|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
आमच्या गाड्या मंदिराजवळच्या एका मोकळ्या जागेत थांबल्या होत्या. मी पटकन उतरून आजूबाजूला पहिले. सगळीकडे शांतता. गर्दी नाही. छोटे रस्ते, साधेपणा. इथपासून स्थान महात्म्य जाणवायला सुरुवात झाली. 2 छोटे रस्ते ओलांडून आम्हाला मंदिरात पोहचायचे होते, ते पण खूप वाटायला लागले. मन धाव घेत होतं. आई बराच वेळ बसली होती. म्हणून तिला सावकाश उतरुन, 2 मिनिटे थांबून, हळू हळू नेण गरजेचं होतं. कारण रस्ता सरळ नव्हता. हळू हळू चालत आम्ही त्या गल्लीतून वळून पुढच्या गल्लीत आलो.समोर लांब गल्ली दिसत होती.आणि मला टेन्शन आले. आई इतक्या लांब कशी चालणार? पण तेवढ्यात कोणी तरी म्हणाले, अग हे काय डाव्या हाताला मंदिर…. डाव्या हाताला लगेच पुढे मुख्य प्रवेशद्वार होते जे पटकन लक्षात पण आले नाही. कदाचित माझ्या मंदिराच्या कल्पना वेगळ्या असतील किंवा हळू हळू अंधार पडत होता त्यामुळे असेल. इथे मंदिर आहे? त्या साधेपणाकडेच मन धावले.
आता मात्र अगदी घालमेल झाली, अगदी ‘भेटी लागे जीवा…’ अशी अवस्था झाली. आईच्या लक्षात आले. ती म्हणाली, तू जा पुढे, २-५ पावलच आहेत, मी येईन हळू हळू चालत. पडत्या फळाची आज्ञा घेत, मी वेगाने पुढे गेले पण दारातच २-३ पायऱ्या होत्या. त्या आई एकटी कशी उतरेल, म्हणून परत मागे फिरले. मग आम्ही दोघी सावकाश उतरलो. चपला स्टँडवर ठेवून, उजव्या बाजुला पाण्याचा नळ होता, तिथे हात-पाय, तोंड धुतले. आणि तिथे निसरड असल्यामुळे आईला ही सावकाश आणून बाहेरच एक कट्टा आहे, तिथे बसवलं.कारण ती तशीही खूप थकली होती चालून.
तिला सांगितलं, दोन मिनिटे इथे बस. मी पटकन एकदा दर्शन घेऊन येते, मग तुला घेऊन जाते परत. आई जिथे बसली होती, तिथे मोठा कट्टा आणि वर पत्र्याची शेड होती. समोरच्या बाजूला संस्थेचे ऑफिस होते. शेडच्या बाजुला पवित्र औदुंबर, तिथे श्रीपाद श्रीवल्लभ ह्यांची लोभस मूर्ती होती. शेजारी एक झाडाला खूप नारळ बांधलेले दिसत होते.
ऑफिस शेजारी होम कुंड आणि पुढे मुख्य मंदिराच्या पायऱ्या. औदुंबरच्या पलीकडे अजून एक झाड होतं. मोठी मोकळी आणि स्वच्छ जागा, जिथे ७-८ लोकं गुरू चरित्र पारायण करत बसली होती. मी ही संक्षिप्त गुरुचरित्र घेतलं होतं बरोबर. माझी इच्छा होती की इथे औदुंबरच्या पवित्र परिसरात वाचन करावे. पण हे सगळं नंतर. आधी गुरुदेवांचे दर्शन असं म्हणत, मी भराभर त्या ५-६ पायऱ्या चढले आणि समोरचे दृश्य बघताच बसले. डोळ्यातून गिरनारला आले होते, तसेच घळा घळा पाणी. हात जोडलेले. ‘ देवा, दिलंस तू दर्शन मला… धन्यवाद!’ किती मनोहारी दर्शन होत ते. मधोमध दत्तगुरुंची तेजस्वी मूर्ती, एका बाजूला नृसिंह सरस्वती आणि दुसऱ्या बाजूला श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी. ताज्या फुलांचे हार, पंचारती आणि आजू-बाजूच्या तेवणाऱ्या समया मूळच्या तेजस्वितते मध्ये अजूनच भर घालत होत्या. काय नव्हतं त्या डोळ्यांमध्ये करुणा, माया, प्रेम, वात्सल्य, प्रसन्नता, पावित्र्य…. भान हरपून दर्शन घेत होते.
भान हरपून दृश्य बघत असताना पडदा बंद झाला. तशी भानावर आले. खूप वाईट वाटलं की बंद झालं का देऊळ. आईला दर्शन नाही होणार का? पण आता पालखी सोहळा होईल आणि मग परत पडदा उघडेल आणि सगळ्यांना दर्शन घेता येईल असे कळले. आता सभा मंडपात सभोवार नजर फिरली. बरीच लोकं होती तिथे. खाली बसून सोहळ्याचा आनंद आणि लाभ घेण्यासाठी जमले होते.
मागे २ स्टूलं होते. एकावर एक जण बसले होते. दुसरं रिकामं होतं. त्यांना रिक्वेस्ट करून एक राखून ठेवायला सांगितलं. आणि आईला आणायला गेले. आई तोपर्यंत इतर लोकांच्या मदतीने येतच होती. मग तिला स्टूलावर बसवून ते खांबा जवळ ऍडजस्ट केलं म्हणजे आईला जरा टेकता येईल.
आज पालखी सोहळा बघायचा आणि उद्या अभिषेक, पादुका लेपन सोहळा बघायचा असं स्मिता काकूंनी सांगितले. सगळ्यांनी मंडपात बसून घेतले. आणि ‘श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये’ , ‘दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ ह्या जय घोषाने सर्व परिसर दुमदुमला. आमच्या ग्रुपमध्ये ही काही लोकांनी सोवळे नेसून पालखी वाहून नेण्याचे पुण्य पदरी पाडून घेतले होते. ग्रुपवर आधीच नावे आणि गोत्र घेतली होती.
पूर्वी श्रीपाद श्रीवल्लभ ह्यांची पालखी गावातून फिरत असे पण आता ती मंदिरातच मुख्य गाभार्याला प्रदक्षिणा घालते. आणि ती पालखी प्रदक्षिणा घालत असताना पालखी धरणाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काय सांगावा?
एकदा प्रवीण दवणे ह्यांना हा मान मिळाला होता. तेंव्हाच्या त्यांच्या भावना त्यांनी गाण्याच्या बोलातून व्यक्त केल्या आहेत.
‘ निघालो घेऊन दत्ताची पालखी, आम्ही भाग्यवान आनंद निधान…
…. साता जन्माची ही लाभली पुण्याई, म्हणून जाहलो पालखीचे भोई!!’
अगदी ह्याच भावना येत असतील सर्व भाग्यवंतांच्या मनात. आम्हाला बघूनच, ते सर्व अनुभवल्यासारखे वाटत होते. सर्व सभा मंडप प्रवीण दवणे ह्यांचे हे गीत, दिगंबरा दिगंबरा जप आणि सिध्द मंगल स्तोत्र म्हणत तल्लीन होत होते. सर्वत्र भारावलेले वातावरण होते.
खूप आनंद, समाधान देत पालखी सोहळा संपन्न झाला. मन समाधानाने भरले होते. यथावकाश सर्वांनी जवळून डोळे आणि मन भरून दर्शन घेतले. आणि बाहेर आलो. ऑफिस बंद होत होते. तिथे तुम्ही दुसऱ्या दिवशी च्या अभिषेकची आणि अन्न दानाची पावती फाडू शकता. पण त्यांना उशीर होत असल्यामुळे आणि आम्ही खूप लोकं असल्यामुळे त्यांनी आम्हाला सकाळी बोलावले.
वाचन करायचं होतं. ते कधी करू? असं मी काकूंना विचारलं. उद्या आपण २-३ तास येथे असणार आहोत तेंव्हा तू करू शकतेस वाचन असे त्यांनी सांगितले.
दुपारच्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण केले. दर्शनाने अंतरात्मा आणि जेवणाने उदरत्मा तृप्त झाला. डोळ्यांमध्ये आजचे दर्शन बंदिस्त करून निद्रेच्या आधीन झालो.
— यशश्री पाटील
Leave a Reply