोडण्याचा छंद अधिकाधिक समृद्ध होत गेला. आप्पांच्या खिशात कायम एक छोटी डायरी असायची ज्यात सगळ्यांच्या वाढदिवसांच्या तारखा आणि दूरध्वनी क्रमांक लिहिलेले असत. पुढेपुढे मोबाईल आल्यावर ते काम सोपं झालं पण तरीही अडीअडचणीला असावी म्हणून ती जीर्ण डायरी आप्पा कायम खिशात घेऊन फिरायचे.
एकदा गावातल्या एका तरुणाने मोठ्या कुतुहलाने आप्पांना विचारलं.
“ आप्पा तुम्ही पोस्टात काम करता मग तुम्ही पत्र का नाही पाठवत ? फोन का करता ?”
“ अरेss पूर्वी पत्रेच पाठवित असे ! आत्ता उदरनिर्वाह म्हणून पोस्ट आहेच पण दिवसेंदिवस हे तंत्रज्ञान विकसित होते ते आपण नाही तर कोण वापरणार? तुम्हा तरूणांसारखे आम्हीही काळाप्रमाणे बदलले पाहिजे हळूहळू! नव्हे का ?”
“ हां ss . हे बरोबर आहे तुमचं फोनाप्पा !!”
“ खरे तर घरी जाऊन समक्ष भेट घेऊन प्रत्यक्ष शुभेच्छा द्यावयास हव्यात पण लांब राहणाऱ्यांकडे जाणे शक्य होत नाही आणि दूसरा मुद्दा असाss की वाढदिवसाच्या दिवशी मी कुणाच्या घरी जाणार, म्हणजे मी काहीतरी भेटवस्तु घेऊन जाणे आले. माझे देणे झाले म्हणजे त्यांनी काही तरी देणे आले. आणि हे देणे-घेणे आले म्हणजे व्यवहार आला. तुलना आली. आणि तुला सांगतो एकदा का नात्यात हा व्यवहार आला की कधी ना कधी तो डोके वर काढतोच. त्यापेक्षा आपले फोनवरचे साधे सोपे निखळ नाते बरे !! कसे ? “
आप्पांचे विचार अगदी परखड आणि स्पष्ट.
“ ….आणि तसेही आजकाल सगळ्यांना असे घरी जाणे रुचतेच असे नाही. काहींना आवडत जरी असले तरी ते वाटते तितके सोपे राहिले नाही रे बाबा आता पूर्वीसारखे. देवा गजानना ss !!”
“ म्हणजे ? असं का म्हणताय फोनाप्पा? “
“ अरेss काही वर्षांपूर्वी माझ्या लेकीच्या वाढदिवशी मुंबईस गेलो होतो. तिला न कळवताच. तुम्ही ते सरप्राईझ का काय म्हणता नाs ते द्यायला. तिच्या मोठाल्या इमारतीखालच्या सुरक्षा रक्षकान् आधी मला डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत असं पाहिलंनी ss जसे काही मी याची इस्टेटच मागीत होतो. नंतर मला इतके प्रश्न विचारलेन् पठ्ठयाने की मला वाटले आता माझी जन्मवेळ आणि पत्रिका पण मागतोय की काय. मग लेकीच्या घरी फोन केलान् आणि माझे नाव सांगताना त्या परप्रांतीय ईसमाने माझ्या नावाची तोडफोड करून जी काही वाट लावलीन की “ऐसे नाम के कीसीको हम पेहचानते नही है!!” असा आवाज लेकीच्या घरून आला. मी काही बोलणार इतक्यात त्याने फोन ठेवलानीन. मग मला एका कॅमेरा समोर उभे धरलेन् आणि माझ्या मुखकमलाचे थेट प्रक्षेपण लेकीच्या घरी दाखवलेन्. मला बघताच तिच्या सासूबाई डोळे मोठे करून किंचाळल्याच “ अगं बाई ..व्याही बुवा !! ..अरे तूम छोडो रे ऊनको छोडो उपर.. ये मेरे सूनबाई के पप्पा है !! “
