“ हॅलो ss .. हा तुझा बाबा रिटायर झाला गं एकदाचा ss !!” ..
बाबा आपल्या चेन्नईत राहणाऱ्या एकुलत्या एका मुलीला फोनवर अगदी उत्साहात सगळं सांगत होते.
“ वा वा !! मग या आता दोघेही आराम करायला थोडे दिवस इकडे !”
“ नको गं बाई …. तुमचा राजाराणीचा संसार त्यात या म्हातारा-म्हातारीची लुडबूड कशाला उगाच ?? आमची मुंबईच बरी आपली.. आणि खरं सांगू का ?? इतकी वर्ष कामाचा व्याप आणि नोकरीतल्या बदल्यांमुळे तुझ्या आईला अजिबात वेळ देऊ शकलो नाही ss पण आता पुढचं सगळं आयुष्य फक्त तिच्यासाठीच राखून ठेवलंय बघ. तेव्हाची तिची राहिलेली हौसमौज शक्य तितकी पूर्ण करायचा प्रयत्न करणार आहे आता !!”
“बाबाss मस्त मस्त !! तुम्हाला सेकंड इनिंग साठी शुभेच्छा मग ! हाहाहा ..!!”
बापलेकीच्या मनसोक्त गप्पा झाल्या आणि आई-बाबा ठरल्याप्रमाणे निवृत्तीनंतरचं निवांत आयुष्य जगू लागले. फिरणं, नाटक-सिनेमा, वाचन, मनात आलं की बाहेर जेवण, देवदर्शन, सण, नातेवाईक, समारंभ आणि बरंच काही .. या ना त्या निमित्ताने बाबा कायम आई सोबत असायचे. पण हा मनमुराद जगण्याचा आनंद फार काळ काही त्यांना घेता आला नाही. तीन-चार वर्षातच आईला काहीशा ‘अकाली वार्धक्याने’ ग्रासलं. हातपाय दुखायचे. अशक्तपणा आला होता. बाहेर पडणं तर पूर्णच बंद. जेमतेम घरच्याघरी कशीबशी फिरायची. भरीला बारीकसारीक इतर त्रास होतेच. पुढे रोजचं घरकाम करणं सुद्धा कठीण झालं. लेकीने येऊन घरकाम आणि स्वयंपाकासाठी एका मावशींची व्यवस्था केली. शिवाय ती स्वतः दोनेक महिन्यातून एकदा तरी येऊन जायची. हळूहळू आईची दृष्टी कमी झाली. सहाजिकच लिखाण, वाचन, टीव्ही बघणं यावर बंधनं आली. देवादिकांचं करणं, जपमाळ, देवपूजा यात आता जास्त वेळ घालवायला लागली. या सगळ्यामुळे आधीच मितभाषी असलेल्या आईचं बोलणं सुद्धा आधीपेक्षा कमी झालं. उतारवयातल्या या बऱ्यावाईट दिवसांत बाबांची मात्र आपल्या अर्धांगिनीला पूर्ण साथ होती.
आताशा दोघांचा दिनक्रम चांगलाच बदलला होता. अगदी आखून दिल्याप्रमाणे. बाबा दिवसभरात शक्य तितकी घरकामात मदत करायचे. आठवड्यातून एकदा भाजी वगैरे आणायचे. वेळ मिळेल तेव्हा आईला वर्तमानपत्र, मोबाईलवर येणारे लेख-गोष्टी वाचून दाखवायचे. गाणी लावून द्यायचे. आईला शक्यतो घरी एकटे ठेवायचे नाहीत ते. म्हणून दिवसा कुठे जायचे नाहीत पण संध्याकाळी मावशी आल्या की मात्र मोकळ्या हवेत जरा तासभर एक फेरफटका मारून यायचे. पण त्याचा मार्गही अगदी ठरलेला. सोसायटीच्या आवारात थोडावेळ, मग तिथून लायब्ररी, मग बागेत चालणं, नंतर तिथल्या काही मित्रमंडळींसोबत गप्पा, मग कधीतरी उगाच चणे-शेंगदाणे-फुटाणे घ्यायचे आणि शेवटचा मुक्काम फुलवाल्याकडे. अगदी न चुकता दररोज देवासाठी “फुलपुडी” घेऊन यायचे.
