नवीन लेखन...

पॉपस्टार रेमो फर्नांडिस

‘प्यार तो होना ही था‘ चित्रपटातील दमदार टायटल सॉंग, हम्मा हम्माचा सुपरहिट ताल आणि ओ मेरी मुन्नी सारखा हट के अल्बम, अशा आपल्या मोजक्या कामानेही संगीतकार रेमो फर्नांडिसने मनोरंजन क्षेत्रावर आपली मुद्रा उमटवली आहे. गोमंतकीय संस्कृतीचे वेगळेपण कायम आपल्या संगीतातून देशापुढे रेमो यांनी मांडले आहे. रेमो फर्नांडिस यांचे पूर्ण नावलुईस रेमो डी मारिया बर्नॅर्डो फर्नांडिस. त्यांचा जन्म ८ मे १९५३ रोजी झाला.

रेमोला नवी पिढी ओळखते ती त्याच्या ‘ओ मेरी मुन्नी’ या एकमेव हिंदी गाण्यांच्या अल्बमवरून. याहून थोडं मागे गेल्यास ‘प्यार तो होना ही था’ या अजय देवगण-काजोल च्या चित्रपटाच्या शिर्षकगिताचा गायक म्हणून आणि त्यापेक्षाही थोडं मागे गेल्यास ‘बॉम्बे’ चित्रपटात रेमोने गायलेल्या ‘हम्मा, हम्मा’ या गाण्यावरून त्याची ओळख अनेकांना पटेल. त्यापेक्षाही जुन्या लोकांना रेमोने गायलेल्या ‘ये है जलवा’ या गाण्यावर थिरकणारी अर्चना पुरणसिंग आठवेल. मात्र हिंदी चित्रपटात रेमोने गायलेली गाणी ही त्याच्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीचा एक टक्का देखील परिचय करून देण्यास समर्थ नाहीत, इतकी त्याची या क्षेत्रातील कारकिर्द मोठी आहे. रेमो फर्नांडिस यांचा पणजी येथे बर्नॅर्डो आणि लुईझा फर्नांडिस या गोवन कॅथोलीक दाम्पत्याच्या पोटी रेमो चा जन्म झाला, तेव्हा त्याचे वडिल गोव्यातील समाजवादी चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते होते.

घरात रॉक-पॉप संगिताचं वातावरण अजिबातच नव्हतं. एक दिवस रेक्स नावाच्या रेमोच्या चुलत भावाने पुण्याहून ‘रॉक अराउंड द क्लॉक’ नावाची एक रेकॉर्ड त्याच्यासाठी आणली. ‘बिल हॅलॅ ऍण्ड हीस कॉमेटस’ या अमेरिकेतल्या गाजलेल्या रॉक ऍण्ड रोल बॅण्डने तयार केलेल्या या रेकॉर्डने रेमोचं आयुष्यच बदलवून टाकलं. या वेळी रेमोचं वय होतं अवघं आठ वर्ष. त्यानंतरची दहा वर्ष रेमोने रॉक-पॉप क्षेत्रातील गुरूंची एकलव्य-स्टाईल मुशाफिरी करण्यात घालवली. ईल्व्हीस प्रिसले, क्लीफ रिचर्डस्, द शॅडोस, द रोलींग स्टोन्स, आणि द बिटल्स — एक ना अनेक रॉक बॅण्डला ऐकत तो मोठा होउ लागला. सत्तरच्या दशकात रॉक संगिताने अमेरिकेच्या सिमा उल्लंघून जगाला वेड लावायला सुरवात केली. लॅटीन, आफ्रिकन, वेस्टर्न क्लासिकल, आणि जॅझ संगिताबरोबर रॉक म्युजिक चे फ्युजन बनु लागले, आणि हळूहळू ‘लेट्स रॉक’ हे सगळ्या जगाचंच आवडतं वाक्य बनलं. रेमो त्या वेळी शाळकरी होता. मात्र शाळेतील चार मित्रांबरोबर त्याने ‘बिट फोर’ नावाचा रॉकबॅण्ड तयार केला होता. या बॅण्डबरोबर काम करतांना त्याच्या हाती गिटार आली, आणि तेव्हापासून बास गिटार आणि रेमो यांचं अतुट नातं जुळलं ते आजतागायत कायम आहे. शालेय शिक्षण संपवून रेमो आर्किटेक़्ट बनण्यासाठी मुंबईला आला. मायानगरी म्हणजे कलाकारांचं नंदनवनच. कॉलेजला बुट्टी मारून गिटार वाजवण्याच्या कार्यक्रमांना जाणे हा रेमोचा आवडता उद्योग बनला. या कालावधीत त्याने हिंदी आणि मराठी भाषा शिकली. सितार आणि बासरी कशी वाजवायची हे तो स्वतःहूनच शिकला. आज हिंदी, मराठी, कोकणी, ईंग्रजी, पोर्तुगिज आणि फ्रेंच या भाषांमध्ये तो गाणी लिहतो.

गोवन, पोर्तुगिज, सेगा, मॉरिशस आणि सिसेलस, आफ्रिकन, लॅटिन, क्युबा, निकाराग्वा या सगळ्या संगितप्रकारांमध्ये ही गाणी कंपोज करतो. आणि जगभर ही गाणी सादर करतो. गोव्यात लहानाचा मोठा होत असतांना रेमोने अनेक युरोपिअन हिप्पी पाहिले होते. तेव्हाच त्याने युरोपमध्ये ‘ईंडियन हिप्पी’ बनुन जायचं असं ठरवलं होतं. आज आपलं स्वप्न तो जगतोय. मुंबईतील चार वर्षांचं वास्तव्य आणि त्यानंतर वेगवेगळ्या बॅण्डबरोबर केलेले युरोप आफिकेचे दौरे रेमोला गोव्यापासून तोडू शकले नाहीत. युरोपमध्ये स्थायिक होण्याची सुवर्णसंधी जवळ असतांना हा अवलीया भारतात परत आला. गोव्यात मात्र त्याचं हवं तसं स्वागत झालं नाही. ‘घर की मुर्गी दाल बराबर’ या भारतीय लोकांच्या स्वभावाचा त्याला परिचय आला. ईंग्रजीत लिहलेली आणि कंपोझ केलेली रेमोची गाणी रेकॉर्ड करायला एकही कंपनी तयार होई ना. आणि आपल्या संगित साधनेशी तडजोड करायला रेमो तयार नव्हता. १९८० च्या दशकामध्ये भारतीय रेडिओ स्टेशन्सवरदेखील रॉक पॉप संगिताला अनुकुल वातावरण नव्हते. त्यामुळे गाणं लोकांपुढे आणावं कसं, हा यक्षप्रश्न रेमोपुढे होता. मात्र हार मानेल तो रेमो कसला?

गोवन क्रेझी नावाची एक रेकॉर्ड कॅसॅट त्याने पोर्टास्टुडिओ या घरगुती टेपरेकॉर्डरवर रेकॉर्ड केली. यातली सगळी गाणी रेमोनं स्वतः लिहली, संगितबद्ध केली आणि रेकॉर्ड केली. गाण्यातील विविध आवाज त्याने एकट्याने काढले. सगळी वाद्ये स्वतःच वाजवली. स्वतःच साउंड इजिनिअर बनुन या अल्बमचं मिक्सिंग केलं. अल्बमचं कव्हरही स्वतःच डिझाईन केलं. आणि मुंबईला जाऊन कॅसॅटसच्या प्रती काढून आणल्या. या कॅसॅटस घेऊन तो आपल्या तुटक्या स्कुटरवर गोव्यातील मार्केटमध्ये स्वतः फिरायला लागला. दुकानदारांना आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्याने आपल्या गाण्याच्या बोलांचं एक पुस्तकही स्वतःच्या हस्ताक्षात लिहून स्वतःच सायक्लोस्टाईल प्रिंटरवरती प्रकाशित केलं. शिवाय पोस्टकार्ड, टि शर्ट्स आणि टोप्यांवरती आपल्या अल्बमचं चित्र काढून या गोष्टी कॅसॅटसबरोबर वाटायला सुरवात केली. याला मेहनत म्हणावे की साधना की वेड म्हणावे? हे अविश्वसनिय काम रेमोने एक दोन नव्हे, तर तब्बल सहा वर्षांपर्यंत केलं. ‘गोवन क्रेझी’ नंतर त्याने ओल्ड गोवन गोल्ड आणि ईतर कॅसॅटसही प्रकाशित केल्या.

