नवीन लेखन...

छायाचित्रे – भूतकाळाची स्मारके !

१) खूप पूर्वी जळगांवला माझ्या आजी-आजोबांचा फोटो काढण्याचा हट्ट माझ्या मामाने धरला तेव्हा चार दिवस घरातील रणांगण धुमसत होतं. आजोबांनी ही कल्पना धुडकावून लावली होती. तरी बरं स्वतःच्या पत्नीबरोबर फोटो होता आणि दोघेही ६५+ होते. आज्जींना नेहेमीप्रमाणे या बाबतीत स्वतःचे काही मत नव्हते.

शेवटी कर्त्या मामाने एका संध्याकाळी दोघांना स्टुडिओत नेलं. आजोबा कसेबसे कोट-टोपी-धोतर वेशात निघाले आणि रस्ताभर कोणाशीही बोलले नाही. आज्जी नवी नऊवारी, अंबाडा अशा अपूर्वाईने या फोटो सत्राला सामोरी गेली. आजही तो फोटो असेल जळगांवला कोठेतरी. पण आजोबांचा नापसंतीच्या आठ्यावाला चेहेरा अजूनही डोळ्यांसमोर आहे. त्यांना न सांगताच मामाने हौसेने तो फ्रेम करून आणला आणि भिंतीवर लावला, त्यावेळी त्यांच्या जमदग्नी अवतारापुढे ( बाय द वे, त्यांचे गोत्रही जमदग्नी होतं.) मामा-मामी, आज्जी कोणाचीही बोलण्याची प्राज्ञा नव्हती.

२) सोलापूरला दयानंद कॉलेजला शिकत असताना आय-कार्ड साठी फोटो काढायचा होता. नवी पेठेतल्या प्रसिद्ध फोटोग्राफर कडे गेलो. त्याने सांगितले- दाढी करून या. फोटो चांगला येईल. तोपर्यंत आयुष्यात कधीही दाढी केली नव्हती. कल्पना सुरम्य असली तरी पिताजींच्या परवानगीशिवाय ती अंमलात कशी आणणार?

” इतक्यात दाढी करायची नाही, चेहेरा खराब होतो” अशी त्यांची सक्त ताकीद ! पण अवघ्या दोन महिन्यांपूर्वी लागलेले महाविद्यालयाचे वारे स्वस्थ बसू देईना. खूप थ्रिल आणि बरंच काही वाटत होतं. शेवटी घरी न सांगता धाडस करून दाढी केलेला फोटो काढला. सायंकाळी वडिलांसमोर जाण्याचे टाळले. पण केव्हांतरी त्यांना ते “दिसले.” त्यांनी आईकडे विचारणा केली कारण ” प्राप्ते तू षोडशे वर्षे” या ओळी ते नुस्त्याच उच्चारत नव्हते पण पाळतही होते. काही दिवसांनी त्यांनी न सांगता माझा स्वतंत्र सेट आणून दिला आणि बाहेर दाढी करायची नाही, तेथील हत्यारांनी कातडीचे रोग होऊ शकतात असे बजावले. तो फोटो अजूनही मी जपून ठेवलाय. गंमत म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या दाढीत चक्क दोन महिने अंतर होते हेही स्पष्ट आठवतंय.

३) सोलापूरच्या आमच्या वाड्यात शेजारच्या घरी दिवाणखान्यात एका आजोबांचा खुर्चीवर बसलेला फोटो लावला होता. नंतर कळले की निधनानंतर शेवटची आंघोळ झाल्यावर नवी वस्त्रे घालून तसे फोटो काढायची प्रथा त्यांच्या घराण्यात होती म्हणे. तेव्हा कोठे फोटोतील निष्प्राण डोळ्यांचे उत्तर मिळाले.

४) माझ्या विवाहाच्या वेळी फोटोग्राफर वगैरे विचारही हिशेबात नव्हता. खरे मंगल कार्यालयात दाखल झाल्यावर हा विषय निघाला, एका परिचित फोटोग्राफरला सीमंती पूजनापूर्वी बोलावले. ५५० रुपये बिलात त्याने दोन दिवसांचे दोन अल्बम ( एक श्वेतधवल आणि एक रंगीत) हाती दिले. साल होते- १९८३…आजही ते अल्बम आहेत हे वेगळे सांगायला नको- त्यातील बऱ्याच जिवलग व्यक्ती नसल्या तरी.

५) हे छायाचित्र पुराण लिहिण्यामागे एक कारण आहे-
इस्लामपूरला असताना चिरंजिवांच्या वाढदिवसाला त्याचा आणि माझ्या पत्नीचा एक फोटो काढला होता आणि स्थानिक घड्याळजीने आम्हांला त्या फोटोफ्रेमचे एक कल्पक घड्याळ करून दिले. (साल १९८७). आजवर ते घड्याळ आहे आणि सुरूही आहे. नुकतीच त्याची दुरुस्ती निघाली आणि साहजिकच जुन्या झालेल्या फोटोचा विषय निघाला. फ्रेम आणि घड्याळ ओके, म्हणून मग गेले काही दिवस “त्या” फोटोचा शोध घेतला. मिळाल्यावर एन्लार्ज करून घेतला. आज घड्याळजीच्या हवाली केला, उद्या मिळेल आणि तो पुन्हा भिंतीवर विराजमान होईल.

हातातून निसटणारे क्षण जिवाच्या आकांताने, किमान छायाचित्रांच्या मदतीने धरून ठेवणारे आपण सारेजण ! मग अशा “युनिक” स्मृती येणारच ना मनात !

भूतकाळाची अशी असंख्य स्मारके आसपास असली की मन रमून जातं.

दरवेळी ” मांडू ” वगैरे ठिकाणीच जायला हवे असे नाही.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..