नवीन लेखन...

पोलिस-नागरिक समन्वयाची नितान्त गरज

Police-People Co-ordination is necessary in India

पठाणकोट येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांना संपूर्ण लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. त्यावेळी या शूरवीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हजारो लोक एकत्र आले होते, त्यावेळचे दृश्य मन हेलावून टाकणारे होते. बॉम्बतज्ज्ञ असलेले लेफ्टनंट कर्नल इ. के. निरंजन यांचाही पठाणकोट येथील हल्ल्यात स्फोटके निकामी करताना मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. राधिका व १८ महिन्यांची मुलगी आहे. सूबेदार फतेह सिंह (कॉमनवेल्थ गेम्स स्वर्ण व रजत पदक विजेते) यांच्या पार्थिवाला त्यांच्या मुलीनेच खांदा दिला.शहिदांमधले ६ सैन्याचे तर एक हवाइदलाचे होते. पठाणकोट येथील तळावर चाललेली दहशत विरोधी शोध मोहिम लेख लिही पर्यंत ९६ तासांनंतरही संपली नव्हती.

गुजरातच्या कच्छमधे देशातील पोलीस महासंचालकांची तीन दिवसीय ५०वी परिषद रविवारी संपन्न झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण वेळ परिषदेला उपस्थित होते. आतापर्यंतचे पंतप्रधान येत आणि एक-दीड तासानंतर निघून जात. पूर्णवेळ उपस्थित राहणारे मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.

तिन्ही दिवस झालेली चर्चा पंतप्रधानांनी गांभीर्याने ऐकल्यामुळे पोलिस वरिष्ठ अधिकार्यांना दिलासा मिळाला. तिन दिवसांत संपूर्ण देशातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती काय आहे, ती कशा पद्धतीने हाताळली जात आहे, कोणत्या त्रुटी आहेत या सर्व बाबींची माहिती त्यांनी घेतली.

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सायबर सुरक्षा, डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया या विषयांना स्पर्श केला आणि पोलिस अधिकार्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा आपल्या कामात प्रभावीपणे वापर करण्याचे आवाहन केले. टेरोरिझम पोलिसिंग, आपत्ती व्यवस्थापन आणि पोलिस प्रशिक्षणाबाबतही पंतप्रधानांनी आपली मते मांडली.देशाचे पंतप्रधान पोलीस दलाबाबत किती गंभीर आहे, याची जाणीव महासंचालकांना झाली. अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीत ही अत्यंत शुभ घटना आहे.

पोलिस संवेदनशीलता अतिशय महत्त्वाची

पोलिसांचे कर्तव्य पार पाडताना संवेदनशीलता अतिशय महत्त्वाची आहे, असे मोदी म्हणाले. पोलीस आपले कर्तव्य करताना साधारणत: संवेदनशीलता दाखवित नाहीत. देशातील कुणीही नागरिक याच्याशी सहमत होईल. जनतेला पोलिसांबाबत धाक न वाटता पोलिसांचा आधार वाटला पाहिजे. धाक गुन्हेगारांना वाटायला हवा; सर्वसामान्य नागरिकांना नाही.

परिस्थिती कुठली आहे, याचा विचार न करता, पोलीस आपल्या ठरलेल्या चौकटीत काम करतात. पोलिसांचे कार्य हे समाजातील सर्व लोकांसाठी आहे.देशातील सर्वसामान्य जनतेचे रक्षण करणे, समाजातील कुठल्याही उपद्रवी घटकापासून त्यांना आधार देणे, हे खरे पोलिसांचे मूळ कार्य आहे. त्यासाठी पोलिसांनी संवेदनशील राहून लवचिकपणे आपले कार्य केले पाहिजे, असे मोदींना सुचवायचे होते. त्यासाठी प्रसंगी लवचिकता दाखविली गेली पाहिजे. चौकट लवचिक असावी, नरम असू नये.

पोलिसांचा समाजात धाक नसला पाहिजे, असे कुणीच म्हणणार नाही. परंतु, धाक व भीती या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. पोलिसांबाबत समाजात भीती असेल तर त्याची कारणे पोलिसांनी शोधून काढली पाहिजेत.

पोलिसांनी आपली प्रतिमा सुधारावी

पोलीस आणि समाज यांच्यात संवाद असला पाहिजे, म्हणजे पोलिसांनी नेमके काय केले पाहिजे? स्थानिक लोकांसोबत पोलिसांचा सतत संवाद असला पाहिजे., समाजात कुणी चांगली गोष्ट साध्य केली, तर पोलिसांना त्यात सहभागी होता येईल काय, याचाही विचार पोलिसांनी केला पाहिजे. अशा व्यक्ती अथवा संस्थांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्या कर्तृत्वाची दखल घ्यावी, जमल्यास त्यासाठी एक छोटेखानी समारंभदेखील आयोजित करता येईल. या अशा आदान-प्रदानातून सर्वसामान्य व्यक्तींमध्ये पोलिसांना समजून घेण्याची वृत्ती वाढेल. असे झाले तर समाजातील लोक पोलीस ठाण्यासोबत स्वत:ला जोडण्याचा प्रयत्न करतील.

सर्वसामान्य जनता केवळ तक्रार करण्यासाठीच पोलीस ठाण्याची पायरी चढते. हे दळणवळण वाढले की, मी अमुक अमुक पोलीस ठाण्याच्या हद्दीतला आहे, असे लोक अभिमानाने सांगतील. थोडक्यात आज पोलिसांची जी प्रतिमा जनसामान्यांच्या मनात तयार झाली आहे, ती बदलली पाहिजे, असे मोदींना वाटते .

पोलीस म्हणून पोलिसांच्या समस्या निश्चि्तच आहेत. त्यांना २४ तास करावे लागणारे कर्तव्य, साप्ताहिक सुटी न मिळणे, समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रसंगी जनतेचे शिव्याशाप, रोष, आक्रोश सर्व काही सहन करणे इत्यादी समस्या आहेत. पण म्हणून, त्यांना जनतेशी अतिशय कठोर वागण्याची परवानगी मिळत नाही. जनतेशी वागताना आपण सेवक आहोत, हा भाव सतत मनात असला पाहिजे.

पोलिसांनी आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एखादा माणूस लहानशी खबरही घेऊन आला तर त्याला सन्मानाची वागणूक मिळायला हवी. अनुभव असा आहे की, पोलिस आधी खबर देण्यासाठी आलेल्यालाच विविध प्रश्न विचारून भंडावून सोडतात.आपली जबाबदारी काy याचाही सर्व पोलिसांनी विचार केला पाहिजे. स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे झालीत, पोलीस आणि जनता यांच्यात दुरावा का आहे?.

नागरिकांनीही आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवावी

देशाच्या सुरक्षेसारख्या मुद्यावर पंतप्रधान जर एवढ्या गंभीरपणे विचार करणार असतील तर देशाच्या नागरिकांनीही आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवली पाहिजे. आपल्या अवतीभवती काय सुरू आहे, यावर बारीक नजर सर्वसामान्य नागरिकाची असली पाहिजे. भारताने इसिसच्या धोक्यापासून सतत सतर्क राहणे गरजेचे आहे.

आज इंटरनेटच्या महाजालामुळे जग खूपच जवळ आले आहे.इसिसने त्याचा लाभ उठवून तरुण-तरुणींना आपल्या जाळ्यात ओढण्याचे कारस्थान रचले आहे. त्यांच्या या कारस्थानाला भारतातीलच काही युवक आणि तरुणी बळी पडल्या आहे. परवा नागपुरात हैदराबादच्या तीन तरुणांना विमानतळावर एटीएसने पकडले. यापैकी दोघे हे यापूर्वी अन्य दोन मित्रांसह इसिसमध्ये सामील होण्यासाठी निघाले असता, कोलकाता विमानतळावर पकडले गेले होते.

