माझ्या मामाची मुलगी आमची किमया ताई स्वतः एक गायनेकोलॉजिस्ट असून आजपर्यंत भिवंडीतील स्वतःच्या हॉस्पिटल मध्ये अवघडातील अवघड डिलिव्हरी यशस्वीपणे पार पाडून हजारो बाळांना तिने जन्माला आणले असेल. पण वाशीतील एका प्रख्यात गायनेकोलॉजिस्ट कडे प्रियाच्या पहिल्या डिलिव्हरीला झालेल्या कॉम्प्लिकेशन मुळे तिने यावेळेस तिच्या हॉस्पिटलला येणाऱ्या तिच्यापेक्षा सिनियर असलेल्या गायनेकोलॉजिस्ट डॉ. रेखा थोटे यांच्याकडे आमची केस सोपवली होती. काल संध्याकाळी नवव्या महिन्यातील रुटीन चेक अपसाठी थोटे मॅडम यांच्या क्लिनिकला प्रियाला घेऊन गेलो असता त्यांनी तपासणी करून लगेचच क्यूरे हॉस्पिटल मध्ये जाऊन ऍडमिट व्हायला सांगितले. एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेटला अजूनदहा दिवस असल्याने आम्ही डिलिव्हरी साठी कोणतीही तयारी न करता आलोय असे सांगितल्यावर मॅडम नी तुम्हाला काय तयारी करायची आहे असा प्रश्न विचारून आम्हाला निरुत्तर केले आणि लेटर पॅडवर हॉस्पिटल साठी आवश्यक त्या सूचना लिहून, हॉस्पिटलला कोणत्या मार्गाने जायचे ते सांगून उद्या सकाळी नऊ नंतर डिलिव्हरी करू असे सांगितले. घरी आईला, किमया ताईला आणि प्रियाच्या या अनपेक्षित बातमीची फोनवरून माहिती दिली. क्यूरे हॉस्पिटल कुठे आहे, कसे आहे याची काहीच माहिती नव्हती किंवा त्याबद्दल ऐकलेसुद्धा नव्हते, डॉ.रेखा थोटे यांनी पाठवल्यामुळे हॉस्पिटल मध्ये जाऊन ऍडमिट करून घेतले. सकाळी आई बाबा दोघेही लवकरच आले, तिला ऑपेरेशन थिएटर मध्ये नेले आणि काही क्षणातच अचानक आमची किमया ताई हॉस्पिटल मध्ये आली, तिने मी डिलिव्हरीसाठी येईन अशी कल्पना दिली नसल्याने, तिला बघितल्याबरोबर आमचे डिलिव्हरीचे टेन्शन कुठल्या कुठे पळाले. आल्याबरोबर नेहमीप्रमाणे हसून थट्टा मस्करी करून तिसुद्धा ऑपेरेशन थिएटर मध्ये गेली. डॉ. रेखा थोटे आणि अनेस्थेटीक डॉ. अय्यर मॅडम यांनी डिलिव्हरी सुरु होण्यापूर्वी बाहेर येऊन थोडी माहिती समजावून सांगितली.
ऑपेरेशन थिएटर चा दरवाजा बंद झाल्यावर पहिल्या डिलिव्हरी पासून गेलेला सव्वा चार वर्षांचा भूतकाळ झरझर नजरेसमोरून जाऊ लागला. पहिल्या नॉर्मल डिलिव्हरी नंतर प्रियाला झालेल्या रक्तस्त्रावा नंतर तिची झालेली क्रिटिकल कंडिशन त्यातून तिचे वाचणे, त्यानंतर काही महिन्यात तिच्या पपांचा अपघाती मृत्यू. लगेच महिनाभरात माझे जहाजावर जाणे, पाच महिन्यात पुन्हा परत येऊन पुन्हा सहा महिन्यात पुन्हा जाणे. सान्वी झाल्यावर दुसरे जहाजावर जायला खूप जीवावर आले होते कारण ती तेव्हा चालायला लागली होती, दोन महिन्याची असताना तिला सोडून जहाजावर गेल्यावर ती सात महिन्याची झाल्यावर तिला पुन्हा बघितले होते. त्यामुळे पुन्हा दुसऱ्यांदा जाताना जाऊ की नको अशा द्विधा मनस्थितीत होतो, पण शेवटी अश्रूना वाट मोकळी करून जहाज जॉईन करायला निघून गेलो.
