अँटवर्पला डीसचार्जिंग करून आम्ही रोटरडॅमला निघालो होतो. रोटरडॅम मध्ये युरोपियन स्टॅंडर्ड मुळे म्हणा कि तिथलं वातावरण आणि नैसर्गिक परिस्थिती यांच्यामुळे म्हणा, तिथल्या लहान मोठ्या स्थानिक बोटी आणि इंधन पुरवठा करणाऱ्या बार्जेस ह्या खूप स्वच्छ, देखण्या आणि सुबक असतात. त्यांच्यावर धूळ किंवा तेलाचे डाग उडालेला रंग यापैकी कसलाही लवलेश नसतो. त्यांच्यावरील सर्व ऑटोमॅटिक सिस्टिम ह्या कॉम्पुटर कंट्रोल्ड असतात. काही काही बार्जेस वर तर संपूर्ण कुटुंब आढळून येत होत. लहान लहान मुले त्यांचे आईवडील त्यांची फोर व्हीलर ,एखादं दुसरा कुत्रा व त्यांची पिल्ल सुद्धा अशा बार्जेस वर पाहायला मिळाली. पाच ते सहा जणांचे कुटुंब अशा बार्जेस आणि लहान बोटी पूर्णपणे मॅनेज आणि ऑपरेट करताना दिसायचे. जहाजावरूनच अशा बोटींचे ऑटोमेशन समजून यायचं. आमचं नवीन जहाज कंपनीने पाण्यात उतरवून जेमतेम 23 महिने झाले होते. जहाज आतून आणि बाहेरून नवीन कोर दिसायचं. आत जहाजामध्ये कुठेही धूळ दिसायची नाही. जहाजाच्या दोन्ही बाजूला म्हणजे पोर्ट आणि स्टारबोर्ड साइडला ब्रिज विंग वर अत्याधुनिक cctv कॅमेरे लावले होते जे 180 अंशाच्या कोनात वर खाली तसेच डावीकडे आणि उजवीकडे फिरवता यायचे. कॅमेरा झूम केला तर जहाजाच्या फॉरवर्ड म्हणजे पुढच्या भागात जवळपास 250 मीटर पेक्षा लांब कोणी खलाशी उभा असेल तर त्याचासुद्धा चेहरा स्पष्टपणे बघता यायचा. यापूर्वीचे जहाज लहान होते त्यांच्यापेक्षा 3 पटीने मोठ्या जहाजावर पहिल्यांदाच काम करण्याचा अनुभव मिळत होता. जहाज कितीही मोठं असलं तरी त्याचं इंजिन आणि इतर मशीनेरी यांचं डिजाईन किंवा ऑपरेटिंग सिस्टीम सारखीच असते फक्त आकारमान मोठं असतं त्यामुळे फारशी अडचण येत नाही. आम्ही गल्फ मधून एव्हीएशन फ्युएल घेऊन निघालो होतो सुएझ कालवा ओलांडून जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीतून येऊन अँटवर्प ला डीसचार्ज करून रोटरडॅम येथे पेट्रोल लोड करून पुन्हा जिब्राल्टर मार्गे सुएझ कालव्याच्या दिशेने निघालो होतो. कार्गो घेऊन जहाज सुएझ कालवा ओलांडून सिंगापूर मार्गे तैवानला जाणार होते. रोटरडॅमला पुरेसे इंधन भरल्यामुळे भूमध्य समुद्रातून सुएझ कालव्यापर्यंत 9 ते 10 दिवस नॉनस्टॉप जाणार होतो. सुएझ कालवा क्रॉस कधी करणार ते तिथे पोचल्यावरच कळणार होतं. बे ऑफ बिस्की शांत असल्याने रोटरडॅमहून निघाल्यापासून जहाज वेगाने आणि न हेलकावता चालले होते. भूमध्य समुद्रात असताना जहाजाचा दुसरा वाढदिवस साजरा करायचा योग आला होता. कंपनीने सगळी जहाजे झिरो अल्कोहोल केल्यामुळे जहाजावर पार्टी म्हणजे फक्त खाण्यापूरतीच उरली होती प्यायला फक्त सॉफ्ट ड्रिंक्स. नाचणारे पण फक्त खाऊनच नाचत असत. चीफ कुक ने नेहमी प्रमाणे खाण्याचे खूप सारे पदार्थ बनवले होते. सगळ्या पदार्थांची आकर्षक सजावट केली होती. सगळ्यांनी पार्टी मध्ये एन्जॉय केलं. दारू नसल्यामुळे एरवी रात्रभर नाचणारे खलाशी रात्री अकरा वाजेपर्यंत एक एक करून आप आपल्या केबिनचा रस्ता पकडत होते. पार्टीमुळे जहाजावर आनंदाचे वातावरण होतं. दुसऱ्या दिवशी सांधकाळी जहाज सुएझ कालव्याच्या जवळ येऊन पोचलं होतं. रात्री अँकर टाकून सकाळी सकाळी सुएझ कालवा क्रॉस करायचा होता. कालवा क्रॉस झाल्यावर आर्मड सिक्युरिटी गार्ड जहाजावर येणार होते. यावेळी चार सिक्युरिटी गार्डस सुएझ कालवा संपल्यावर चढून श्रीलंकेतल्या गॅले बंदरावर उतरणार होते. लाल समुद्रात सोमालिया देशाच्या सीमेजवळून जहाज जाणार असल्याने बंदूकधारी सिक्युरिटी गार्डस कंपनीने पुरविले होते. सोमालियन पायरेट्स जहाज हायजॅक करत असल्याने एक ठराविक भाग ज्यामध्ये पायरेट्स चे हल्ले जास्त होत असत त्याला हाय रिस्क एरिआ किंवा HRA बोलत असत.
श्रीलंकेकडे जाताना सुमारे 3 दिवसांचा HRA लागत होता. मागच्या वेळेस गल्फ हुन युरोपला जाताना सुद्धा सिक्युरिटी गार्डस् आले होते त्यांनी जी माहिती आणि सूचना दिली होती तशीच माहिती व सूचना देण्यासाठी सुएझ कालवा सोडल्यानंतर काही तासातच मीटिंग बोलावण्यात आली. साडेसहा फुटाचा रिटायर्ड अमेरिकन सोल्जर 4 जणांच्या सिक्युरिटी गार्डस चे नेतृत्व करीत होता. त्याने सुरवातीला सगळयांना प्रश्न केला की तुम्हा भारतीय लोकांमध्ये दिवसभर निर्जळी उपवास करण्याची प्रथा का का अस्तित्वात आहे याच शास्त्रीय कारण माहिती आहे का? त्याच्या प्रश्नाने सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. मग तो पुढे सांगू लागला की जर जहाजावर पायरेट्स ने हल्ला करून जर आपल्याला बंधक बनवल तर पुढील 24 तास अन्न आणि पाण्याशिवाय सर्वांनी काढायचे. त्यामुळे रक्तातील पांढऱ्या पेशी वाढतात आणि त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. याचा अर्थ आपल्या निर्जळी उपवास करण्याच्या प्रथेचा अभ्यास करून त्यातील शास्त्रीय महत्व आपल्यालाच एक अमेरिकन पटवून देण्याचा प्रयत्न करत होता. मग तो पुढे आणखी सांगू लागला की आपण 35 जणांना एकत्र डाम्बलं जाईल किंवा आपण सर्व इंजिन रुम मध्ये लष्करी कारवाई होईपर्यन्त त्यांच्या हातात न सापडता लपून राहू वगैरे वगैरे. मग खाण्याचे आणि पाण्याचे कसे रेशनिंग करायचे एका दिवसात किती खायचे किती पाणी प्यायचे. कोणी आजारी पडला तर काय करायचं सगळं सांगून झालं. महिनाभरापूर्वी HRA मधून एकदा गेल्यामुळे यावेळेला कोणाला फारसं थ्रिलिंग वाटत नव्हतं. त्यात अमेरिकन आणि ब्रिटिश रिटायर्ड सोल्जर्ससह काही सिक्युरिटी पुरवणाऱ्या कंपन्यांची पैसे कमावण्यासाठी रचलेली चाल म्हणजे सोमालियन पायरेट्सचे जहाजांवर होणारे हल्ले. जर हे हल्ले बंद झाले तर ब्रिटिश आणि अमेरिकन सिक्युरिटी कंपन्यांची दिवसाला लाखो अमेरिकन डॉलर्सची उलाढाल येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांच्या कंपन्यांकडून कशी होईल. त्यामुळेच महिन्यातून दोन चार वेळा सोमालियन पायरेट्स कडून कुठल्या ना कुठल्या जहाजांवर हल्ले होत होते. खरं म्हणजे ते हल्ले