नवीन लेखन...

पोलिओमुक्त विश्व

विश्वाच्या कल्याणासाठी पोलिओ जगताचा अनभिषिक्त सम्राट होण्याच्या आकांक्षेने महायुद्धात उतरलेला हा योद्धा कोण असेल बरे ! त्याची आयुधे आहेत सूक्ष्मदर्शकयंत्र , परीक्षा नळ्या , चंचुपात्र आणि युद्धभूमी आहे प्रयोगशाळा , तर शत्रू आहे पोलिओ .

पोलिओच्या विषाणूशी मोठ्या निकराचा लढा देऊन लक्षावधी बालकांना जीवदान देणारा हाच तो शास्त्रज्ञ , डॉ . अल्बर्ट सबीन . त्यांची ती संपूर्ण पांढरी दाढी , सरळ नाकावर विसावलेला चष्मा आणि चेहऱ्यावरती अर्थपूर्ण भाव . एक शिक्षक या नात्याने ते एखादी गोष्ट व्यवस्थित आणि परिपूर्ण कशी होईल , याकडे बारकाईने बघतात , तर एक धाडसी संशोधक या नात्याने नवीनच निर्माण केलेल्या लशीचे प्रयोग प्रत्यक्ष आपल्या छोट्या गोंडस मुलींवरती करण्याचा धोका पत्करतात .

२६ ऑगस्ट १९०६ रोजी , ज्यू कुटुंबात जन्मलेल्या अल्बर्टने वयाच्या बाविसाव्या वर्षीच न्युमोनियाच्या विषाणूची तपासणी केवळ तीन तासात करण्याचे तंत्र शोधून काढले आणि हे तंत्र ‘ सबीन तंत्र ‘ म्हणून ओळखले जाऊ लागले . गंमत अशी की , १ ९ ३१ साली अल्बर्टला परीक्षेत ‘ सबीन तंत्रा ‘ वरच प्रश्न विचारला होता !

१९३९ साली सिनसिनाटी वैद्यक विश्वविद्यालयात त्यांनी तब्बल ३० वर्षे पोलिओच्या विषाणूवर संशोधन केले . हे सगळे इकडे चालू असताना , १ ९ ५५ साली डॉ . जॉन साक यांनी पोलिओची लस शोधून काढल्याचा दावा केला , परंतु डॉ . सबीन यांनी त्या लशीत असलेली महत्त्वपूर्ण उणीव निदर्शनाला आणून दिली . ती अशी , की त्यापासून मिळणारी प्रतिकारशक्ती ही दीर्घ काळ टिकणारी नाही , कारण ती ‘ मृत लस ‘ या प्रकारची लस होती . डॉ . सबीन यांनी ‘ जिवंत लस ‘ या प्रकारात मोडणारी लस अखेर शोधून काढली . तोंडावाटे सेवन केल्यावर ती आतड्यात जाऊन तिथे दीर्घ मुदतीची प्रतिकारशक्ती निर्माण होते .

१९५४ साली त्यांनी आपल्या लशीचे प्रयोग जनसामान्यांवर करण्यास सुरुवात केली . परंतु पोलिओ न झालेल्या मुलामुलींवर प्रयोग करू द्यायला कोणीच तयारी दाखवेना . कारण , प्रयोग करायचा म्हणजे लस पाजल्यावर त्यांच्या घशाची , रक्ताची आणि विष्टेची वेळोवेळी तपासणी करावी लागणार होती , आणि म्हणून स्वतःच्याच दोन गोंडस मुली डेबोराह आणि अॅमी यांच्यावर प्रयोग करण्याचे धाडस त्यांनी केले . आपल्या मुलींवरच काही विपरीत परिणाम झाला तर ? त्या गोजिरवाण्या मुलींना कल्पना नव्हती की , त्यांच्यावर कसले प्रयोग केले जाताहेत .

डॉ . अल्बर्ट म्हणतात , ‘ अहो , मी माझ्या मुलींवर जर प्रयोग केले नसते , तर दुसऱ्यांच्या मुला – मुलींवर प्रयोगासाठी त्यांच्या आई – वडिलांची परवानगी तरी कशी मिळाली असती ? ‘

कम्युनिस्ट लस ?

चाचण्या यशस्वी झाल्या . डॉ . अल्बर्ट यांचा आत्मविश्वास वाढला होता . १ ९ ५७ साली मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या विशेष पथकाने सबीनच्या लशीला अधिकृत मान्यता दिली . १ ९ ५६ ते ६० या कालावधीत त्यांनी त्यांच्या रशियन सहकाऱ्यांच्या मदतीने या लशीत खूप सुधारणा करून ती निर्धोक असल्याचे जाहीर केले . १ ९ ६० साली रशियात ७७ हजार मुलांना , जर्मनी , झेकोस्लोव्हाकिया , हंगेरी , रुमानिया आणि बल्गेरिया या देशांत २३ हजार बालकांना ही लस देण्यात येऊन ती जनमान्य झाली . पण अमेरिकेने मात्र त्यावरची बंदी उठवली नाही , हे आश्चर्यच म्हणायला हवे !

रशियात ही लस तयार केली जात असे , म्हणून ही चक्क ‘ कम्युनिस्ट लस ‘ म्हणून ओळखली जाऊ लागली . पुढे १ ९ ६१ साली अमेरिकन मेडिकल असोसिएशननं सबीन लशीला मान्यता दिली . ‘ सबीन ‘ लस ही ‘ साक ‘ लशीला उत्तम पर्याय म्हणून लोकप्रिय झाली .

१९८२ साली डॉ . अल्बर्ट सबीन यांनी पोलिओच्या या संपूर्ण पसाऱ्यातून निवृत्ती जाहीर केली खरी , पण पोलिओचे या जगातून संपूर्ण उच्चाटन करण्याची भीष्मप्रतिज्ञा करणारा हा योद्धा हे सामाजिक बांधीलकीचे रणांगण सोडून मागे फिरणे केवळ अशक्य होते आणि काय तो दैवदुर्विलास ! १ ९ ८३ साली डॉ . सबीन यांना त्यांच्या सायकल मणक्यात कॅल्शिअम साचल्यामुळे अर्धांगवायूने घेरले . भरपूर विश्रांती , मनोबल आणि इच्छाशक्तीच्या जोरावर हा योद्धा काठीच्या आधाराने पुन्हा चालू लागला .

रोटरी इंटरनॅशनलचा ध्यास

१९८५ साली रोटरी इंटरनॅशनल या संस्थेने पोलिओचे २००५ सालापर्यंत जगातून उच्चाटन करण्याचा विडा उचलला . जागतिक आरोग्य संघटना , युनिसेफ व इतर सामाजिक संघटना यांच्या सहकार्याने लशीच्या उत्पादनासाठी प्रचंड निधी उभा केला गेला आणि अजूनही उभा केला जात आहे . पोलिओ निर्मूलनाच्या या जागतिक प्रकल्पाचे सल्लागार म्हणून डॉ . सबीन यांची १ ९ ८४ साली नियुक्ती करण्यात आली . १ ९ ८५ रोजी ‘ रोटरी जागतिक सामंजस्य पुरस्कार ‘ देऊन त्यांना रोटरी इंटरनॅशनलच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित करण्यात आले . १२ मे , १ ९ ८५ साली अमेरिकेचे अध्यक्ष रोनाल्ड रिगन यांच्या हस्ते व्हाइट हाऊसमधील एका महत्त्वपूर्ण समारंभात ‘ मेडल फॉर फ्रीडम ‘ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला . असा हा योद्धा ३ मार्च , १ ९९ ३ रोजी पंचतत्त्वात विलीन झाला . ‘ पोलिओमक्त विश्व ‘ या स्वप्नपूर्तीसाठी आवश्यकता आहे जिद्द , शिस्त आणि समर्पणाची . या प्रक्रियेत दोन महत्त्वपूर्ण अडथळे आहेत . एक म्हणजे पोलिओ लशीच्या निर्मितीसाठी लागणारा प्रचंड पैसा . पैशांचा प्रश्न रोटरी इंटरनॅशनल , बिल गेट्स फाउण्डेशन व इतर जागतिक सामाजिक संघटनांनी सोडविला आहे . परंतु , दुसरा महत्त्वाचा अडथळा असा की , लशीतील विषाणूत होणारे जनुकीय बदल . यामुळं पोलिओ -मुक्तीला पूर्णविराम देणे अवघड झाले आहे .

भारताने १९९ ५ – ९६ साली ‘ पोलिओ पल्स ‘ हे राष्ट्रीय धोरण म्हणून स्वीकारले . पोलिओ पल्स म्हणजे एकाच ठराविक दिवशी संपूर्ण देशभर लसीकरणाचा कार्यक्रम घेणे . १३ जानेवारी २०११ रोजी पश्चिम बंगालमध्ये ‘ वाइल्ड ‘ पोलिओचा शेवटचा रुग्ण सापडला . ‘ वाइल्ड ‘ म्हणजे पोलिओ विषाणूच्या मूळ जातीमुळे होणारा पोलिओ .

२५ फेब्रुवारी , २०१२ रोजी जागतिक आरोग्य संघटनेने भारताला पोलिओमुक्त म्हणून जाहीर केले . पण एका अटीवर . ती अट अशी की , ‘ जानेवारी २०१४ पर्यंत भारतात एकही रुग्ण सापडता कामा नये . ‘ पाकिस्तान , अफगाणिस्तान आणि नायजेरिया हे देश अद्याप पोलिओमुक्त झालेले नाहीत . या देशातून होणाऱ्या विषाणू प्रवेशामुळे पोलिओमुक्त भारत अभियानाला खीळ बसू शकते .

व्ही . डी . पी . व्ही . म्हणजे काय ?

तोंडावाटे देण्यात येणारी लस ही ‘ लाइव्ह ‘ असते . यात पोलिओचा जिवंत जंतू शरीरात सोडला जातो . तो पोलिओविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती निर्माण करतो . परंतु , ५० लाखात एखाद्या बालकाला विषाणूमध्ये जनुकीय बदल ( म्यूटेशन ) होऊन पोलिओ होऊ शकतो .

काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातील बीड येथे सापडलेला रुग्ण अशाच प्रकारातला आहे , यावर जागतिक आरोग्य संघटनेने शिक्कामोर्तब केले आहे . बीडप्रमाणेच असे तीन रुग्ण बिहार आणि ओरिसा येथे सापडले आहेत . यालाच ‘ व्हॅक्सिन डिराइव्हड पोलिओ व्हायरस ‘ ( व्ही . डी . पी . व्ही . ) असे म्हणतात .

जेव्हा देशभरात ( नैसर्गिक पोलिओ ) चा एकही रुग्ण सलग तीन वर्षं सापडत नाही , तेव्हाच ‘ पोलिओमुक्ती ‘ जाहीर होते . यात व्ही . डी . पी . व्ही चा रुग्ण गृहीत धरला जात नाही जानेवारी २०१४ पर्यंत वाइल्ड पोलिओचा एकही रुग्ण सापडला नाही , तर भारत पोलिओमुक्त म्हणून जाहीर केला जाईल . ‘ पोलिओ निर्मूलन ‘ याचा अर्थ , जगातील एकाही देशात ‘ वाइल्ड पोलिओ ‘ किंवा ‘ व्ही . डी . पी . व्ही . ‘ चा रुग्ण सलग तीन वर्ष सापडता कामा नये . असे झाले तरच जगातून पोलिओचे निर्मूलन झाले असे म्हणता येईल .

आय . ई . ए . जी . ची सूचना

ही परिस्थिती लक्षात घेता , ‘ इंडियन एक्स्पर्ट अॅडव्हायजरी ग्रूप ‘ ( आय . ई . ए . जी . ) ने ‘ तोंडावाटे ‘ दिले जाणारे ‘ सबीन व्हॅक्सिन आणि इंजेक्शनद्वारा दिले जाणारे ‘ साक व्हॅक्सिन ‘ अशी दोन्हीही व्हॅक्सिन्स टप्प्याटप्प्याने बालकांना देण्याचे सुचविले आहे . इंजेक्शनद्वारा देण्यात येणाऱ्या व्हॅक्सिनला ‘ किल्ड ‘ व्हॅक्सिन म्हणतात , कारण यातील विषाणू मृत असतात . त्यामुळे त्यांच्यात जनुकीय बदलाची कुठलीच शक्यता नसते .

या मृत लशीच्या तीन मात्रा घेतल्यानंतर १०० टक्के सुरक्षितता मिळते . तेव्हा आय . ई . ए . पी . च्या सुचनेनुसार आर्थिक , सामाजिक आणि वैज्ञानिक शक्ती एकवटून आपण पोलिओला ‘ गुडबाय ‘ करू या !

–रंजन गर्गे

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..