लायडर तंत्रज्ञानामुळे, दाट झाडीत लपलेल्या जमिनीच्या पृष्ठभागाचाही त्रिमितीय नकाशा तयार करता येतो. या पद्धतीत, ज्या प्रदेशाच्या पृष्ठभागाचा नकाशा तयार करायचा असेल, त्या प्रदेशावर विमान, हेलिकॉप्टर वा ड्रोनसारख्या हवाई वाहनावर बसवलेल्या स्रोताद्वारे लेझर किरण सोडले जातात. या किरणांपैकी काही किरण हे तिथल्या झाडांच्या वरच्या भागातील पानांवरून परावर्तित होतात. काही लेझर किरण पानांमधल्या मोकळ्या जागांतून पानांच्या खालच्या वेगवेगळ्या थरांपर्यंत पोचून परावर्तित होतात. अखेर काही लेझर किरण पानांतल्या सर्व मोकळ्या जागा पार करून तिथल्या जमिनीपर्यंत पोचून परावर्तित होतात. झाडांच्या वेगवेगळ्या भागावरून व जमिनीवरून परावर्तित झालेले हे सर्व किरण त्या हवाई वाहनावरील संवेदकाद्वारे टिपले जातात. लेझर किरण सोडल्याच्या व ते टिपल्याच्या वेळेवरून त्यांच्या या प्रवासाला लागणारा कालावधी समजू शकतो. झाडावरच्या पानांच्या वेगवेगळ्या थरांच्या किंवा जमिनीच्या, हवाई वाहनापासूनच्या अंतरातील फरकामुळे या कालावधीतही फरक असतो. कालावधींतील या फरकावरून, त्या प्रदेशाची प्रत्यक्ष रचना लक्षात येते व त्या प्रदेशाचा त्रिमितीय नकाशा तयार करणं शक्य होतं. या पद्धतीत, लेझर किरण सोडण्याच्या वेळचं आणि लेझर किरण टिपण्याच्या वेळचं, त्या हवाई वाहनाचं अचूक स्थान माहीत असणं गरजेचं असतं. यासाठी कृत्रिम उपग्रहावरील जागतिक स्थानदर्शक यंत्रणेची मदत घेतली जाते.
पोलंडमधील सिलेसिया विज्ञापीठातील जान वागा आणि मारिया फाजेर यांनी, लायडर तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेल्या नकाशांची, भौगोलिक नकाशांशी सांगड घालून कोझलच्या खोऱ्यातल्या या ऐतिहासिक खड्ड्यांचा सविस्तर अभ्यास केला आहे. कोझल खोऱ्यातल्या ब्लेशहामेर, हेडेब्रेक आणि ऑडेरटाल या ठिकाणी सुमारे चाळीस हजार बाँबचा मारा केल्याचं युद्धकालीन कागदपत्रांवरून दिसून येतं. जान वागा आणि मारिया फाजेर यांना आपल्या अभ्यासात, कोझलच्या खोऱ्यातील सुमारे दीडशे चौरस किलोमीटर जमिनीवर, बाँबच्या माऱ्यामुळे निर्माण झालेले सुमारे सहा हजार खड्डे सापडले आहेत. हे खड्डे पुंजांच्या स्वरूपात विविध ठिकाणी एकवटले आहेत. या जागांपैकी काही ठिकाणी तर, एकेका हेक्टर जागेत (म्हणजे शंभर मीटर लांबी-रुंदीच्या चौरसात) त्यांना जवळपास तीस खड्डे आढळले आहेत. या सहा हजार खड्ड्यांपैकी सुमारे ५,२०० खड्ड्यांचा व्यास हा दहा ते पंधरा मीटर इतका मोठा आहे. या मोठ्या खड्ड्यांची खोली दोन मीटरपेक्षा अधिक भरते. खड्ड्यांच्या आकारावरून व त्यांच्या स्वरूपावरून या संशोधकांनी, एखादा खड्डा कोणत्या क्षमतेच्या बाँबमुळे निर्माण झाला असावा याचंही गणित मांडलं आहे.
कोझल इथल्या या खड्ड्यांपैकी अनेक खड्डे पाण्यानं भरले आहेत. त्यामुळे या खड्ड्यांच्या परिसराला आता पाणथळी स्वरूप प्राप्त झालं आहे. हे पाणथळ परिसर म्हणजे बेडकासारखे विविध प्रकारचे उभयचर, सरीसृप, कीटक, पक्षी-प्राणी, इत्यादींचं वसतिस्थान होऊन, कोझलच्या खोऱ्यात ठिकठिकाणी नवीच वैशिष्ट्यपूर्ण परिसंस्था विकसित झाली आहे. या परिसंस्थेमुळे या परिसराला, ऐतिहासिक महत्त्वाबरोबरच नैसर्गिक महत्त्वही प्राप्त झालं आहे. म्हणूनच लायडारद्वारे या खड्ड्यांचा अभ्यास करणाऱ्या मारिया फाजेर सुचवतात की, ‘या प्रदेशाला संरक्षित प्रदेश म्हणून जाहीर केलं गेलं पाहिजे!’.
चित्रवाणीः https://www.youtube.com/embed/EYbhNSUnIdU?rel=0
— डॉ. राजीव चिटणीस.
छायाचित्र सौजन्य:
Leave a Reply