नवीन लेखन...

सकारात्मकता

परमेश्वराचं अस्तित्व हा सातत्यानं चर्चिला जाणारा विषय. कोणी ते सहजी मान्य करतात, तर कोणी बिलकूल नाही. प्रत्येकाला आपली बाजू मांडण्यासाठी भरपूर उदाहरणं असतात. काही विज्ञानावर सिद्ध करता येतात, तर काही विज्ञानासाठीही गूढ. नेमकं काय असावं? विचार करायला लागलो, की प्रश्नांची भेंडोळी पुढे सरकत राहतात अन् उत्तरं… उत्तरं सापडली तर मग प्रश्नाचं अस्तित्व राहिलं असं कसं म्हणता येईल? अशीच काही प्रश्नांची भेंडोळी घेऊन मी एकदा माझ्या आध्यात्मिक गुरूंच्या भेटीला गेलो. चार-पाच वर्षे झाली त्याला. अम्मा-भगवान या नावानं जगात सर्वदूर त्यांना ओळखलं जातं. आमची भेट झाली. चेन्नईपासून शंभरएक किलोमीटरवर असलेल्या वरदेपालयम येथील त्यांच्या आश्रमात. सध्या तिथं वननेस विद्यापीठ साकार झालंय… तर आमची भेट झाली अन् सर्वप्रथम मी सांगितलं की, भगवान परमेश्वर खरोखर आहे का? तो दिसतो का? जाणवतो का? माझा एक मित्र तर म्हणतो, “परमेश्वर वगैरे झूठ आहे. मीच भगवान आहे.” भगवान म्हणाले, “परमेश्वर आहे. तो जाणवतो, तो दिसतो हे जेवढं खरं आहे. तेवढंच तुमचा मित्र भगवान आहे हेही खरं. आता हे पाहा रस्त्याच्या कडेला तुम्ही उभे आहात. वाहतूक सुरू आहे. अचानक एक वाहन अतिवेगाने तुमच्याकडे येताना दिसतंय. त्या वाहनचालकाचा वाहनावरचा ताबा सुटलाय. कोणत्याही क्षणी तुम्ही त्याखाली सापडणार आहात. पळण्याचं त्राण नाही. तेवढा अवधीही नाही. आता केवळ जे होईल त्याचा स्वीकार करणं एवढंच हाती आहे. त्याला पर्यायही नाही. आपलं मरण आपल्याच डोळ्यांनी पाहावं असा हा प्रसंग… अन् अगदी क्षणात एक हात पुढे येतो. तुम्हाला धक्का देतो. तुम्ही रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळता. त्याचवेळी ते वाहनही भेलकडत तुमच्या पुढे जाऊन खड्ड्यात कोसळतं. तुम्हाला फारतर खरचटलं आहे. तुम्ही जिवंत आहात. कोणी धक्का दिला तुम्हाला? तुम्ही पाहाता. एक खेडूत. अशिक्षित. तो तुम्हाला सावरायला पुढे येत असतो. तुम्ही म्हणता, अगदी देवासारखा आलास. तुझ्यामुळं आज मी जिवंत आहे. हा जो खेडूत आहे तो घटनेपूर्वीही तुमच्या आसपासच होता; पण त्याच्याकडे तुमचं लक्ष गेलेलं नव्हतं. त्याचं अस्तित्व जाणवलेलं नव्हतं. आता ते जाणवलेलं आहे. तो देवासारखा आला, असं म्हणतो आपण, पण तो तर खरा परमेश्वरच! त्याला ओळखण्याची दृष्टी हवी. मनाच्या गाभाऱयात कृतज्ञता हवी. खरंतर तो परमेश्वर सततच तुमच्यासोबत असतो. तुम्ही श्वास घेता म्हणजे काय करता? आपण श्वासोच्छ्वास घेतो याची जाणीवही नसते. आपल्याला क्षणोक्षणी जिवंत ठेवणाऱया त्या परमेश्वराचं अस्तित्व मान्य करण्याची वृत्तीही नसते. तेवढा कृतज्ञभावही नसतो; पण जेव्हा तुमचं नाक-तोंड दाबलं जातं किंवा तुमची घुसमट होते तेव्हा परमेश्वराची आठवण येते.”
भगवानांनी परमेश्वरी अस्तित्वाचं निरूपण साध्या-सोप्या शब्दात केलं. त्यावेळी ते पटलंही; पण या भेटीनंतरही तो प्रश्न मनातून हद्दपार झाला असं नव्हे. कारण हे सारं प्रत्यक्षात कसं आणायचं? प्रश्न सुटत नव्हता. सहा महिन्यांपूर्वी पुण्यात डॉ. विजय सावंत यांना भेटायला गेलो. महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनचे ते कार्यकारी संचालक आहेत. ज्येष्ठ संगणकतज्ञ विजय भटकर यांच्यासमवेत त्यांनी या क्षेत्रात मोलाचं कामही केलंय. डॉ. सावंत यांच्याशी चर्चा सुरू होती. वेगवेगळे विषय येत होते अन् अधूनमधून त्यांचे फोनही सुरू होते. एक फोन आला. बहुधा राजकीय क्षेत्रातल्या एखाद्या प्रभावी व्यक्तीचा असावा. या संवादात पलीकडचा माणसू काय बोलतोय हे कळत नव्हतं; पण त्याचा अंदाज बांधता येत होता. तो सांगत होता, “उद्या मी त्या उमेदवाराला तुमची भेट घ्यायला सांगतो. त्याला वेळ द्या. समजावून घ्या. तुम्हाला रोज अनेक लोक भेटत असतील; पण त्याला इतर अनेकांप्रमाणं समजू नका. कारण मी त्याला पाठवतोय… वगैरे!” या संवादातलं….विजय सावंत यांचं उत्तर, विवेचन मात्र मी ऐकू शकत होतो. ते म्हणाले, “अवश्य पाठवा. मी भेटेन त्याला. काय हवी ती मदतही करीन. तुम्ही काळजी करू नका… हो! हो!! रोज अक्षरश शंभर-दोनशे लोकांना मी भेटतो हे खरंय; पण मला भेटणारा प्रत्येकजण परमेश्वराचाच अवतार आहे या भावनेनं मी त्यांना भेटतो. त्यामुळं माझ्या दृष्टीनं इतर असं कोणीच नसतं. तुम्ही सांगा त्यांना – मी भेटेन.’
आपल्याला भेटणारा प्रत्येक माणूस हा परमेश्वराचा अवतारच आहे, अशा भावनेनं रोज शेकडो लोकांना भेटणं ही भावनाच मला अंतर्मुख करून गेली. सकारात्मकता म्हणजे यापेक्षा वेगळी काय असते? व्यावसायिक अभ्यासक्रम असो, की तणावनिर्मूलन की व्यक्तिमत्त्वविकास या साऱयात सकारात्मकता सांगितली जातेच ना? काही लोक त्याला परमेश्वर म्हणत असावेत. आपल्या भोवताली स्वार्थ, इर्षा, असूया काही कमी नाही; पण त्यातला परमेश्वर पाहायला हवा. दृष्टी जोपासायला हवी. मग त्याला परमेश्वरी अंश म्हणा किंवा तुम्ही जोपासलेली सकारात्मकता…

— किशोर कुलकर्णी

Avatar
About किशोर कुलकर्णी 72 Articles
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..