अखंड कोकणात जसे काँग्रेसी विचारांचे प्राबल्य होते तसे समाजवादी विचारांचा भारी पगडा होता. कार्यकर्ते आणि राजकारणही विचार, निष्ठा, सामाजिक बांधिलकी यावर आधारलेले होते. परंतु त्याकाळच्या शिवसेनेतही रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातीलच कार्यकर्ते होते. शिवसेनेतही मुंबईचा पहिला महापौर होण्याच भाग्य प्रि. वामनराव महाडिकांना लाभलं होतं. तत्पूर्वी काँग्रेसच्या स. का. पाटील या मालवणी सूपूत्राची मुंबापुरीवर हुकमत होती. जवाहरलाल नेहरू यांचे स. का. पाटील यांच्याशी फार जवळीक होती.
कोकण म्हणजे परमेश्वराला पहाटेच्यावेळी पडलेलं सुंदर स्वप्न असं वर्णन साहित्यिक करतात. कोकणातील निसर्ग सौंदर्य हे कुणालाही हेवा वाटणारे, भुरळ घालणारे असेच आहे. इथला समुद्र, स्वच्छ समुद्र किनारे, माडा-पोफळीच्या बागा, आंबा, फणसांच्या बागा हे सारच अवर्णनिय असच आहे. पूर्वी कोकण म्हटलं की ठाणे, रायगड, रत्नागिरी, मुंबई असा कोकण म्हटला जायचा. नंतर त्यात थोडा बदल आणि वाढही झाली. पूर्वीच्या अखंड रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन सिंधुदुर्ग जिल्हा निर्माण करण्यात आला. तर ठाणे जिल्ह्याच विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. आजही आणि पूर्वीही मुंबई शहर हे कोकणचाच भाग मानण्यात आला होता. आणि आजही आहे कोकणातील रायगड, पालघर, ठाणे हे जिल्हे मुंबईच्या शेजारीच आहेत. परंतु रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे मात्र 500 कि.मी. अंतरावर आहेत. परंतु कोकणवासियांच मात्र मुंबईशी एक वेगळच भावनिक नातं जोडलं गेलं आहे. त्यामागची असंख्य कारण आहेत. यातल प्रमुख म्हणजे नोकरी व्यवसाय निर्माण करणार शहर असूनही आपलं शहर असं एक जडलेलं नातं आहे. म्हणूनच नोकरी व्यवसायानिमित्ताने मुंबईकडे जाणाऱ्यांची संख्या पूर्वी फारमोठी होती. कोकणात चाळीसवर्षापूर्वी शिक्षणाच्या सोयी सुविधांचा कमालीचा अभाव होता. तालुक्यात दोन-चार माध्यमिक शाळा होत्या. दोन-तीन तालुक्यात एखाद महाविद्यालय असायचं यामुळे जेमतेम दहावीपर्यंतच काय ते शिक्षण! पुढील शिक्षण घेण्यासाठीची आर्थिक स्थिती नसायची. त्यामुळे पुढे शिकण्याची इच्छा असूनही अनेकांना शिक्षणच थांबवावे लागले. रोजगाराच्या संधी शोधत मुंबईकडे जावं लागलं. शिक्षक, वकील, डॉक्टर, इंजिनिअर अशा विविध क्षेत्रात पुढील शिक्षण घेण्याची कोणतीही सुविधा कोकणात नव्हती. यामुळेच वसई, विरार, ठाणे, मुंबई, रायगड याभागात अखंड कोकणातील तरूण विस्तारला आहे.
राजकीयदृष्ट्या कोकणाचा विचार करताना काँग्रेसपक्ष, प्रजासमाजवादी, जनसंघ, शेका पक्ष या विचारधारेशी कोकणवासिय जोडले गेलेले होते. या अखंड कोकणात जसे काँग्रेसी विचारांचे प्राबल्य होते तसे समाजवादी विचारांचा भारी पगडा होता. कार्यकर्ते आणि राजकारणही विचार, निष्ठा, सामाजिक बांधिलकी यावर आधारलेले होते. मुंबईच्या राजकारणातही कै. मृणालताई गोरे, प्रि. वामनराव महाडिक, स. का. पाटील अशा नावाचा दबदबा होता. शिवसेनेचा वावर हा तेव्हा मुंबईबाहेर नव्हता. परंतु त्याकाळच्या शिवसेनेतही रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातीलच कार्यकर्ते होते. शिवसेनेतही मुंबईचा पहिला महापौर होण्याचं भाग्य वामनराव महाडिकांना लाभलं होतं. तत्पूर्वी काँग्रेसच्या स. का. पाटील या मालवणी सूपुत्राची मुंबापुरीवर हुकमत होती. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे स. का.पाटील यांच्याशी फार जवळीक होती. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर मुंबईच राजकारण बदलत गेले. 1966 साली स्थापन झालेल्या शिवसेनेला सत्तेपर्यंत पोहोचायला तब्बल 29 वर्षे लागली. मुंबई महानगरपालिकेत तत्पूर्वी शिवसेना सत्तेवर आलेली परंतु कोकणातही 1990 सालीच कोकणात शिवसेनेचे आमदार निवडून आले. तत्पूर्वी कोकणात रायगडमध्ये पाटील बंधू आणि रत्नागिरी आजचा सिंधुदुर्ग समाजवादी विचारांच्या बॅ. नाथ पै यांच्या विचारांच, भाषणाच गारूड समाजमनावर होते. कोकणात समाजवादी विचार फार तळागळापर्यंत रूजलेला होता. 1977 च्या आणिबाणीनंतर तर तो अधिकार बहराला आला. त्यावेळच्या निवडणुकांमध्ये कोकण प्रांतात जनता पक्षाचे आमदार निवडुन आले. जयप्रकाश नारायण यांच्या विचारांनी अखंड भारत देश भारावुन गेला होता. यामुळे जनतापक्षाचे त्याकाळी आमदार निवडून आले. यातले अनेक चेहरे पुढच्या नंतरच्या काळात कुठे दिसलेही नाहीत. या काँग्रेस, समाजवादी वातावरणातही कुसूमताई अभ्यंकर या जनसंघाच्या आमदार म्हणून रत्नागिरीतून निवडून यायच्या त्याकाळच्या राजकारणाची आणि कोकणच्या जनतेचीही एक गंमत होती. लोकसभेत समाजवादी विचारांचे लोकप्रतिनिधी निवडून जायचे आणि विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जायचे. मात्र, 1977 च्या आणिबाणी नंतरच्या निवडणुकांमध्ये देशभरात काँग्रेसची पडझड झालेली असताना मात्र देवगड पंचायत समिती काँग्रेसने आपल्याकडे राखली होती. शिवसेना मुंबई, ठाणे या महानगरांमध्ये स्थिरावली होती. या दोन्ही शहरांच्या महानगरपालिका शिवसेनेकडे आल्या होत्या. 1980 नंतर कोकणातही काँग्रेस मजबुतीने उभी होती. तोपर्यंत समाजवादी विचारांची जनमाणसावरील पकड हळूहळू कमी होत गेली होती. मुंबईतही मोहन रावले खासदार म्हणून लालबाग-परळ भागातून सतत लोकसभेत निवडून येत राहिले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची पहिली संधी बॅ. ए. आर. अंतुले यांच्या रूपाने कोकणाला मिळाली. तत्पूर्वी महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात एखाद राज्यमंत्रीपद कोकणाच्या वाट्याला यायचे. बॅ. ए. आर. अंतुले यांच्यापूर्वी हंगामी मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेब सावंत यांना संधी मिळाली होती. दळणवळणच्या बाबतीत बॅ. ए. आर. अंतुले यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले, तर बाळासाहेब सावंत यांनी कोकणात फलोद्यानातून विकासाची संकल्पना मांडली. त्यानंतर 1997 मध्ये मुख्यमंत्री म्हणून नारायण राणे यांना संधी मिळाली. आठ महिन्यांचाच कालावधी त्यांना मिळाला. याकाळात रस्ते, पाणी, वीज आणि पर्यटन विकास यावर भर देऊन काम केलं गेलं. मधल्या कालावधीत शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकणातीलच आहेत. 1995 कोकणचे राजकारण बदलत गेले. काँग्रेस तर आजच्या घडीला नाहीच आहे. काँग्रेस फुटून तयार झालेल्या राष्ट्रवादीचा रायगडमध्ये थोडाफार प्रभाव दिसतो. परंतु उर्वरित भागात अस्तित्वापुरतेच अशी स्थिती आहे. भारतीय जनता पक्षाचा पूर्वी कोकणात प्रभाव होता. आताच्या बदलत्या राजकारणात तो अधिक वाढत गेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील झालेले बदलाचे परिणामही कोकणातही आहेतच. कोकणातील औद्योगिकीकरण हे खरं तर ठाणे, रायगड पुरतेच मर्यादित राहिले. अन्यत्र बागायती, शेतीवर भर देत उदरनिर्वाह केला जातो. कोकणात उद्योग उभारणीही झाली पाहिजे. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि जनतेचा सकारात्मक प्रतिसाद यावरच कोकणातील समृद्धी आणि स्वयंसिद्धता अवलंबून आहे.
–संतोष वायंगणकर
(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)
Leave a Reply