यावेळेस कंपनीने अशा जहाजावर पाठवले जिथे पाच ऐवजी सहा महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट होता. घरी यायला सहा ऐवजी साडे सहा पेक्षा जास्त महिने लागल्याने आता बस झाली शिपिंग आणि जहाजावरील करियर हा विचार पक्का केला. आमचा स्वतःचा गोडाऊन आणि रूम बांधण्याचा बांधकाम व्यवसाय सुरूच असल्याने वर्षभर त्यात बऱ्यापैकी मन रमले. हाती घेतलेली बिल्डिंग पूर्ण बांधून झाल्यावर आमच्या नवीन घराचे बांधकाम सुरु केले. मे महिन्यात घराचे बांधकाम सुरु झाले होते तशातच डिसेंबर महिन्यात आम्हाला दुसरे बाळ होणार आहे समजल्यावर आनंद झाला. किमया ताईने ह्यावेळी आपण कोणतीही रिस्क न घेता प्लॅन्ड सीझर करू त्यासाठी तिने तिच्या हॉस्पिटलला येणाऱ्या डॉ. रेखा थोटे यांच्याकडे कन्सल्ट करायला सांगितले, त्यांनी पण मागील डिलिव्हरीचे सगळे रिपोर्ट आणि हिस्टरी पाहिली आणि सीझरच करायचा निर्णय घेतला. पुन्हा एकदा कल्याणमध्ये निदान डायग्नोस्टिक सेंटर मध्ये डॉ. प्रशांत पाटील यांच्याकडे रुटीन सोनोग्राफी साठी जाणे सुरु झाले. त्यांचा नेहमीचा हसतमुख आणि प्रसन्न चेहरा आणि सोनोग्राफी सुरु असताना ते ज्याची तपासणी करतात ते सगळं समजावून सांगणे यामुळे त्यांच्याकडे गेल्यावर त्यांच्याप्रति दरवेळेस आदर निर्माण होत असे. सान्वी पोटात असताना त्यांच्या मिस्कील स्वभावा बद्दल कल्पना होतीच. अनोमली स्कॅनच्यावेळी बाळाचे अवयव आणि त्यांची होणारी वाढ योग्य रीतीने होतेय वगैरे अशी सगळी माहिती दिली.
घराचे काम जोरात सुरु होते, आमचे नवीन घर आता आकार घेत होते त्याचवेळी आमचं दुसरं बाळ सुद्धा गर्भात आकार घेत होते आणि रोज एक एक दिवसानी मोठं होतं होते. सान्वी झाल्यानंतर माझ्या भावालासुद्धा पहिली मुलगीच झाली होती. आता आमच्या घरात येणाऱ्या तिसऱ्या बाळाविषयी सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली होती. येणारे बाळ मुलगा आहे की मुलगी हे डिलिव्हरीच्या दिवशीच समजणार होते. मुलगा होवो की मुलगी याच्यापेक्षा प्रियाची डिलिव्हरी सुखरूप होवो अशी माझ्या सह आई बाबांची अपेक्षा होती. पण प्रियाचे म्हणणे होते की एक मुलगी आहे तिच्याशी खेळायला एक बहीण आहे आता त्या दोघीना एक भाऊ आला पाहिजे. सातव्या महिन्यातील रुटीन सोनोग्राफी मध्ये डॉ. प्रशांत पाटील यांनी बाळाला एक प्रॉब्लेम असल्याचे सांगतानाच विशेष घाबरण्याचे कारण नाहीये, गायनेकोलॉजिस्ट तुम्हाला आवश्यक तो उपाय आणि काळजी घ्यायला सांगतील असे सुद्धा सांगितले. बाळाचे युरीनरी ब्लॅडरमध्ये त्याची युरीन साठून राहते आणि त्यावर थोटे मॅडम यांनी काळजी करण्याचे कारण नाही आपण पुन्हा काही दिवसानी सोनोग्राफी करून पाहू या असे सांगून दडपण दूर