जन्म. १५ सप्टेंबर १९३०
सुमधुर भावगीते लिहून मराठी रसिकांना मोहवून टाकणाऱ्या मधुकर जोशींनी जीवनभरात पाच हजाराच्यावर गीते लिहिली, १०० गझल, ३५० ध्वनिफिती, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विनंतीनुसार गीत, शिवायन यासह अनेक बालगीतेही लिहिली. आकाशवाणीवर पंचवीस संगीतिका सादर केल्या. पी. सावळा राम, ग. दि. माडगूळकर, शांता शेळके, जगदीश खेबुडकर यांच्यासह दिग्गज कविंचे गीत लेखन बहरात होते तेव्हाही जोशी यांची गीते लोकप्रिय झाली होती. त्यांनी काही मंगलाष्टका लिहिल्या आहेत. एवढी प्रचंड गीते लिहिणाऱ्या जोशी यांना त्या काळात फारसे मानधन मिळत नसे. परिणामी कुटुंबाचा खर्च चालवताना त्यांना काही शिल्लकही ठेवता आली नाही.
संगीतकार दशरथ पुजारी यांनी मधुकर जोशी यांची बरीचशी गीतं एच.एम.व्ही.त रेकॉर्ड केली होती. ती आठवण सांगताना संगीतकार दशरथ पुजारी आपल्या पुस्तकात म्हणतात त्यावेळी काही लोकांचा थोडासा गैरसमज झाला होता की, इतर इतके चांगले कवी असताना तुम्ही मधुकर जोशींचीच गाणी का घेता? त्यांना असं वाटणं स्वाभाविक होतं. त्यावेळचे एक नामवंत कवी मला म्हणाले, “पुजारी, तुमचे मधुकर जोशी हे ठरलेले कवी आहेत. तुम्ही दुसर्या कवीला संधी देत नाहीत. हा काय प्रकार आहे? मी एवढंच सागितलं, “प्रकार दुसरा-तिसरा काही नसून मला त्यांची गीतं आवडतात. त्यांचे शब्द साधे, सुटसुटीत, अर्थाला धरून- दादरा, केरवा, रूपकच्या मीटरमध्ये छान बसवलेले असतात. एका मात्रेचंही कमी-जास्त होत नाही. शिवाय काव्य पाहिल्याबरोबर जेव्हा संगितकाराला चाल चटकन सुचते ते काव्य फार चांगले, असे मी समजतो.” त्यांचं एक काव्य त्यावेळी फार लोकप्रिय होतं.
तसेच संगीतकार दशरथ पुजारी ‘अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती’ या गाण्याची जन्मकथा सांगताना आपल्या अजून त्या झुडुपांच्या मागे या पुस्तकात म्हणतात, ‘अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती’ या गाण्याची जन्मकथा सांगण्यासारखी आहे. त्याकाळी मधुकर जोशी हे डोंबिवलीला विष्णूनगर भागात राहायचे. लहानसं घर होतं त्यांचं. एकदा मी त्यांच्या घरात प्रवेश केला तर दारातच एक कागद पडलेला दिसला. उचलून बघतो तर त्यावर एक कविता लिहिलेली होती. आता कवीच्या घरात दुसरं काय मिळणार म्हणा! मनात म्हंटलं, या कवीचा जबाब नाही. घरामध्ये काव्यंच काव्य लोळत पडलीत. त्या कागदावरचे शब्द सहज कुतूहल म्हणून वाचले. मला ते एकदम आवडले. मी त्यांना म्हंटलं, “अहो कविराज, हे इतकं सुंदर काव्य आहे ते जपून ठेवायचं तर इथे धुळीत पडलेलं दिसतंय. हा काय प्रकार आहे?”
मधुकर जोशी म्हणजे स्वभावाने अगदी साधे व गरीब. ते म्हणाले, ” अहो, काय झालं की माझ्या वहीतून हे कागद माझ्या लहान मुलाने फाडलेले आहेत. त्या लहान मुलाला काय समजतंय् हो त्याचं महत्त्व?” मी म्हणालो, “ते कागद माझ्या हाती लागले हे बरंच झालं नाहीतर त्याचा उपयोग दुसऱ्याच कामाकरिता झाला असता. आता नशिबाने ते वाचले आहे तर नीट सांभाळून ठेवा. अन् हे बघा! हे काव्य वाचल्याबरोबर एक चाल सुचली आहे. तुम्ही कवी आहात. तुमच्या घरात वाजवायची पेटी नसेलच. कुणाकडून तरी मागून घ्या.” मधुकर जोशींनी शेजाऱ्यांकडून पेटी आणली. माझ्यापुढे ठेवली व म्हणाले, “ऐकवा आता चाल.” मी मनात दाटलेल्या स्वरांना संघटित केलं व गाण्याला मूर्त स्वरूप आलं. एका अलौकिक गाण्याचा जन्म तिथे झाला.
मधुकर जोशी यांची अनेक गाणी मी रेकॉर्ड केली ती खूप गाजली. जसे- आकाश पांघरूनी जग शांत झोपले हे..
झिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात.. या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार.. आस आहे अंतरी या, आसरा हृदयात दे.. मधुकर जोशींची गीतं खरंच चांगली आहेत. म्हणूनच मला उत्तम चाली सुचल्या.
मधुकर जोशी यांनी त्याकाळात अनेक मराठी चित्रपटांसाठी गीतलेखन केले होते. त्यांनी लहान मुलांसाठी लिहिलेली गाणी आजही अवीट गोडीने चिमुकल्यांना ऐकवली जातात. अशीच अमुची आई असती, झिम झिम झरती श्रावणधारा, नको ताई रुसू, यांसारखी हजारो गाणी कवी मधुकर जोशी यांच्या समृद्ध लेखणीतून उतरली आहेत.
आकाशवाणीसाठी संगीतिका, गीत शिवायन, महाराष्ट्र गाथा इत्यादींचे लेखनही जोशी यांनी केले होते. कुसुमाग्रज व ग. दि. माडगुळकर यांच्या कवितेची छाप त्यांच्यावर पडली. त्यांनी पाच हजारांपेक्षा जास्त गाणी लिहिली होती, त्यापैकी २०० ते २५० गाणी प्रकाशित झाली.
मधुकर जोशी यांचे निधन २१ एप्रिल २०२० रोजी झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply