नवीन लेखन...

भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगली वेंकय्या

पिंगाली वेंकय्या.. हे नाव फारसे कुणाला माहीत नाही. भारताच्या राष्ट्रध्वजाची कल्पना मांडली ती याच पिंगाली वेंकय्या यांनी. त्यांचा जन्म २ ऑगस्ट, १८७६ रोजी झाला. ध्वज कोणत्या रंगाचा असावा, त्यात किती आणि कोणते रंग असावेत, त्याचा आकार कसा असावा याचा सखोल अभ्यास करून त्यांनी तिरंगा साकारला. ते केवळ तिरंग्याचे निर्माते नव्हते तर जपानी भाषेचे शिक्षक, सिद्धहस्त लेखक आणि जिओफिजिसिस्टही होते.चिल्लापल्ली येथे प्राथमिक, तर मासुलीपटनम येथील हिंदू हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी ते कोलंबोला रवाना झाले.

देशभक्तीने भारावलेल्या पिंगाली यांनी वयाच्या १९ व्या वर्षी बोअर युद्धासाठी आपले नाव नोंदवले आणि ते सैन्यात भरती झाले. त्यानंतर आफ्रिकेत असताना त्यांची महात्मा गांधीजींशी भेट झाली आणि त्यांचे ऋणानुबंध जुळले. ते पुढे ५० वर्षे टिकून होते. भारतात परतल्यावर बंगलोर आणि मद्रास येथे त्यांनी रेल्वे गार्ड म्हणून काम केले आणि मग बेल्लारी येथील शासकीय सेवेत प्लेग अधिकारी म्हणून ते रुजू झाले. पण त्यांची देशभक्तीची आस त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. शिक्षणाच्या ओढीने त्यांनी थेट लोहरमधील अँग्लोवेदिक महाविद्यालय गाठले आणि प्राध्यापक गोटे यांच्या मार्गदर्शनाखाली जपानी भाषा आणि इतिहासाचे शिक्षण घेतले.

उत्तर भारतातील पाच वर्षांच्या वास्तव्यात ते राजकारणात सक्रिय झाले. ब्रिटिशांना देशातून हद्दपार करण्यासाठी क्रांतिकारकांच्या मदतीने ते योजना आखू लागले. १९०६ मध्ये झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत पिंगालींमध्ये दडलेला क्रांतिकारक दादाभाई नौरोजी यांनी हेरला. या ठिकाणीच पिंगाली यांची मुनगलाच्या राजाशी भेट झाली. त्यानंतर १९०६ ते १९११ ही पाच वर्षे मुनगला या ठिकाणी त्यांनी शेतीविषयक संशोधन केले. त्यांच्या या संशोधनामुळे आणि कंबोडिया कॉटनच्या शोधामुळे ते पट्टी वेंकय्या म्हणून ओळखले जाऊ लागले. ब्रिटिशांनाही त्यांच्या या संशोधनाचे कौतुक वाटले आणि त्यामुळेच पिंगाली यांना रॉयल अॅग्रिकल्चरल सोसायटी ऑफ ब्रिटनचे सन्माननीय सदस्यत्व देऊ केले.

सरतेशेवटी पिंगाली मासुलीपट्टममध्ये परतले आणि त्यांनी स्वत:ला नॅशनल स्कूलच्या विकासासाठी वाहून घेतले. या ठिकाणी प्राथमिक सैन्यप्रशिक्षण, घोडेस्वारी, इतिहास आणि शेतीविषयी प्रशिक्षण देण्यात येत असे. ते केवळ पुस्तकी ज्ञानाने समाधानी होणारे नव्हते. त्यांच्या दैनंदिन आचरणातून त्यांचा उदारमतवादीपणा दिसत असे. १९१४ मध्ये आपल्या शेतावर ‘स्वेच्छापुरम’ ही संस्था स्थापन केली.
१९१६-१९२१ या कालावधीत पिंगाली यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक आगळा पैलू सर्वाच्या दृष्टीस पडला. सुमारे ३० ध्वजांचा अभ्यास करून पिंगाली यांनी भारतीय ध्वजाची कल्पना मांडली. आपल्या तिरंग्याच्या सध्याच्या रूपाचे डिझाईन तयार करण्याचे श्रेय पिंगाली यांना दिले जात असले तरी भारतीय ध्वजाची पाळेपुळे ‘वंदे मातरम्’ चळवळीपर्यंत जातात. १ ऑगस्ट १९०६ रोजी कलकत्त्यातील पारसी बगान स्क्वेअर (ग्रीन पार्क) येथे पहिले ध्वजारोहण झाले. हा ध्वजही तीन रंगांत होता. वरील भागात लाल, मध्ये पिवळा आणि खालच्या बाजूला हिरवा, अशी या झेंडय़ाची रंगसंगती होती. लाल भागात पांढऱ्या रंगाची आठ कमळाची फुले कोरलेली होती. पिवळ्या भागात निळ्या रंगाने देवनागरी लिपीत ‘बंदे मातरम्’ असे लिहिले होते. मदाम कामा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९०७ मध्ये पॅरिसमध्ये ध्वजारोहण केले होते. या झेंडय़ाची रंगसंगतीही पहिल्या ध्वजाप्रमाणेच होती. फरक एवढाच की, पहिल्या पट्टीमध्ये केवळ एकच कमळ होते आणि सप्तर्षी दर्शविणारे सात तारे होते.

बर्लिनच्या समाजवादी बैठकीत हा ध्वज फडकविण्यात आला. १९१७ मध्ये जेव्हा राजकीय चळवळीने वेग घेतला, त्यावेळी अॅनी बेझंट आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ध्वजारोहण केले होते. या ध्वजाच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यात युनियन जॅकचा शिक्का होता. त्याचप्रमाणे पांढऱ्या आकाराचे अर्धवर्तुळ आणि ताऱ्याचे चिन्ह होते. त्यावेळच्या जनतेचे उद्दिष्ट दाखविणे हा त्यामागचा संकेत होता आणि सत्ता मिळविण्याची इच्छा प्रदर्शित करण्यासाठी युनियन जॅकचा शिक्का होता. पण त्या ध्वजावरील युनियन जॅकचे अस्तित्त्व ही राजकीय तडजोड असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली होती. त्यामुळे या ध्वजाचा स्वीकार करण्यात आला नाही. १९२१ मध्ये स्वातंत्र्याच्या चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधीजींकडे आले आणि त्याचवेळी तिरंग्याचे पहिले रूप जनतेसमोर आले.

१९२१ ते १९३१ ही दहा वर्षे पिंगाली यांच्यादृष्टीनेच नव्हे तर आंध्र प्रदेशमधील स्वातंत्र्य चळवळीचा महत्त्वाचा कालावधी ठरला. ३१ मार्च आणि १ एप्रिल १९२१ या दोन दिवशी बेझवाडा येथे एआयसीसीच्या (ऑल इंडिया कॉँग्रेस कमिटीने) ऐतिहासिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याच वेळी पिंगाली वेंकय्या ध्वज घेऊन गांधीजींकडे गेले. भारतातील दोन प्रमुख धर्म दर्शविणारे लाल आणि हिरवा असे दोन रंग यात होते. अशाप्रकारे राष्ट्रध्वज अस्तित्वात आला, पण ऑल इंडिया कॉँग्रेस कमिटीने तो अधिकृतपणे स्वीकारला नव्हता.

गांधीजींनी तो स्वीकारल्यानंतर पुढील प्रत्येक कॉँग्रेस बैठकीमध्ये हा ध्वज फडकविण्यात येत असे. सामान्य माणसाच्या प्रगतीचे प्रतीक असलेल्या चरख्याचा या ध्वजामध्ये अंतर्भाव करण्यात यावा, अशी सूचना जालंधरचे हंसराज यांनी केली. त्यानंतर गांधीजींनी इतर अल्पसंख्यांकांचे अस्तित्व दर्शविणारी पांढरी पट्टी या ध्वजात समाविष्ट केली. १९३१ पर्यंत त्याला लोकमान्यता मिळाली नव्हती. ध्वजामधील रंगांचा अर्थ समजण्यावरूनही त्यावेळी जातीय तणाव निर्माण झाला होता. १९३१ मध्ये कराची येथे भरलेल्या कॉँग्रेसमध्ये यावरील अंतिम तोडगा काढण्यात आला. शौर्य दर्शविणारा भगवा, सत्य आणि शांती दर्शविणारा पांढरा आणि समृद्धी व विश्वास दर्शविणारा हिरवा असा या तीन रंगी ध्वजाचा अर्थ लावण्यात आला. चरखा आणि सूत यांच्याऐवजी ध्वजाच्या मध्यभागी अशोकचक्राचा समावेश करण्यात आला.

राष्ट्रध्वजातील तीन रंगांचा अर्थ समजावताना सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सांगितले की, राजकीय नेत्यांनी व्यावहारीक सुखांचा त्याग करणे हे भगवा रंग दर्शवतो, सत्याची वाट दाखवणे हे पांढरा रंग सांगतो तर हिरवा रंग आपले जमिनीशी असलेले नाते दर्शवितो आणि अशोकचक्र हे धर्माचे प्रतीक आहे.
पिंगाली वेंकय्या यांचे ४ जुलै, १९६३ निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / संजय पेठे

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..