
मधाळ हसणारी, गालावर गोड खळी असलेली, बोलक्या डोळ्यांची, सुरेख केसांची वळण लाभलेली, तरतरीत नाकाची अन् कलावतीला शोभेल अशीच उंची लाभलेली नम्रता गायकवाडची लोभस व्यक्तिरेखा सर्वांच्या डोळ्यात भरेल अशीच आहे.
एखाद्या प्रकल्पावर काम करत असताना त्या प्रकल्पाची गरज ओळखून त्याला साजेसा ठरेल असा चेहरा छायाचित्रकाराला निवडायचा असतो. मात्र काही चेहरे असे असतात त्याला कोणताही मेकओव्हर केला तरीहि त्यात तो शोभून दिसतो. मराठी सिनेइंडस्ट्रीत अशी काही मोजकी लोक आहेत. या यादीत नम्रता गायकवाड हिचं नाव घेता येईल. मधाळ हसणारी, गालावर गोड खळी असलेली, बोलक्या डोळ्यांची, सुरेख केसांची वळण लाभलेली, तरतरीत नाकाची अन् कलावतीला शोभेल अशीच उंची लाभलेली नम्रता गायकवाडची लोभस व्यक्तिरेखा सर्वांच्या डोळ्यात भरेल अशीच आहे. तिच्यातले हेच गुण एक अभिनेत्री म्हणून तिला जितके महत्वाचे ठरतात. तितकेच ते तिला मॉडेल म्हणून प्रेजेंट करताना उपयोगी पडतात.
गुणी अभिनेत्री म्हणून यश संपादित केलेल्या तर मॉडेल म्हणून जाहिरात क्षेत्रात वेगळं नाव कमावलेल्या नम्रताचं फोटोशूट करण्याची संधी मला एका नामांकित वृत्तपत्रामुळे मिळाली. यावेळी एथनिक लूकसाठी डिझायनर साडय़ांमध्ये तिचं फोटोशूट करण्यात आलं होतं. मात्र, नम्रताचा चेहरा खरं तर एका छायाचित्रकाराला हवा असलेला असा फोटोजेनिक असाच चेहरा असल्याने तिला मॉडेल म्हणून दिल्या गेलेल्या कोणताही पेहरावात ती उठूनच दिसेल याची खात्री मला होती. पारंपरिक वेशभूषा केलेली नम्रता मी छायाचित्रित केली होती. याच्या विरुद्ध वेस्टर्न आऊटफिटमध्येही तिचं एक छायाचित्र टिपण्याचं मी ठरवलं अन् या छायाचित्रणादरम्यानही ती अधिक खुलल्याचं मला जाणवलं.
मॉडेलचा एक वेगळा रुबाब स्टुडिओत असतो. तो नेमका कसा जपायचा याचे एथिक्स तिला माहीत होते, तर तिच्या गालावर नेमकी खळी कुठे पडते, चेहऱयावर नेमके कुठे कटस् आहेत या सगळ्याचा अंदाज घेतल्यानंतर वेगळ्या प्रकाशरचनेत तिचे छायाचित्र टिपण्याचा मी प्रयत्न केला. या शूटनंतर अनेक प्रकल्पांमुळे नम्रता आणि माझ्यात संवाद झाले. काही प्रकल्पांवर आम्ही कामही केलं. यातून तिचा आजवरचा जीवन प्रवास उलगडला. व्यावसायिक रंगभूमीवरून एकदम छोटा पडदा आणि थेट रुपेरी पडद्यावर झळकलेली नम्रता आज तरुण अभिनेत्रींच्या यादीत महत्त्वाचं स्थान मिळवून आहे.
नम्रताला अभिनय क्षेत्रात येण्यासाठी खरं तर पूरक असं कोणतंच वातावरण नव्हतं. शाळा-महाविद्यालयातही तिने कधी अभिनयात रस घेतला नाही. तसंच घरी अभिनय क्षेत्राचाही कोणताच धागा नव्हता. वडील राज्य शासनाच्या विद्युत विभागात नोकरी करत होते, तर आई ही गृहिणी होती. वडिलांच्या नोकरीनिमित्ताने कुटुंबाला एका शहरातून दुसऱया शहरात सतत स्थलांतर करावं लागत होतं अन् या स्थलांतराच्या काळात केवळ शालेय शिक्षण हेच नम्रताचं उद्दिष्ट नकळत ठरलं गेलं होतं.
जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जाणारा 8 मार्च हा नम्रताचा जन्मदिवस. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या नाशिकमध्ये जन्मलेली नम्रता चौथीपर्यंतच्या शालेय शिक्षणानंतर ठाणे जिह्यातल्या कल्याण इथे कायमची स्थायिक झाली अन् शहरबदलीचा तिचा प्रवास कल्याण शहरात आल्यानंतर संपुष्टात आला. कल्याणच्या नालंदा विद्यालयातून पाचवीनंतरचं शालेय शिक्षण तिने पूर्ण केलं अन् त्यानंतर तिने बिर्ला महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी कमावली. शालेय शिक्षणासोबतच कल्याणच्याच गुरू लक्ष्मी यांच्याकडून भरतनाटय़मचे धडे तिने गिरवले अन् नृत्याचं बाळकडू लहानपणीच मिळवलेली नम्रता आज रुपेरी पडद्यावर ताल धरताना आपल्याला दिसत आहे.
नृत्यकलेत नम्रताने शालेय काळापासूनच रस घेतला होता. मात्र, अभिनय क्षेत्रापासून ती पार दूर होती. महाविद्यालयीन शिक्षणानंतर कल्याणच्या आचार्य आत्रे नाटय़गृहात वडिलांच्या कार्यालयातून भरवल्या गेलेल्या एका एकांकिका स्पर्धेला केवळ प्रेक्षक म्हणून आलेल्या नम्रतासाठी तो दिवस टार्ंनग पाईंट ठरला. अभिनयाची चंदेरी दुनिया इथे तिला फारच भावली. अनेक प्रश्नांची कालवाकालव तिच्या डोक्यात यावेळी सुरु झाली. एकांकिका स्पर्धेसाठी परिक्षक असलेले अशोक समेळ हे नम्रताच्या वडिलांचे जवळचे मित्रच होते. नम्रताला अभिनयाविषयी पडलेल्या प्रश्नांची उकल अशोक समेळांनी केली खरी. मात्र तिला या क्षेत्रात प्रवेश करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
अशोक समेळांच्या मार्गदर्शनानंतर अभिनय प्रशिक्षण शिबिरातून नम्रताने या क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि प्रशिक्षण शिबिराच्या अंती तिला या क्षेत्रात आपलं पाऊल रोवण्यास व्यासपीठ मिळालं ते ‘ज्ञानोबा माझा’ या व्यावसायिक नाटकाचं. ‘ज्ञानोबा माझा’ या नाटकात रुक्मिणीची भूमिका साकारून नम्रता रंगमंचावर आली अन् इथे तिने रसिक मनावर चांगलीच भुरळ घातली. यापाठोपाठ ‘मंगळसूत्र’ या मालिकेतून नम्रता छोटय़ा पडद्यावर झळकली. अलका कुबल या ज्येष्ठ अभिनेत्रीच्या मुलीची भूमिका तिने या मालिकेत साकारली होती. या मालिकेच्या माध्यमातून छोटय़ा पडद्यावरून नम्रता घराघरांत पोहोचली. आपला वेगळा चाहता वर्ग तयार होतो न होतो तोच नम्रताला रुपेरी पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली ती ‘स्वराज्य – मराठी पाऊल पडते पुढे’ या सिनेमातून.
व्यावसायिक नाटकानंतर छोटा पडद्यावर अन् लगेच रुपेरी पडद्यावर गुणी अभिनेत्री म्हणून नम्रताने अल्पावधीतच नाव कमावलं. तिच्या याच अभिनयाच्या जोरावर तिला पुढे ‘विजय असो’ या सिनेमात तसंच आता ‘विठ्ठल विठ्ठल’ या व्यावसायिक नाटकात काम करण्याची संधी चालून आली. विशेष म्हणजे येत्या 18 ऑक्टोबरला तिचा ‘वंशवेल’ हा सिनेमादेखील येऊ घातला आहे. कै. राजीव पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या या शेवटच्या सिनेमात नम्रताची मध्यवर्ती भूमिका असून स्त्रीभ्रूणहत्या, स्त्री-पुरुष समानता आणि कुटुंब जपणूक यावर आधारित असलेल्या या सिनेमाकडे नम्रताचंही आता लक्ष लागलं आहे.
धनेश पाटील
dhanauimages@gmail.com
Leave a Reply