मुंबईतील रेल्वे मार्गावर अनेक छोटे मोठे पूल आहेत.
दहा फूट ते पंधरा फूट लांबीचे रूळ पुलावरून जातात.
लोकल भराभर एकामागे एक अशा येत असल्यामुळे कधी कधी दोन गाड्या बाजूबाजूच्या रूळावरून जात येत असतात.
भारतात वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळे गट घातपात करायचा प्रयत्न करतात.
कोणी धर्मावरून, कोणी सामाजिक क्रांती घडविण्यासाठी तर कोणी फक्त गोंधळ वाढवून सत्तारूढ सरकारला आव्हान म्हणूनही घातपात करण्याकडे वळतात.
सामान्य जनता म्हणते की ह्यांत बळी जातात सामान्यांचेच तर हे असं कां करतात ?
एकदा कां एक मार्ग स्वीकारला की अनेकांच्या अंगात तो अभिनिवेश भिनतो.
मग अशा अपघातांत किती तरी सामान्य लोकांचे असामान्य, कधीही न भरून काढतां येणारे नुकसान होते. आता आपल्याच लोकांनी निवडलेलं राज्य आहे, ह्यावर फारसे कोणी विचार करत नाही.
नुकसान जनतेचचं होतं, हे ही विचारात घेतलं जात नाही.
धार्मिक वाद, आर्थिक तत्वज्ञान, ह्यांचा आधार घेतला जातो.
मग एक कट कारस्थान रचले जाते.
तसाच एक कट अंधेरी आणि विलेपार्लेमधील जाणारा व येणारा छोटा पूल अचानक उडवून दोन गाड्यांना तरी मोठा अपघात घडवण्याचा बेत आंखला गेला होता.
त्यानंतर मुंबईची वाहतूकही महिन्याभरासाठी बिघडली असती.
असा मार्ग निवडणं योग्य की अयोग्य, वगैरे तात्विक चर्चा आपल्याला करायची नाही.
निदान ह्या रहस्यकथेपुरती तरी नाही.
आपण फक्त तो एक गुन्हा आहे, ह्या दृष्टीने पाहूया.
यशवंत आणि चंदू खाजगी गुप्तहेर म्हणून काम करत.
त्यांच्या कामाच्या निमित्ताने ओळखीही खूप होतात.
गुन्हेगारी जगतात खबरी म्हणून काम करणारे कांही लोक नेहमी असतातच.
साधारणपणे पोलिसांना ते खबर देतात.
असे कांही खबरी यशवंताच्याही माहितीतले होते.
त्यापैकी सोमनाथने यशवंतांशी फोनवर संपर्क साधला आणि त्यांना वरील “येत्या आठवड्यात पूल उडविण्याचा बेत” आंखला गेला असल्याची खबर दिली.
यशवंत म्हणाले, “तू ही खबर पोलिसांना कां नाही दिलीस ?”
सोमनाथ म्हणाला, “पोलिसांना जर कळवली तर पूल वाचेल की नाही, कोणास ठाऊक पण मला ताबडतोब उचलतील आणि आत टाकतील.
ह्यापेक्षा अधिक माहिती तुम्हाला मी नाही देऊ शकत.”
यशवंतानी लगेच चंदूला बोलावले आणि मिळालेल्या खबरीबद्दल सांगितले.
ते म्हणाले, “चंदू, डायनामाईट, आरडीएक्स किंवा असंच कांही द्रव्य वापरल्याशिवाय पूल उडवणं शक्य नाही.
पुलाच्यावरचे दोन रूळ उडवण्याएवढा स्फोट घडविण्याची तयारी कांही चार दिवसांत होत नाही.
ही तयारी बरीच आधीपासून चालू असेल.
तेव्हां आपल्याला हे शोधून काढावचं लागेल.
वर्सोवा, मालाड, भाईंदर येथील बंदरांवर गेल्या दोन महिन्यांत अशी कांही हालचाल झाली की काय ही माहिती तू काढायची आहेस.
मी पोलिसांना कळवतो.”
चंदूने मान डोलावली व तो कामगिरीवर निघाला.
यशवंतानी मुंबई पोलिस कमिशनरना फोन केला व मिळालेली माहिती सांगितली.
कमिशनर म्हणाले, “धुरंधर साहेब, आम्ही तर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून आहोत.
शहरांत जर अशी स्फोटके आली असतील तर ती कुठे असतील, ह्याचा अंदाज घेऊन छापे मारावे लागतील.
