नवीन लेखन...

फोटोग्राफीचे माझे गुरु – उदय कानिटकर

गुरु समान दाता नहीं, याचक शीष समान।
तीन लोक की सम्पदा, सो गुरु दीन्ही दान॥

संत कबीर म्हणतात की गुरु सारखा कोणीही ‘दाता’ नाही आणि ‘शिष्यासारखा कोणी ‘याचक’ नाही. गुरूने दिलेलं ज्ञान त्रिलोकातल्या संपत्तीपेक्षा नक्कीच जास्त मोठं असतं.
……..
गोष्ट असेल साधारण २०-२१ वर्षांपूर्वीची. थोडंसं आर्थिक स्थैर्य आलेलं होतं. सह्याद्री-हिमालयात खूप भटकणं होतं पण कॅमेरा नव्हता. अचानक लहानपणीचा मित्र भेटला …. तो बहुतेक त्यावेळी इंग्लंडमध्ये वास्तव्याला होता … बोलता बोलता कळलं की त्याच्याकडे असलेला ‘प्रॅक्टिका’ हा एसएलआर कॅमेरा त्याला विकायचा होता. कॅमेरा, त्याला स्टॅंडर्ड, वाईड आणि झूम अशा तीन लेन्स होत्या. कार्ल झिसच्या लेन्स होत्या. कार्ल झिसच्या लेन्स जगात एक वेगळं उंच स्थान असलेल्या … अगदी आजही तीच प्रतिष्ठा आहे. मी तो कॅमेरा घेतला. तोपर्यंत मी कुठलाही कॅमेरा हातात देखील धरला नव्हता. मग हा तर एसएलआर… त्यात जवळ जवळ पूर्णपणे मॅन्युअल. फोकसिंग कसं करतात ते ही माहित नाही, तर अपार्चर, शटर स्पीड, कॅमेऱ्याच्या फिल्मची सेन्सिटिव्हिटी (ASA) अशा अगदी बेसिक गोष्टी सुद्धा माहित नव्हत्या. आणि कोणीतरी मला उदय कानिटकर यांचं नाव सांगितलं. त्यावेळी उदयचा क्लास गोखले रोड वर होता. मी उदयकडे जायला लागलो आणि हळूहळू त्याने मला कॅमेऱ्याच्या या विश्वात नेलं. माझ्या स्वभावाप्रमाणे मी झपाटून गेलो. मला वाटतं की वर्षभरातच मी त्यावेळचा बऱ्यापैकी चांगला असलेला निकॉन कंपनीचा F80 हा फिल्म कॅमेरा घेतला. यातला अजून एक शुभ संकेत म्हणजे त्याच दरम्यान मी काढलेला एक फोटो महाराष्ट्र टाइम्समध्ये छापून आला. त्यानंतर सहाच महिन्यात मी महाराष्ट्र टाइम्समध्ये लिहायला लागलो. तोपर्यंत थोडीशी फोटोग्राफी यायला लागल्याने माझ्या लिहिण्याबरोबर माझेच फोटो देता यायला लागले. कोणावर अवलंबून राहावं लागत नव्हतं. वीसेक वर्षांपूर्वी महाराष्ट्र टाइम्स मध्ये सुरु झालेलं ते लिहिणं अजूनही अखंडपणे चालू आहे. सहज सव्वा दोन हजाराच्या वर लेख आणि फोटो तर खूपच प्रसिद्ध झाले.

तो बेसिक कोर्स – आता नीट आठवत नाही पण बहुतेक चार शनिवार-रविवार (चार तास प्रत्येकी) असा असला तरी नंतर काही वर्ष मी उदयला नित्यनियमाने अनेक गोष्टी विचारत असे. आणि तो अगदी सिन्सिअरली त्या समजावून सांगत असे. त्यानंतर फोटोग्राफी कमालीची बदलत गेली. डिजिटल तंत्रज्ञानाने सगळा आसमंत व्यापला गेला. अगदी बेसिक कन्सेप्च्युअल गोष्टी बदलल्या. मुख्य म्हणजे फिल्म रोल गेले. कॅमेऱ्यात अतिअद्ययावत सोयी आल्या. साहजिकच फोटोग्राफर्सना देखील या सगळ्या गोष्टी नीट समजून घेऊन शिकाव्या लागल्या … याही दिवसात उदय स्वतः खूप अपडेटेड असल्याने मदत करतच होता. या सगळ्या बदलांमुळे कॅमेरे देखील बदलले गेले. अर्थात लेन्सेस देखील. फोटोच्या प्रिन्टस गेल्या आणि डिजिटल फोटो आले. त्यांचं डेटा सेव्हिंग, पोर्टेबल हार्ड डिस्क, कार्ड रीडर, फोटो अनेक मार्गानी लोकांना पाठवणं असे अनेक वेगवेगळे प्रकारही आले. फोटो प्रिंटिंग गेल्याने ते थोडे नीट करण्यासाठी फोटोशॉप .. लाइटरुम असली नाना सॉफ्टवेअर्स आली. सगळे संदर्भच बदलले.

उदय हा अत्यंत हुशार आणि प्रतिभाशाली फोटोग्राफर. प्रिंटिंग क्षेत्रातला उच्चशिक्षित. त्यामुळे रासायनिक प्रक्रिया, रंग आणि तंत्रज्ञान यात उत्तम प्राविण्य असलेला. अनेक वेगवेगळे प्रयोग सतत करणारा. तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय सुंदर कलात्मक गोष्टी करणारा. त्यात कमालीचा सज्जन, सचोटी असलेला… गैर उद्देशांना बिलकुल स्थान नाही . … सगळा मामला सरळ .. सुशील … स्वच्छ. साहजिकच उदय हा हाडाचा शिक्षक-गुरु.

मी काही व्यावसायिक किंवा पूर्णवेळ फोटोग्राफर नाही. नोकरी करून शनिवारी – रविवारी दोन तीन तास आजूबाजूच्या येऊर किंवा ऐरोली खाडीवर जाऊन निसर्ग, फुलपाखरं किंवा पक्षी यांचे फोटो काढत राहणे. कधी सह्याद्रीत छोटया ट्रेकला गेल्यावर तर कधी एखाद्या ट्रीपला. असं असलं तरी छंद जोपासताना त्यात सातत्य आणि सन्मान हा ठेवत असल्याने कॅमेरा हा विषय कायमच मनाच्या जवळचा. साहजिकच जेवढं जमेल तेवढं शिकायचं … यातल्या लँडस्केप, पक्षी, मायक्रो (फुलपाखरं-कीटकसृष्टी), आर्किटेक्चर, माणसं .. अशा काही विषयांच्या जाणिवा मनन … अभ्यास करत रुंदावत ठेवायच्या, हा शिरस्ता.

आजही फोटोग्राफीचं हे विश्व म्हणजे छंद जोपासणाऱ्या लोकांसाठी फार आकर्षक … यात त्यांचे पंचप्राण गुंतलेले. फोटोग्राफीमुळे वेगवेगळ्या क्षेत्रात व्यक्त होण्याचे आयाम कमालीचे उंच झाले आहेत … अलिबाबाची ही पार अनंत काळाला व्यापणारी जादुई गुहा आहे. काय करत नाही कॅमेरा …. सगळं सगळं करतो … कमालीच्या गोष्टी करतो … आणि माझ्यासारखा वेडा माणूस तर या आनंद वाटेवर अखंड चालतो …. चालत राहातो … वाटेत कधीतरी गूढ गहन गोष्टी दिसतात … वीस वर्षाच्या अनुभवानंतरही डोकं फार काम करत नाही … अशावेळी आमचा गुरु – उदय सोबत असतोच … कायम … तो त्यातली गहनता उलगडून सांगतो ….. ठाणा-मुंबईतले अनेक टँलेन्टेड फोटोग्राफर्स उदयचे विद्यार्थी आहेत …. आणि फोटोग्राफीत कोणी कितीही मुशाफिरी केली तरी उदय हा त्या सगळ्या मुशाफिरांचा कायम शिक्षक असतो … आणि कायम राहील.

तर आमच्या या अतिशय उबदार अशा मित्राला – प्रतिभावान गुरूला गुरुपौर्णिमेनिमित्त मनापासून वंदन … वयाने जरी लहान असलास तरी तुझे कृपाछत्र आणि आशीर्वाद हा आमच्यासाठी अतिशय मूल्यवान असाच.

उदय कानिटकर
Institute of Photographic Studies
www.udaykanitkar.in
www.ips.ac.in
Thane (West)
+919324456269
+919869279751

(स्वभाव नादिष्ट असल्याने अनेक गोष्टी करत असतो …. त्यामुळे त्या त्या गोष्टीत गुरु आहेतच .. पण फोटोग्राफी हा सगळ्यांचा प्राण असल्याने ‘उदय’च आज आठवला … मध्ये तीनेक वर्ष हैदराबादला असल्याने प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. त्यामुळे पाच सहा वर्षांपूर्वी काढलेला त्याचा फोटो सोबत दिलाय)

— प्रकाश पिटकर

प्रकाश पिटकर
About प्रकाश पिटकर 43 Articles
मी आय.डी.बी.आय. बँकेत गेली ३४ वर्ष नोकरी करतोय. सध्या AGM म्हणून हैदराबाद इथे पोस्टेड आहे. मला ट्रेकिंग, फोटोग्राफी, प्रवास, दूरवरचे स्वतः वाहन चालवत प्रवास, वाचन अशा आवडी आहेत. मी गेली सतरा वर्ष महाराष्ट्र टाइम्सचा फ्री लान्स कॉलमनिस्ट आहे. माझे आता पर्यंत सहज दोन हजाराच्यावर लेख प्रसिद्ध झाले आहेत. मी मुख्यतः ठाण्याचा रहिवासी आहे. प्रवास वर्णन, व्यक्ती-संस्था चित्र, ऐतिहासिक वास्तू, निसर्गातले अनेक विषय.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..