चित्रपट हे एक माध्यम आहे. त्यामुळे या माध्यमातून परिवर्तनही घडवता येऊ शकतं. या माध्यमाचं काम केवळ मनोरंजनात्मक न राहता विविध विषय हाताळून विस्तारत जात आहे. बायोपिक चित्रपट हे देखील त्यातीलच एक. बायोपिक चित्रपट प्रेक्षकांना ऊर्जा देण्यासाठी बनवले जातात.
लोकमान्य एक युगपुरष, डॉ. प्रकाश बाबा आमटे, महानायक वसंत तू, यशवंतराव चव्हाण-बखर एका वादळाची, हरिशचंद्राची फॅक्टरी असे विविध बायोपिक याआधी मराठी चित्रपटसृष्टीत येऊन गेले आहेत. या चित्रपटातून केवळ संबंधित व्यक्तीचं चित्रणच नव्हे तर त्या चित्रपटातून प्रेक्षकांनी काहीतरी आत्मसात करावी एवढी निर्माता-दिग्दर्शकाची अपेक्षा असते. निखिल फिल्म्स निर्मित ‘ब्रेव्हहार्ट, जिद्द जगण्याची’ या चित्रपटाची कथादेखील प्रेक्षकांना उर्मी देणारी, आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला लावणारी आहे.
आपल्या आयुष्यात आलेले दु:ख विसरून उरलेल्या दिवसात जितकं जास्त आनंदाने जगता येईल याचा विचार करणारा निखिल कारखानीस. त्याला फिरण्याची, वाचनाची, लेखनाची, खाण्याची प्रचंड आवड. खऱ्या अर्थाने तो रसिक होता. आयुष्याकडे बघण्याचा त्याचा सकारात्मक दृष्टिकोनच त्याला जगण्याची उर्मी द्यायचा. मात्र नियतीने त्याला एका वेगळ्या वळणावर आणलं होतं. एका दुर्दम्य आजाराशी त्याची गाठभेट होते आणि आयुष्याचा खरा प्रवास सुरू होतो.
आपण किती जगतो यापेक्षा आपण कसं जगतो याकडे तो जास्त महत्त्व द्यायचा. कालांतराने तो रोग बळावू लागला. मात्र दुखण्याकडे लक्ष न देता तो आनंदाने जगत राहिला. याच काळात तो लंडन दौरा करून आला. शिवाय अंदमानसारख्या ठिकाणी जाऊन आला. ही सत्य घटना या चित्रपटामार्फत सांगण्यात आली आहे. त्याने या साऱ्या प्रसंगांना तोंड कसं दिलं, त्यावेळेस त्याच्या मदतीला कोण कोण धावून आले हे तुम्हाला चित्रपट पाहताना कळेलच.
ही कथा निवेदनात्मक स्वरूपात मांडली जाते. पिल्लू काका म्हणजेच अतुल परचुरे हे या कथेचे निवेदन करताना दिसतात. निवेदन करताना ते सांगतात की, मी निखिलचा पिल्लू काका. मात्र संपूर्ण कथेत ते कुठेच दिसत नाही. कथा फार उत्तेजन देणारी आहे. या कथेमुळे निखिलविषयी कौतुक वाटतंच मात्र त्याहीपेक्षा त्याच्यासोबत राहिलेल्या त्याच्या बाबांविषयी फार आत्मियता वाटते.
अरुण नलावडे यांनी निखिलच्या बाबांची भूमिका चोख बजावली आहे. शिवाय अभिनयाच्या बाबतीत हा चित्रपट महत्त्वाचा ठरतो, कारण यामध्ये सुलभा देशपांडे यांचा शेवटचा अभिनय अनुभवता येणार आहे. निखिलची आजीची भूमिका त्यांनी यात साकारली आहे. किशोर प्रधान यांचीही लहान भूमिका या चित्रपटातून पाहायला मिळते. त्याचप्रमाणे डॉ. विलास उजवणे, विजय चव्हाण, इला भाटे आदी दिग्गज कलाकारांचाही अभिनय पाहता येणार आहे.
चित्रपटाच्या मांडणीपेक्षाही कथा फार उजवी वाटते. सत्य घटनेवर आधारित कथा असली तरी त्याला पटकथा आणि संवाद दिले आहेत श्रीकांत बोजेवार यांनी. शिवाय त्यांनीच गीतेही लिहिली आहेत. दिग्दर्शन दासबाबू यांनी केलं आहे. निखिलचे विविध वैशिष्टय़ यात मांडता आले असते मात्र काही प्रसंग उगीचच लांबवून चांगले प्रसंग दाखवण्यात दिग्दर्शन कमी पडले असे वाटते. निखिलला लिखाणाची आवड होती असं सतत सांगितलं जातं मात्र प्रत्यक्षात चित्रपटात निखिल कुठेच त्याची ही आवड जोपासताना दिसत नाही. शिवाय त्याला ट्रेकिंगचीही आवड होती. मात्र ट्रेकिंगचीही आवड फार जोपासलेली दिसत नाही.
चित्रपटाचा खरी कथा होती ती म्हणजे एवढय़ा दुर्दम्य रोगावर मात करूनही निखिल काम करत होता, उत्साही होता. त्याने अखेपर्यंत प्रत्येकाला पॉझिटिव्ह ठेवलं. दु:खाला हसऱ्या मुखाने सामोरं गेला. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा चित्रपट जेवढा रंगवायला हवा तेवढा रंगलेला दिसत नाही. सिनेमातील काही प्रसंग वगळता चित्रपट आलबेल सुरू असलेला दिसतो.
छायाचित्रण विली यांनी केलं असून, संकलन पराग सावंत यांनी केलं आहे. तर संगीत अर्नब चटर्जी, पार्श्वसंगीत अमर मोहिले यांनी केलं आहे. सुरेश वाडकर आणि साधना सरगम यांनी गाण्याला आवाज दिला आहे. एकंदरीत तांत्रिक बाजू चांगल्या जमून आल्या आहेत. सच्चिदानंद कारखानीस आणि संतोष मोकाशी निर्मित ब्रेव्हहार्ट हा चित्रपट बाप-मुलाच्या नात्यातील हळवेपणा, निखिलचा जिद्दीचा प्रवास, दु:ख हसरं कसं करावं यावर आधारित आहे.
दर्जा : अडीच
Leave a Reply