अचानक आभाळ काळ्याकुट ढगांनी भरून यावं , तस हे गाणे ऐकलं कि होत . मन व्याकुळ होऊन जात . निराशेची धग काय चीज आहे हे जाणून घ्यायचे तर हे गाणे ऐकावे .
‘पूछोना कैसे मैने रैना बिताई , एक पल जैसे एक जुग बीता ,
जुग बिते मोहें निंदा ना आई ……… ‘
‘मेरी सुरत ,तेरी आंखे ‘ हा १९६३ सलातला एक सुंदर सिनेमा . एका कुरूप आणि दुर्दैवी जीवाची हि शोकांतिका होती . जे जग ‘कुरुपतेले ‘झिडकारत त्या जगात हा जीव आपल्यासाठी ‘जागा ‘ शोधतोय ! हा कुरूप’ प्यारे ‘ अशोक कुमारांनी ताकतीने उभा केलाय . ह्याच सिनेमातले हे गाणे .
हे गाणे सिनेमात दोन भागात आहे . पहिला भाग आहे ,ज्यात बाल अशोक कुमारला त्याचे सांभाळकर्ते वडील, कन्हैयालाल , हे गाणे शिकवतात . या गाण्यात त्यांनी जो गायक ‘गुरु ‘दाखवलाय तो पाहून त्यांच्या अभिनयाची उंची कळते . हा राग शिकवताना , स्क्रीन वरील त्यांच्या हरकती पट्टीच्या गायकाला लाजवतील अश्या आहेत ! कन्हैयालाल साठी पंडित शिव दयाळ बातीश आणि लहान अशोक कुमार साठी सुमन कल्याणपूर आवाज दिलाय . सुमन कल्याणपूर यांचा काय आवाज लागलाय ?, लहान मुलाच्या आवाजातला नैसर्गिक गोडवा जाणवल्या शिवाय रहात नाही !
हे गाणे’ अहिर भैरव ‘ या रागावर आधारित आहे . हा राग दुसऱ्या प्रहराचा म्हणजे साधारण सकाळी सहा ते नऊ दरम्यानचा . Morning Melody म्हणावा असा . या गाण्याच्या पहिल्या भागात फक्त ‘ पूछोना कैसे मैने रैना बिताई ‘ हि एकाच ओळ घेतलीय . या ओळीची अनेक अंगानी गायकी जी पंडित शिवदयाळजीं नी ऐकवली आहे , ती या रागाचा वस्तुपाठच म्हणावा . नुस्ती आलाप आणि ताणांची बरसात आहे ! या गाण्याचे संगीतकार सचिन देव बर्मन (दादा ),यांनी तबल्यावर लावलेला अध्धा ताल या रागाची लय अन लज्जत वाढवून गेलाय . हा पहिला भाग म्हणजे ‘कानसेनां ‘साठी मेजवानी आहे .
दुसरा भाग म्हणजे सम्पूर्ण लांबीचे गाणे . यात मन्नाडे अशोक कुमारान साठी गातात . एक दिवस काय झाले कि , सचिनदा ,रात्री नऊच्या दरम्यान मन्नाडे कडे ,हातात कागदाचा चिठोरा घेऊन आले आणि म्हणाले ‘ तुमची पेटी काढा ,हे नोटेशन ,उद्या आपल्याला हे गाणे रेकॉर्ड करायचे आहे !’ आणि हे गाणे तयार झाले . या गाण्यात मन्नाडे काय गाऊन गेलेत ?! त्यांच्या गाण्यातली सहजता इतकी सुंदर आहे कि ,या रागाच्या चौकटीत त्यांचा आवाज एखाद्या घड्याळाच्या लंबका सारखा एका लयीत हेलकावे खातो . या गाण्याला हवी असलेली ‘करुणा ‘ त्यांच्या आवाजात आहेच .
प्यारे या पात्राच्या निराश मानसिकतेला , साजेलशे भावपूर्ण गाणे लिहलंय शैलेंद्रजींनी . या गाण्याच्या लेखनासाठी केवळ सलाम करून भागणार नाही , आजन्म ऋणी राहावे लागेल . इतकी घट्ट आणि जाड ‘निराशा ‘ कोणी गीतात बंदिस्त केल्याचे माझ्या तरी ऐकण्यात नाही !मन्नाडे याचा आवाज आणि अशोक कुमारचा अप्रतिम अभिनय दगडाच्या काळजाला सुद्धा पाझर फोडून जाईल . मन्नाडेच्या आवाजातली कातरता ‘ताडपत ,तरसत उमर गवाई ‘ हे पहिल्या कडव्यांच्या शेवटच्या ओळीला ,आणि ‘ ज्योत के प्यासे मेरे नैन बेचारे , भोरभी किरण कि आस न लाये ‘म्हणताना शिगेला पोहचते . ऐकताना वाटते डोळ्यातून पाणी झिरपले असतेतर बरे झाले असते , पण तसे होत नाही !मन सुन्न होऊन जात !
बरेच जण या गाण्याचा संबंध काजी नझरुल इस्लाम (हे बंगालीत रवींद्रनाथ टागोरां इतकेच आदरणीय साहित्यिक ,गीतकार आहेत )यांच्या ‘अरुणो कांती के —-‘ या बंगाली गीताशी जोडतात . हे बंगाली गाणे आशा भोसलेंनी गायलंय . आजवर ओ .पी .नय्यरची आशा भोसले ऐकणाऱ्यांना हा गोड धक्का असेल . कोठे तो लाडिक ,खट्याळ ,मदहोश सूर आणि कोठे हा सय्यमीत गोडवा . अर्थात दोन्हीही अफलातूनच आहेत . अवखळ ,डोंगर कपारीतून झेपावणारा नदी जेव्हा सखल मैदानी भागात येते, तेव्हा जशी शांत होते , तसा या गाण्यासाठी आशा भोसलेंचा सूर लागलाय , राग अहिर भैरावास साजेलसा ! हे बंगाली गीत आणि ‘पूछोना कैसे मैने रैना बिताई , एक पल जैसे एक जुग बीता ,—-‘ हि दोन्ही गाण्याचे प्रेरणा स्थान , उस्ताद मुश्ताक हुसैन खान साहेबांच्या पारंपरिक बंदिश आहे .
एकूण काय तर सचिनदा ,मन्नादा , दादामुनी यांनी मिळून काळजाला हात घातलाय हे मात्र खरे . डोळे मिटून ऐकावे असे गाणे .
सु र कुलकर्णी .
आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . तोवर Bye .
(सदर लेखातील माहिती नेट वरील विविध site वरून मिळवली आहे . )