केले. प्रिया स्वतः डॉक्टर असल्याने तिने त्यावरून आपले बाळ हा मुलगाच असला पाहिजे असा तर्क काढला कारण गर्भात असताना युरीनरी ब्लॅडर चा प्रॉब्लेम जास्तकरून मुलांनाच येतो असं तिने अभ्यासले होते. पण जसं पहिल्या वेळेला तिने ओटभरणीला बर्फी ऐवजी पेढा काढला होता, पहिला मुलगाच होईल म्हणून आशीर्वाद दिलेला असूनसुद्धा आम्हाला पहिली मुलगीच झाली होती तसाच सस्पेन्स यावेळेस सुद्धा डिलिव्हरी होईपर्यंत राहणार होता कारण प्रियाने नुसता तर्कच केला होता. आठव्या महिन्यात पोटावर हात ठेवल्यावर गर्भात बाळाची हालचाल जाणवत असताना एका वेगळ्याच विश्वात हरवल्या सारखं व्हायचं, गर्भात आपली दुसरी मुलगी आहे की मुलगा आहे यापेक्षा ते बाळ आपल्याशी गर्भातुनच संवाद साधतंय असा भास व्हायचा. मला लवकर बाहेर यायचंय तुमच्याजवळ त्यासाठीच माझी गर्भात धडपड चाललीय असं बाळाच्या हालचाली वरून वाटायला लागायचे. गर्भात असलेल्या बाळाचे डोके, हात आणि पाय असे अवयव प्रिया सांगेल त्याप्रमाणे हाताला जाणवायचे. थोटे मॅडम यांच्या ठाण्यातील क्लिनिक मध्ये त्यांनी ऐकवलेले बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकताना येणारा अनुभव आणि बाळाचे गर्भात असताना अनुभवलेल्या हालचाली या सर्वांचे सुख काही क्षणातच त्या बाळाला प्रत्यक्ष हातात घेऊन वाढणार होते. एक ना अनेक आठवणी, प्रियाच्या आठव्या महिन्यात नवीन घराची झालेली वास्तूशांती. नवीन घरात राहायला जाऊन महिना होऊन गेला तरीही नवीन रंगाचा सुगंध अख्या घरात दरवळत असे. आमच्या सगळ्यांसह आमच्या नवीन घराचे नवेपण आणि भव्यतासुद्धा घरात येणाऱ्या नवीन पाहुण्याची आतुरतेने वाट बघत होते.
पाऊण एक तासाच्या प्रतीक्षे नंतर हवाहवासा आवाज ऐकायला मिळाला, जन्म झाल्यावरच पहिल्यांदा बाळ रडण्याचा. सान्वी झाली तेव्हा आईने ऑपेरेशन थिएटरचा दरवाजा उघडण्या अगोदरच आपल्याला मुलगी झाली असे उद्गार काढले होते. यावेळेस रडण्याचा आवाज ऐकून आईला मुलगा आहे की मुलगी असा कोणताच निष्कर्ष काढता येईना. काही मिनिटातच किमया ताई हसत हसत बाळालाच बाहेर घेऊन आली आणि तिने आईला मिठी मारून तिच्या कानात मुलगा आहे असे सांगितले. तेवढ्यात सिस्टर बाळाला पुन्हा आत नेण्यासाठी बाहेर आली, बाळाला नेताना त्याच्या कमरे भोवती गुंडाळलेले कापड काढून दाखवताना मुलगा झाला आहे असं बोलून अभिनंदन करू लागली.
प्रियाला काही वेळाने ऑपेरेशन थिएटर मधून रिकवरी रूम मध्ये नेत होते पण तिथे तिला नेत असताना ती नजरेनेच सांगत होती की बघ बोलले होते ना यावेळेस मुलगाच होणार आहे.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
B. E. (Mech), DIM
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply