लेक फॉरेस्टची प्राथमिक शाळा अगदी जवळ आहे. दररोज सकाळी साडे आठ वाजता भरते. तेव्हा लहान मुलं आणि त्यांना सोडायला येणारे पालक दिसतात. एरव्ही रस्त्यावर फारशी वर्दळ नसते. मोटारीही विशिष्ट वेळा सोडल्यास दिसत नाहीत. पक्षीही तुरळक आढळतात. ही सरकारी शाळा आहे. खाजगी शाळांच्या फिया जास्त असतात. असे असले तरी सरकारी शाळांमध्येही गुणवत्तेकडे लक्ष दिले जाते. या शाळांशेजारीच डे केअर सेंटर्स असतात. नोकरी करणाऱ्या पालकांची मुलं शाळेनंतर त्यात राहतात. नोकरीनंतर परताना पालक त्यांना संध्याकाळी घरी घेऊन जातात.
एका वर्गात साधारण वीसेक मुलं असतात. प्रत्येक शिक्षिका सर्व मुलांकडे मनापासून लक्ष आणि प्रेम देतात. शाळेत मुलांना जीवनाभिमुख शिक्षण देण्यावर भर देण्यात येतो.
एके दिवशी शाळेच्या भव्य पटांगणावर एक पोलिस व्हॅन उभी होती. मुळात अमेरिकन पोलिस हे उंचपुरे, धट्टेकट्टे असतात. इथे पोलिसयंत्रणेला खूप अधिकार सरकारने दिलेले आहेत. ड्रायाव्हिंग लायसन्सला इथे फार महत्त्व असते. चालकाकडून एखादा गुन्हा घडला तर पोलिस लायसन्सवर पॉईंटस नोंदवतात. बँकांमध्ये किंवा आर्थिक व्यवहार चालतात तिथे लायसन्सला फार महत्त्व असते. त्यामुळे ड्रायव्हर आपल्या लायसन्सवर काही शेरा मिळू नये याविषयी जागरूक असतात.
अमेरिकेत पोलिस यंत्रणेकडे सामान्य नागरिकाचा सहृदय मित्र म्हणूनच पाहिले जाते. घरात काही गडबड झाली आणि विशिष्ट नंबर फिरविला तर पाच मिनिटात पोलिस घटनास्थळी पोहोचतात. लहान मुलांच्या बाबतीत तर ते अधिक तत्पर, संवेदनशील आणि संरक्षक असतात. म्हणून या यंत्रणेविषयी मुलांना माहिती व्हावी व त्यांच्या मनात विश्वास निर्माण व्हावा म्हणून शाळासंचालक पोलिसांना शाळेत आवर्जून बोलवतात. मुलं मग त्यांच्या बरोबर गप्पा मारतात, त्यांच्या व्हॅनबद्दल, गणवेषाबद्दल, वायरलेस यंत्रणेबद्दल नाना प्रश्न विचारतात.
अमेरिकेत सारी घरे लाकडी असतात. कारण इथे भूकंपाची शक्यता लक्षात घेण्यात आलेली असते. लाकडाच्या घरांना आगीचा धोका असतो. त्याचबरोबर अनेकदा इथे विद्युतप्रवाहामुळे अपघात होतात. फायर फायटिंगवाले तेव्हा मोलाची भूमिका बजावतात. मुलांना फायर फायटिंगच्या कामाचा परिचय व्हावा म्हणून शाळेत त्यांनाही निमंत्रित केले जाते.
माझी नात रिया पहिल्या वर्गात शिकते. एकदा शाळेतून घरी येताना ती फिशटँकसारख्या बॉक्समधून कोंबडीची दोन पिल्लं, त्यांची ऊबदार गादी, अन्न, पिण्याचं पाणी घेऊन आली. तिच्या शिक्षिकेने ती तिला दिली होती. दोन दिवस घरी ठेवून त्यांचे संगोपन कसं करायचं याचा अभ्यास तिने करावा असे सांगितले होते. लहान शाळकरी वयातच मुलांना थेट जीवनाला कसे भिडायचे. याचे शिक्षण इथे दिले जाते.
आपल्याकडल्या शाळांमधून मुलांची अशा रीतीने प्रत्यक्ष तयारी करवून घेत नाहीत, असे मला चुकूनही म्हणायचे नाही. इथे मी काय अनुभवले हे अधोरेखीत करण्याचा माझा प्रयत्न आहे.
— डॉ. अनंत देशमुख
(अनघा प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या ओ अमेरिका ह्या पुस्तकामधून)
Leave a Reply