व्ही-१३०२ हे युद्धकालीन टेहळणीसाठी वापरलं गेलेलं एक जर्मन जहाज होतं. दारूगोळा, तोफा व इतर शस्त्रास्त्र, इत्यादींनी सुसज्ज असणारं हे टेहळणी जहाज म्हणजे मुळात मासेमारीसाठी बांधलेलं जहाज होतं. सन १९२७ साली तयार झालेलं हे ४८ मीटर लांबीचं, २९२ टन क्षमतेचं जहाज अगोदर ‘जॉन मान’ या नावानं ओळखलं जायचं. दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास, त्याचं रूपांतर टेहळणी करणाऱ्या जहाजात केलं गेलं. दिनांक १२ फेब्रुवारी १९४२ रोजी ब्रिटिश विमानांनी या टेहळणी जहाजावर हल्ला करून त्याला बुडवलं. तेव्हापासून गेली आठ दशकं हे जहाज, त्यावरील स्फोटकं, इंधनासाठी वापरला जाणारा कोळसा व इतर सर्व सामग्रीसह नॉर्थ सी या समुद्राच्या तळाशी चिरनिद्रा घेत आहे. हे जहाज जिथे सापडलं आहे, तिथे समुद्राची खोली तीस-पस्तीस मीटरच्या आसपास आहे. हे जहाज उजव्या बाजूला कलंडलं असून, त्याच्या डाव्या बाजूला बॉम्बमुळे एक मोठं भोक पडलं आहे.
दीर्घ काळ पाण्याखाली असलेल्या या जहाजाच्या परिसरात अनेक सजीव मुक्तपणे विहरताना पाणबुड्यांना आढळले आहेत. मासे, खेकड्यांसारखे कवचधारी प्राणी, विविध मृदुकाय प्राणी, अशा अनेक सजीवांचं हे निवासस्थान झालं आहे. इथे अनेक सागरी वनस्पतीही वाढल्या आहेत. या सगळ्या सागरी जीवांना जरी हे एक चांगलं निवासस्थान लाभलं असलं तरी, त्या ठिकाणी विविध सूक्ष्मजीवाणूंची अनपेक्षित स्वरूपाची वाढ झाली असण्याची मोठी शक्यता संशोधकांकडून व्यक्त केली गेली. सूक्ष्मजीवांची अशा प्रकारची वाढ ही तिथल्या परिसंस्थेला धोका निर्माण होत असल्याचं दर्शवते. याच पार्श्वभूमीनुसार, जोसेफाइन व्हान लँडुयट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या संशोधनात, या जहाजातून पाण्यात शिरलेल्या विविध रसायनांचा आणि तिथे आढळणाऱ्या सूक्ष्मजीवाणूंचा एकमेकांशी असलेला संबंध अभ्यासला.
जोसेफाइन व्हान लँडुयट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या संशोधनात, इथल्या गाळात जमा झालेले विविध धातू आणि सेंद्रिय रसायनं, यांचं प्रमाण मोजलं. तसंच त्यांनी या गाळात कोणत्या प्रकारचे सूक्ष्मजीवाणू आढळतात आणि ते किती प्रमाणात आढळतात, त्याचाही शोध घेतला. या गाळाशिवाय जहाजावरच्या, नांगरासह इतर पोलादी भागांवर कोणते सूक्ष्मजीवाणू वास्तव्याला आहेत, तेही त्यांनी शोधून काढलं. या संशोधनासाठी लागणारे सर्व नमुने, जोसेफाइन व्हान लँडुयट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाणबुड्यांकरवी गोळा करून घेतले. जहाजाच्या परिसरातल्या गाळातले विविध ठिकाणचे जे नमुने गोळा केले गेले, त्यांत जहाजाच्या दोन्ही बाजू, तसंच जहाजाचा पुढचा भाग आणि मागचा भाग, अशा सगळीकडील नमुन्यांचा, समावेश होता. तसंच हे नमुने जहाजापासून वेगवेगळ्या अंतरापर्यंतचे होते – अगदी जहाजाच्या जवळच्या गाळातले ते जहाजापासून ऐंशी मीटर अंतरापर्यंतच्या गाळातले. हे सर्व नमुने गाळाच्या पृष्ठभागापासून सुमारे पंधरा सेंटिमीटर खोलीवरून घेतले गेले. जहाजाच्या नांगराच्या व इतर भागांच्या पृष्ठभागावर जमा झालेल्या थरांचेही नमुने गोळा केले गेले. या सर्व नमुन्यांतील रसायनांचा शोध हा रासायनिक विश्लेषणाद्वारे तर, जीवाणूंचा शोध हा जनुकीय विश्लेषणाद्वारे घेतला गेला.
या नमुन्यांच्या विश्लेषणातून अनेक लक्षवेधी निष्कर्ष निघाले. सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जहाज बुडून ऐंशी वर्षं उलटली असली तरी, त्यातून प्रदूषक अजूनही बाहेर पडत आहेत. जहाजात जिथे कोळसा साठवला होता, त्या भागातील गाळाच्या नमुन्यांत निकेल, तांबं आणि अर्सेनिक या मूलद्रव्यांच्या क्षारांचं प्रमाण सर्वाधिक होतं. यातील अर्सेनिक हे मूलद्रव्य कोळशातून बाहेर पडत असण्याची शक्यता आहे. जहाजाजवळच्या काही ठिकाणच्या गाळातलं धातूंचं प्रमाण, हे धातू पोलादाच्या गंजण्यामुळे वा जहाजाला दिलेल्या रंगाद्वारे पाण्यात मिसळले जात असण्याची शक्यता दर्शवत होतं. तसंच गाळाच्या नमुन्यांत टीएनटीसारख्या स्फोटकांपासून निर्माण झालेल्या सेंद्रिय पदार्थांचं प्रमाणही लक्षणीय होतं. जहाजापासून जसं दूर जाऊ तसं, या धातूंचं आणि सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण अपेक्षेप्रमाणे कमी होत गेलं.
जहाजाच्या वेगवेगळ्या भागात सूक्ष्मजीवाणूंचं प्रमाणही वेगवेगळं असल्याचं दिसून आलं. तसंच काही विशिष्ट प्रकारच्या सूक्ष्मजीवाणूंचं प्रमाण, हे त्यात्या ठिकाणच्या धातूंच्या आणि सेंद्रिय पदार्थांच्या वाढत्या प्रमाणानुसार वाढत असल्याचं आढळलं. जहाजाच्या विविध भागांवर जमलेल्या थरांत, गंधकाचं रासायनिक स्वरूप बदलू शकणाऱ्या डीसल्फोबल्बससारख्या सूक्ष्मजीवाणूंचं प्रमाण गाळातील प्रमाणापेक्षा अधिक होतं. गंधकांशी संबंध असणाऱ्या या सूक्ष्मजीवाणूंचा पोलादाच्या गंजण्याशी थेट संबंध असतो. त्याचबरोबर जिथे स्फोटकांतून निर्माण होणाऱ्या सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण अधिक आहे, तिथे या सेंद्रिय पदार्थांचं विघटन करणाऱ्या ऱ्होडोबॅक्टरेसी आणि क्रोमॅटिएसी या प्रकारांतील सूक्ष्मजीवाणूंचं प्रमाणही अधिक असल्याचं दिसून आलं आहे. जोसेफाइन व्हान लँडुयट आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या संशोधनातून, जहाजावर आढळणाऱ्या सूक्ष्मजीवाणूंचा, जहाजातून बाहेर पडणाऱ्या विविध धातू आणि सेंद्रिय पदार्थांशी संबध असल्याचं स्पष्ट झालं आहे.
या बुडालेल्या जहाजाच्या परिसरात सापडलेल्या सूक्ष्मजीवाणूंचं हे अस्तित्व, बुडालेल्या जहाजातून बाहेर पडणारे धातू आणि सेंद्रिय पदार्थ आजही – म्हणजे आठ दशकांनंतरही – इथल्या सागरी जीवनावर परिणाम घडवत असल्याचं दर्शवतं. हा परिणाम जरी अतितीव्र नसला, तरी तो भविष्यातही घडतच राहणार आहे. तसंच नॉर्थ सी समुद्राच्या परिसरात बुडवल्या गेलेल्या जहाजांची प्रचंड संख्या लक्षात घेता, या प्रदूषकांच्या परिणामाचा गांभीर्यानं विचार करायची गरज आहे. नॉर्थ सी रेक्स हा प्रकल्प अशा सर्व संशोधनातल्या निष्कर्षांची सर्वांगानं दखल घेण्याचा प्रयत्न करतो आहे. इतकंच नव्हे तर, या प्रकल्पाद्वारे लवकरच काही शिफारशी केल्या जाण्याची शक्यता आहे. यातली एक शिफारस असू शकेल ती, नॉर्थ सी समुद्राच्या तळाशी असलेली ही ‘विषारी’ जहाजं समुद्राच्या बाहेर काढण्याची! कारण समुद्राच्या तळाशी असणाऱ्या या जहाजांतून बाहेर पडणारे पदार्थ पूर्णपणे नष्ट होण्यास अजूनही दीर्घ काळ लागणार आहे. त्यामुळे ही घातक जहाजं जर पाण्याच्या बाहेर काढली नाहीत, तर हे सागरी प्रदूषण असंच चालू राहणार आहे!
-छायाचित्र सौजन्य : (सागरी विज्ञानातील सीमा) / (Flanders Marine Institute)
चित्रवाणीः विषारी जहाज
Leave a Reply