|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
हे सगळे जे घडले होते, ते माझ्या कल्पना शक्तीच्या पलीकडे होते. माझा माझ्यावरच विश्वास नव्हता कि, मी अशा कुठल्या अस्तित्वात असलेल्या स्वामींना मनोभावे नमस्कार करेन. कुठले योग होते हे दत्तगुरुच जाणे!!
आता आईसुद्धा नमस्कार करून स्वामींना नमस्कार करुन आली आणि त्यांच्या त्या शिष्यांकडे गेली, ज्यांनी मला बोलावलं होतं. आईने त्यांना वाकून नमस्कार केला, तर त्यांनी(हे देखील स्वामीच होते) आईला पदर पुढे करायला सांगितला आणि तिच्या ओटीत पैसे घातले. पुढे म्हणाले, ‘पूजा में रखना! खर्च मत करना!’
आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत होते. तिच्या तब्येतीच्या द्रुष्टीने असाध्य अशा ह्या यात्रेचा असा क्रुपा प्रसाद तिला मिळाला. मी थोडे मागून हे बघत होते. नकळत माझेही डोळे वाहू लागले. आजोबांच्या दत्त भक्तीचा क्रुपा प्रसाद तिला मिळाला होता. आणि तिच्या पुण्याईची फळे मी चाखत होते. आता त्या स्वामींकडे जाणे मला प्रशस्त वाटले नाही. ऊगीच त्यांना वाटेल आता प्रसाद घ्यायाला आली. असं माझ्या मनात आलं. पण हे सगळे महात्मे त्याच्या पलिकडे कधीच गेलेले असतात. हे कळण्याइतकी आपली साधना नाही ना … असो. मी परत जाण्यासाठी वळतच होते की पुन्हा त्यांची हाक आली. ‘इधर आओ बेटी!’ त्यांच्या चेहर्यावर एक सूक्ष्म हसू होते, असे मला वाटले. कदाचित त्यांनी ओळखले असतील माझ्या मनातले विचार!
मी नमस्कार करत असतानाच त्यांनी खिशातून पैसे काढले आणि माझ्या ओढणीच्या ओटीत घातले. डोक्यावर हात ठेवून जे आईला सांगितलं तेच सांगितलं. मी मगाचपासून ज्या हेतूने त्यांना टाळतं होते,त्या माझ्या दुष्ट विचारांना त्यांनी मलाच पैसे देऊन तिलांजली दिली. किती क्षुद्र विचार करत होते मी, ह्या विचारांनी मी खजिल झाले. मनोमन दत्तगुरु आणि त्यांची माफी मागून परत फिरले.
हे सगळं होईपर्यंत जवळपास अडीच-तीन वाजत आले होते मंदिर दुपारी १२ ते ४ बंद असते. आता जरा पाच सात मिनिटे चालायचे होते. मग नदीचा घाट लागतो. खरं तरं खूप काही चालणे नव्हते. पण ऊन आणि त्यामुळे दमलेली आई. पुढची चाल आईसाठी फार त्रासदायक ठरत होती. त्यामुळे आम्ही बरेच मागे पडलो होतो. आमचा ग्रुप गुरुदेवांच्या भेटीच्या ओढीने बराच पुढे गेला होता. आणि आई आता प्रचंड थकली होती तिला एक पाऊलही पुढे टाकले शक्य नव्हते. एका क्षणी आई खचली.
घाटाच्या थोडे आधी तिने माघार घेतली. तिथे बाजूलाच एक दुकान होते, जिथे बाहेर बसायला बाक होते आणि सावली सुद्धा होती. मी तिला तिथेच बसवले. कारण आता एकही पाऊल जरी टाकले असते तरी कदाचित तिला त्रास झाला असता. तसंही तिला थोडा हार्ट ट्रबल सुद्धा आहे त्यामुळे मी रिस्क घेऊ नये असे त्या क्षणी मला वाटले. तिथे बसवून तिला थंड पाण्याची बाटली, कोल्ड्रिंक असं काही तरी घेऊन दिले. ती म्हणाली,’आता मी पुढे येऊ शकत नाही. तर मी येथे थांबते. तू पुढे जा.’
आधी माझे मन तिला एकटीला ठेवायला तयार होत नव्हते. “पण तुझं तरी दर्शन होऊ दे,आणि माझ्यातर्फे ही नमस्कार करून ये” असे म्हणल्यावर मी तिला एकटीला तिथे ठेवून पुढे जायला तयार झाले.
मी घाटाच्या पायर्याय उतरून बोटीजवळ आले. समोर क्रुष्णेचे विशाल पात्र त्या ऊन्हातही डोळ्याला गारवा देत होते. आजूबाजूला हिरवळ! मध्येच एका ठिकाणी मोठे तीन-चार दगड, ज्यांच्यावर पिवळट-हिरवट उंच गवत आणि त्या गवतावर बसणारे उंचच्या उंच बगळे किंवा करकोचे! सर्वच दृश्य खूप विलोभनीय होते. डाव्या आणि उजव्या बाजूला जिथे नजर जाईल तिथे कृष्णा नदीचे पात्र होते. पूर्वी नदीला एवढे पाणी नव्हते. तेव्हा नदीचे पात्र उतरून चालत कुरवपूरला पलीकडच्या तीरावर जाता येत होते. आणि पात्रातील एका पाषाणावर श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे पावलाचे ठसे ऊमटले आहेत हे ऐकलं होतं.त्या ठिकाणी ऊभे राहून ते रोज सूर्य नमस्कार घालत होते. पण आता नदीला पाणी असल्यामुळे ते बघता येणार नव्हते. पहिल्यांदाच नदीला पाणी असल्यामुळे मन खट्टू झाले. असो.
अगदी असंच सिद्धटेकला जाताना होत. खूप आधी भीमा नदीला पाणी नव्हते. तेव्हा आम्ही बैलगाडीत बसून, बैलगाडी नदीच्या पात्रातून पलीकडे सिद्धटेकला जात होती. या तीरावरून पलीकडचा कळस दिसला कीच, गहिवरून येत होते. तसंच या तीरावर उभे राहून मला समोर मुख्य मंदिराचा कळस दिसत होता. आता तर खूप ओढीने मी बोटीत बसले.
माझ्याबरोबर अजूनही आमच्या ग्रुपमधील काही लोकं होती. नदी क्रॉस करायला आम्हाला चार-पाच मिनिटे लागली असतील. एक मन मंदिराकडे धाव घेत होते आणि एक मन आई जवळच रेंगाळत होते. मनाची फार द्विधा अवस्था झाली होती. तिने हे सगळं बघावं असं फार वाटतं होतं. त्याच अवस्थेत आम्ही पलीकडच्या किनार्या वर उतरलो.
सुरुवातीला खडकाळ ओबडधोबड रस्ता आणि चढं होता. मग पुढे अशाच रस्त्यावरून चालत जाऊन बऱ्याच पुढे पायऱ्या होत्या. आई चढावरून कशी आली असती? असे एकदा मनात आले.
पायऱ्या चढून समोर मुख्य मंदिराच्या कमानी समोर आले. तेवढ्यात समोरून मला अमिता ताई सडेकर, राजेंद्र दादा सडेकर आणि गजानन काका काळे येताना दिसले. मी समोर आल्या-आल्या त्यांनी प्रश्न विचारला,’ हे काय? आई कुठे आहे?’ आणि उत्तराच्या जागी त्यांना माझ्या डोळ्यातले अश्रू मिळाले.
‘तिला येता आले नाही. ती खूप दमली आहे.’ असं रडत-रडत मी सांगितले. तेव्हा गजानन काका आणि राजेंद्र दादा एकदम म्हणाले.’ हे चालणार नाही! आपण तुझ्या आईला घेऊन यायचं! स्वामींची इच्छा आहे की, तिचे दर्शन व्हावे.’ पण मी एकटी कशी आणणार होते आणि आता तर इथे नावही नव्हती. कसं करूयात? तर अमिता ताईंनी माझ्याकडची बॅग घेतली आणि सांगितले हे दोघं आणि तू मिळून पलीकडे जाऊन परत त्यांना घेऊन या. मी तुझी बॅग सांभाळते.
त्या क्षणी ते तिघे जण माझ्यासाठी साक्षात गुरुदेव दत्त होते!!
मग राजेंद्र दादा, गजानन काका आणि मी परत त्या पायर्याू उतरून आणि तो चढ उतरून किनार्या.पाशी आलो. आम्ही ज्या नावेतून आलो, ती नंतर परत गेली होती पण किनार्या वर दुसर्या बाजूचे (वेगळं राज्य) नाव आणि नावाडी होता. त्याला आम्ही खूप विनवण्या केल्या, पण तो काही तयार झाला नाही. त्याने सांगितले, पलीकडूनच नाव जेव्हा येईल तेव्हा तुम्ही परत जाऊ शकता.’ मला असे वाटते त्यांचे काहीतरी नियम असावेत. त्यांना आम्ही डबल पैसे देतो, हवे तेवढे पैसे घ्या, सगळं सांगून झाले. तरीही त्याने ऐकले नाही. तिकडे आईला फोन करणे चालू होते. फोनची रिंग वाजत होती. पण ती उचलत नव्हती.
आईला ऐकायलाही जरा कमी येत होतं आणि बाहेरच्या वातावरणात कदाचित फोनची रिंग ऐकू येत नव्हती. आता तर जीव फारच घायकुतीला आला. असे वाटले ही नदी मधे दुभंगली तर किती बरं होईल, अशीच पळत जाऊन आईला घेऊन येऊ शकेन. पण ना मी वासुदेव होते, ना क्रुष्ण! पण इथे गुरुदेव पाठीशी होते.
आणि अचानक आईचा फोन आला. तिने माझे मिस्ड् कॉल बघितले असावे. पण फोनमध्ये खूप डिस्टर्ब होता. त्यामुळे आम्हाला एकमेकांचं नीट ऐकू येत नव्हतं. त्यातल्या त्यात मी आईला सांगितले, तिथल्या दुकानातल्या एका माणसाला नाव पाठवायला सांग, आम्ही येतो तुला घ्यायला!
पण ते आईला काय नीट ऐकू येत नव्हते. फोन मधून एकमेकांना ऐकू येत नसले, तरी मनाचे मनाला नक्कीच कळले असावे, कारण त्याच वेळात आईने तिथल्या माणसाला सांगितले होते, मला घाटापर्यंत सोड.
आमचे जेव्हा प्रयत्न चालू होते. त्याच वेळेला तिकडे दुकानातल्या एका माणसाने, त्याचं नाव हनुमान आहे असे नंतर कळले, आईला अक्षरश: हाताला धरून अलगदपणे नावे पर्यंत आणले होते. त्याच्याही त्याच भावना होत्या की इतक्या लांब आल्या आहात आणि दर्शन नाही असं नाही होऊ शकत नाही. त्यामुळे त्या माणसाने इतक्या अलगदपणे आईला नावे पर्यंत आणले होते. इथे या तीरावर आम्ही अगदी हवालदिल झालो होतो. आई पर्यंत निरोप गेला आहे का नाही? तिथे इतकी शांतता होती की नाव सुरू झाली की नाही हेही कळू शकते. पण त्या तीरावर काही हालचाल दिसत नव्हती. आता काय करावे? या विचारात आम्ही तिथेच हताशपणे उभे होतो. तेवढ्यात ज्या नावाड्याने आम्हाला नाही म्हटले होते, त्याने सांगितले तुमची नाव येत आहे.
आम्हाला तर समोर काही हालचाल दिसत नव्हती आणि ह्याला कसं कळलं नाव येत आहे. त्याच्या तोंडून जसं काही गुरुदेव बोलले. त्याला इंजिन स्टार्ट केल्याचा बारीक आवाज ऐकू आला किंवा त्याला पाण्यातल्या लहरी जाणवल्या असाव्यात आणि लगेचच काही सेकंदानंतर आम्हालाही लांबवर इंजिन सुरु झाल्याचा आवाज आला. आम्हाला हायसे वाटले. चला आता नाव इकडे आली की, आपण तीच नाव घेऊन आईला आणायला जावे.
नावेचा फडकणारा भगवा ध्वज आता हळूहळू दिसायला लागला. हळू हळू आमचे पाऊल नदीच्या दिशेने पुढे सरकू लागले आणि नावेत आईला बघून अत्यानंदाने डोळे भरून वाहू लागले. आई नावेत कशी काय? आणि एकटी कशी आली? असे अनेक प्रश्न मनात आले. पण आईच्याबरोबर भक्तीभावाने आलेल्या हनुमानाची आईने ओळख करून दिली आणि सांगितले यांनी मला इथपर्यंत अगदी अलगदपणे आणले. मला अजिबात त्रास झाला नाही. मग आम्ही नावाड्याला आणि हनुमानाला फुल ना फुलाची पाकळी म्हणून थोडे पैसे दिले.