असं सगळं सुरू असताना एके दिवशी सकाळी बाबा बाथरूममध्ये पाय घसरून पडले. शेजाऱ्यांनी लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं. छोटसं फ्रँक्चर असल्यामुळे प्लॅस्टर घातलं. लेक ताबडतोब निघाली आणि संध्याकाळपर्यंत पोचली. पाठीला सुद्धा थोडा मार लागला होता , त्यात वयही जास्त म्हणून “५ महीने तरी घराबाहेर पडायचं नाही” अशी सक्त ताकीद दिली होती डॉक्टरांनी. घरच्याघरी वॉकर घेऊन फिरायला परवानगी होती फक्त .
“ बाबा ss तुम्ही दोघं चला आता चेन्नईला माझ्याबरोबर.
“ काहीतरीच काय ?? असं जावयाकडे राहतात का इतके दिवस ?”
“ काय बाबा ? असं काही नसतं . हे कसले जुनाट विचार घेऊन बसलात ?”
“ हेहेहे sss अगं गंमत केली गं बाळा . होऊ नयेच पण भविष्यात कधी अगदीच अगतिक झालो तर तुमच्याशिवाय कोण आहे आम्हाला ? .. पण आत्ता नको . तुझं दिवसभर ऑफिस असतं. त्याचे सुद्धा कामासाठी दौरे सुरू असतात आणि आमचंही इथे सगळं रुटीन सेट झालंय आता. त्यात बदल नको वाटतो ss म्हणून म्हणालो !!”.
बाबा ऐकणार नाहीत म्हंटल्यावर शेवटी मुलीनी एका ओळखीच्या संस्थेमार्फत दिवसभर घरी राहून बाबांची काळजी घेऊ शकेल अशा एका विश्वासू मुलाची सोय केली.
दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधून सुटका झाली आणि छोट्या अँब्युलंसमधून स्वारी घरी निघाली. वाटेत बाबांनी एके ठिकाणी रस्त्याच्या कडेला थांबवायला सांगितलं. खिडकी थोडीशी उघडली आणि बाजूच्या फुलवाल्याला म्हणाले ..
“ बाबा रे ss .. उद्यापासून जरा घरी “फुलपुडी” देशील का रे ? महिन्याचे पैसे एकदम घे हवं तर आणि तुझे घरपोच देण्याचे काय असतील ते पण सांग !!”.
“ अहो काका , पाठवतो नक्की. दुकान बंद केलं की देईन आणून. आणि पैसे द्या हो आरामात. तुम्ही फक्त लवकर बरे व्हा आता!. पैसे काय आता ऑनलाईन पण येतात !“
“ ते काही मला जमत नाही बुवा अजून !”
हे ऐकून मुलगी म्हणाली ..
“ बाबा थांबा ss ते मी करीन. आता आधी घरी जाऊया लवकर . दादाss तुमचा नंबर द्या. मी घरी पोचल्यावर करते ट्रान्सफर लगेच “ .
फुलपुडीचं सगळं ठरवून अँब्युलंस घरच्या दिशेने निघाली.
“ काय हे बाबा ? तुमच्या या अवस्थेत त्या फुलपुडीचं काय एवढं अर्जंट होतं का ? आणि तुम्ही कधीपासून इतके धार्मिक झालात हो ??”
“ अगं मी आजही अजिबात देवभोळा नाहीये ss पण रोज सकाळी देवपूजेला सुरुवात करायच्या आधी तुझ्या आईनी ही फुलपुडी उघडली की त्यातल्या वेगवेगळ्या रंगांची ती प्रसन्न फुलं बघून, त्यांना स्पर्श करून तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद उमटतो बघ. चेहरा खुलतो गं तिचा ss आणि मग ती तासन् तास तल्लीन होऊन पूजाअर्चा करत असते. दिवसभरातली ही एकंच गोष्ट ती इतक्या मनापासून करते. म्हणून केवळ हा अट्टाहास. एकवेळ भाजी-किराणा आणायला एखाद-दोन दिवस उशीर झाला तरी चालेल. आम्ही खिचडी कढी खाऊ ss पण तिच्या त्या रोज नव्याने उमलणाऱ्या आनंदाच्या कळीसाठी ती फुलपुडी दररोज घरी येणं माझ्यासाठी महत्वाचं आहेsss . कळलं का ? म्हणून तू आपले ते फुलवाल्याचे पैसे मात्र न विसरता पाठव हां ss . आणि जो पर्यंत मी बाहेर फिरू शकत नाही तोवर दरमहा पाठवत जा म्हणजे मला उगीच ह्याला त्याला सांगत बसायला नको. एकहाती तुझ्याकडेच राहू दे हे काम !!”
बाबा निवृत्त झाले तेव्हाच्या त्यांच्या भावना आणि आईला कायम साथ देण्याचा तेव्हा व्यक्त केलेला विचार आजही इतका दृढ आहे हे बघून लेकीलाही दाटून आलं.
“ हो बाबा ss .. हे बघा.. या महिन्याचे लगेच केले सुद्धा ट्रान्सफर मोबाईलवरून. तुम्ही निश्चिंत रहा !!”.
मुलगी दोन-तीन दिवस राहून , त्यांचं सगळं मार्गी लावून गेली. “फुलपुडी” मात्र त्या दिवसापासून रोज येऊ लागली. दिड महिन्यांनी डॉक्टरांना दाखवण्यासाठी म्हणून लेक-जावई येऊन गेले. त्यानंतर काही दिवसातच मुलीला तिच्या कंपनीकडून ६ महिन्यांसाठी ऑस्ट्रेलियाला जायची संधी चालून आली होती. आई बाबांना कधी काही मदत लागली तर ? या काळजीने ती जायला तयार नव्हती पण “अशी संधी वारंवार येत नाही , आता माझी तब्येत सुधारते आहे . तू गेली नाहीस तर आम्हा दोघांना वाईट वाटेल” अशी भावनिक मनधरणी बाबांनी केली आणि शेवटी ती रवाना झाली.
दिवसामागून दिवस सरत होते. बाबा हळूहळू बरे होत होते. प्लॅस्टर निघालं. वॉकर शिवाय चालणं सुरू झालं. परिचारक मुलाचे कामाचे तास हळूहळू कमी करत एक दिवस त्यालाही सुट्टी देऊन टाकली. इतके सगळे बदल होत असले तरी एक गोष्ट तशीच होती ती म्हणजे गेले ५ महीने दररोज संध्याकाळनंतर दारावर अडकवली जाणारी “फुलपुडी”. या ऑनलाईन युगात पैसे भरायला मुंबई-चेन्नई-ऑस्ट्रेलिया सगळं सारखंच असल्यामुळे मुलगी सातासमुद्रापार गेली असली तरी फुलपुडीचा आणि त्यासोबत येणारा ‘आनंदाचा रतीब’ नियमित सुरू होता. आता बाबा अगदी पूर्ण बरे झाले होते. एके दिवशी दुपारी त्यांनी मुलीला फोन केला. तब्येतीची सगळी खबरबात दिली आणि म्हणाले ..
“ अगं बाळा .. आता पुढच्या महिन्यापासून तू ते फुलपुडीचे पैसे भरू नकोस. मी आता पूर्वीसारखा आणत जाईन रोज फिरायला जाईन तेव्हा !”.
असं म्हंटल्यावर मुलीने डोळे एकदम मोठे केले, कपाळावर हात मारला आणि जोरात ओरडलीच ..
“ ओह नो sss बाबा बाबा .. आय अॅम एक्सट्रिमली सॉरी बाबा. मी इकडे यायच्या तयारीत साफ विसरून गेले ते फुलपुडीचं. आणि इथे आल्यावर तर काम इतकं वाढलंय ना !. शी sss असं कसं विसरले मी . माझ्यामुळे फुलपुडी येणं बंद झालं तिकडे. बाप रे !! आणि आईच्या पूजेचं काय ?? !!
एकदम अपराधी भावनेने तिचा डोळ्यांचा बांध फुटला. तिची ही अवस्था बघत बाबांनी तिचं वाक्य मध्येच तोडलं..
