राजा नीळकंठ बढे यांचा जन्म १ फेब्रुवारी १९१२ रोजी नागपूर यथे झाला. हे संपादक, चित्रपट अभिनेते, गद्य लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार आणि गायक असले तरी त्यांची खरी ओळख मराठी कवी आणि गीतकार अशीच होती.
त्यांचे प्राथमिक शिक्षण छिंदवाडा येथे तर माध्यमिक शिक्षण नागपूरच्या टिळक विद्यालयात झाले. १९३५ मध्ये त्यांनी पंजाबची मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली.
सुरुवातीला राजा बढे यांनी अनेक वृत्तपत्रात कामे केली. १९५६ ते १९६२ या कालखंडात ते आकाशवाणीवर ‘ निर्माता ‘ म्हणून काम करीत होते. या नोकर्यांच्या धरसोडीत त्यांचे कॉलेजशिक्षण राहून गेले. मुंबई आकाशवाणीवरच्या नोकरीनंतर बढे यांनी आकाशवाणीला छोटे छोटे माहितीपट करून दिले.
राजा बढे यांनी १९४० च्या आसपास चित्रपट व्यवसायात प्रवेश केला. ‘ सिरको फिल्म्स ‘ मध्ये दोन वर्षे त्यांनी कामे केली. १९४२ मध्ये ते ’ प्रकाश स्टुडिओ ‘त रुजू झाले. बंधू बबनराव यांच्या मदतीनं त्यांनी ‘ स्वानंद चित्र ‘ ही संस्था उभी केली आणि ’ रायगडचा राजबंदी ‘ हा संभाजीमहाराजांच्या जीवनावरील चित्रपट काढला.
राजा बढे यांचा संस्कृत काव्याचा आणि उर्दू शायरीचा चांगला अभ्यास होता. तरीही त्याच्या कवितेची भाषा बोजड नव्हती. गीत, गझल याप्रमाणेच ‘ चारोळी ‘ हा रचनाप्रकार बढे यांनी हाताळला. खऱ्या अर्थाने त्यांनी गजल हा प्रकार लोकप्रिय केला अर्थात माधव जुलिअन यांनी देखील गजल लिहिले. परंतु गाण्यासाठी म्हंणून गजल जास्त लोकप्रिय केली ती राजा बढे यांनीच असे अनेकांचे म्हणणे आहे. ‘ कोंडिबा ‘ हे टोपण नाव वापरून काही राजकीय वात्रटिका त्यांनी लिहिल्या. मुंबईच्या विविधवृत्तात त्या प्रकाशित होत असत. त्याची अनेक गीते आजही लोकप्रिय आहेत उदाहरण द्यायचे झाले तर त्यांनी ” जय जय महाराष्ट्र माझा , गर्जा महाराष्ट्र माझा ” हे अजरामर असे ‘ महाराष्ट्र गीत लिहिले. त्याचप्रमाणे ” चांदणे शिंपीत जाशी ” , ” डोळे मोडीत गौळण राधा ” किंवा ” त्या चित्तचोरट्याला का ” , ” दे मला गे चंद्रीके ” , माझीया माहेर जा ” , ” दे मला गे चंद्रिके ” ” कळीदार कपुरी पान ” त्या चितचोरट्याला का आपुले म्हणूं मी ” अशी शेकडो गीते -भावगीते लिहिली , महत्वाचे म्हणजे कुमार गंधर्व यांनी गायलेले त्याचे ‘ वेडात काय गोडी ” अजरामर गीत . त्याच्या १५० पेक्षा जास्त ध्वनिमुद्रिका निघाल्या. लेखक , प्रतिभासंपन्न कवी ,उत्कृष्ट नाटककार , संगीतकार , अभिनेता , चित्रपट निर्माता , उत्कृष्ट नेलं पेंटर , नख चित्रकार , खरड चित्रकार , चित्रकार असे अनेक पैलू त्याच्याकडे होते. आज जे सुप्रसिद्ध इव्हेंट्स होतात त्याचे जनकही राजा बढेच होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे राजा बढे यांचे दैवत होते. त्यांचे राष्ट्रप्रेम त्यांच्या ‘ क्रांतिमाला ‘ (१९५२) या संग्रहातून वेळोवेळी दिसून येते. त्यात २१ कविता आहेत. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील देशभक्तिपर गीते आहेत. प्रत्यक्ष सावरकरांनी ‘ प्रस्तावनेत ‘ आपण स्वतःच नामवंत, सुप्रतिष्ठित प्रतिभासंपन्न साहित्यिक असल्याने, माझ्या प्रस्तावनेची गरज नाही असे उद्गार काढले आहेत. महात्मा गांधी यांनी बघीतलेला मराठीमधील एकमेव चित्रपट म्हणजे ‘ रामराज्य ‘ . त्या चित्रपटातील सर्व गाणी गाजली . त्या चित्रपटमामधील सर्व गाणी राजा बढे यांची होती. बाळ कुडतडकर यांनी सांगितले की ‘ संगीतिका ‘ हा प्रकार मराठी साहित्यात सुरु केला असेल तरं तो राजाभाऊ बढे यांनी. राजाभाऊंची गाणी हिराबाई बडोदेकर , लता मंगेशकर , मालती पांडे , कुंमार गंधर्व, ज्योत्स्ना भोळे, सुमन कल्याणपूर , सुलोचना चव्हाण , जितेंद्र अभिषेकी , अशा भोसले, आशा खाडिलकर अशा अनेकजणांनी गायली आहेत. आशा भोसले यांनी त्यांचे हृदयनाथ मंगेशकरांनी संगीत दिलेले पाहिले गाणे गायले ते राजा बढे याचे होते. ” चांदणे शिंपीत जाशी ” हे ते गाणे होते. शाहीर साबळे यांनी तर त्याचे ‘ जय जय महाराष्ट्र माझा ‘ हे अजरामर ‘ महाराष्ट्र गीत ‘ गायले.
आई-वडिलांच्या निधनानंतर मोठा भाऊ म्हणून लहान भावंडांची जबाबदारी पालनपोषण यांतच सर्वस्व मानून राजा बढे स्वत: अविवाहित राहिले. खऱ्या अर्थाने ते ‘ राजा ‘ माणूस होते. आमच्या अनेक माध्यमांनी त्याच्याकडे दुर्लक्षच केले म्हणावे लागेल पण त्याची खंत त्यांना नव्हती. त्याच्या मृत्यूनंतर नागपुरात त्याच्या जन्मठिकाणी त्याच्या नावाने एक थिएटर बांधायचे ठरले होते. त्याचे भूमीपुजन पंडित रवीशंकर याच्या हस्ते झाले होते. परंतु ते थिएटर झालेच नाही. त्याचे बंधू बबन बढे त्यांना ‘ संत ‘ म्हणत. ते खरे ठरले कारण ते त्याचे अजरामर काम करून निघून गेले . आम्ही मात्र त्याच्याकडे दुर्लक्षच केले. मुंबईत दादर येथे मात्र एका चौकाला ‘ कवी राजा बढे चौक ‘ हे नाव दिले गेले आहे.
कथाकथनाचे कार्यक्रम आज सर्वत्र होतात. या कथाकथनाचे खरे बीज रोवले राजा बढे यांनीच. १९६४ साली मुंबईत राजा बढे यांच्या पुढाकाराने प्रथमच कथाकथनचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात पु. ल. देशपांडे, ग.दि. माडगूळकर यांनी प्रथमच त्यांच्या कथा कथन केल्या होत्या.
राजा बढे हे दिल्लीमध्ये काही कामानिमित्त दिल्ली येथे गेले असताना त्यांचे अचानक ७ एप्रिल १९७७ रोजी निधन झाले..
— सतीश चाफेकर
Leave a Reply