आता पुढचं मोठ्ठं हर्डल होतं, तो ओबडधोबड मातीचा चढ! पण एका बाजूने गजानन काका आणि एका बाजूने राजेंद्र दादा यांनी आईला अगदी फुलासारखे उचलून सरळ रस्त्यावर आणून ठेवले. त्या दोघांच्या अक्षरश: पाया पडावेसे वाटले. पण गजानन काकांनी थांबवले. ते म्हणाले, ‘ही सेवा स्वामींनी आमच्याकडून करून घेतली आहे. तर पाया पडून ती वाया जाऊ देऊ नका!’ किती हे समर्पण! ह्या लेव्हलला आपण कधी पोहचणार? मी नुसतेच हात जोडले आणि आईनेही त्यांना मनोभावे हात जोडून धन्यवाद दिले.
आता हळूहळू एकेक पायरी चढत आईसुद्धा मंदिरापर्यंत आली. हे सगळे होईपर्यंत बराच उशीर झाला होता आणि आम्हाला परत सुद्धा लवकर निघायचे होते. त्यामुळे अमिता ताई म्हणाल्या, ‘मी आईला घेऊन मंदिरात जाते. तू तोपर्यंत टेंबे स्वामींची गुहा आणि हजारो वर्ष जुना वटवृक्ष बघून ये.’ माझ्याबरोबर राजेंद्र दादा आणि गजानन काकाही होतेच, कारण त्यांचेही बघणे बाकी होते.
मला असं वाटलं की आता आपलं खरं खरं दर्शन होणार. कारण आईचं दर्शन झालं नसतं, तर ती खंत कायम माझ्या मनात राहिली असती.
मग आई हळू हळू थांबत चालत आत मध्ये देवळात गेली आणि तिथे सभामंडपात बसली. तिकडे मंदिराच्या उजव्या बाजूने डोंगराळ, जंगलातून जाणारी पायवाट असावी अशी वाट तुडवत आम्ही वटवृक्षपाशी आलो. हा वटवृक्ष एक हजार वर्ष जुना आहे. तिथे स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ यांनी बसून ध्यानधारणा केली आहे. तो विशाल वटवृक्ष बघून खूप समाधान वाटले. वटवृक्षाच्या छायेत बसून थोडे नामस्मरण केले आणि मग वृक्षाला प्रदक्षिणा घालून आम्ही पुढे टेंबे स्वामींच्या गुहेकडे निघालो.
थोडे पुढे गेल्यावर एक गुहा आहे. जेथे टेंबेस्वामींनी चार चातुर्मास केले आणि याच गुहेत बसून त्यांनी, ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हा अठरा अक्षरी मंत्र रचला. गुहेचे तोंड खूप अरुंद आहे. तुम्हाला वाकून आणि पुढे तर गुडघ्यावर रांगतच जावे लागते. अरुंद बोळातून गुडघ्यावर रांगत पुढे गेलात की पुढे एक माणूस बसू शकेल अशी जागा आहे. तिथे समोर शिवलिंग आणि टेंबेस्वामींचा फोटो आहे. एका कोपर्यांत एक ज्योत सतत तेवती ठेवली आहे. एका वेळी एकच माणूस जाऊन दर्शन घेऊन येऊ शकतो. आम्ही तिघे आळीपाळीने आत जाऊन दर्शन घेऊन आलो. आत गेल्यावर मांडी घालून बसल्यावर इतके शांत वाटले की असे वाटले इथेच बसून वाचन करावे. तिथेच ‘ओम नमः शिवाय’चा पाच वेळा जप करून मी बाहेर आले आणि मंदिराकडे निघालो.
मन तर कधीच पोहचले होते मंदिरात!. आता पावलांचा वेगहि वाढला.
ज्या क्षणाची मी इतके दिवस वाट बघत होते, तो आता जवळ आला आणि मी खूप उत्सुक होते श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पादुकांचे दर्शन घ्यायला!
— यशश्री पाटील
Leave a Reply