आम्ही आमच्या पध्दतीने शोध सुरू करू.
तुम्हाला बातमी कशी कुठून मिळाली ते तुम्ही सांगणार नाही पण आम्ही तेही शोधून काढू.
एकच सांगतो की असे धमकीचे कॅाल आम्हाला नेहमीच येत असतात.
कधी कम्युनिकेशन टॅावर उडवणार कधी सचिवालयांत बॅाम्ब ठेवलाय तर कधी आणखी कुठे.
आम्ही त्या धमक्या खोट्या मानून संपवत नाही.
तर आम्ही शक्यता पडताळून पहातो.”
यशवंत म्हणाले, “गुन्हेगारांच्या जगांत अशा बातम्या खूप असतात.
मला ज्याने सांगितलय त्याने एवढच ऐकलं असणार, ह्यांत शंका नाही.
तसेंच अगदी आठ दिवसांत नाही पण लवकरच असा प्रयत्न होईल, असे मलाही वाटत्येय.
दुसरी गोष्ट अशी की ही माहिती रेल्वेलाही कळवायला हवी आहे.
त्यांच्या पश्चिम विभागाच्या जनरल मॅनेजरला कुठून बातमी मिळाली, तें मात्र सांगू नका.
मला खात्री आहे की तुम्ही हे गुप्त राखाल.”
यशवंताना खात्री होती की पोलिस कमिशनर दक्षतेने हालचाली सुरू करतील.
चंदू वेसावे, मार्वे, येथील कोळीवाड्यांमधून खूप फिरला.
कांही ओळखीच्या लोकांकडे चौकशी केली.
त्याने अर्थातच स्फोटक द्रव्याबद्दल कांही विचारले नाही.
त्यांच्या गांवातल्या खोल समुद्रापर्यंत जाणाऱ्या नावांची माहिती करून घेतली.
बहुतेक आधुनिक पध्दतीच्या मशीनवर चालणाऱ्या मध्यम आकाराच्या बोटी होत्या.
कांही ओळखीचे लोक होते, त्यांच्याकडे ड्रग्ज किंवा तत्सम कांही मोठ्या प्रमाणांत कोणी आणलं कां ? ह्याची चौकशी केली.
तसं कांही आणलं गेल्याची कुणीच माहिती दिली नाही.
दुसऱ्या दिवशी तो घोडबंदरला गेला.
तिथेही त्याने अशीच चौकशी केली.
तिथेही कांही विशेष माहिती, वेगळी हालचाल झाल्याची खबर त्याला मिळाली नाही.
तेव्हा छान वारा वहात होता.
तरी खाडीतून पलिकडे जात येत होत्या.
चंदूला वाटले तरीने एक फेरी मारावी.
पलिकडे उतरावे.
जरा निसर्गाची मजा पहावी.
तो चिखलांतून जाऊन तरीत बसला.
तरीत पंचवीस तीस माणसे होती.
आता रस्ते होऊनही अजून तरीला बऱ्यापैकी उतारू होते तर.
पलिकडे गेल्यावर सर्व उतरले.
चंदू थांबला.
त्याने तरीवरच्या म्हाताऱ्या नाखव्याशी उगीच बोलणे काढले.
नाखवा खूष झाला, खूप गोष्टी सांगू लागला.
त्यातच तो म्हणाला, “एका मध्यम बोटीने एकदा कांही माल ह्या जेटीवर उतरवला.
काय होतं कुणास ठाऊक पण नक्कीच बेकायदेशीर आयात होती.
चंदूने त्याला सहज विचारल्यासारखे म्हटले, “केव्हाची ही गोष्ट ?”
नाखवा म्हणाला, “झाला एक महिना ह्या आमवास्येला.”
चंदूने विचारलं, “त्यांना मदत कोणी केली इथे माल उतरवायला ?”
म्हातारा नाखवा म्हणाला, “ते मला कसं कळणार पण ते बोलतांना मध्ये मध्ये म्हणायचे, ‘रावजी, लौकर रे बाबा ! नायतर मालक पैसे तर देणार नाहीच वर चाबकाचे फटके खायला लागतील.’
तर कधी कोणाला लाला बोलत.
पण मला कमी ऐकायला येत बरं कां !”
चंदू परत निघाला पण वाटेतच त्याला गुंडानी अडवले.
चार जणापुढे चंदूच काही चाललं नाही.
यशवंतांनी पोलीस कमिशनरना चंदूला संरक्षण द्यायची विनंती केली होती.
त्यामुळे चंदूला गुंडानी कुठे नेण्यापूर्वीच पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी त्याला सोडवले.
गुंड पोलिसाना पाहून पळून गेले.
ही माहिती चंदूने यशवंताना सांगितली.
त्यांना अंदाज आला की स्फोट घडवायला लागणारं सामान आणलं गेलं होतं.
ह्या मागे मोठा कट होता.
आता रावजी कोण आणि लाला कोण हे शोधावं लागणार होतं.
ते क्राईम ब्रॅंचच्या मुख्य ॲाफीसात आले.
कमिशनरकडून परवानगी लगेच मिळाली.
ते रेकॅार्ड रूममध्ये ठाणं मांडून बसले.
खूप शोधूनही दोन्ही नांवे त्यांना सापडेनात.
रावजी नांवाचा एकही गुन्हेगार, अगदी पाकीटमार, मध्येही कोणी नव्हता.
लालाही मिळत नव्हता.
आता अधिक शोधून फायदा नाही, असे त्यांना वाटू लागले.
एवढ्यांत चंदूला नाखव्याने सांगितलेली एक गोष्ट त्यांना आठवली.
नाखवा म्हणाला होता की त्याला कमी ऐकू येते.
मग रावजी ऐवजी मावजी असू शकतं किंवा रामजी असू शकतं.
लाला हा बाला असू शकतो.
मग त्यांनी तशी वेगवेगळी नांवे शोधून काढली.
ते सर्व मामुली चोऱ्या करणारे होते.
ते कटांत नक्कीच नसणार पण त्यांनी माल उतरवून घेतला हे नक्की.
कमिशनरांकरवी त्यांना बोलावण्यांत आले.
त्यांनी आढेवेढे घेत कबूल केलं की माल त्यांनीच उतरवून घेतला.
आत काय होतं त्यांना माहिती नाही.
तो कोणी मागवला तेंही त्यांना माहिती नव्हतं.
माल कुठपर्यंत त्यांनी नेला, तेवढंच फक्त ते सांगू शकतील.
यशवंतानी दोघांनाही वेगवेगळं करून दोघांकडूनही ती जागा जाणून घ्यायची सूचना केली.
दोघांनीही एका सोसायटीच्या एका इमारतीपर्यंत त्यांना नेऊन सोडले.
दोघेही इमारतीत गेले नव्हते.
एका साध्या वेशातील पोलिसाने सोसायटीच्या त्या इमारतीत कोण कोण रहातात त्याची नीट चौकशी केली.
त्या इमारतीतील एकूण पाच फ्लॅटस् लीजवर दिलेले होते.
त्यापैकी दोघे बरीच वर्षे रहात होते.
एका फ्लॅटचा लीजचा करार सहा महिन्यापूर्वीचा होता तर दोन बाजूबाजूचे फ्लॅट चार महिन्यापूर्वी एकाच नांवाने लीज केले होते.
पोलिसांनी लागलीच त्या दोन फ्लॅटसवर नजर ठेवली.
तिथे रहाणारे दोघे आणिक दोघांना घेऊन आलेले असतांना पोलिसांनी तिथे धाड मारली.
त्यांनी प्रतिकार करायचा प्रयत्न केला.
एकाने पिस्तुल चालवले तर एकजण सुरा घेऊन धांवला.
एका पोलिसाच्या दंडाला गोळी चाटून गेली.
मुंबईच्या भर वस्तीमध्ये गोळीबार ऐकून लोक चकीत झाले.
पोलिसांनी शिताफीने त्यांना सर्वांना शस्त्रे टाकायला लावून पकडले.
त्या दोन फ्लॅटसमध्ये २ एके रायफल्स, चार पिस्तुले, स्फोटक रसायनांचा कांही किलोंचा साठा, दहा मोबाईल, इ. वस्तू जप्त करण्यांत आल्या. घबराट पसरू नये म्हणून
पोलिसांनी लोकांना खरी कल्पना न देतां फक्त अवैध धंदे करणारे म्हणून त्यांना पकडल्याचे सांगितले.
चौघांनाही विना जामीन कस्टडी मिळाली व कोर्टात खटला दाखल झाला.
