सुप्रसिद्ध कवी, लेखक आणि समीक्षक असलेल्या रमेश अच्युत तेंडुलकर यांचा जन्म १८ डिसेंबर १९३० साली झाला. एम. ए. झाल्यानंतर त्यांनी काही वर्षे सी. आय. डी. विभागात काम केले. परंतु मुळात समीक्षकाची वृत्ती असल्यामुळे ते मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयात रजू झाले. काही काळ तेथे अध्यापन केल्यानंतर पुढे ते १९६७ ला कीर्ती महाविद्यालयात प्राध्यापक या नात्याने शिकवू लागले. ते विद्यार्थीप्रिय असे ते प्राध्यापक होते. कॉलेजमध्ये शिकवत असताना ते नित्यनियमाने कविता लिखाण करू लागले. त्यांच्या कविता ‘सत्यकथा’ मासिकातून प्रकाशित होऊ लागल्या. या कवितेवरील प्रेमातून आणि कवितेच्या अभ्यासातून ते काव्य समीक्षाही करू लागले.
भा. रा. तांबे, अनंत काणेकर, पु. शि. रेगे, बा. भ. बोरकर आणि ग. दि. माडगूळकर यांच्या विषयीच्या लेखांचा संग्रह ‘ गीतभान ’ रमेश तेंडुलकरांच्या रसिक आणि समीक्षा वृत्तीचा प्रत्यय देतो. तेंडुलकरांनी काही महत्त्वपूर्ण ग्रंथांचे संपादनही केले आहे. ‘चौकोनी आकाश’ (अनंत काणेकरांच्या कविता), ‘कविता दशकाची’ (१९८० च्या दशकातील महत्त्वपूर्ण अशा दहा कवींच्या कवितांचे संपादन), ‘मृण्मयी’ (इंदिरा संत यांच्या निवडक कविता), ‘मराठी संशोधन खंड – १३ व १४’, ‘आठवणीतल्या कविता’ (भाग १ ते ४) इत्यादी ग्रंथांचे त्यांनी संपादन केले. त्यांच्या संपादनात एक मर्मग्राही समीक्षक प्रत्येक ठिकाणी दिसतो. ‘ बालकवींची कविता तीन संदर्भ ’ या त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेल्या समीक्षात्मक ग्रंथात गोविदाग्रज आणि बालकवी, केशवसुत आणि बालकवी, मर्ढेकर आणि बालकवी अशी मांडणी करून केशवसुत, गोविंदाग्रज आणि मर्ढेकर यांच्या कवितेचा आणि बालकवींच्या कवितेचा ऋणानुबंध शोधला आहे. आधुनिक मराठी कवितेविषयीचा रमेश तेंडुलकरांचा सखोल अभ्यास नियतकालिकातून प्रकाशित झालेले अनेक समीक्षात्मक लेखातून दिसून येतो. मला त्यांच्या घरी माझे मित्र सतीश शिंदे यांच्याबरोबर साहित्य सहवास मध्ये जाण्याचा योग आला होता, त्यावेळी ते नुकतेच हॉस्पिटलमधून उपचार घेऊन आले होते तेव्हा मी तेथे त्यांची स्वाक्षरी घेतली होती.
प्रा. रमेश तेंडुलकर हे माणूस म्ह्णून खूप साधे आणि मनाने खूप मोठे होते. अत्यंत साधी रहाणी आणि आपल्या घरी येणारा माणूस कितीही साधा असला तरी त्याचे त्यांच्या घरी अगत्याने स्वागत होत असे. त्याचे चिरंजीव नितीन तेंडुलकर उत्तम कवी, लेखक आहेत. त्याचप्रमाणे त्याचा मुलगा सचिन तेंडुलकर हा भारताचा गाजलेला क्रिकेटपटू आहे. तर त्यांचे दुसरे चिरंजिव नितीन तेंडुलकर हे देखील वडिलांप्रमाणे लेखन करतात, कविता करतात. त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तर त्यांचा मोठा मुलगा अजित हे देखील उत्तम क्रिकेट प्रशिक्षक आहेत.
१९ मे १९९९ रोजी त्यांचे अचानक निधन झाले.
— सतीश चाफेकर
Leave a Reply