शेवटी विहीण बाईंनी शिक्का मारलाss तेव्हा कुठे आमचे हे पत्र लेकीच्या घरी पोहोचले एकदाचे. मेल्यानं माझ्या सरप्राईझचा पार विचका केलनीन आणि उलट मलाच हे भलते सरप्राईझ दिलनीन. तेव्हापासून कानाला खडा. कोणाकडे आगंतुक जायचे म्हणून नाही ते. शहरात तर नाहीच नाही. या आपल्या जोश्याच्या घरी कसेss जाता येता कधीही गेले तरी अडवायला कुणी नाही. वर चहा मिळतो तो बोनस .. हाहाहा ss “
आजच्यासारखं फोन करणं इतकं स्वस्त नव्हतं तेव्हासुद्धा आप्पा सगळ्यांना फोन करायचे. सुरुवातीला त्यांची पत्नी गमतीत म्हणायची सुद्धा की “ यांचा अर्धा पगार फोन करण्यात जातो आणि उरलेला दानधर्मात!”. ते अगदीच काही चुकीचं नव्हतं. जरा कुणी त्रासात दिसलं, अडचणीत असलं की आप्पा लगेच सढळहस्ते मदत करायचे. मुळात आप्पांच्या गरजा काही फार नव्हत्या आणि गरजूंना मदत केल्यावर त्यांना त्याचं जास्त समाधान वाटायचं. त्यामुळे असलेल्या पगारात सुद्धा खाऊन पिऊन अगदी सुखी होते. त्यांच्यापेक्षा वयाने बराच लहान असलेला पोस्टातला त्यांचा एक जीवश्च कंठश्च सहकारी अन् त्याची पत्नी दोघेही वर्षभराच्या अंतरात अकाली गेले आणि त्यांचा अर्धवट वयातला मुलगा बिचारा एकटा पडला. आप्पांनी क्षणाचाही विलंब न करता त्याची सगळी जबाबदारी घेतली. त्याच्या राहण्याची, पुढच्या शिक्षणाची सगळी सोय आणि खर्च केला. ते सुद्धा त्यांना सेवेतून निवृत्त व्हायला अगदी काहीच महीने शिल्लक असताना. त्या मुलानेही त्याची जाण ठेवून खूप मन लावून अभ्यास केला. अखेर त्याच्या कष्टाचं चीज झालं आणि आय आय टी मुंबईत त्याला प्रवेश मिळाला. तो जाताना दोघेही भावूक झाले.
“ आप्पा ss तुम्ही आणि आजींनी मला आधार दिलात म्हणून मी आज इथवर पोचलो. हे उपकार मी कधीही विसरणार नाही. “
“ अरे वेड्या ss , काय ही उपकराची भाषा करतोस ? उलट तुझ्यामुळे आम्हालाही एक गुणी नातू मिळाला. अजून काय हवे आम्हा म्हातारा म्हातारीस ? तू आता मोठा साहेब होणार अन् रडतोस काय असा ? हा घे हा आपल्या कड्यावरच्या गणपतीचा फोटो कायम ठेवीत जा खिशात आणि प्रसन्न मनाने जा मुंबईस. यशस्वी हो !!”
काळ पुढे सरकत होता. आप्पांची लेक तिच्या संसारात गुरफटली होती. आय आय टी तला नातू सुद्धा मुंबईतच चांगल्या नोकरीत स्थिरावला होता. निवृत्त झालेले फोनाप्पाही आता वार्धक्याकडे झुकले. वयानुसार काही ना काही तक्रारी सुरू झाल्या. अगदी झोपून वगैरे नसले तरी बऱ्यापैकी थकले होते. लांबचा प्रवास मात्र पूर्णच बंद झाला. गावातल्या गावात फिरणं क्वचितच होऊ लागलं. संकष्टीला कड्यावरच्या गणपतीला घरूनच नमस्कार करू लागले. विरंगुळा म्हणून टीव्हीवर अमिताभ बच्चनच्या सगळ्या सिनेमांची पारायणं झाली. पण या फोनाप्पांचे वाढदिवसांचे फोन मात्र अगदी पूर्वीसारखे सुरू होते. अगदी त्याच उत्साहात. एव्हाना इतकी माणसं जोडली गेली होती त्यांच्या खजिन्यात की रोज कुणाचा ना कुणाचा तरी वाढदिवस असायचाच.
आज आप्पांचाच सत्तरावा वाढदिवस होता. सकाळी लवकर त्यांच्या मानस नातवाचा आजीला फोन आला. “ हॅलो आजी. आप्पा झोपले असतील ना आत्ता ?”
“ हो रे बाळा. उठवू का त्यांना ?”
“ नको नको ss . मी दिवसभरात आप्पांना फोन करतो शुभेच्छा द्यायला. पण आज एका महत्वाच्या कामासाठी जाणार आहे. ते झालं तर कदाचित एका वेगळ्या नंबर वरून सुद्धा फोन करीन. त्यामुळे कुठलाही फोन आला तरी घ्यायला सांग आप्पांना. तू सुद्धा दिवसभर आप्पांच्या जवळपासच रहा!”
“ काय ? नवीन नोकरी वगैरे धरतोयस का ? की आम्हाला सोडून परदेशात वगैरे जायचा विचार आहे? की एकदम लग्नच जमवलंस ? “
“ अगं आजी आजीss तसं काही नाहीये. तू फक्त मला आशीर्वाद दे. बाकी सविस्तर सांगतो नंतर. चल ठेवतो आता फोन. थोडा गडबडीत आहे!”
आप्पा उठल्यावर त्यांना हे गूढ संभाषण सांगितलं. तेव्हापासून नातवाच्या फोनची दोघेही दिवसभर वाट पहात बसले. इतर कोणाचे फोन आले की तो संपेपर्यंत लक्ष दूसरा फोन येत नाहीये ना याकडे. अखेर संध्याकाळी एका अनोळखी क्रमांकावरून आलेला फोन खणखणला आणि आप्पांनी लगेच उचलला.
“ हॅलो .. फोनाप्पा जी ??”
“ हां बोला. मीच बोलतोय !”
“ प्रणाम फोनाप्पा जी.. मै अमिताभ बच्चन बोल रहा हू कौन बनेगा करोडपती से!”
“ ए अगं हे बघ काय म्हणतायत ? “फोनचा स्पीकर सुरू करत आप्पा हळू आवाजात पुटपुटले
“ अहो असं काय? बोला ना फोनवर “
“ फोनाप्पा जी सबसे पहले आप को जन्मदिन की बहोत बहोत शुभकामनाये !!”
साक्षात अमिताभ बच्चन यांच्याकडून शुभेच्छा मिळाल्यामुळे आप्पांना काय बोलावं ते सुचत नव्हतं .
“ जी बहोत बहोत धन्यवाद.!!
“ आपका पोता अभी हमारे सामने है और एक प्रश्न पर आपकी सहाय्यता लेना चाहते है. वो अब खेल के ऐसे पडाव पर है की अगर आपने सही जवाब दिया तो वो ढेर सारी धनराशी यहासे लेकर जा सकते है. लेकिन ध्यान रहे, आपका गलत जवाब उन्हे बहोत नीचे ले जाएगा !”
“ अरे बाप रे !! .. जी मै जरूर प्रयत्न करूंगा !!”
“ लेकिन जाते जाते एक बात आपको बताना चाहता हू आप्पाजी. वैसे तो हमारे फोन अ फ्रेंड लाईफलाईन मे नियमोके अनुसार अलग अलग क्षेत्र के ४-५ ग्यानी दोस्तोंके नाम देनेका विकल्प होता है. लेकीन आपके पोते ने ये तय किया था की प्रश्न किसी भी विषय का हो मै फोन तो आप्पाजी को ही करूंगा. मै आपसे बात करू, आप को बधाई दू ऐसी इच्छा थी ऊनकी. ये दिखाता है की आप दोनो का रिश्ता कितना गहरा है. धन राशी के मोल से भी ज्यादा महत्वपूर्ण ऐसा अनमोल रिश्ता है आपका. आपने ऊनके शिक्षा के लिये, उज्ज्वल भविष्य के लिये जो योगदान दिया है वो भी उन्होने कथन किया और आपके फोनाप्पा नाम के पिछे की जो कहानी है वो भी बतायी. एकदम अद्भुत!!”
आपल्या दैवताशी इतका वेळ अनपेक्षित संभाषण. आप्पांना हे सगळं स्वप्नवत वाटत होतं. या सुखद धक्क्यामुळे आप्पा एकदम निःशब्द झाले होते. तरीही धीर करून म्हणाले “मै क्या बोलू समझ मे नही आ रहा. मै आपको हमारे आंजर्ले गाव मे आनेका निमंत्रण देता हू. यहां का निसर्ग और समुद्र आपको जरूर अच्छा लगेगा. यहां कडे के उपर, मतलब उंचाई पर एक प्रसिद्ध गणेश मंदिर भी है. सिर्फ आंजर्लेही नही पुरे कोकण के सभी गावोकी अलग अलग विशेषताए है. मेरी आपको विनंती है की कुछ दिन तो गुजारीये कोकण मे.. !!”
“ हाहाहाहाहाsss .. जी फोनाप्पा जी जरूर जरूर !. आपको पुनः एक बार जन्मदिनकी शुभकामनाये देता हू. अगली आवाज आपके पोते की होगी और उत्तर देने के लिये आपको मिलेंगे सिर्फ पैतालीस सेकंद!”
पुढे त्याने प्रश्न विचारला. कायदे क्षेत्रातला अतिशय कठीण प्रश्न होता. नातवलाही त्या उत्तराची काहीही कल्पना नव्हती आणि आप्पांना त्याचं उत्तर माहिती असण्याची तर सुतराम शक्यता नव्हती. त्यामुळे फोन संपल्यावर तो खेळ तिथेच सोडून मिळालेली रक्कम घेऊन जायच्या तयारीत होता. अपेक्षेप्रमाणे बराच वेळ आप्पानी काहीच उत्तर दिले नाही आणि अगदी वेळ संपता संपता “ सी सी ss . आणि १०० % बरोबर उत्तर आहे .. डाव सोडू नको !”.. टुंssग टुंssग आणि फोन बंद.
खरं तर बाहेर पडण्याची इच्छा असूनही केवळ आप्पांचा मान आणि मन राखण्यासाठी त्याने सी उत्तर सांगितलं आणि ते खरोखरंच बरोबर होतं. खूप मोठी रक्कम जिंकून तो बाहेर पडला आणि पहिला आप्पांना फोन केला.
“ हॅलो अप्पा.. हॅप्पी बर्थ डे.!”
“ बाळा . तुझे खूप खूप अभिनंदन !. किती अविस्मरणीय अशी भेट दिलीस रे आज माझ्या वाढदिवशी. पर्वणीच होती माझ्यासाठी !”.
“आप्पा .. जेव्हा के बी सी मध्ये जाण्यासाठी निवड झाल्याचं समजलं तेव्हाच ठरवलं की काहीही झालं तरी कॉल तुम्हालाच करायचा. तुमची तब्येत बरी असती तर घेऊनच गेलो असतो तिकडे प्रेक्षकात बसायला. तसं तेही खूप दमछाक होणारं असतं म्हणा. पण नंतर समजलं की शूटिंग याच महिन्यात आहे तेव्हा आपल्या गणपतीला मनोमन दोन प्रार्थना केल्या. एक म्हणजे तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी एकतर शूटिंग तरी असावं किंवा किमान या भागाचं टीव्हीवर प्रसारण तरी. आणि दुसरं म्हणजे तिथे गेल्यावर बिग बींच्या समोर हॉट सीट वर बसण्याची संधी मिळावी. नाहीतर सगळं मुसळ केरात!”.
“ अरे पण त्या प्रश्नासाठी तू तुझ्या कुठल्यातरी कायदेपंडित मित्राला फोन लावायचा सोडून मला केलनी म्हणजे जणू पैशावर पाणी सोडल्यासारखेच होते.. जी रक्कम तुला मिळणार होती त्या आकड्यात नेमके पूज्य किती हे ही माहिती नाही मज!”
“ अहो आप्पा. बरेच वर्षांपासून नेहमी वाटायचं की तुम्हाला काहीतरी मस्त भेट द्यायची वाढदिवसाची. पण तशी वस्तु काही सापडलीच नाही आणि राहूनच गेलं. आता अशी मनासारखी संधी मिळाली तर बरी सोडेन मी. पैसे काय पुन्हा मिळवता येतील हो पण तुम्ही नसतात तर माझं आयुष्य कुठल्या वळणावर गेलं असतं याची कल्पनाही करवत नाही मला. तुमच्या आनंदापुढे बाकी सगळं गौण आहे हो आप्पा. पण उत्तर तर अगदी चोख सांगितलंत तुम्ही. तुम्हाला या क्षेत्रातली सुद्धा इतकी महिती आहे हे नव्याने समजलं मला!”.
“ अरे नाही रे बाबा. माझे सगळे आयुष्य गेले पोस्टात. मला वकिलीचे ज्ञान कुठून येणार एवढे ? आणि ते ही इतक्या उच्च प्रतीचे. हां ss आता वर्षानुवर्ष तुझ्या लाडक्या आजीची वकिली करतोय तो भाग वेगळा. त्यापलीकडे मला ओ की ठो कळत नाही त्यातले. पण तू मला माझ्या एका दैवतासोबत संभाषण करता यावे म्हणून मिळणाऱ्या बक्षीसाचा त्याग करण्यास तयार झाला होतास म्हणूनच बहुधा माझे दुसरे दैवत तुझ्या मदतीस धावून आले ss !”.
“ म्हणजे काय आप्पा ? मी समजलो नाही !”
“ त्याचे झाले असे ss माझ्या शाळेतला वर्गमित्र आता त्याच्या मुलासोबत पुण्यात स्थायिक असतो. हा त्याचा मुलगा फार मोठा कायदेतज्ञ. पुण्यात खूप मोठे प्रस्थ आहे म्हणे. त्याला त्यांच्या क्षेत्रातील कुठलातरी प्रतिष्ठित पुरस्कार मिळालान् म्हणून कड्यावरच्या गणपतीच्या दर्शनाला आला होता कुटुंबास घेऊन. त्याच्या बापाने त्यास बजावले होते. आंजर्ल्यास जातोयस तर त्या म्हाताऱ्या फोनाप्पाला भेटून येss . म्हणून ते जोडपे पुरस्काराचे पेढे आणि देवळातून गणपतीचा प्रसाद घेऊन आले होते. त्यांच्यासोबत गप्पा मारीत बसलो होतो . मेजका त्याच वेळेस तुझा फोन आलानीन. आणि तो सुद्धा स्पीकरवर. तेव्हा त्यानेच उत्तर सांगितलेन् मला हळूच तुला सांगायला. म्हणजे अप्रत्यक्षपणे आपला गणपतीच पावला नव्हे का?.
“ अरे वा वा !! असं आहे काय सगळं ? गणपती बाप्पा मोरया !!”
“ पण तुझे आभार कसे मानू रे बाबा .. ज्या गोष्टीचा कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता ती गोष्ट आज प्रत्यक्षात उतरली तुझ्यामुळे. आजवर इतक्या वर्षांत असंख्य जणांना मी वाढदिवसाचे अनपेक्षित फोन केलेनीन पण मला अनपेक्षित म्हणावा असा हा एकंच फोन आला. पण तो असा आला की माझ्या सत्तर वाढदिवसांचा सोहळा एकदम एकाच दिवशी झाला असे वाटतेय बघ. हे म्हणजे सिनेमात तो अँथनी त्या अमर ला म्हणतो ना “ अपून तुमको एकही मारा लेकिन शॉलिड मारा की नही ?” अगदी तसेच झाले हो हे. हाहाहाहाss . “
कैक दिवस तो आवाज आप्पांच्या कानात आणि मनात घुमत राहिला. इतकी वर्ष अनेक जणांना केलेल्या फोनमुळे मिळालेल्या फोनाप्पा या नावाला महानायकाच्या एका आलेल्या फोनमुळे आता वेगळंच वलय प्राप्त झालं होतं. पुढे बरेच दिवस गावात सगळ्यांच्या चर्चेचा एकंच विषय होता .. .. “फोनाप्पा”
तळटीप : सदर कथा काल्पनिक असून वास्तवाशी संबंध आढळल्यास योगायोग समजावा.
©️ क्षितिज दाते , ठाणे
आवडल्यास text शेअर/फॉरवर्ड करायला माझी काहीच हरकत नाही …
Leave a Reply