सन १९८६ पंतप्रधान राजीव गांधी यांची गोवा भेट. या भेटीदरम्यान रेमोने ‘हॅलो राजीव गांधी’ हे गाणं स्टेजवर सादर केलं. यात राजीव गांधी यांना ‘ड्युड, बडी’ अश्या एकेरी संबोधनांनी संबोधीत केल्यामुळे रेमो नव्याच वादामध्ये फसला. मात्र शेवटी राजीव गांधींनीच हे गाणं आपल्याला मनापासून आवडल्याचं जाहीर केलं आणि रेमोची या वादातून सुटका झाली. यामुळे त्याला भारतभर प्रसिद्धी मात्र मिळाली. २००७ मध्ये मिळालेला पद्मश्री पुरस्कार ही याची पावतीच म्हणावी लागेल. रॉक म्युजीकचा उपयोग जन-आंदोलनादरम्यान लोकांच्या भावना बोलत्या करण्यासाठी केला जातो, याची रेमोला जाणीव आहे. त्यामुळेच त्याने भोपाळ गॅस दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी झालेल्या संगितमय कार्यक्रमामध्ये स्वतःसाठी दोन गाणी मागुन घेतली. हा कार्यक्रमा आणि त्यानिमित्ताने ही गाणी त्यावेळला दुरदर्शनवरून संपुर्ण देशभर दाखवली गेली आणि रेमोचं नाव युवकांच्या ओठावर येऊ लागलं. याच दरम्यान जलवा चित्रपटाचं शिर्षकगित गाण्याची ऑफर त्याला आली आणि तेव्हा मुंबईतच असल्यामुळे त्याने सहज म्हणुन ते गाणं गायलं. पुढे या गाण्याने काय चमत्कार घडवला ते आपण जाणतोच.
बॉलीवूड मध्ये नावारूपाला आल्यावर मुंबई सोडण्याचं जिगर मोठमोठे कलाकार दाखवू शकत नाहीत. रेमो मात्र या सगळ्याला अपवाद आहे. कुणातरी (रॉक न जाणणार्र्या) संगितकाराने बनवलेलं गाणं कुणातरी (रॉक न जाणणार्र्या) गितकाराने लिहलेलं गित आपण त्यांच्या स्टाईलमध्ये गायचं, म्हणजे आपल्या संगिताचा अपमान आहे असं त्याचं मत होतं. त्यामुळे बॉलीवुडसाठी गाणी म्हणायचं त्याने टाळलं.

१९९५ मध्ये ए आर रेहमान ने मणिरत्नमच्या ‘बॉम्बे’ चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीमध्ये ‘हम्मा हम्मा’ हे गाणं गाण्यासाठी रेमो ला विनंती केली. या गाण्याचे हिंदी बोल मात्र मी लिहणार, आणि ते माझ्या पद्धतीने सादर करणार, असा बाणेदारपणा प्रत्यक्ष रहमानला दाखवण्याचं धाडस रेमोच करू जाणे. मात्र या गाण्याने रेमोबरोबरच रेहमानसाठीही रसिकांच्या मनाची कवाडे खुली केली, यात शंका नाही.
या दरम्यान रॉक सिंगर म्हणुन त्याचे अनेक अल्बम्स येत गेले आणि ते भारतीय उपखंडाबरोबरच युरोपातही लोकप्रिय होत गेले. दिग्दर्शक अनुराग कश्यकप दिग्दर्शित ‘बॉंबे वेलवेट‘ चित्रपटातून रेमो फर्नांडिस याने अभिनय केला आहे. मात्र हे सगळं काम रेमोने गोव्यात राहूनच करायचं असं ठरवलं होतं. गोवा या आपल्या जन्मभुमी बद्दल त्याच्या मनात असलेल्या प्रेमाचं ते प्रतिक आहे. ख्रिस्चन आणि हिंदू संस्कृतीचा मिलाप असलेल्या गोवा सिओलीम झागोर फेस्टीवल मध्ये रेमोच्या गाण्याशिवाय लोकांचे मन भरत नाही. शिवाय गोव्याचा गणेशोत्सव रेमोच्या बासरिशिवाय पुरा होत नाही. रेमोच्या घरीदेखील गणपतीबाप्पा येतात आणि दहा दिवसांचा उत्सव साजरा होतो. मुळची फ्रेंच असलेली त्याची पत्नी मिशेल आणि दोन मुले आजही गोव्यातील सिओलीम या खेड्यात असलेल्या त्यांच्या घरातच राहतात. मुले राज्य शासनाच्या शाळेत जातात. गोव्याच्या राजकारणात आपल्या वडिलांचा समाजवादाचा संदेश रेमो आपल्या गाण्याच्या माध्यमातून पसरवत असतो. कोकणी भाषेतील त्याची गाणी निवडणुकीदरम्यान प्रचारात वापरली जातात. गोव्याच्या उत्कर्षासाठी तेथील राजकारण्यांवर आणि राजकारणावर तो नेहमीच कडक शब्दात टिका करत असतो.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / गौरांग प्रभु

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..