नवीन लेखन...

पिंपळ

१) कुलकर्ण्यांचा प्रशस्त वाडा. पंधरा वर्षांची कुमुद आजीला शोधत बागेत आली . आजी नेहमीप्रमाणे औदुंबराच्या झाडाखाली शांत बसली होती. कुमुदला माहीत होतं. आजी औदुंबराच्या झाडाकडेच असणार. आजोबा गेल्याचं दुःख ती पचवू शकत नव्हती. हा औदुंबर आजोबांना प्रिय होता. कुमुदला आजीची अवस्था पहावत नव्हती. तिला पूर्वीसारखी हसीमजाक करणारी हरहुन्नरी आजी हवी होती. कुमुद आजीला म्हणाली, “ आजी ग घरांत चल. आजोबा म्हणायचे, दिवेलागणीला असं घराबाहेर राहू नये. ” आजी म्हणाली, ” तेच तर .. आता काही म्हणायला ते आहेत कुठे ? हसत खेळत हार्टॲटॅकने निघून गेले.

माणूस आजारी असेल , बिछान्याला खिळलेला असेल तर आपण समजू शकतो की त्याच्या गच्छंतीची वेळ आली आहे.
पण हे धडधाकट असे कसे निघून गेले. जे असते कालाचे ठायी , मजपाशी उत्तर नाही” असं पुटपुटत आजी कुमुद सोबत घरांत आली..
जेवणं आटोपून आजी आणि कुमुद आजीच्या बेडरुममध्ये आल्या. आजी मिश्किलपणे म्हणाली, “ काय ग कमू तू आज माझ्यासोबत झोपणार आहेस की काय ? माझी पाठ सोडत नाहीस ती ? ” कुमुद : तसच नाही काही पण मला नं तुझ्याशी बोलायलायच आहे. आपल्या वाड्यातच कौल फाडून आकाश पहाणारा पिंपळ वृक्ष आहे. सुशांत काका म्हणत होता. तो वृक्ष मुळातून उपटून दुसरीकडे लावावा. त्या वृक्षाची म्हणे काकुला भीती वाटते. “

आजी : तुझी नेत्रा काकू नववधू आहे ना. तिला हा वाडा , ते पिंपळाचं झाड, घरातली माणसं, सगळं नवीन आहे. थोड्या दिवसांत रुळेल ती. तुला भीती वाटते का ?

कुमुद : मला .. नाही ग. माझा आवडता वृक्ष आहे तो. मी जन्मापासून पहातेय. झुपकेदार शेपटाच्या खारी त्या वृक्षावर सारख्या लपंडाव खेळत असतात. त्या चिमुकल्याखारुताई माझं मनोरंजन करतात. पोपटांचा थवाही झाडावर बसून गोंगाट करतो. मोठे पक्षीही अगदी घार, गरुड पहाताना मला मज्जाच वाटते. भीती कशाची ?

आजी : त्या पिंपळाला तुझे आजोबा गुरु वृक्ष म्हणायचे. तुझ्या आजोबांना त्या पिंपळानेच वैद्दबुवा बनवलं. त्यांना कुठूनसा शोध लागला. हा वृक्ष औषधी आहे. अगदी कॅंसरपासून सर्व आजार हा वृक्ष दूर करतो. केवळ या वृक्षापासूनच ते औषध बनवून ऋग्णांना बरं करायचे. या पिंपळानंच त्यांना निष्णात वैद्दबुवा असा लौकिक मिळवून दिला. सर्वात महत्वाचं तो पिंपळ आपल्या घरांत आहे हे आपलं भाग्य समजायचं कारण हा एकमेव वृक्ष रात्रंदिवस म्हणजे चौवीस तास प्राणवायू सोडत असतो. गौतमबुध्द तथा ऋषिमुनींनी याच वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती केली आहे. पिंपळ हा एक देवदेवतांचा वास असलेला पवित्र वृक्ष आहे. नेत्राला हे सगळं सांग तिची भीती दूर होऊन तिला पिंपळाबद्दल आदरच वाटेल. तरीपण कमु एक गोष्ट लक्षात ठेव. रात्रीमात्र त्या वृक्षाच्या आसपास फिरु नका. आपण त्या खोलीचं दार बंद करतो आणि चुकूनही उघडत नाही.

कुमुद : आजु हे असलं काहीतरी सांगून तू मला घाबरवतेस हं. मी जाते झोपायला.
२) सुशांत , नेत्राच्या बेडरुममधून हा वृक्ष दिसायचा. सुशांतला या वृक्षाची सवय होती. त्याचं बालपण तर या वृक्षाच्या अंगाखांद्यावर मजेत गेलेलं. नेत्राला घरांत वृक्ष असणं ही कल्पनाच पटत नव्हती. तिनं असे वृक्ष क्वचित बंगल्यात हॅाटेलमध्ये एखाद्दा बिल्डिंगमध्येही पाहिलेत. अगदी नाही असं नाही. लग्नापूर्वी ती सुशांतच्या घरी आली होती. परंतु वृक्ष असलेल्या खोलीचा बंद दरवाजा उघडून तिनं ती खोली पाहिली नव्हती. तिथं वृक्ष असल्याबद्दल कोणी बोलले नव्हते. माहीत असतं तर कदाचित तिनं हे स्थळ नाकारलही असतं. कारण तिचं ठरवून झालेलं लग्न होतं. तिच्या बेडरुमच्या खिडकीतून हा वृक्ष दिसत होता. रात्रीच्या वेळी फांद्दांच्या सावल्या विचीत्र चळवळताना दिसत होत्या. पानांची प्रचंड सळसळ कानावर येत होती. वाऱ्याचा वेणूनाद भिववीत होता. एखाद्या फांदीला वेटोळा घालून बसलेला अजस्त्र अजगर किंवा दिवड असल्याचा भास तिला होत होता. फांद्यांना उलटी लटकलेली वटवाघळं दिसत होती. रातकिड्यांचा किर्रर्र आवाज येत होता. घुबडांचा सुस्कारा कानावर येत होता. नेत्राचा भितीनं थरकाप उडाला . रात्रीचे तीन वाजलेत. तिला काही केल्या झोप येत नव्हती. अखेरीस तिनं सुशांतला उठवलं .

नेत्रा : सुशांत मला त्या पिंपळामुळे झोप येत नाहीय. बघना त्या झाडावर काहीतरी अजगरासारख दिसतंय.
सुशांत : कुठे काय ? अग तू झाडाकडे बघतेसच का ? आपण कोकणात झाडाझुडपांत रहातोय. झाडावर पक्षी, प्राणी येणारच . सकाळ झाली की निघून जातील . त्याने खिडकीचे पडदे व्यवस्थित बंद केले. आणि क्षणार्धात गाढ झोपी गेला.
नेत्राच्या मनात आलं , अरे बापरे म्हणजे कल्पना नव्हे तर खरंच तो अजगर असू शकतो. नेत्रानं डोक्यावरुन पांघरूण ओढलं नी झोपायचा प्रयत्न करु लागली. ती शहरी भागातून इथं आलेली. इथलं आयुष्य तिला कठीण वाटू लागलं. आई बाबांची आठवण येऊन तिला रडू कोसळलं.

सकाळ झाली. नेत्रा धावतच खिडकीपाशी उभी राहीली. मनात भीतीचा लवलेशही नव्हता. किरमिजी सूर्यप्रकाशात तो वृक्ष प्रसन्नपणे सळसळताना दिसत होता. झुलत्या पानांव्यतिरीक्त तिला त्या वृक्षावर काहीही दिसलं नाही. ती मनोमन सुखावली आणि स्वयंपाक घराच्या दिशेनं निघून गेली.

स्वयंपाक घराला लागूनच डायनिंग हॅाल होता. घरातले सर्व एकत्र बसून चहानाश्ता करीत. जेवणाच्या वेळा मात्र सर्वांच्या आपापल्या सोईनुसार होत्या. चहानाश्त्यासाठी डायनिंग टेबलवर कुमुद, कुमुदचे बाबा सदानंद , कुमुदचा मधला काका माधव, काकू मानसी, धाकटा काका सुशांत, काकू नेत्रा आणि आजी हे सर्व एकत्र बसले होते. रमाकाकू सर्वांना चहा नाश्ताच्या प्लेट्स देत होत्या . नेत्रा आजीच्या बाजूला बसलेली . ती आजीला बोलतं करण्याचा प्रयत्न करीत होती. आजी शांत होती. रात्री नेत्रा पिंपळाला कशी घाबरली तो किस्सा कुमुदनं रंगवून सांगितला. आता मात्र सर्वांनी पानांची एकत्र सळसळ व्हावी तसं एकत्र बोलायला सुरवात केली. आजीसुध्दा मिश्किलपणे हसत होती.

तो पिंपळवृक्ष बंगला बांधण्याच्या आधीपासूनच कसा त्यांच्या सोबत आहे. पिढ्यांन् पिढ्यांना पुरुन उरणारा तो वृक्ष आहे.
आजपर्यंत कसलाही वाईट अनुभव घरांत कोणालाही आलेला नाही. किंवा रानटी पशुपक्षी कधीही घरांत आलेले नाहीत. हे सर्व नेत्राला पटवून देत होते. तो वृक्ष म्हणजे देवादिकांच निवासस्थान आहे. वाड्याबाहेर औदुंबर आहे. तिथं गुरुदेव दत्ताचा वास आहे. घरांत बाहेर कुठंही आपल्याला भीती नाही. हे सांगण्यामागे नेत्रानं मनांत कसलीही भीती बाळगू नये हा हेतू. आजोबांची बागेतल्या औदुंबराशी आणि घरातल्या पिंपळवृक्षाशी किती जवळीक होती. त्या आठवणी आजी डोळ्यांत पाणी आणून सांगत होती. तिला मागे ठेवून आजोबा निघून गेलेत हे तिला सहन होत नव्हतं. म्हणूनच ती या दोन वृक्षांपाशी घुटमळत असते. हे दोन वृक्ष तिला घरचेच सदस्य वाटत होते. आताशा ती या वृक्षाच्या सावलीत खुर्ची टाकून हातवारे करीत या वृक्षांशी गप्पा मारत बसल्याचे दृश्य दिसायचे.

तर अश्या प्रकारे आजीला बोलत करण्याचा आणि दैनंदिन व्यवहारात रुळवण्याच्या प्रयत्नात सर्वजण होते.. त्यातल्या त्यात माधवकाकाच्या तान्ह्या बाबुच्या बाललीलांमुळे घरांत आनंद होता ..

३) कुमुद आणि नेत्राचं छान जमायचं . काकु , पुतणी असल्या तरी अगदी जीवलग मैत्रिणी असल्यासारख्या वागायच्या. कुमुद नेत्राला म्हणजेच धाकट्या काकुला चिडवित होती.

कुमुद : काय मग ? नेत्राकाकू आता तरी पिंपळाला घाबरायचं सोडणार नं ? नेमकी रात्री घाबरतेस ? मॅरेज लाईफ एंजॅाय कसं करणार ग ?

नेत्रा : ( कुमुदला चिमटा काढत ) अग वेडे तुझ्या काकुशी बोलतेयस .. जिभेला हाडबिड आहे की नाही ? मला नाही हो चालायची अशी थट्टा .

कुमुद : हो का ? लटका राग कळतो बरं आम्हाला. मनांत उकळ्या फुटतायत त्या चेहऱ्यावर दिसतायत बरं का ? थांब तू , सुशांत काकालाच पाठवते तुझ्या खोलीत. कुमुद सुसाट बाहेर पळाली.

आजच्या गप्पांमुळे नेत्रा सावरली होती. आज प्रथमच हा वाडा तिला आपलासा वाटू लागला. तिनं त्या खोलीचं दार उघडलं नी त्या पिंपळाखाली उभी राहीली. हिरवागार डोलेदार वृक्ष तिलाही फार आवडला होता. माहेराहून आलेल्या रुकवतात तिची एक शाळेतली हस्तकलेची वही होती. त्या वहीत एक जाळीदार पिंपळपान होतं. ते जाळीदार पिंपळाचं पान पहाताना तिला गहीवर दाटला. तिला दहावीच्या निरोपसमारंभात ते पिंपळपान तिची वर्गमैत्रीण अरुणानं दिलं होतं. आणि काही दिवसांत ती ट्रेन ॲक्सिडंटमध्ये स्वर्गवासी झाली होती. अरुणा आणि नेत्रा दहा वर्ष एकाच शाळेत शिकत होत्या. शाळेच्या आवारातल्या पिंपळाखाली त्या सतत घुटमळत असायच्या. पिंपळाच्या चौथऱ्यावर बसून दोघी खूप स्वप्नरंजन करायच्या. त्या पिंपळाच्या तळाशी त्यांची खूप गुपित होती. ते सगळे प्रसंग आठवून कुमुदचे डोळे भरुन येत होते. अरुणानं दिलेलं पान तिनं जिवापाड सांभाळलं होतं. आता तर संपूर्ण पिंपळवृक्ष तिच्या घरांत आहे. हे मात्र तिला गूढ अघटित वाटत होतं. तर्कापलिकडलं काहीतरी. क्षणार्धात तिनं हे असह्य विचार मनातून झटकून टाकले. तिच्यासमोर तिची सासू उभी होती. नेत्राला पिंपळापाशी पाहून तिला खूप बरं वाटलं. ती म्हणाली, ” नेत्रा मला कुमुदनं सांगितलं तू या वृक्षाला खूप घाबरतेस म्हणे, या वृक्षाची अशी सवय होईल की तो तुला आमच्यासारखाच आवडायला लागेल.
नेत्रा : हो आई असंच होईल. आता नाही घाबरत मी. घरांत वृक्ष असणं अशी मी कधी कल्पनाच केली नव्हती. तशी घराची रचना छान आहे. बघाना मी ज्या दारानं इथं आले. त्या दाराला समांतर समोर एक दार आहे. ते दार उघडलं की पुन्हा खोल्या आहेत.

सासू : तो वृक्ष न हलवतां बंगला बांधावा असाच प्रस्ताव होता. दोन पिढ्या या बंगल्यात गुण्यागोविंदानं नांदल्यात . आपली ही तिसरी पिढी. आपल्या पूर्वजांनी वृक्ष हलवायचं धाडस केलं नाही. आपणही ते करायला धजायचं नाही. मस्करीत का होईना सुशांत अशाप्रकारचं काहीतरी बोलून गेलाय.

नेत्रा : हो मी घाबरते म्हणून सुशांत तसं म्हणाला असेल . माफ करा आई . आता सुशांतही असं काही बोलणार नाही. माझ्यामुळेच बोलला असणार.

सासूबाई पिंपळासमोर उदबत्ती लावून पिंपळाला प्रदक्षिणा घालून हात जोडून समोरच्या दारातून त्यांच्या खोलीत निघून गेल्या.

थोरल्या सदानंदने गावकऱ्यांसाठी शाळा सुरु केली. मधला माधव कॅालेजवर प्रोफेसर आहे तर धाकटा सुशांत निष्णात डॅाक्टर आहे. त्यानं हॅास्पिटल उभारलं .. अशा उच्चभ्रू कुटूंबात नेत्रा आली आहे. हे एकत्र कुटूंब सुखानं नांदत आहे. नाही म्हणायला या मुलांचे वडील आबा वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी हार्टॲटॅकनं निधन पावलेत. दोन महिने होत आलेत. त्यामुळे सुखाला गालबोट लागलंय. आबांच्या निधनामुळे आई मात्र शांत झाली आहे. हळूहळू तीसुद्धा दुःखातून सावरेल.
नेत्रा खारूताईंचा पळापळीचा खेळ मजेत पहात होती. अधूनमधून येणारे पाखरांचे थवे तिचं लक्ष वेधून घेत होते. वृक्षाला सोनेरी मुकुट चढवल्यासारखी पिंपळपानं चमकत होती. थंडगार वाऱ्याच्या झुळका मन प्रफुल्लीत करीत होत्या. हा वृक्ष रात्री भयानक दिसतो तितकाच दिवसा सुंदर दिसतो. निसर्गाची किमया वाखाणावी तितकी कमी . बऱ्याच वेळानं नेत्रा तिच्या खोलीत गेली. या पिंपळाचं सुरेखसं चित्र तिनं रेखाटलं.

४) नेत्रानं खिडकीवरचे पडदे बाजूला सारले. आताही ती खिडकीतून तो वृक्ष न्याहाळत होती. तिला पिंपळाखाली गेलेलं तिचं बालपण आठवत होतं. तिची शाळा तिच्या घरापासून अगदी जवळ होती. त्यामुळे जवळपासच्या मुलांचा तो खेळांचा अड्डाच होता. अरुणा आणि नेत्रा शाळेव्यतिरिक्तचा बराच वेळ त्या वृक्षाच्या चौथऱ्यावर खेळण्यात घालवित. लहान असताना पकडापकडी, लपंडाव, सारीपाट सर्व खेळ मुलं मनसोक्त खेळत. नेत्रा आणि अरुणा तेरा चौदा वर्षांच्या होताच खेळ कमी आणि चौथऱ्यावर बसून गप्पाच जास्त होऊ लागल्या. नेत्राला झाडापेरांविषयी फार आकर्षण होतं. लहान मुलं ढगांत आकार शोधतात तर नेत्रा गर्द झाडाझुडपांत , मोठाल्या वृक्षांमध्ये आकार शोधायची. अरुणा तिला चिडवायची , ” बघ हो नेत्रा, आपल्या घोसाळकर टीचर काय सांगायच्या .. कोणत्याच गोष्टींच्या जास्त जवळ जाऊ नये. एखाद्या गोष्टीचा जास्त विचार करु नये. मग त्या गोष्टींच वेड तरी लागतं किंवा त्या गोष्टी आपल्याला झपाटून टाकतात. नेत्रा तुला माहीतच असेल वड पिंपळ हे वृक्ष माणसांना झपाटतात म्हणे. बघ हो पिंपळ तुझ्या मागे लागेल. ” हे आठवून नेत्राच्या अंगावर शहारा आला. खरं तर ह्या दंतकथा आहेत. असं काही नसतं. एम ए झालेली मी. अशा गोष्टींवर विश्वास ठेवला तर लोक मलाच वेडं ठरवतील. पण काही का असेना , माझ्या घरातच झाड आहे. तेही पिंपळाचं .. असो . पुन्हा एकवार नेत्रानं मनातले विचार झटकले आणि लेखन पॅड घेऊन काहीबाही लिहीत राहीली. लिहीणं हा तिचा छंद होता. घरकाम , स्वयंपाकपाणी या कामांसाठी लक्ष्मीताई होत्या. सदानंद भाऊजींची पत्नी रमावहिनी स्वयंपाक घर सांभाळायची.

लक्ष्मीताईंना सोबत घेऊन सारा स्वयंपाक त्या करायच्या. स्वतःच्या हाताने सर्वांना जेवण वाढायच्या आणि सर्वात शेवटी त्या आणि लक्ष्मीताई जेवायच्या. ही गोष्ट घरांत सर्वांना खटकायची. रमावहिनींनी पंगतीत बसावं म्हणून वाद देखील होत असत. पण त्या म्हणत, “ अरे मी मधे मधे खात असते रे . माझी काळजी सोडा. “ मला या माझ्या थोरल्या जावेचं भारी कौतुक वाटतं. तीनं स्वतःला या परिवारांत पूर्णपणे झोकून दिलय. घरातही सर्वांना तिच्याबद्दल अतीव आदर , प्रेम, माया आहे. ती या कुटूंबाचा आधारस्तंभ आहे. हा वाडा सदैव मुलांच्या गोंगाटांत गजबजलेला असतो. आबांचा वचक होता. दिवेलागणीपूर्वी सर्वांनी घरांत असलंच पाहिजे. हा नियमच त्यांनी घालून दिला होता. घरातल्या कर्त्या पुरुषांना मात्र सुट होती. नेत्रालाही अर्थार्जनाची इच्छा असल्यास ती करु शकते. असंही आबा म्हणत. परंतु नेत्रा मात्र घरीच राहून काही करता आल्यास पहावं अशा मनोवृत्तीची होती. त्यामुळे ती लेखन आणि चित्रकलेत मग्न असे. आबांचा सहवास नेत्राला दोनेक महिने लाभला. आईंचं नेत्राशी आणि सर्वच सुनांशी नातं जिवाभावाचं होत.

त्यामुळे घरांत आनंद सुख नांदत होतं. आज सुशांत हॅास्पिटलमधून नेहमीपेक्षा लवकर आला. तो नेत्राला फिरायला समुद्रावर घेऊन गेला. ती दोघं समुद्रावर अनेकदा गेलीत . इथला समुद्रकिनारा स्वच्छ होता. किरमिजी किरणांचा सूर्यास्त डोळे दिपवून टाकत होता. समुद्रातल्या छोट्या छोट्या होड्या लाटांवर हेलकावतानाचं दृश्य विलोभनीय होतं. हा देखणा समुद्र नेत्रा डोळ्यांत साठवून घरी जाताच कुंचल्यांतून कागदावर उतरवायची. ही जिवंत चित्रकला सुशांतला खूप आवडायची आणि नेत्राचं मनोमन कौतुक वाटायचं.

खूप दिवस झालेत. नेत्रा अगदी मजेत आहे. मनावर कसलाही ताण नाही. तिची चित्रकला लेखन सुरु आहे. कुमुद नेत्राला आजीचा निरोप सांगायला आली. आजीनं सर्वांना वृक्षापाशी येण्यास सांगितलं. सर्वजण वृक्षापाशी गोळा झाले. नैवेद्याचं ताट चौथऱ्यावर ठेवून सर्वांनी वृक्षाला हात जोडले. नमस्कार केला. आई ओठांत काहीतरी पुटपुटली आणि सर्वांना तिथून जाण्यास सांगितलं. आई बराच वेळ वृक्षापाशी बसून होती. सुशांत अजून आला नव्हता. हॅास्पिटलमध्ये काही इमर्जन्सी आल्यास काहीवेळा तो घरीसुद्धा येत नसे. नेत्रा आज पुन्हा एकदा रात्री खिडकीतून बाहेर डोकावण्याचा प्रयत्न करीत होती.

तिला आई वृक्षापाशी बसलेली दिसली. रात्रीचे बारा वाजून गेलेत. आईंनीच सांगितलं होतं रात्री अपरात्री पिंपळापाशी जाऊ नका. मग आई अशा का बसल्यात ? नेत्राला दार उघडायचं धाडस होत नव्हतं . तिनं सुशांतला फोन केला. आणि आई अशा रात्री बाहेर पिंपळापाशी बसल्यात त्यांना घरांत घेऊन यायला सांगितलं. सुशांत हसला आणि म्हणाला, ” अग आईच का आम्ही पण असे बसतो. भय कसलंच नाही ग. तिला आबांची आठवण आली असेल. ती दोघं बरेचदा असे बसायचे. आणि आज त्यांना देवाज्ञा होऊन दोन महिने झालेत. गेल्या महिन्यात आईनं आजच्या तारखेला त्यांच्या आवडतं जेवणाचं ताट त्या वृक्षापाशी ठेवून नैवेद्य दिला होता. तिच्या तशा काही भावना असतील. टेन्शन घेण्यासारखं काही नाही. मी घरी यायला निघालोय . दहा मिनीटांत पोहोचेन. ”