घडवून आणले जात होते अशी चर्चा जहाजावर रंगत असे. HRA मध्ये जातांना वॉच सिस्टीम सुरु झाली होती. मी थर्ड इंजिनीयर असल्याने माझी ड्युटी दुपारी 12 ते 4 आणि रात्री 12 ते पहाटे 4 अशी होती. HRA मधील दुसऱ्या दिवसाची ड्युटी संपवून सेकंड इंजिनियरला वॉच हॅन्डओव्हर करून मी ब्रिजवर ताजी हवा खायला गेलो. दुपारचे साडेचार वाजले होते. जहाज फुल स्पीडवर होतं. खरं म्हणजे फुल स्पीड म्हणजे इंजिनच्या अधिकतम क्षमतेच्या 85% स्पीडला फुल स्पीड बोलतात. आणि जेव्हा इंजिन 100% स्पीड ने चालवलं जातं त्यावेळी मॅक्सिमम स्पीड बोललं जातं. पायरेट्स च्या बोटी या लहान लहान स्पीड बोट असल्याने समुद्रात लाटा उसळत असल्या कि हल्ल्याची शक्यता कमी असते. पण त्या दिवशी ब्रिजवर गेल्यावर पाहिलं तर समुद्र एकदम शांत दिसल्यासारखा दिसत होता. पांढरे फेसळणारे पाणी मागे सोडत जहाज वेगाने चालले होतं. केबिनमध्ये जाऊन प्रियाला फोन करण्यासाठी निघणार होतो तेवढ्यात दूर क्षितिजावर एक मोठी शिडाची होडी दक्षिणेकडून जहाजाच्या दिशेने येताना दिसली. त्या शिडाच्या होडीकडे बघितल्याबरोबर आणखी थोडा वेळ तिथेच रेंगाळलो. शिडाची होडी आकारमानाने मोठी दिसत होती. ब्रिजवर चीफ मेट आणि एक खलाशी वॉच करत होता तसेच दोन्ही बाजूला एक एक सिक्युरिटी गार्ड नजर ठेवून होता. शिडाची होडी जसजशी जवळ येत होती तसतसा तिचा आकार स्पष्ट होत होता सगळे जण आळीपाळीने तिच्याकडे दुर्बिण लावून बघत होते. सुमारे अर्धा एक तास ती एकच शिडाची होडी दिसत होती दहा मैलांवरून जेव्हा ती होडी पाच मैलांवर आली तेव्हा काहीतरी गडबड असल्याचं सगळयांना जाणवायला लागलं होतं. सगळेचजण त्या एका शिडाच्या होडीवर नजर ठेवून होते अधून मधून जहाजाच्या चारही बाजूला नजर फिरवून दुसऱ्या दिशेने कोणाची काही हालचाल आहे का ते पण तपासून बघत होते. जेव्हा ती शिडाची होडी आपल्याच जहाजाच्या दिशेने येत आहे याची खात्री पटली तेव्हा ती 5 मैलांच्या जवळ आली होती. जशी ती होडी 5 मैलांच्या जवळ आली तशी त्या होडीमागून आणखीन एक होडी दिसायला लागली. जवळपास तासभर एकच होडी दिसत असताना अचानक दुसरी होडी कशी काय निघाली हे समजायला वेळ लागला नाही. तोपर्यंत दोन पैकी एक होडी जहाजाच्या पुढच्या दिशेकडे उत्तरेकडे वळली आणि एक होडी मागच्या दक्षिणेकडील दिशेने वळली होती. चीफ मेट ने इंजिन रूमला फोन करून इशारा दिला. मी धावत धावत केबिन कडे पळालो कपडे बदलायला जाताना चीफ इंजिनीयरच्या दारावर जोराने टक टक करून त्याला खाली चला असं बाहेरूनच जोरात ओरडून सांगितलं. तोपर्यन्त त्यालापण फोन आला सेकंड इंजिनियरला. फक्त 2 मिनिटात सगळे डेक ऑफीसर ब्रिजवर आणि इंजिनीयर इंजिन रुम मध्ये पोचले होते. हल्ला झाल्यावर सगळ्यांनी महत्वाची कागदपत्रे आणि वस्तू भरलेली आपापली बॅग घेऊन इंजिन रुम मध्ये जायचे ठरलेलं असल्याने जो तो बॅग घेऊनच आला होता. इंजिन रूम मध्ये कॉम्पुटर स्क्रिनवर स्टारबोर्ड साईडला असलेला cctv कॅमेरा शिडाच्या होड्यांवर झूम केला गेला होता. त्यामुळे ब्रिजवरून फोन यायच्या पहिलेच आम्हाला बाहेर काय घडतंय याची कल्पना आलेली असायची. कॅप्टन ने जहाज मॅक्सिमम स्पीड ला पळवायला फोन केला. जहाजाचा इंजिन कंट्रोल चीफ इंजिनियरकडे आला त्याने फ्युएल लिव्हर हळू हळू एकदम टोकाला नेऊन टेकवला. जहाजाचे इंजिन जोर जोरात थर थरू लागलं होतं. इंजिनासोबत आम्ही सगळे सुद्धा पुढे काय होईल या कल्पनेने थर थरू लागलो होतो. AC असलेल्या थंडगार इंजिन कंट्रोल रुम मध्ये घाम फुटायला सुरवात झाली होती. Cctv कॅमेऱ्यात बाहेरच थरार दिसत होता. पाठीमागून आलेल्या होडीतून एक छोटी स्पीड बोट पाण्यात उतरवली गेली. त्या छोट्या स्पीड बोट मध्ये 4 काळे कुट्ट सोमालियन पायरेट्स जहाजाकडे रायफल रोखुन पुढे येत होते. चारपैकी दोन सिक्युरिटी गार्डस आप आपल्या रायफल सावरून आडोशाला उभे होते. आम्ही उंचावर असल्याने गार्डस ना पायरेट्सवर नेम धरणे जास्त सोयीचं होतं तसेच जहाजावर स्टील प्लेट्सचा आडोसा होता त्यामानाने पायरेट्स खुल्या स्पीड बोट ने पुढे पुढे येत होते. जोपर्यंत पायरेट्स जहाजावर चढत नाहीत किंवा ते स्वतःहून गोळीबार करत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर गोळीबार न करण्याचा नियम होता. पण हवेत गोळीबार करून त्यांना वॉर्निंग देण्याची परवानगी होती. सिक्युरिटी गार्डस ने त्यांच्या हातातील अत्याधुनिक रायफल गोळीबार न करता पायरेट्स ना उंचावून दाखवल्या. पायरेट्स ने जहाजावर लावलेल्या काटेरी कुंपणाचा जवळ येऊन अंदाज घेतला. छोटया स्पीडवर आणि पायरेट्स वर पाणी पडून ते भिजून ओले झाल्याने जहाजावर चढण्यास त्यांना त्रास व्हावा म्हणून फायर पंप चालू केला होता त्यातील प्रेशरने फायर होस मधून पाण्याचे जोरदार फवारे जहाजच्या बाजूला उडत होते. जवळपास वीस एक मिनिटे पायरेट्स ची स्पीड बोट जहाजाचा पाठलाग करत होती. शिडाची मोठी होडी म्हणजेच सोमालियन पायरेट्स ची मदर शिप जहाजपासून 3 मैलांवर होती पण जहाजाच्या वेगामुळे ती आणि दुसरी होडी सुद्धा मागे पडू लागली. चार जणांची स्पीड बोट अजून मागेच होती. पण जहाजावरील गार्डस आणि पायरेट्स या दोघांकडून सुद्धा गोळीबार झाला नाही. सुमारे 30 मिनिटांच्या थरारा नंतर पायरेट्स नी माघार घेतली आणि ते त्यांची स्पीड बोट वळवून माघारी जाऊ लागले. काही पिक्चर मध्ये रॉकेट लाँचर घेऊन जहाज उडवणारे पायरेट्स बघितले. काही पिक्चर मध्ये पेट्रोल च्या ड्रमला बंदुकीने गोळी मारून स्फोट करताना पहिले. इथे पेट्रोल ने भरलेलं अख्ख जहाजच होत. सुमारे एक लाख दहा हजार टन पेट्रोल. अंदाजे 1,10000000 लिटर पेट्रोल आम्ही घेऊन चाललो होतो. आणि जर का त्या पायरेट्सनी गोळीबार करून, रॉकेट सोडून किंवा ग्रेनेड मारुन जहाज उडवलं असत तर आम्ही सगळे आप आपल्या घरी फोटो फ्रेम मध्येच पोचलो असतो.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरिन इंजिनीयर
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply