चिंतामणी त्रंबक खानोलकर म्हणजेच ‘ आरती प्रभू ‘ यांचा जन्म ८ मार्च १९३० रोजी ‘ बागलांची राई ‘ ह्या वेंगुर्ल्यातील खेड्यात झाला.
उपजीविकेसाठी खानोलकर यांच्या वडिलांना कुडाळ. वेंगुर्ले, सावंतवाडीत येथे स्थलांतरे करावी लागली.. सावंतवाडीत प्लेगच्या साथीमुळे त्यांना मुंबईत स्थलांतर करावे लागले आणि ते पुढील शिक्षणासाठी मुंबईला आले. परंतु त्याच्या शिक्षणात खंड पडतच राहिला तरी १९६० मध्ये ते एस.एस.सी पास झाले.
त्यांनी कविता ‘ आरती प्रभू ‘ या नावाने लिहिल्या , तर गद्य लेखन चिं . त्र्य . खानोलकर या नावाने लिहिले . पुढे ते मुंबईतील ‘आकाशवाणी’ केद्रात काही काळ रुजू झाले. त्यांची कविता म्हणजे एक वेगळीच अनुभूती आहे. ते आपल्या एका कवितेत म्हणतात . ‘ माझ्या अजाण
निष्प्राण कवितेच्या वाटेला जाऊ नका…मोडून पडाल ‘ आपल्या कवितेबद्दल ते जेव्हा असे म्हणतात तेव्हा अक्षरशः अंगावर काटा येतो. त्यांच्या कवितेतून प्रकृती आणि विकृती यांचे जे दर्शन होते त्यांनीही आपण हबकून जातो कारण ह्या दोन्ही प्रवृत्ती आपल्या प्रत्येकाच्या शरीरात असतात .
प्रकृती आपल्याला कधीकधी जाणवते पण विकृती मात्र आपल्या शरीरात खोलवर चोच खुपसून बसलेली असते. ती कधी आपली खुपसलेली चोच खसकन बाहेर काढेल याचा नेम नसतो. त्यांच्या ‘ चानी ‘ कादंबरीचा शेवट बघीतला की ती ‘खसकन’ बाहेर आलेली चोच जाणवते. तर दुसरीकडे आपण त्यांची ‘ रात्र काळी घागर काळी ‘ वाचताना ‘ पार हबकून जातो आणि वाचून जाणवते की खानोलकर किंवा आरती प्रभू यांच्या शरीरातील मनाचा वेध घेताना आपण स्तंभित होतो , आपल्याला त्यांचे वेगळे रूप साहित्यातून दिसते. अजगर कादंबरी तर इतकी जबरदस्त आहे की ती आपली झोपच उडवते.
त्या कादंबरीमधील पात्राविषयी एकदा पु. ल. देशपांडे यांनी त्यांना विचारले होते ‘ का रे त्या पात्राला कथानकात का मारलास ‘ तेव्हा त्यानी शांतपणे उत्तर दिले ‘ मी नाही मारला , तो मेला ‘ आणि ते निर्विकार झाले. आपल्या कलाकृतीपासून वेगळे झाल्यानंतरचे खानोलकर अत्यंत वगळे भासत असत , त्यांच्या नाटकामधील व्यक्तिरेखा बघितल्या तर आपण विचारांच्या , अनुभूतीच्या खोल गर्तेत जातो. एक शून्य बाजीराव , अवध्य , सगेसोयरे , अजब न्याय वर्तुळाचा , कालाय तस्मै नमः सारखी दर्जेदार नाटके त्यांनी लिहिली. खरे पाहिले तर त्याबद्दल खूप खूप लिहिता येईल त्यांच्या कवितांबद्दल , कादंबऱ्याबद्दल , नाटकाबद्दल . परंतु इथे थोडासाच वेध घेत आहे. त्यांचे जोगवा, दिवेलागण , नक्षत्रांचे देणे हे काव्यसंग्रह आहेत. त्याचप्रमाणे गणराय आणि चानी , कोंडुरा , अजगर , रात्र काळी घागर काळी , पिशाच्च , पाषाण पालवी , त्रिशंकू ह्या कादंबऱ्या त्यानी लिहिल्या . तर सनई , राखी पाखरू ,चाफा आणि देवाची आई हे कथासग्रह देखील प्रकाशित झाले आहेत. त्याच्या ‘ चानी ‘ वर चित्रपट निघाला. त्याचप्रमाणे ‘ कालाय तस्मै नमः ‘ ह्या नाटकांवर अमोल पालेकर यांनी चित्रपट दिगर्शित केला होता.
त्यांच्या ‘नक्षत्राचे देणे’ या कविता संग्रहाला १९७८ चा ‘ साहित्य अकादमीचा ‘ पुरस्कार मिळाला होता.
त्यांची बहुतेक शेवटची कविता अशी होती ..
“अखेरच्या वळणावर यावा
मंद सुगंधी असा फुलोरा,
थकले पाऊल सहज उठावे
आणि सरावा प्रवास सारा.”
आरती प्रभू हे सामान्य माणसाला कळण्यापूर्वीच २६ एप्रिल १९७६ साली या जगातून निघून गेले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply