Holy places never had any beginning. They have been holy from the time they were discovered, strongly alive because of the invisible presences breathing through them – Giuseppe Tuccei.
असे म्हणतात, स्वर्ग ज्या ठिकाणी पृथ्वीला भेटतो त्या ठिकाणी देवदेवता वास्तव्य करतात. कदाचित म्हणूनच देवदेवतांनी आपले निवासस्थान म्हणून हिमालयाची निवड केली असेल. येथील हवा, निसर्ग, वातावरण इतके मधुर आहे की ते माधुर्य परमात्म्याकडूनच प्रसृत होत असले पाहिजे. हा सारा भूभाग एका उदात्त काव्याने भरून गेला आहे. भगवान विष्णूसुद्धा आपल्या दुसऱ्या अवतारात ‘कुर्मावतारात’ याच परिसरात प्रगटले. सर्वजण त्या परिसराला ‘कुर्मांचल’ म्हणून ओळखू लागले. वर्षे उलटली. लोक बदलले आणि कुर्मांचलचे ‘कुमाऊं’ झाले. चंपावत जवळच्या कानदेव पर्वतशिखराकडे हात दाखवून आजही लोक श्रद्धेने सांगतात, ‘श्रीविष्णूंनी या ठिकाणी कुर्मावतार धारण केला.’ या कुमाऊं प्रदेशात एक उंच पर्वत शिखरावरील माता भगवतीचे पुरातन स्थान उत्तर भारतातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. ‘पूर्णागिरी’ म्हणून हे स्थान ओळखले जाते. काहीजण या स्थानाला ‘पुण्यगिरी’ म्हणून संबोधतात. या स्थानाची उंची आहे साधारण ५४०० फूट.
पूर्णागिरीशी निगडित दोन कथा सांगितल्या जातात. दक्षाची कन्या सती. पित्याचा विरोध स्वीकारून सतीने शंकराशी विवाह केला व पतीच्या घरी कैलासाकडे प्रस्थान केले. एके दिवशी दक्ष राजाने एका यज्ञाचे आयोजन केले. सर्व देवदेवता, ऋषीमुनींना त्याने आमंत्रित केले पण शंकराला व सतीला मात्र त्याने आमंत्रित केले नाही. जेव्हा सतीला या यज्ञाविषयी कळले, तेव्हा माहेरची ओढ, माता पित्यावरील प्रेम तिला खुणावू लागले. पित्याच्या घरी जाण्यासाठी आमंत्रणाची काय गरज? सती माहेराची वाटचाल करू लागली. शंकर मात्र आपल्या निवासस्थानीच, कैलासावर राहिले. सती एकटीच माहेरी पोहोचली. यज्ञ समारंभ सुरू झाला व सर्वांसमोर सतीकडे दक्ष शंकराबद्दल अपशब्द उच्चारून सतीला व शंकराला अपमानित करू लागला. सती पतीच्या अपमानाने उद्विग्न झाली. संतापली व शेवटी असह्य होऊन यज्ञकुंडात तिने उडी घेतली व आत्मसमर्पण केले. हे शंकराला कळले. त्यांना क्रोध अनावर झाला, त्यांनी वीरभद्राला यज्ञ समारंभ उद्ध्वस्त करण्याची आज्ञा केली. वीरभद्राचे यज्ञस्थळी आगमन झाले. त्याने सर्व समारंभ उद्ध्वस्त करून दक्ष राजाचा वध केला. काही वेळातच सतीच्या विरहाने व्याकूळ झालेले शंकर समारंभस्थळी आले. यज्ञकुंडात अर्धवट जळालेले सतीचे कलेवर खांद्यावर घेऊन ते तांडव नृत्य करू लागले. सर्व पृथ्वी भयभीत झाली. सतीच्या देहाचा शंकराला विसर पडावा व ते शांत व्हावेत म्हणून विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राच्या साहाय्याने सतीच्या देहाचे १०८ तुकडे केले. हे तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी शक्तिपीठे निर्माण झाली. सतीचे नाभीस्थळ एका उंच पर्वतशिखरावर पडले व जमिनीचा वेध घेत पर्वत पायथ्याशी वाहणाऱ्या नदी किनारी स्थिरावले. हे पर्वतशिखर म्हणजेच ‘पूर्णागिरी’. लोक या पर्वत शृंखलेला सतीच्याच नावाने ‘अन्नपूर्णा’ म्हणून ओळखू लागले.
तर दुसरी कथा सांगते, एकदा ब्रह्मदेवांनी एका यज्ञ समारंभाचे आयोजन केले. त्यासाठी त्यांनी एका निसर्गरम्य स्थानाची निवड केली. सर्व देव देवतांना आमंत्रणे पोहचली. एका शुभ मुहूर्तवर कैलासपती शंभू महादेवाचे आदिमाया पार्वतीसह समारंभस्थळी आगमन झाले. त्या स्थानाचे सौंदर्य पाहताच पार्वती मोहित झाली व त्या ठिकाणी वास्तव्य करण्याची इच्छा तिने शंकराकडे व्यक्त केली. शंकराने पार्वतीची मागणी मान्य केली. पार्वतीसह शंभू महादेव तिथे वास्तव्य करू लागले. हेच पूर्णागिरी स्थान. काही पुराणकथा सांगतात, पांडवांनी आपल्या वनवास काळात काही काळ या परिसरात व्यतीत केला होता.
पूर्णागिरी टणकपूरपासून २०-२१ कि.मी. अंतरावर आहे. दिल्लीहून टणकपूरसाठी बससेवा उपलब्ध आहे. साधारण ३३० कि.मी. चे हे अंतर असून या प्रवासाला ९-१० तास लागतात. मोरादाबाद, रूद्रपूर-खतीमा असा हा मार्ग आहे. लखनौ, नैनीतालहूनही टणकपूरला जाता येते. टणकपूर हे बऱ्यापैकी मोठे गाव असून सर्व प्रवासी सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. पायथ्याशी असलेल्या या गावाचे मूळ नाव ‘ब्रह्मदेव.’ १८८० साली ब्रिटिशांनी या गावाच्या स्थानाचे महत्त्व ओळखले. वस्ती वाढू लागली व आजचे टणकपूर जन्माला आले. हिमालयाच्या पर्वतरांगांचा निरोप घेऊन काली नदी या ठिकाणी मैदानी प्रदेशात प्रवेश करते व ‘शारदा’ नावाने आपला पुढचा प्रवास सुरू करते. या काली नदीने भारत व नेपाळची हद्द आखली आहे. टणकपूरपासून नेपाळची हद्द तर फक्त ३ कि.मी. अंतरावर आहे.
टणकपूरचे आकर्षण म्हणजे शारदा नदी व तिच्या काठावरील मंदिरे ! सूर्यास्ताची वेळ पश्चिमा निरनिराळ्या रंगाने माखलेली. समोर खळाळणारी निलवर्णी शारदा. मखमली स्पर्श करणारी वाऱ्याची झुळूक. सायंकालीन शेवटची सोनेरी किरणे पूर्वेकडील हिमालयाच्या फूट हिल्सवर रेंगाळत असतात. सर्व आसमंत सुवर्णकांतीने झळाळत असतो. हळूच किरणे मावळतात. वातावरण धूसर होते. टेकड्यांवर अंधाराची पावले पडू लागतात. आकार अस्पष्ट होऊ लागतात आणि अनादी अंध:काराच्या आवरणात सर्व काही लुप्त होते. उरते ती शारदा नदीची खळखळ व मधूनच ऐकू येणारा एखाद्या मंदिरातील घंटेचा नाद.
टणकपूरपासून पूर्णागिरीला जाण्यासाठी जीप उपलब्ध होतात. वाटेवर साधारण ८ कि.मी. अंतरावर एक नवीनच बांधलेले भगवती मातेचे आधुनिक पद्धतीचे सुंदर मंदिर आहे. जे लोक पूर्णागिरीला जाऊ शकत नाहीत ते या मंदिरात येऊन देवीच्या दर्शनाचा आनंद घेतात. आता सुरू होते टेकड्यांची, जंगलाची सोबत तर उजवीकडे शारदा नदी. पुढे ४ कि.मी. अंतरावर येतो तुळीगड. येथे भाविकांच्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध आहेत.
तुळीगडजवळ थोडी सपाटीची जागा आहे. त्याला ‘रानीघाट’ म्हणतात. जवळच एक शिवमंदिर आहे. तेथील काही भग्न अवशेषांकडे हात दाखवून काही भाविक ही ‘पांडवांची रसोई’ म्हणून दाखवतात. जवळचा चीड वृक्ष भीमाने लावला असेही सांगतात.
चढणीचा रस्ता सुरू होतो. जसजसे वर जावे तशी हवा सुखद होऊ लागते. एका बाजूला शारदा नदीचे विहंगम दृश्य. नागमोडी वळणे घेत, टेकड्यांना चुकवत, मुरडत जाणारी शारदा नदी. तिच्या पात्रात झालेली छोटी मोठी बेटे. आसमंतात पसरलेली वनराई. दूरवर दिसणारे टणकपूर तर नेपाळमधील काही खेडी. परिसरात पसरलेल्या पर्वतरांगा. निसर्गाचे रूप क्षणाक्षणाला बदलत असते.
६ कि.मी. अंतरावर येते टंकी. या ठिकाणी राहण्याची सुविधा उपलब्ध आहे व पुढे अर्धा किमी. अंतरावर येते ‘टुन्नास’. टुन्नासपर्यंत वाहने येऊ शकतात. टुन्नास या ठिकाणी महाकाल भैरवाचे पुरातन मंदिर आहे. भाविक भैरवाचे दर्शन घेतात व वाटचाल सुरू करतात. टुन्नास या ठिकाणी देवीने तुर्णा राक्षसाचा वध केला होता म्हणून हे स्थळ टुन्नास म्हणून ओळखले जाते. तसेच देवराज इंद्राने या ठिकाणी तपोसाधना केली होती. अशा आख्यायिका सांगितल्या जातात.
टुन्नास ते पूर्णागिरी हे ३ कि.मी. अंतर पायी जावे लागते. ही सर्व वाट जास्त करून पायऱ्यांची आहे. मधे थोडा चढ-उतार. वाटेवर जवळजवळ अडीच कि.मी. अंतर दुतर्फा दुकाने तसेच तात्पुरत्या निवासाची व स्नानाची व्यवस्था उपलब्ध आहे.
१००-१२५ वर्षांपूर्वी हा रस्ता अत्यंत अवघड होता. एका जवळजवळ सरळसोट कातळाला पडलेल्या अरूंद भेगेच्या कडेकडेने जावे लागे. नंतर त्या कातळाच्या कडेला पोलादी साखळदंड बांधण्याची व्यवस्था म्हैसूरच्या महाराजांनी केली होती. तरीही अपघात घडत. लोक मृत्युमुखी पडत. पण भाविकांची संख्या कमी होत नव्हती. कारण एकच, ‘देवीवरील श्रद्धा.’ आज मात्र हा रस्ता पूर्ण सुरक्षित आहे. पण जाताना त्यावेळी हा रस्ता कसा असेल याची पूर्ण कल्पना येते.
साधारण दीड ते दोन कि.मी. अंतर चालल्यावर एक छोटेसे तांब्याचे काळे पडलेले मंदिर दृष्टीस पडते. सर्वजण या मंदिराला ‘झूठा मंदिर’ म्हणून ओळखतात. या झूठा मंदिराची अशीच एक कथा! एका धनिकाने पुत्रप्राप्तीसाठी देवीला साकडे घातले व देवीला सांगितले की पुत्रप्राप्तीनंतर तुला सोन्याचे मंदिर अर्पण करीन. देवीने त्या धनिकाची मनोकामना पूर्ण केली. देवीला दिलेला शब्द धनिकाच्या लक्षात होता पण द्रव्यलोभ कोणाला सुटलेला नाही? त्याने तांब्याचे मंदिर बनवले व त्याला सोन्याचा मुलामा दिला. मंदिर घेऊन तो पूर्णागिरीची वाटचाल करू लागला. रस्ता अवघड. तशात उभी चढण. तो दमला, थकला, तहान लागली, सावली पाहून विश्रांतीसाठी बसला. मंदिर जमिनीवर ठेवले. पाणी प्याला, विश्रांती घेतली, ताजातवाना झाला. पुढची वाटचाल करण्यासाठी उठला. मंदिर उचलू लागला पण मंदिर हालेचना. खूप प्रयत्न केले पण मंदिर आहे तिथेच! आज हे मंदिर त्याच जागी आहे.
अजून थोडं पुढं गेलं की समोर शंकूच्या आकाराचे पर्वत शिखर दिसू लागते. आपण त्या शंकूच्या टोकावर पोहोचणार आहोत. त्या ठिकाणी माता भगवती आपली वाट पाहात बसली आहे. या मार्गाचा शेवटच्या साधारण एक कि.मी. अंतराचा टप्पा पूर्ण पायऱ्यांनी बांधला आहे. जाण्या-येणाऱ्यांसाठी वेगळ्या मार्गिका. दरीच्या बाजूला रेलिंग. सर्व मार्गावर पावसापासून, उन्हापासून, वाऱ्यापासून संरक्षण होण्यासाठी छत. येथे होणारी गर्दी विचारात घेऊन हा मार्ग बांधला आहे व तो पूर्ण सुरक्षित आहे. साधारण २० मिनिटात हे अंतर पार करून आपण मुख्य मंदिरापाशी पोहचतो. जाताना आपल्याला वाटत असते, हे एक मोठे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर असेल. पण पोहचल्यावर मात्र निराशा होते. कारण हे शिखर इतके निमुळते आहे की, मंदिर बांधण्यासाठी या ठिकाणी जागाच उपलब्ध नाही. एका छोट्याशा मंदिरातील अष्टधातूंच्या सिंहावर आरूढ माता भगवतीचे दिव्य रूप आपल्यासमोर उभे ठाकते. नकळत हात जोडले जातात. मस्तक झुकते. थकवा तर कधीच गेलेला असतो. भाविक आपल्या मनोकामना एका कागदावर लिहून त्या चिठ्ठया एका कापडात गुंडाळून मंदिरामागील एका झाडाला बांधून ठेवत असतात. त्यांना खात्री असते माता भगवती आपल्या मनोकामना पूर्ण करणार आहे.
हे मंदिर सकाळी उघडते व सूर्यास्तानंतर बंद होते. रात्री या ठिकाणी कोणीही थांबत नाही. असे सांगतात सिद्धबाबा नावाच्या एका साधूने या ठिकाणी रात्री राहण्याची ईर्षा केली तेव्हा देवी संतापली. तिने त्याचे दोन तुकडे केले. त्यापैकी एक तुकडा बनखंडी या/ठिकाणी तर दुसरा तुकडा समोरच्या पर्वतावर फेकला. आजही तो पर्वत सिद्धबाबाचा पहाड म्हणून ओळखतात. या परिसरात सिद्धबाबाची तीन मंदिरे आहेत व भाविक सिद्धबाबाच्या दर्शनाला आवर्जून जातात.
पूर्णागिरी पर्वत शिखराच्या आजूबाजूला ५ ते ६ हजार फूट उंचीच्या हिमालयाच्या पर्वतरांगा पसरल्या आहेत. सकाळी दूर डोंगराआडून सूर्योदय होत असताना आणि धुकं विरत असताना स्वप्न भासावं इतकं सुरेख दृश्य या ठिकाणाहून दिसते. समोर शारदा नदीच्या पलीकडे थेट नेपाळमध्ये जाणारे रूंद मोकळे खोरे. खोऱ्याच्या दोन्ही कडांना घनदाट वृक्षराजीने वेढलेले डोंगर आणि खोऱ्याच्या मधून नागमोडी वळणे घेत जाणारी शारदा नदी व तिच्या तीरावरील पाचूसारखे हिरवेकंच गवताळ पट्टे. दऱ्यांमध्ये धुक्याचे पट्टे तरळत असतात व त्याच्यावर सूर्यकिरणे पसरत असतात.
पूर्णागिरीला वर्षभर भाविकांची गर्दी असते पण विशेष उत्सवाचे दिवस म्हणजे मकरसंक्रांत, चैत्र महिना व नवरात्र. यावेळी तर हजारो भाविक देवीच्या दर्शनाला येतात. देवीच्या जयजयकाराने तिच्या स्तुती कवनाने सर्व परिसर दुमदुमून जातो. चैत्र महिन्यातील उत्सव जवळजवळ ४० दिवस सुरू असतो. इतका प्रदीर्घ चालणारा उत्सव क्वचितच.
पूर्णागिरीला अजून एक वदंता ऐकायला मिळते की, देवीची कृपा असलेल्या पुण्यवंत, भाग्यवंतांना पूर्णागिरीच्या समोरच्या पहाडावर दिव्य दिव्याचे दर्शन होते आणि विशेष म्हणजे सुप्रसिद्ध लेखक व शिकारी जिम कॉर्बेट यांनी हे दिवे पाहिले होते. त्यांनी तसा स्पष्ट उल्लेख आपल्या Temple Tiger and more maneaters of Kumaon या पुस्तकात केला आहे. १९२९ साली तालादेसच्या नरभक्षकाची शिकार करण्यासाठी जेव्हा ते या परिसरात आले होते, तेव्हा त्यांना हा दिव्य अनुभव आला. या अनुभवाबद्दल ते लिहितात-
‘टणकपूरपासून सोळा मैलांची आम्ही पायपीट केली. मी खूप दमलो होतो. रात्रीचे जेवण करून एका सुरक्षित जागी लावलेल्या तंबूत मी विश्रांती घेत होतो. इतक्यात नदीपलीकडच्या डोंगरावर मला एका ठिकाणी तीन दिवे पेटल्यासारखे दिसले. दरवर्षी जंगले जाळतात. एप्रिल-मे मध्ये वणवे पेटतात. या तीन ठिकाणचा उजेड पाहून तर्क लावला की, धुमसत्या ओंडक्यावर वाऱ्याचा झोत आल्याने. त्या ठिकाणी ज्वाळा उफाळल्या असतील. या ठिकाणचा उजेड पहात असताना वरच्या बाजूला मला आणखी दोन दिवे पेटलेले दिसले. या नव्या दिव्यांपैकी एक दिवा खाली सरकला व आधीच्या तीन दिव्यांपैकी मधल्या दिव्यात मिसळला. आता मला वाटू लागले, त्या ज्वाळा असाव्यात पण हा माझा तर्क बरोबर नव्हता. त्या ज्वाळा नसून दिवे होते. हे सर्व दिवे सारख्या आकाराचे असून त्यांचा व्यास साधारण दोन फूट होता. ते स्थिरपणे जळत होते. ज्योत हलणं, कमीजास्त होणं, धूर निघणं असे काहीच होत नव्हते. तेवढ्यात आणखी अनेक दिवे दिसू लागले. मला वाटले कुणीतरी राजा-महाराजा शिकारीसाठी त्या भागात आला असावा किंवा त्याची काही मोलाची वस्तू तिथे हरवली असेल व ती शोधण्यासाठी राजाने त्यांच्या लोकांना कंदील घेऊन पाठवले असेल. माझ्याबरोबर आलेल्या माणसांनासुद्धा या दिव्यांचे कुतूहल वाटत होते. आमच्यापासून हे दिवे साधारण १५० यार्डावर होते. तिकडून काही आवाज ऐकू येतो का असे मी माझ्या माणसांना विचारले तेव्हा आपल्याला कसलाच आवाज ऐकू येत नाही असे ती म्हणाली.
दुसरे दिवशी पुढच्या मुक्कामाकडे जाण्यासाठी आम्ही पहाटेच तंबूच्या बाहेर आलो. तांबडं फुटलं होतं. उजेड पसरत होता. दूरचेपण स्पष्ट दिसत होते. दिवे पाहिलेल्या डोंगराचा भाग मी पूर्ण निरखला. प्रथम डोळ्याने व मग दुर्बिणीने. एकाही मनुष्यप्राण्याच्या अस्तित्वाची तिथे कोणतीही खूण दिसत नव्हती किंवा धुमसणारी लाकडे पण दिसत नव्हती. उलटपक्षी एका नजरेतच कळत होते की तिथे वर्षभरात तरी वणवा पेटला नसावा. शिखरापासून पायथ्या पर्यंतचा तो डोंगरभाग खडकाळ होता. क्वचित कोठे खुरटी झाडं-झुडुपं उगवली होती. रात्री जिथे दिवे दिसले होते तो तर सरळसोट उभा कातळ होता. तिथे कोणी मनुष्य पोहचणंच शक्य नव्हते.
आपल्या बरोबरीच्या एका माणसाला जिम कॉर्बेटने पूर्णागिरीला पाठवले व त्याला सांगितले की, “पूर्णागिरीच्या मुख्य पूजाऱ्याला भेटून या दिव्यांची हकीगत सांगून त्याविषयी जास्तीत जास्त माहिती घे.”
जिम कॉर्बेटने पाठविलेला गंगाराम हा माणूस पूर्णागिरीच्या पुजाऱ्याला भेटला तेव्हा पुजाऱ्यांनी सांगितले की, “फार फार वर्षांपूर्वी कुण्या एका महत्त्वाकांक्षी साधूला देवीची बरोबरी करण्याची ईर्षा झाली. ज्या पर्वतशिखरावर जाण्यासाठी देवीने मनाई केली होती त्या पर्वतशिखरावर तो चढला. आपला आज्ञाभंग केला म्हणून देवीने त्या साधूला नदीपलिकडच्या डोंगरावर फेकले. पूर्णागिरीहून हद्दपार झालेला हा साधू दिवे लावून देवीची पूजा करतो. ते दिवे विशिष्ठ तिथीला दिसतात. (जिम कॉर्बेटला हे दिवे ५ एप्रिल रोजी दिसले होते) आणि हे दिवे ५ फक्त देवीची कृपादृष्टी लाभलेल्या पुण्यवंतानाच दिसतात.” जिम कॉर्बेट व त्याच्या माणसांना हे दिवे दिसले होते. कारण देवी ज्यांचे रक्षण करते त्या डोंगराळ मुलखातल्या गावकऱ्यांच्या हितासाठींच जिम कॉर्बेट व त्यांची माणसे तिथे गेली होती.
पूर्णागिरीला या आलेल्या अनुभवाबद्दल जिम कॉर्बेटने एका स्थानिक वृत्तपत्रात लेख लिहिला होता व तो लेख पूर्णागिरीच्या प्रमुख पुजाऱ्यांच्या वाचण्यात आला होता. हे दिवे दिसण्याचे भाग्य लाभलेला पहिला युरोपीय पुरुष म्हणून त्याचे अभिनंदन करण्यासाठी ते जिम कॉर्बेटला भेटले. ते दिवे ही एक वस्तुस्थिती आहे असे त्या पुजाऱ्याचे ठाम मत होते तर जिम कॉर्बेटने ते स्वत: पाहिले होते त्यांच्या मते, त्या दिव्याबद्दल दुसरे काही स्पष्टीकरण देणे शक्यच नव्हते.
त्या काळात सर माल्कम हॅले हे संयुक्त प्रांताचे गव्हर्नर होते. त्यांच्याही वाचण्यात जिम कॉर्बेटचा हा लेख आला होता. जेव्हा ते या भागाच्या भेटीवर आले होते तेव्हा त्यांनी या परिसराला मुद्दाम भेट दिली होती. नजिकच्या काळात मात्र हे दिवे कोणी पाहिल्याचे माहित नाही, पण या दिव्यांचे अस्तित्व आजही कोणी नाकारत नाही.
पूर्णागिरी हे पुरातन स्थान आहे. हिंदू धर्मावर आलेले मळभ दूर करण्यासाठी आदिशंकराचार्यांनी भारताच्या चार दिशांना चार मठांची स्थापना केली. त्यापैकी एक मठ त्यांनी जोशीमठ या ठिकाणी स्थापला व आपले शिष्य तोटकाचार्य यांच्याकडे या धर्मपीठाची जबाबदारी दिली. या मठासंबंधी आम्नाय सांगताना या मठाची देवी ‘पूर्णागिरी’ असे त्यांनी सांगितले आहे.
पूर्णागिरीचा हा सर्व पर्वत देवी स्वरूप मानला जातो. धार्मिक श्रद्धेने या पर्वतावरील झाडे-झुडपे तोडली जात नाहीत. उत्तराखंडातील सर्व श्री स्थानांच्यामध्ये हे स्थान महत्त्वाचे समजले जाते.
अनादि अनंत काळापासून माता भगवती हिमालयाच्या या पर्वतशिखरावर आजही आपल्या भक्तांची आतुरतेने वाट बघत बसली आहे. त्यांच्या मनोकामना तिला पूर्ण करायच्या आहेत. त्यांच्या संकटांचे निवारण करायचे आहे. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण तिला आनंदाचा करायचा आहे. त्यांच्या भक्तीत तिला स्वत:ला हरवून जायचे आहे. कारण भक्त हेच तिचे सर्वस्व आहे.
– प्रकाश लेले
Leave a Reply