कोर्टात चौघांवर विना परवाना शस्त्रे, स्फोटके जागेंत ठेवणे आणि बॅाम्बस्फोट घडवून आणण्याचा बेत आखून तशी तयारी करणे, असे दोन वेगवेगळे गुन्हे त्यांच्यावर भरण्यांत आले.
पहिला गुन्हा सिध्द करायला पुरेसा पुरावा पोलिसांकडे होता व तो त्यांनी सादर केला.
दुसरा गुन्हा पोलिसांना सिध्द करतां येत नव्हता.
ऐकीव माहितीवर तो आधारित आहे, असा पवित्रा बचाव पक्षाने घेतला होता.
पोलिसांची सायबर सेल मोबाईल वरचे सर्व संभाषण पुन्हा पुन्हा तपासत होते परंतु त्यांत कांही लोकल रेल्वेवरील पुल उडविण्याचा बेत केलेला सांपडत नव्हता.
गुन्हेगारी जगतांतील बातमी एका खबरीने धुरंधरांच्या मार्फत दिली, हे कोर्टाला पुरेसे नव्हते.
यशवंत कमिशनर साहेबांना भेटायला गेले असतांना ह्याबद्दल चर्चा झाली.
सायबर ब्रॅंचने प्रत्येक मेसेज डीकोड करायचे कसे प्रयत्न केले ते धुरंधरांनी जाणून घेतले.
सायबर सेलमध्ये डीकोडींग करणाऱ्या टीमला ते भेटले.
टीममध्ये अत्यंत हुशार, इमफर्मेशन टेक्नॅालॅाजीचे उच्च शिक्षण घेतलेले तरूण होते.
यशवंतानी त्यांनी केलेले प्रयत्न समजून घेतले.
मग ते म्हणाले, “ह्यांच्याकडे दहा मोबाईल होते.
एकाच दिवशी अनेक मेसेज जात होते, येत होते ! बरोबर !
ह्यांतील प्रत्येक मेसेज तुम्ही डीकोड करायला पहात आहांत.
आता असं करा की एका दिवशी वेगवेगळ्या मोबाईलवरून गेलेले मेसेजेस एकत्र करा.
एक शब्द ह्यावरचा, एक त्यावरचा, अशी वेगवेगळी जुळणी करून डीकोडींगचा प्रयत्न करा.
धुरंधरांनी दिलेल्या सुचनेवर काम करताच सायबर ब्रॅंचला पार्ले-अंधेरीमधला ब्रिज कसा, केव्हा, कुणी उडवायचा ह्याची सर्व माहिती मिळाली.
पुरावा एकत्र करून तो तशा स्वरूपांत पुन्हां सादर केला गेला.
आश्चर्यचकीत झालेल्या आरोपींनीही तो मान्य केला.
त्यांना जास्तीत जास्त शिक्षा, म्हणजे फांशी व्हावी अशी मागणी सरकारी वकीलांनी केली.
कोर्टाने मात्र प्रत्यक्ष कोणाचा मृत्यू झाला नसल्याने त्यांना आजन्म कारावासाची शिक्षाच दिली.
मात्र ते पळण्याची शक्यता लक्षांत घेऊन त्यांना खास कोठड्यांमध्ये बंदोबस्तात वेगवेगळं ठेवण्यांत यावं असा हुकुम दिला.दोन गाड्या पुलावरून जात असताना पूल उडवल्याने किती हानी झाली असती ते मुंबईकर जाणतात.
धुरंधरांच्या चतुराईने व चिकाटीने शोध घेण्याच्या वृत्तीमुळे मुंबईवरच एक मोठं संकट टळलं.
धुरंधरनी खाजगींत ते श्रेय सोमनाथसारख्या एका छोट्या गुन्हेगाराला दिलं.
जीवाला धोका, गुन्हेगारी मन, लालच, ह्या सर्वांवर त्या गुन्हेगाराच्या देशप्रेमाने मात केली आणि सोमनाथने योग्य व्यक्तीशी संपर्क साधला.
त्यामुळे अनेकांचे जीव बचावले.
कमिशनरनी धुरंधरांचा खाजगीत सत्कार केला व त्यांच्या व चंदूच्या धैर्याची प्रशंसा केली.
– अरविंद खानोलकर.
वि. सू.
ही संपूर्ण कथा काल्पनिक आहे. ह्यांतील व्यक्ती, प्रसंग, घटना सर्वस्वी काल्पनिक आहेत. साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.
Leave a Reply