“ अगं अगं हो हो हो ss … हरकत नाही … तू पैसे भरले नसलेस तरी तो फुलवाला रोज देत होता फुलपुडी. त्यामुळे तू वाईट वाटून घेऊ नकोस…. आईची देवपूजा अगदी व्यवस्थित सुरू आहे .. अगदी नियमितपणे ss .. चांगला आहे गं तो फुलवाला . खूप वर्ष ओळखतो मी त्याला !”.
हे ऐकून तिला थोडंसं हायसं वाटलं.
“ हुश्श !!.. थांबा लगेच त्याचे ३ महिन्याचे राहिलेले पैसे ट्रान्सफर करते !”.
“ नको नको … आता मी स्वतः जाऊनच देतो .. त्याचे आभार प्रत्यक्ष मानतो. मला इतक्या दिवसांनी बघून त्यालाही जरा बरं वाटेल.!”
एका चकार शब्दाने पैशाबद्दल न विचारता सलग इतके महीने फुलपुडी देत होता तो. बाबांच्या लेखी त्या फुलपुडीचं महत्व बघता हे कुठल्याही उपकारापेक्षा कमी नव्हतं. आता मात्र बाबांना कधी एकदा संध्याकाळ होतेय आणि स्वतःच्या हातानी त्याला पैसे देऊन मनापासून कृतज्ञता व्यक्त करतोय असं झालं होतं. संध्याकाळी स्वयंपाकाच्या मावशी आल्या आणि तडक बाबा फुलवाल्याकडे गेले. तिथे जाऊन बघतात तर काय ? त्या ठिकाणी कुठलीशी चहा-वडापावची टपरी होती. बाबांनी कुतुहलाने त्याला विचारलं .
“ अरे s इथे फुलांचं दुकान होतं त्यांनी काय नवीन गाळा घेतला काय ?
“ नाय काका .. तो गेला .. माझा गाववाला होता तो !!”.
“ कुठे गेला ? मला पत्ता दे बरं !”.
“ वारला तो काका .. २-३ महिनं झालं !”.
“ बाप रे !! काय सांगतोस काय ? मग ते दुकान दुसरं कोणी चालवतं का ?”.
“ नाय ओ काका ! फुलांचा धंदाच बंद केला. आता मी चालवतो हे दुकान “.
हे ऐकून बाबांना चांगलाच धक्का बसला पण आता त्यांच्या मनातल्या विचार डोहात एका नवीन प्रश्नानी उडी मारली. फुलांचं दुकान जर बंद झालं तर मग दाराला रोज फुलपुडी कोण अडकवून जातंय ???
त्यांनी शेजाऱ्या पाजाऱ्यांना विचारलं. त्यांच्या बागेतल्या मित्रांकडे चौकशी केली. संस्थेतर्फे आलेल्या मुलाची शक्यता पडताळून पहिली. लेक विसरली म्हणून जावयानी चेन्नईहून काही व्यवस्था केली का याची सुद्धा खातरजमा केली. पण फुलपुडीबद्दल सगळेच अनभिज्ञ होते. शेवटी त्यांनी सोसायटीच्या वॉचमनला या बाबत विचारलं …
“ ओ हां शाब .. एक लोडका आता है रोज .. शायकील पे .. कोभी शाम को आता है.. कोभी रात को लेट भी आता है !!“
“ अरे … अपने जान पहचान का है क्या ??”
“ पैचान का ऐसे नही …वो रोज आता है इतने दिनसे .. तो जानता है मै. “
“ अभी आज आयेगा तो मुझे बताओ !”
आता बाबांच्या डोक्यात एकाच विचाराचा भुंगा… . तो कोण असेल???
संध्याकाळनंतर बरीच वाट बघून शेवटी बाबा झोपून गेले पण रात्री उशिरा कोणीतरी फुलपुडी अडकवलीच होती.
दुसऱ्या दिवशी मात्र बाबांनी ठरवलं. वॉचमनवर विसंबून राहायचं नाही. कितीही उशीर झाला तरी याचा सोक्षमोक्ष लावायचाच. संध्याकाळपासूनच दार किलकिलं करून बाबा थोड्या थोड्या वेळाने अस्वस्थपणे येरझारा घालत होते. अधून मधून बाहेर बघत होते. मध्येच दाराशी खुडबुड आवाज झाला . धावत त्यांनी दार उघडलं. एक तरुण मुलगा गडबडीने खाली उतरत त्याच्या सायकलपाशी जात होता. बाबा काहीसे मोठयाने ..
“ अरे ए ss .. इकडे ये .. ए ss !!“
तो मुलगा लगेच वर आला .
“ आजोबा कशे आहे तुम्ही आता ?”
“ मी बरा आहे. पण तू कोण रे बाळा ?? . मी ओळखलं नाही तुला . पण तुला बघितल्या सारखं वाटतंय कुठेतरी . आणि तू फुलपुडी आणतोस का रोज ?.. कोणी सांगितलं तुला ? त्या फुलवाल्यानी का ? त्याच्याकडे कामाला होतास का ??”
बाबांचं कमालीचं कुतूहल त्यांच्या या प्रश्नांच्या सरबत्तीतून बाहेर पडत होतं.
“ आजोबा sss . तुम्ही डिशचार्ज घेतल्यावर अँब्युलंसनी आलते किनई घरी ss त्या अँब्युलंसचा डायवर मी !”.
“ अरे हां हां … आता तू सांगितल्यावर आठवला बघ चेहरा. ये आत ये. बस इकडे.. पण तू ?? फुलपुडी ?? .. त्याला खुर्चीवर बसवता बसवता एकीकडे बाबांचे प्रश्न सुरूच होते.
त्याचं काय झालं .. त्यादिवशी तुमचं ते तंगडं मोडलं असून पण ssssss … सॉरी हा आजोबा .. ते रोज नुसते पेशंट, मयत, लोकांचं रडणं वगैरे बघून बघून आपलं बोलणं थोडं रफ झालंय ss . पण मनात तसं काय नाय बरका s !”..
“ अरे हरकत नाही sss बोल बोल !!”
“ हां ss तर तुमचा एवढा पाय फ्रँक्चर असून पण तुम्ही ते ताईला फुलपुडीचं सांगत होते ते मनात पार घुसलं होतं बघा माझ्या .तुम्हाला आजींची किती काळजी वाटते ते ऐकून माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलतं. नंतर येके दिवशी येका पेशंटला आणायला सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलतो अन् माझ्याच समोर एक बॉडी आत आली. बघतो तर तो फुलवाला sss . शॉक लागून मेला बिचारा. पण आई शप्पथ खरं सांगतो आजोबा sss त्याची बॉडी बघून मला पहिलं तुम्ही आठवला. आता आजींच्या फुलपुडीचं काय होणार हा प्रश्न पडला. तेव्हाच ठरवलं की ते बंद होऊन द्यायचं नाय. मग येक दोन दिवस त्याची कामाला ठेवलेली पोरं दुकान बघत होती त्यांच्याकडून आणून दिली मी फुलपुडी तुम्हाला. नंतर गाशाच गुंडाळला ओ त्यानी. येकदा वाटलं त्या तुमच्या ताई पैशे भरतात त्यांना समजलं तर करतील काहीतरी पण नंतर वाटलं त्या तरी बाहेरगावाहून काय करणार ? . मलाच काही कळना झालं. म्हंटलं डबल झाली तरी चालेल पण आपण देऊ की थोडेदिवस फुलपुडी. माझ्या घराजवळ एक फुलवाला आहे पण त्याच्याकडे घरपोच द्यायला माणसं नाही. म्हंटलं आपणच देऊया. पण मी दिवसभरचा असा कुठं कुठं जाऊन येतो. देवाला घालायची फुलं म्हणल्याव अशी नको द्यायला. म्हणून रोज घरी जाऊन आंघोळ झालीsss की मग सायकलवर येतो. बरं आपला घराला जायचा एक टाईम नाय. म्हणून कधी उशीर पण होतो. बरेच दिवस बघितलं तर दाराला कधीच दुसरी पुडी दिसली नाही म्हणजे म्हंटलं आजोबांनी दूसरा फुलपुडीवाला धरला नाही अजून. आता आपणच द्यायची रोज. तेवढाच आजींच्या आनंदात आपला पण वाटा.
“ अरे मग इतक्या दिवसात एकदा तरी बेल वाजवून आत यायचंस . भेटायचंस. !”
“ अहो . आधीच तुमची तब्येत बरी नाही त्यात तुम्हाला का त्रास द्यायचा आणि भेटण्यापेक्षा फुलपुडी वेळेत मिळणं मत्त्वाचं !”.
“ अरे पण पैसे तरी घेऊन जायचेस की !! फुलवाल्याचे द्यायचेत अजून की तू दिलेस ??.. हे घे पैसे !!” .. पाकिटात हात घालत बाबा म्हणाले .
“ हाय का आता आजोबा . छे छे.. मी नाही घेणार पैसे. पण त्याची काही उधारी नाही बरका. एकदम द्यायला जमत नाही म्हणून रोजचे रोख पैशे देतो मी त्याला !”
“ अरे पण तू का उगीच भुर्दंड सहन करणार ? उलट इतके दिवस तू हे करतोयस त्याचे आभार कसे मानू हेच समजत नाहीये बघ मला. काय बोलावं हेच सुचत नाहीये. !!
“ अहो भुर्दंड काय ? अन् आभार कसले ? माझे पण आई वडील हैत की गावी . तिकडं असतो आणि माझ्या आईला फुलं हवी असती तर फुलपुडी आणली असतीच की मी. त्यांची इच्छा होती की मी गावात राहावं अन् मला मुंबईतच यायचं होतं. म्हणून त्यांनी बोलणं टाकलंय ओ माझ्याशी. त्याचंच वाईट वाटतं बघा. ही फुलं देऊन मला माझ्या आईला आनंद दिल्याचं समाधान मिळतंय हो !!”.
बाबांचे डोळे एव्हाना आपसूक पाणावले होते. त्यांनी त्या मुलाचा हात अलगद हातात घेतला. तो मुलगा सुद्धा भावूक झाला….
“ सीरियस पेशंटला घेऊन जातो तेव्हा वेळेत पोचेपर्यंत जाम टेन्शन असतं आजोबा. वरच्या सायरनपेक्षा जास्त जोरात माझं हार्ट बोंबलत असतंय . आणि एकदा जीव वाचला कीनई मग भरून पावतं बघा. आपली ड्यूटीच आहे ती ss . पण त्यादिवशी तुम्ही ते म्हणले होते ना “आईच्या चेहऱ्यावरच्या आनंदाची कळी फुलण्यासाठी फुलपुडी ss” .. मला काय असं छान छान बोलता येत नाही तुमच्यासारखं .. पण तुमचं बोलणं ऐकून एक गोष्ट डोक्यात फीट्ट बसली की.. “मरणाऱ्यांना जगवणं” मोठं काम हायेच पण “जगणाऱ्यांना आनंदी ठेवणं” पण तितकंच मत्त्वाचं आहे. !!!! म्हणून आता पुढच्या महिन्यात मी गावी जातो आणि आमच्या म्हातारा-म्हातारीला पण जरा खुश करतो !! चलाss निघतो आताss उशीर झाला. जरा जास्त बोललो असलो तर माफ करा हां आजी आजोबा !!
हे सगळं ऐकून आई आत देवघरापाशी गेली. संध्याकाळी दिवा लावून झाल्यावर देवापुढे ठेवलेली साखरेची वाटी घेऊन आली आणि ती त्या मुलाच्या हातात ठेवली. आपला थरथरता हात त्याच्या डोक्यावरून, गालावरून प्रेमाने फिरवला. आणि मृदु आवाजात म्हणाली ..
“ अहो बघा sss दगडात देव शोधतो आपण .. पण तो हा असा माणसात असतो. नाहीतर या मुलाचं नाव सुद्धा आपल्याला माहिती नाही पण माझ्या आनंदासाठी तो इतके दिवस झटतोय !!.. धन्य आहे बाळा तुझी !!” .
आई दारापाशी गेली. या सगळ्या गप्पात दाराला तशीच अडकून राहिलेली फुलपुडी काढली. खुर्चीत बसली आणि प्रसन्न अन् भरल्या अंतःकरणानी, पाणावलेल्या डोळ्यांनी एकटक बघत बसली ती दिवसागणिक आनंद देणारी इवलीशी “फुलपुडी”.
–– क्षितिज दाते.
ठाणे.
दातेसाहेब,
मला म्हाता-याला रडवलंत तुम्ही आज.