इसिसचे भूत दोघांच्या मानगुटीवर असे काही बसले होते की, ते पुन्हा त्याच मार्गाने लागले आणि नागपुरात दुसर्यांदा पकडले गेले. याचा अर्थ भारतात इसिसचे स्लीपर सेल कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी यवतमाळच्या काही युवकांनी इसिसमध्ये जाण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना पकडण्यात आले. पुण्यातील एका शाळकरी मुलीने स्वत: मानवी बॉम्ब बनण्याच्या लालसेपोटी इसिससोबत संपर्क स्थापित केला होता. सायबर सेलच्या लक्षात आल्याने तिला रोखण्यात आले.

पोलिस-नागरिक समन्वयाची नितान्त गरज

तिकडे पाकिस्तानचा कुख्यात दहशतवादी हाफीज सईद यानेही भारतातील युवकांना आपल्या संघटनेत ओढण्यासाठी खास सेल सुरू करण्याचे जाहीर केले आहे. आम्हाला किती सतर्क रहावे लागेल, याची कल्पना यावी., विविध दहशतवादी गट भारताला वेढा घालण्याचा प्रयत्न करीत आहेत.ते कोणत्याही राष्ट्रप्रेमी भारतीयासाठी एक आव्हान आहे. या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी सरकार, पोलिस यंत्रणा आणि नागरिकांना एकत्र येण्याची गरज आहे.

देशातही इसिस आणि पाकपुरस्कृत दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी पोलिस यंत्रणेने संवेदनशील असावे, स्थानिकांचा विश्वाास संपादन करावे. केवळ इसिस आणि पाकिस्तानच नव्हे, तर देशाला माओवाद्यांकडूनही मोठा धोका आहे.

टेक्नोसॅव्ही युवकांना आपले कान आणि डोळे बनवा

आज भारताची सायबर यंत्रणा सक्षम नाही. त्यासाठी तरुणाईची मदत घेणे शक्य आहे. आजचा शिक्षित युवक हा टेक्नोसॅव्ही आहे. इंटरनेटची माहिती असणारे हजारो युवक आज भारतात आहेत. अशा युवकांचे लहान लहान मेळावे ठाणे,विभाग, शहर आणि जिल्हा पातळीवर भरवून देशाच्या सुरक्षेसाठी त्यांची मदत घेता येईल. यातून ज्यांच्याकडे अधिक कसब आहे, त्यांनी अन्य युवकांना प्रशिक्षण देणे हा कार्यक्रमही हाती घेता येईल.

अनेक पोलिस निरीक्षकांना इंटरनेट काय आहे, हे माहीत नाही. शेकडो जिल्ह्यांमध्ये सायबर सेल नाही. आज शत्रू चोहोबाजूने भारतावर टपून बसला असताना भारताने इंटरनेटसाठी अत्यावश्यक आणि अनिवार्य साधनसामुग्री, उपकरणे, यंत्रे खरेदी करून त्यासाठी वेगळी यंत्रणा उभारण्याची गरज आहे. तरच इंटरनेटवरून कोण इसिसशी संपर्क साधत आहे, हे लक्षात येऊ शकेल.

आज भारतातच इंटरनेटचे अनेक तज्ञ आहेत. त्यांचा वापर याकामासाठी करता येईल. आज खरी गरज , प्रत्येक पोलिस ठाण्यात एक सायबर सेल निर्माण करणे. तेव्हाच इसिस आणि हाफीज सईदचे मनसुबे आम्ही उधळून लावू शकतो.पोलिसांनी गुन्ह्यांचा सामना करताना स्थानिकांना विश्वाासात घ्यावे आणि या कामी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करावा.युवकांना कट्टरवादापासून परावृत्त करण्यासाठी आंतरराज्य सीमेवर असलेल्या जिल्ह्यातील पोलिस दलांमध्येही योग्य समन्वय असावा.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..