सुशांत घरी येताच त्यानं खिडकीतून आईला हाक मारली, “ आई काय ग, झोप येत नाहीय का ? माझ्या खोलीत ये , गप्पा मारुया .” आईनं काही उत्तर दिलं नाही, फक्त हात दाखवून समोरचं दार उघडून तिच्या खोलीत निघून गेली.
रात्र चढत होती. नेत्राची झोप उडाली होती. आज पुन्हा तिला तो वृक्ष खुणावत होता. पानांची सळसळ शिगेला पोहोचलेली. वाऱ्याचा वेणूनादही विचीत्र घोंघावत होता. खोलीतल्या खोलीत वारे गरगरत होते. थोड्या वेळांत वारे शांत झाले . आणि नेत्राच्या कानावर गप्पांचा आवाज येऊ लागला. नेत्राला सगळं विचीत्र वाटत होतं. तिनं पुन्हा एकदा खिडकीबाहेर पाहिलं. तिला तीन चार माणसं बसून गप्पा करीत असल्याचं दृश्य दिसलं. क्षणभर मनांत येऊन गेलं. माझ्याबेडरुमचं दार बंद आहे. समोरच्या आईंच्या खोलीचाही दरवाजा बंद आहे. आणि दारावरची बेल वाजलेली नाही. आणि वृक्षाच्या खोलीत फक्त ही दोनच दार उघडतात. बाहेरुन आत कोणी येऊच शकत नाही. मग ही माणसं आली कशी ? गप्पांचा आवाज वाढत होता. ओळखीचे कोणी आहे का पहावं म्हणून नेत्रानं पुन्हा खिडकीतून डोकावलं, तिला दरदरुन घाम फुटला . तिला त्या ग्रुपमध्ये चक्क आबा दिसत होते. मनात प्रश्नांच काहूर उठलं ? हे कसं शक्य आहे ? आबा तर वारलेत. तिनं घाबरुन सुशांतला उठवलं. आणि बाहेर पहाण्यास सांगितलं. सुशांतन खिडकी बाहेर पाहीलं . त्याला काहीही दिसलं नाही.

नेत्रा : अरे तुला गप्पांचा आवाज तरी ऐकू येतोय का ?
सुशांत : नाही ग , तू झोप पाहू. आणि येत असेल आवाज तर दुर्लक्ष कर. मी दिवसभरच्या श्रमानं थकलोय ग .
नेत्रानं झोपण्याचा प्रयत्न केला . तिला झोप येईना . खिडकीवर कोणीतरी टकटक करीत असल्याचा आवाज आला. तिनं घाबरत त्या दिशेला पाहीलं , तिला खिडकीतून घरांत डोकावणारी अरुणा दिसत होती. पुन्हा तिला प्रश्न पडला, हे कसं शक्य आहे ? तिनं आता शांत झोपलेल्या सुशांतला उठवायचं धाडस केलं नाही. प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत ती सुशांतच्या कुशीत शिरुन झोपायचा प्रयत्न करु लागली ..

नेत्राचा सकाळी डोळा लागलाय. तिला रात्री झोप लागली नाही. हे सुशांतला ठाऊक होतं. त्यानं स्नानादी विधी उरकले. चहानाश्ता केला नी रमावहिनीला म्हणाला, नेत्राला कोणी उठवू नका . रात्री बराच वेळ घाबरुन जागी होती. त्या वेडाबाईनं पिंपळाचा धसका घेतलाय. किती समजावलं तरी अधूनमधून अशी घाबरतेच. काय करावं समजत नाही. काल काय तर म्हणे तिला गप्पांचा आवाज येत होता. असो. चल वहिनी मी निघतो. “ सुशांत हॅास्पिटलला निघून गेला.

५) नेत्राला जाग आली. ” अरे बापरे दिवस डोक्यावर आलाय. ” म्हणत नेत्रा धडपडून उठली. उशीरा उठल्याने अपराधी भावनेनं नेत्रा डायनिंग टेबलवर बसून राहीली. कालची रात्र मात्र ती विसरु शकत नव्हती. तिच्या सोबत आई आणि रमावहिनी बसल्या. नेत्राच्या केसावरुन हात फिरवित म्हणाल्या, “ घाबरु नकोस, मला सुशांतनं तू काल घाबरल्याचं सांगितलं.

नेत्रा : मला विचीत्र भास झाले.
आई : तू माझ्या खोलीत ये मला तुझ्याशी बोलायचे आहे.

नेत्रा आईंच्या खोलीत आली. आईंनी दार बंद केलं नी म्हणाल्या , ” मी जे सांगेन ते मन लावून ऐक . आणि आपल्या गप्पा कोणालाही म्हणजे सुशांतलाही सांगू नकोस.” नेत्रा म्हणाली , ” हो आई. “

आई : प्रथम मला सांग काल तू का घाबरलीस ?
नेत्रानं घडलेला आणि खिडकीतून पाहिलेला प्रकार सांगितला. आबा आणि तिची मृत मैत्रीण अरुणा यांना स्पष्ट पाहील्याचं तिनं सांगितलं.

आई : हे बघ बाळा, तुझ्या बोलण्यावर माझा पुर्ण विश्वास आहे. तू जी माणसं पाहिलीस, आबांनाही पाहिलंस . हे सगळं खरं आहे. पण तू घाबरु नकोस. जर मी तिथेच बसले असते तर तुला कोणीही दिसलं नसतं. ते सगळे माझ्यासाठी थांबले होते. मी तिथे बसलेली तेव्हा मी एकटी नव्हतेच. माझ्यासोबत तुमचे आबा , माझे सासरे, आजेसासरे, माझा एक दीर असे सगळे मृतात्मे होते. ते रोज दिसत नाहीत. ते ज्या तारखेला गेले त्या तारखेला मला दिसतात. ही गोष्ट मी घरांत कोणालाही सांगितली नाही. आणि सांगणारही नाही. तुझ्या मैत्रीणीचा सुद्धा तोच मृत्यूदिन असावा. या गोष्टी आपण कोणालाही पटवून देऊ शकत नाही. त्या कोणाला सांगायच्याही नाहीत. वडावर भुताखेतांचा अनुभव येतो तर पिंपळावर देवादिकांचा आणि शरीर धारण न केलेल्या आत्म्यांचा वास पिंपळावर असतो. हे पवित्र आत्मे असतात. हे मी पुराणग्रंथांमध्ये वाचले आहे. त्यांची भीती बाळगू नकोस. ते तुला काही करणार नाहीत. तू कोणत्याही संकटात असलीस तर ते कोणाच्या न कोणाच्या रुपात येऊन संकट निवारण करतील. तुझं भवितव्य खुप छान उज्ज्वल आहे. फक्त माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव. मी आता आयुष्याच्या शेवटच्या वळणावर आहे. भीती, आनंद, दु:ख या सर्वांच्या पार गेलेय. मी कशालाही घाबरत नाही. मला उलट हे सगळं आवडतं. एक वेगळं विश्व मी आनंदान अनुभवतेय. तू फक्त रात्री अपरात्री माझ्या मागे मागे येऊ नकोस. तुला कोणी दिसणार नाहीत. की कसले भासही होणार नाहीत. तुला या वाड्यात रहायचं नसेल तर मी सुशांतला वेगळं रहायचा सल्ला देते. नेत्राला हे ऐकताना भीती वाटत होती. क्षणभर मनांत येऊन गेलं. हा वाडा, हा वृक्ष अगदी सुशांतलाही कायमच सोडुन माहेरी निघून जावं. पण का कोणास ठाऊक क्षणार्धात तिची भीती निघून गेली. भिंतीवर असलेल्या सासऱ्यांच्या तसवीरीला नमस्कार करुन ती तिथून बाहेर पडली. तिसऱ्या शक्तीवर मात्र तिचा विश्वास दृढ झाला. आणि ही शक्ती ज्याची तोच अनुभवतो हेही अगाध ज्ञान तिला मिळालं. देव आहे. तिसरी शक्तीही असावी. हे चक्र अनादीअनंतकाळापासून सुरु आहे. आपली भुमिका या शक्तींवर विश्वास ठेवावा की ठेवू नये इतकीच आहे. एकमात्र खरं की कोणीही या शक्तींच्या आहारी जाऊन अंधश्रद्ध होऊ नये. असो. आयुष्य एकदाच मिळतं. आयुष्य खूप सुंदर आहे . ते सकारात्मकतेनं जगावं असं ठरवून कधीही वेगळं न होता एकत्रकुटूंबात मजेत रहाण्याचा तिनं निर्णय घेतला .. खूप छान मन हलकं हलकं झालं होतं .

वाचकहो या कथेतलं खरं काही नाही बरं का . हे सगळं कल्पनेचं जंजाळ आहे. माझ्या हातात लेखणी आहे. असं काही बाही कधीमधी पानांवर उतरतं …

हेमांगी अरविंद नेरकर
दिनांक : ११/१०/२०२३.

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..