“आज कमी कपडे धुवायला टाका. आजच नाही, हा आठवडाभर कमीच कपडे धुवायला द्या.” तिने नवऱ्याला आणि मुलांना बजाविले.
“काय ग, काय झाले? ” सर्वांनी एक सुरात विचारले. तिने त्यांना सांगितले की कामवाल्याबाईने रजा घेतली आहे. तिच्या नातवाच्या पहिल्या वाढदिवसासाठी तिला गावी जायचे आहे.
बाईच्या जाण्याने तिला अडचण होणार होती परंतु तिच्या आनंदासाठी तिने तिची रजा मंजूर केली. ती निघायला लागल्यावर तिने बाईला पाचशे रुपयाची नोट काढून दिली. तिनेही हसून ती घेतली. “चार दिवसांनी येते बाई.’ एवढे बोलून ती गेली.
इकडे घरात काहूर माजले. नवऱ्याने डोळे मोठे करत तिला विचारले, “एवढे पैसे देण्याची गरज काय होती? आपला एक पिझ्झा त्या बाईवर तू खर्च केलास.” त्याच्या आवाजातली नाराजी तिला स्पष्ट जाणवत होती. तरीही त्याच्याकडे दुर्लक्ष करुन ती म्हणाली, “जाऊ दे, तिलाही आनंद मिळू दे.” घरात तिचे वागणे कोणालाच पटले नव्हते. सगळी मंडळी तिच्यावर रुसली.
चार दिवसांनी तिची बाई परत आली. तिच्या नवऱ्याने बाईला खोचकपणे विचारले, “काय बाई, कसा झाला नातवाचा वाढदिवस? आम्ही दिलेल्या पैशांचे तुम्ही काय केलेत? ”
बाई हसली आणि तिने पाचशे रुपयांचा हिशोबच सादर केला. एकूण आठ गोष्टींवर तिने खर्च केला होता. नातवाला भेटवस्तू आणि पोषाख, जावयासाठी आणि मुलीसाठी भेटवस्तू, देवळात चढवलेला प्रसाद, कोणाच्यातरी औषधासाठी केलेला खर्च, गाडीभाडे आणि मुलीच्या सासरी दिलेली मिठाई असा तो खर्च होता.
“तुमच्या पैश्यांमुळे मी माझी मान ऊंच ठेवू शकले. गावातही माझी इज्जत राखली गेली.” बाई गहिवरुन म्हणाली. तिच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर कृतज्ञता दिसत होती.
बाईचे बोलणे ऐकून तिचा नवरा खजिल झाला. बाई आपले काम उरकून गेल्यावर ती त्याला म्हणाली, “आपण पिझ्झा घेणार होतो. त्यामध्ये आठ तुकडे असतात. त्या प्रत्येक तुकड्याचे सार्थक झाले आहे. त्या बाईला आणि तिच्या कुटुंबाला आनंद मिळाला आणि आपल्याला दुआ. आता सांगा आपल्याला पिझ्झा हवा होता की हा पुण्याचा संचय? ”
त्या एका हृद्य प्रसंगाने तिच्या मुलांवरही खोल परिणाम झाला. आता कधीही चैन करण्यापूर्वी ते कोणी गरजू आहेत का याचा आधी शोध घेतात. तिलाही भरुन पावल्यासारखे वाटते.
कैकदा आपल्या ऐषआरामापेक्षा दुसऱ्याला, विशेषतः गरजूला केलेली मदत आपल्याला अतोनात समाधान देऊन जाते. शेवटी जीवन म्हणजे फक्त आपलाच आनंद नाही तर त्यात इतरांचा आनंद आणि समाधानही समाविष्ट आहे. सहज गंमत म्हणून आपणही या पिझ्झा सारखे किती आनंदाचे क्षण मिळविले याचा विचार करु या.
— नीला सत्यनारायण
अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.
Leave a Reply