गेले काही दिवस गुलजारची गाणी यु -ट्युबवर ऐकतोय. ( टॉप १०० सॉंग्स ऑफ गुलजार ) त्यातील गाणे क्र. ७७ वर पहिल्यांदा अडखळलो. ” वारीस शाह नू ”
मग कळलं की ते “पिंजर “मधील गाणं आहे. चित्रपट पाहिलाय, घरी सीडी आहे पण समहाऊ आठवत नव्हतं. पुन्हा एकदा यु -ट्युब झिंदाबाद ! वादली बंधूंनी ते उरस्फोड गायलंय. रचना आहे – अमृता बाईंची ! पंजाबची ही वाघीण – पण आतवर घायाळ आणि त्यामुळे शब्दांना सुऱ्याची धार.
आख्खा ” पिंजर” फाळणीमुळे रक्तरंजित ! फक्त असंवेदनाशील व्यक्तीच डोळ्यांत पाणी न आणता आणि हाताच्या मुठी आवळल्याविना एका बैठकीत पिंजर बघू शकेल.
१९४७ ची जखम माझ्या पिढीने पाहिली नाही पण अमृता आणि गुलज़ार ती आम्हाला विसरू देत नाही. या रचनेत अमृता साक्षात वारीस शाहला ( हीर रांझा या सुप्रसिद्ध प्रेम त्रिकोणाचा अक्षर निर्माता ) आवाहन करते आहे –
” बाबा रे, थडग्यातून बाहेर ये आणि पंजाबच्या इतिहासात एक नवे पान लिही. फाळणीनंतर झालेल्या पंजाबच्या दुरावस्थेवर भाष्य कर आणि प्रेमाचे पान उलट ! हीर रांझा च्या कथेत तुम्ही एका स्त्रीच्या (हीर) व्यथेला अजरामर केलेत पण आता पंजाबच्या लाखो मुली तुमची करूणा भाकताहेत. रण (?) भूमीवर मृतदेह पडले आहेत आणि चिनाब रक्ताळली आहे. कोणा अज्ञाताने नदीत विष ओतलं आहे आणि ते विषारी पाणी या (सुजाण ) भूमीला विराण करतंय. द्वेष मत्सराच्या फुत्कारातून या कसदार जमिनीत उद्या कसले कोंब अंकुरणार आहेत ? बघ ,आकाशही आसवांनी आणि किंकाळ्यांनी भरून गेलंय.”
मी या कवितेचे “गुरुमुखी ” आणि “शहामुखी ” भाषेतील शब्द टिपले, तिचे इंग्रजी आणि हिंदीत भाषांतर केले. कोठेही वेदनेची दाहकता कमी नाही. पंजाबकन्येचा हा “टाहो ” अर्वाचीन भारतीय साहित्यातील सर्वाधिक संख्येने संवेदनशील हृदयांपर्यंत आजवर पोहोचला आहे. गेले काही दिवस हे गाणे मी अनेक आवाजांमध्ये ऐकले आहे -मूळ गायकांसह ! कोठेही उष्णता कमी वाटली नाही. हा त्या टाहोचा प्रताप आहे.
नेहेमी “तुझ्या पावलांनी माती सुगंधित झाली ” असलं हळुवार प्रेम लिहिणारा गुलज़ार, या अमृता बाईंच्या नादी लागून त्याने “जळक्या पाकळयांच्या ” वेदना मांडल्या आहेत “पिंजर” मध्ये ! “नासूर “झालेल्या जखमा दाखविल्या आहेत -ज्या १९४७ पासून अजून उघड्या आहेत.
लिहायचं होतं ” पिंजर ” बद्दल – त्यातील कथानक , उर्मिलाचा “सत्या ” पेक्षाही उजवा अभिनय आणि समंजस / हळवा मनोज वाजपेयी (ज्याची ही करियर बेस्ट भुमिका आहे), संगीत/गायकी , उध्वस्त छावण्या, विषयाची संयत हाताळणी ! आणि गुलज़ार बद्दल काय लिहिणार ? फुलं ही तोच ,हारही तोच !!
तेंव्हा लवकरच लिहीन “पिंजर “बद्दल ! मात्र आज हे गाणं. त्याचं कारण म्हणजे –
गेले काही दिवस अमृता प्रीतमच्या जागी मला “निर्भयाची “आई दिसत होती – या कवितेतील आर्त टाहो, न्यायव्यवस्थेतील वारीस शाहांपर्यंत पोहोचावा म्हणून सात वर्षे विविध कोर्टाच्या फेऱ्या मारणारी !
फक्त एकच “हीर “नाहीए अजून !
तोपर्यंत हा “टाहो” जिवंत ठेवायला हवा !!
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply