नवीन लेखन...

पाकिस्तानकडून समुद्री दहशतवादी हल्ल्याची शक्यता

पाकिस्तानचे  समुद्री हल्ल्याचे नियोजन 

इंटेलिजन्स ब्युरोकडून एक महत्त्वाची माहिती हाती लागली आहे, ज्यामध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्करे तोयबा, जैश ए मोहम्मद समुद्रातुन महाराष्ट्र, गुजरात राज्यांच्या किनार्यावर असलेल्या महत्वाच्या स्थळांवर/आस्थापनांवर हल्ले करून नुकसान पोहोचवू शकतात. हाती आलेल्या माहितीनुसार जैश ए मोहम्मदचे 600 दहशतवादी लष्करे तोयबा बरोबर पाकिस्तनच्या समुद्रामध्ये प्रशिक्षण घेत आहेत. त्यात बोटी चालवणे, पाण्याच्या आत जाऊन बंदराच्या आत महत्त्वाच्या ठिकाणी स्फोटक पदार्थ लावणे,घातपात करणे किंवा दहशतवादी हल्ला करणे. लष्करे तोयबा आणि सोमालियाचे समुद्री चाचे संघट्ना अल शबाब ह्यांच्यामध्ये हातमिळवणी झाली असून त्यांच्याकडूनही समुद्रातील प्रशिक्षणासाठी मदत घेतली जात आहे. अल कायदा, आयसिएस हे गटही त्यात सामील आहेत. काही वर्षांपुर्वी ज्या वेळी एलटीटीई दहशतवादी गट श्रीलंकेत सक्रीय होता त्यावेळी समद्री टायगर्स संघटनेकडुन घातपात करण्यासाठी मदत पाकिस्तानने घेतली होती.

26-11 चा मुंबई दहशतवादी हल्ला हा समुद्राकडूनच झाला होता. या हल्ल्याला 10 वर्षे पूर्ण होतील. पुन्हा एकदा भारताला धडा शिकवण्याच्या हेतूने पाकिस्तान हल्ल्याचे नियोजन करीत आहे. 26-11 चा हल्ला होण्याची शक्यता वर्तवली असतानाही तो थांबवता आला नाही. त्यामुळेच या लेखामध्ये सागरी सुरक्षा अधिक बळकट कशी करता येईल याविषयी चर्चा करूया.

अमली पदार्थांची तस्करी 

आजही लाकडी बोटींनी(धाऊ)  भारताच्या गुजरात किनार्यावरून आखाती देश, पाकिस्तान यांच्याशी समुद्री व्यापार केला जातो. यामधला बहुतांश समुद्री व्यापार हा बेकायदा आहे. या लाकडी बोटी पाकिस्तान किंवा आखाती देशातून खोट्या नोटा आणि अंमली पदार्थ तसेच इतर गोष्टींची तस्करी करतात.  2018 सालातील अहवालामध्ये अशी माहिती उघड झाले आहे की जगात जिथे सर्वात जास्त अफु गांजा चरस अंमली पदार्थ सेवन केले जाते त्यात दिल्लीचा तिसरा क्रमांक आहे तर मुंबईचा जगामध्ये सहावा क्रमांक आहे. ही गोष्ट आपल्यासाठी नक्कीच भुषणावह नाही. परंतू हे स्पष्ट आहे की मुंबईची लोकसंख्या प्रचंड असल्याने तिथे अंमली पदार्थ वापराचे प्रमाणही खूप जास्त आहे. म्हणून मुंबईसारख्या महानगरांना अफू गांजा सारखे अंमली पदार्थ पुरवायचे असतील तर त्यासाठी उपयुक्त मार्ग म्हणजे सागरी मार्ग. कारण इतर मार्गांवर तपासणीचे धोके अधिक असतात. महानगरे ही समुद्रकिनार्यावर वसली आहेत त्यामुळे दहशतवाद्यांना अमली पदार्थांची तस्करी खूप उपयुक्त ठरते.

गेल्या वर्षी आलेल्या गुप्तहेर अहवालानुसार पाकिस्तानी दहशतवादी गट केरळामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यात थोडेफार यशही त्यांना मिळाले आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया हा त्यांच्या एक चेहरा समजला जातो. आयएसआय कर्नल हुद्द्याचा अधिकार्याला कोलंबो मध्ये पोस्टिंग देऊन ओसामा ब्रिगेड तयार करण्याचे काम दिले आहे. हाच अधिकारी श्रीलंकेच्या किनारपट्टीवरून दुष्कृत्य करण्याचे कोऑरडिनेशन करतो. काही दिवसांपुर्वी आपल्या पूर्व किनार्यावरती एक बोट शस्त्र नेत होती त्यांना पकडण्यात यश आले. नक्षलवादी किंवा माओवाद्यांना शस्त्रे पुरेशी असतात,मात्र त्यांना दारुगोळा कमी पडतो. तो आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवरून आणला जातो कारण इतर सीमांवरून आणणे जास्त कठीण जाते.

हल्ला करण्याकरता अनेक कारणे

पाकिस्तानात अंतर्गत सुरक्षेची परिस्थितीच गंभीर आहे. त्याशिवाय पाकिस्तानला आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. 12 बिलियन डॉलर इतकी मोठी मदत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मिळणे गरजेचे आहे. म्हणून इथल्या जनतेचे लक्ष पाकिस्तानामधील असलेल्या आर्थिक व सुरक्षा आव्हानांकडून काढून भारताकडे केंद्रीत करायचे असेल तर भारतात काही ना काही कारवाया करणे सोयीचे वाटते. एवढेच नव्हे तर आत्ता आयएसआय या पाकिस्तानच्या गुप्तहेर संस्थेला लेफ्टनंट जनरल असीम मुनीर म्हणून नवे संचालक मिळाले आहेत. त्यांना आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी भारतावर हल्ला करण्याशिवाय दुसरा काही पर्यायही दिसत नाही. म्हणूनच समुद्रावरून हल्ला होण्याची शक्यता वाढते आहे.

ज्या प्रमाणे एलटीटीईच्या सी टायगर्स ने 29 हून अधिक नौदलाच्या बोटी बुडवल्या होत्या. त्याशिवाय श्रीलंकच्या नौदलाचा तळ त्रिंकोमाली इथेही हल्ला केला होता. तशाच प्रकारचे हल्ले पाकिस्तानी दहशतवादी गट करु शकतात. त्याला चीनची छुपी मदत आहेत. त्याशिवाय सौदी अरेबिया अलकायदा, आयएसआय यांना पैशाची मदत नेहमीच करत असतो.

भारताच्या समुद्रकिनार्यावर महत्त्वाची बंदरे आहेत त्याशिवाय मोठ्या पेट्रोलियम रिफायनरीस, पेट्रोल इंडस्ट्री या किनार्यावरती कच्छच्या रणात, मुंबईच्या किनार्यावर आहेत. या सर्वांचे रक्षण दहशतवादी हल्ल्यापासून केले पाहिजे. नौदलाचे पश्चिम किनार्यावर तळ आहेत. त्यांचेही रक्षण करण्याची गरज आहे. म्हणूनच आता गरज आहे ते की या आस्थापनांनी सावध राहणे. समुद्रामध्ये कोळी बांधवांच्या हजारो बोटी रोज मासेमारी करता जातात, त्यांनाही आपले कान आणि डोळे बनवणे गरजेचे आहे.

तंत्रज्ञानाचा वापर खूप जास्त वाढवा

आपण तंत्रज्ञानाचा वापर खूप जास्त वाढवला पाहिजे. 26-11 च्या तुलनेत आपली सागरी सुरक्षा नक्कीच मजबुत झाली आहे. परंतू आपली किनारपट्टी एवढी मोठी आहे की तिथे तंत्रज्ञान वापरुन लक्ष ठेवणे गरजेचे आहे. या तंत्रज्ञानामध्ये टेहेळणी करण्यासाठी आकाशातून उडणारी अन आर्म व्हेईकल किंवा युएव्ही उपयुक्त तंत्रज्ञान ठरेल. कारण विमानातून किंवा हेलिकॉप्टरने किनार्यावर लक्ष ठेवणे हे खर्चाचे ठरते. युएव्ही ची किंमत फार कमी आहे .त्यामुळे भारतात अधिक युएव्ही समुद्रकिनार्यावर टेहेळणी करण्यासाठी आणले जात आहेत. पोलिसांना लागणार्या पेट्रोलिंगच्या बोटींचा वापर खर्चिक असते. काही देशांमध्ये या बोटी खाजगी उद्योगांकडून भाड्याने घेतल्या जातात. जेवढा वापर तेवढे पैसे दिले जातात. जेव्हा लागेल तेव्हा बोटी भाड्याने घेणे कमी खर्चाचे असते, कारण त्याचे बाकी व्यवस्थापन कंपनी करते. त्यामुळे काही बोटी आपण लार्सन अँड टुर्बो कडून भाड्याने घेऊ शकतो का? कारण हिच कंपनी तटरक्षक दलाकरता बोटी बनवत आहे.त्यामुळे् समुद्रकिनार्याचे रक्षण करण्याचा खर्च कमी होईल.

अंडरवॉटर सर्व्हिलन्स व्यवस्था लावण्याची गरज

प्रत्येक 20 मीटरहून अधिक लांब बोटींवर जीपीएस किंवा जीआयएस ऑटोमॅटीक आयडेन्टिफ़िकेशन सिस्टिम लावली जाते. ती त्या बोटीची इलेक्ट्रॉनिक ओळख असते जी त्या रडारवरून चेक करता येते. परंतू 20 मीटर हून लहान बोटींवर अशा प्रकारचे जीपीएस किंवा जीआयएस लागले नाही. याचाच अर्थ ज्या भारतीय कोळ्यांच्या चार साडे चार लाख बोटी भारतीय समुद्रात रोज फिरतात त्यांना इलेक्ट्रॉनिक ओळखण्याची कोणतीही सोय आपल्याकडे नाही. त्यामुळे त्यांनाही ओळखण्याची इलेक्ट्रॉनिक पद्धत सुरु केली पाहिजे.

मोठ्या लष्करी तळाचे किंवा आस्थापनांच्या रक्षणासाठी विशेषतः समुद्रकिनार्यावरील आण्विक संस्था किंवा नाविक तळे, तेलशुद्धीकरण केंद्र यांच्याभोवती अंडरवॉटर सर्व्हिलन्स व्यवस्था लावण्याची गरज आहे. रडारवरून समुद्रांतील बोटींवर लक्ष ठेवले जाते. त्यामुळे खूप प्रचंड माहिती साठते पण त्याचे विश्लेषण कऱणे सोपे नाही. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून रडारवरून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून चोरांना पकडणे गरजेचे आहे. नाहीतर जसे सगळ्यांनी सीसीटीव्ही लागले आहे पण त्यातून फ़ारसे काहीच निष्पन्न होत नाही,तसेच रडारच्या बाबतीतही होईल. विश्लेषण करून दुष्कृत्याला पायबंद घालणे महत्त्वाचे आहे. त्याशिवाय कंटेनर्स सिक्युरिटी इनिशिटीव्ह लावण्याची गरज आहे. आज आपला आंतरराष्ट्रीय व्यापार कंटेनरने होतो. हायवे वरून जाताना आपण ते पाहतो. मात्र या कंटेनरच्या आतून काय येते हे माहित करणे सोपे नाही. कंटेनर्सचे स्कॅनिंग केले आणि खाजगी कंपन्या ट्रॅक करतात तसेच ट्रॅकिंग करणे गरजेचे आहे त्यामुळे चुकीचा माल (जसे तस्करीचा माल) आणता येणार नाही. आपली सागरी सुरक्षा सुधारली आहे. पण दहशतवादी आपले कमजोर मुद्दे शोधून हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपणही नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांच्या एक पाऊल पुढे राहिले पाहिजे. एवढेच नव्हे तर प्रत्येक किनारपट्टीवर प्रत्येक नागरिक, प्रत्येक आस्थापनातील काम करणार्या सरकारी कर्मचार्यांनी आपले कान डोळे उघडे ठेवून एखादी माहिती आली तर ती सुरक्षा दलाला सांगावे जेणेकरून भविष्यातील धोका टाळता येईल.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..