नवीन लेखन...

पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग १०

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||

१२.३० ला कुरवपूरला आल्यानंतर, आता ४ वाजून गेले होते आणि मी मुख्य मंदिरात प्रवेश केला. खूप वाट पाहिल्यावर जेंव्हा काही तरी मिळते, तसा आनंद झाला. तरीही मुख्य पादुका दर्शन घेण्यासाठी मला अजून काही काळ थांबायचे होते. वाचन पूर्ण करून आत दर्शनाला जाऊयात असे मी मनातच ठरवले होते. एक अनामिक ओढ किंवा हुरहूर लागली होती.पण वाचन झाल्याशिवाय नाही.. आत प्रवेश केल्यावर समोर मोठ्ठं वडाचे झाड, त्या भोवती पार. प्रशस्त स्वच्छ मंदिर. फरसबंदीचे बांधकाम. इथे कुठे ही वाचायला बसू शकतो आपण. आपल्या घरी आल्यासारखं वाटलं.

डाव्या हाताला मोठ्ठी पडवी होती. तिथे एका कोपऱ्यात सर्व पुरुष मंडळी सोवळ घालत होती. अलीकडे मेघना काकू, आई बसली होती. बाकी आमच्या ग्रुप मधले, कोणी परिसर हिंडून बघत होतं, कोणी प्रदक्षिणा घालत होतं. एकंदरीत खूप प्रसन्न वाटत होतं.

‘परत जायला असेच ५-५.३० तास लागतील तर शक्यतो लवकर चला’ असं गुप्ताजी सांगत होते. इतक्या शांत, समाधानी ठिकाणाहून लवकर का निघायचे? आणि माझ्या वाचनाचं काय? क्षणभर मला वाईट वाटले. पण तेवढ्यात गजानन काका म्हणाले, ‘तू तुझं वाचन पूर्ण कर, मगच आपण निघुयात. तसंही आमचा अभिषेक आणि बाकी दर्शन विधी व्हायला वेळ लागेल. तू शांतपणे वाचन कर.’ त्यांच्या त्या शब्दांनी धीर आला.
मुख्य मंदिर आम्ही ज्या पडवीत बसलो होतो, त्याच्या डाव्या बाजूला होते. मग त्या पडवीत मुख्य मंदिराकडे तोंड करून मी नमस्कार करून वाचन सुरू केले. पण कदाचित दर्शनाची ओढ असल्यामुळे किंवा जाण्याची घाई असल्यामुळे लक्ष विचलित होत होते. समाधानपूर्वक वाचन झाले नाही.

तोपर्यंत आई जाऊन दर्शन घेऊन आली. माझंही वाचन पूर्ण झालं आणि मी अक्षरश: धावतच मंदिरात गेले. कसली ओढ होती कोण जाणे? आत गेले तेंव्हा जवळपास सगळ्यांचे दर्शन घेऊन झाले होते.

गाभाऱ्याच्या आधीच्या मंडपात डाव्या हाताला श्री दत्तगुरुंची सुंदर मूर्ती होती. आणि उजव्या हाताला मूळ गाभारा होता. गाभाऱ्यात आत मध्ये जरा अंधार होता. इथेच श्रीपाद श्रीवल्लभ ध्यान धारणा करायला बसायचे. मग त्या दृष्टीने ती जागा अगदीच योग्य होती. लहानशी, अंधारी आणि एका बाजूला, म्हणजे साधनेत व्यत्यय नको. तिथे मी जरा घुटमळले. आता त्या मंडपात मी एकटीच होते. खरंच काही सुचत नव्हते.

हरवल्यासारखी झाले होते. तेवढ्यात तिथल्या गुरुजींनी आवाज दिला. ‘ताई इकडे या.. इथे दर्शन घ्या.’

मराठी? होय, ते गुरुजी मराठी होते. मी मुख्य गाभाऱ्यासमोर आले. समोर श्रीपाद श्रीवल्लभांचा फोटो, समोर त्रिमूर्ती आणि पुढ्यात पादुका. काय आणि किती साठवू एका वेळी ह्या डोळ्यांमध्ये!

हात जोडून गुढगे मुडपून खाली बसले. एकटक पादुकांकडे बघत असताना लक्षात आलं, अरे, आपण ते उपरणं, बाकी गोष्टी आणल्या आहेत त्या दिल्याच नाहीत. काय झालं माहीत नाही, पण मी खूपच गोंधळल्यासारखी झाले होते.

मी तशीच्या तशी बॅग गुरुजींच्या हातात दिली. त्यांनीच ते उघडून सर्व वस्तू पादुकांजवळ ठेवल्या. मी नाईलाजाने उठले, नमस्कार करून जायला निघाले, तेवढ्यात गुरुजींनी हाक मारली. त्यांनी मी दिलेल्या डाळिंबांपैकी एक मला दिले प्रसाद म्हणून. आणि स्वतःच. सांगू लागले, मी उद्या अभिषेकच्या वेळेस हे वस्त्र घालेन, हे अत्तर आणि केशर लेपनात घालेन. डाळिंबाचा रस तीर्थात घालेन. माझं काही लक्षच नव्हतं. माझी नजर, लक्ष समोर महाराजांच्या पादुकांवर. मी तो प्रसाद घेऊन वळले आणि परत गुरुजींनी हाक मारली. मी वळले. त्यांनी थांबायला सांगितले. आणि आत जाऊन एक फळ … कुठलं फळं ?? पेरू !! पेरू उचलला महाराजांच्या पादुकांवर ठेऊन माझ्या हातात दिला.

मी चाट पडले. काही तासांपुर्वीचा पेरुचा संदर्भ आता लागत होता. काय होतं हे सगळं? जे काही योगा-योग घडत होते किंवा अनुभव मिळत होते, त्याचं लॉजीकल एक्सप्लनेशन माझ्याकडे नव्हते. पण हे नक्कीच आपल्या कुवती बाहेरचे विद्यान होते. मनोभावे तो प्रसाद डोक्याला लाऊन मी एका वेगळ्याच धुंदीत बाहेर पडले.

मुलगी आईकडे माहेरी ज्या ओढीने जाते. आणि माहेराहून निघताना रुख-रुख, हुरहुर, अस्वस्थता, आनंद, समाधान असे जे संमिश्र फिलिंग असतं, अशीच काहीशी अवस्था आमच्या सर्वांचीच होती. गुरुमाऊली परत कधी बोलावतील आता?

तिथून परत पंचदेव पहाड आणि मग बसकडे जड पावलांनी निघालो. तिथे स्मृती ताईंनी सांगितले, मलाही पेरूचा प्रसाद मिळाला. लेकराची इच्छा गुरुमाऊलींनी अशी पूर्ण केली होती.

खूप समाधानाने पण काहीशा अतृप्तीने आम्ही सिकंदराबादला आलो. आणि दुसऱ्या दिवशी दुपारच्या गाडीने कल्याणकडे प्रस्थान केले. परतीच्या वाटेत राजेंद्र दादा सडेकर सांगत होते की, गुरुदेवांची इच्छा असल्याशिवाय दर्शन मिळत नाही. सहजा सहजी तर कोणालाच दर्शन मिळत नाही कुरवपूरला. काही तरी मनस्ताप होतोच किंवा आयत्या वेळेस ट्रीप कॅन्सल होते. हे मी अरुताईकडून पण ऐकले होते. दोन वेळेस तिचे तिथे जाऊन दर्शन झाले नव्हते. एकदा जायच्या दिवशी प्लॅन कॅन्सल करावा लागला. असं ऐकलं होतं. मनात आलं, वा! आपल्याला असा काही त्रास नाही झाला किंवा मनस्ताप नाही झाला. पण.. जिथे अहं भाव तिथे तो तुम्हाला योग्य मार्गावर आणातोच. गिरनारला हा अनुभव येऊनही, माझ्या मनात ह्या वेळेस असाच अहं भाव आला. पण कान पकडून वठणीवर आणण्यासाठी गुरू माऊली होते ना!

कल्याणपर्यंत आम्ही इतके सहज पोहचलो. कल्याण स्टेशनवर उतरल्यावर आईने सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद दिले. बीपी, डायबेटिस, पायाच्या त्रासाने चालण्याचा प्रॉब्लेम, एका डोळ्याला काच बिंदू, कानांचा हडताल अशा सर्व तब्येतीच्या तक्रारीमध्ये सुद्धा तिच्या इच्छेमुळे आणि ग्रुपमधील सर्वांच्या सेवाभावी वृत्तीमुळे आईची ही यात्रा सुफळ पार पडली. गुरुदेवांचीच क्रुपा!

आता उतरल्यावर आई साठी wheel chair, सामानासाठी हमाल हे तर करायचेच होते. त्यातून आम्ही आणि मेघना काकू, अविनाश काका ठाण्याला एक टॅक्सी करुन येणार होतो. आणि अनुराधा काकू, बळवंत काका कल्पना ताईंबरोबर एक टॅक्सी करून मालाडला जाणार होते. गाडीतून उतरल्यावर दोन हमाल आमच्या जवळ आले आणि म्हणाले, भोसले साहेबांनी पाठवलंय. राजेंद्र दादा भोसले यांनी हमाल केला होता आणि दोघांना आमच्याकडे पाठवले होते.

सर्वांचा प्रेमळ निरोप घेऊन आम्ही हमालाच्या हवाली सामान सुपुर्द केले. सर्व मंडळी आपल्या इप्सित स्थळी जायला रवाना झाली. आम्ही wheel chair ची वाट बघत होतो. स्मिता काकू आईची wheel chair येईपर्यंत थांबल्या. मग आता आम्ही जाऊ, तुम्ही निघालात तरी चालेल.असे सांगितल्यावर त्या गेल्या.

कुठे भेटायचे काय, सगळं ठरवण्यआधीच ते दोन हमाल सामान घेऊन फटाफट पुढे निघाले. अविनाश काका त्यांच्याबरोबर घाईघाईत गेले. नेमके आम्ही तीन ठिकाणी विभागलो गेलो. एक बॅच एका बाजूने उतरली. त्यांच्याकडे थोडे सामान. ते आपले जनरल पब्लिक जिथून उतरतो तिथून गेले. एक हमाल आणि अविनाश काका सगळ्या सामानाबरोबर एका बाजूने आले आणि मी, आई आणि wheel chair नेणारा हमाल रॅम्प असलेल्या बाजूने बाहेर.

इतका गोंधळ झाला. बराच वेळ झाला, कोणी कोणाला भेटतच नव्हतं. सगळ्यांचे मोबाईल लाऊन झाले. कोणीच फोन उचलले नाहीत.
तर ते तीनही हमाल पैसे घेऊन निघून गेले होते. अर्धा-पाऊण तास मी आणि कल्पना ताई एकमेकींना शोधतोय. बाकी सगळे ज्येष्ठ नागरिक त्यामुळे त्यांना सामानाजवळ बसवून स्टेशनच्या बाहेर फिर-फिरतोय. घाम निघाला अक्षारश:! बरं! सामान आणि लोकं अशी काही मिक्स झाली होत की, एकमेकांना भेटल्याखेरीज पुढे जाणे शक्य नव्हते. जवळपास आम्ही असे अर्धा पाऊण तास फिरत होतो एकमेकांना शोधत.
प्रचंड मनस्ताप झाला. मनस्ताप! आता मला जाणवलं हे का घडतंय ते! मनोमन मी दत्त गुरूंची क्षमा मागितली. आणि पुढच्या दोन मिनिटात कल्पना ताई माझ्या पुढ्यात मला शोधत!

आम्ही जिथे उभे होतो तिथे ती दोनदा येऊन गेली होती आणि ते जिथे उभे होते तिथे मी दोनदा जाऊन आले होते. पण कोणीच कोणाला दिसलं नव्हतं. अगदी चकवा पडल्यासारखं आम्ही फेऱ्या मारतोय! एकमेकींना भेटल्यावर आम्ही सुटकेचा निःश्वास टाकला. ते cool cab च्या exit जवळ होते आणि आम्ही रिक्षा स्टँडच्या. बरं cabs रिक्षा स्टँड पाशी येत नाहीत. आई तर एवढं चालणार कशी? आणि ते बाकीचं सामान?
असा विचार करत असतानाच, एक माणूस अगदी देवासारखा धाऊन आला. तो टॅक्सीवाल्यांचा म्होरक्या होता बहुतेक. आमची पूर्ण केस त्याने ऐकून घेतली. दोन टॅक्सीवाल्यांना बोलावले. मग ते त्रिमूर्ती दोन गाड्या आणि आम्ही आणि सामान घेऊन निघाले. रिक्षावाल्याला रिक्वेस्ट करत दोन्ही गाड्या अगदी आई, अविनाश काका आणि सामान होतं तिथे पर्यंत घेऊन आले. शेवटी एकदाचे आम्ही आमच्या आमच्या घरी रवाना झालो. मनस्ताप ज्यांच्यामुळे घडला ते ही तिघंच होते, मार्गावर आणणारे ही तिघंच होते. असे छोटे-मोठे योग ट्रीप ठरल्यापासून येत राहिले.

परीक्षा घेणारा ही तोच! तरणाराही तोच! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!

जाता जाता…

अजूनही गुरुदेवांच्या चमत्कारांच्या पोतडीत काही तरी होते माझ्यासाठी!

ज्या दिवशी यात्रेची सांगता झाली, त्याच दिवशी रात्री माझ्या मिस्टरांचा पुण्याहून फोन. (शैलेश तेंव्हा नोकरी निमित्त पुण्याला होता.) माझ्या सख्ख्या दीराचा साइकल प्रॅक्टीस करताना मेजर अपघात झाला होता. तो कोमामधे होता. मेंदूमधे रक्तस्त्राव झाला होता. कानातून रक्त, कॉलर बोन डिसलोकेट झालं होतं. आणि मित्रांनी त्याला हॉस्पिटलला ऍडमिट केलं होतं. सगळं ऐकून प्रचंड हादरले मी. काय आहे हे?
तो आय.सी.यु. मधे होता. रात्रभर शैलेशच्या हॉस्पिटल/पोलिस स्टेशन अशा चकरा चालू होत्या. रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. शेवटी पहाटे ४ वाजता डॉक्टर म्हणाले, ४८ तास तर काही सांगता येत नाही.

ह्या गडबडीत मी खूप दमलेली असल्यामुळे पहाटे माझा डोळा लागला.आणि डोळ्यासमोर खूप प्रकाश आणि त्या प्रकाशात मला मिळालेल्या फोटोतला चेहरा समोर आला आणि खडबडून जाग आली. अजून बॅग्ज् अनपॅक केल्या नव्हत्या. फोटो बॅगेतच होता.पण मी तो फोटो डोळ्यासमोर आणला.हात जोडून ‘यात्रेदरम्यान काही चुकीचे घडले असेल तर मला माफ करा आणि आम्हाला ह्या संकटातून बाहेर काढा’ अशी प्रार्थना केली.

‘अशक्य ते शक्य करतील स्वामी!’ सकाळी ७-७.३० ला शैलेशचा फोन. राजूने डोळे ऊघडले आणि डोळ्यात ओळखीचे भाव होते. पूर्ण दिवसभरात मग अशा एकेक पॉझिटीव्ह न्यूज येत राहिल्या. मेंदूतील रक्तस्त्राव थांबला, आता तो पूर्ण शुद्धीत आला. असं करतं शेवटी संध्याकाळपर्यंत त्याला एकेक गोष्टी आठवल्या. नंतर कॉलर बोनचं ऑपरेशन झाले आणि आता तो रिकव्हर होतोय त्यातून हळू हळू!
हे संकट वाचासिद्धी स्वामींनी आधीच ओळखले होते का? म्हणून तो फोटोरुपी प्रसाद दिला का?

मोरयाची भक्ती मनात आणि योगेश्वराच्या कर्मयोगाची श्रद्धा कार्यात अशा माझ्या जीवनात अचानक कोणी तरी येऊन एकमुखी दत्ताची उपासना कर सांगणं. माझं त्या कडे लक्ष न देणं, वेगवेगळे चांगले योग गुरुवारीच घडवून संकेत देणं, ध्यानीमनी नसताना अचानक गिरनार यात्रा योग येणं, माझ्या मनात जरा अहंभाव आला की कधी परिक्षा घेऊन कधी कान पकडून पुन्हा योग्य मार्गावर आणणे आणि पीठापूर यात्रेचे सुरवातीपासूनचे हे सगळे अशक्य वाटणारे योग/अनुभूती ह्या सगळ्याचा कुठे ना कुठे काही तरी संबंध आहे जो समजणं आपल्या कुवतीच्या बाहेर आहे. जास्त लॉजिकल विचार न करता त्याने दर्शविलेल्या मार्गावर चालत रहाणे.

एखाद्या वाट चुकलेल्या वासराला गोपाल जसा चुचकारत, फटकारत योग्य दिशा दाखवतो, तशीच काहीशी प्रचिती मला येत आहे असं मला वाटतं.

ह्या मार्गावर पडलेलं पाऊलं ह्याचं मार्गावर पुढे पडत रहावं आणि अखेरची मंजिल गुरुचरणी स्थान असावं, अशी गुरुदेवांनाच मनोमन प्रार्थना!!

श्री दत्तार्पणमस्तु! ईदं न मम्!!

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||

— यशश्री पाटील

1 Comment on पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग १०

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..