ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला मोहन पाठक यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत.
१९६० नंतर जगभरातच जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल झाले व आजही हे बदल वेगाने घडून येत आहेत. साठोत्तरी ठाणे शहर व ठाणे जिल्हाही या परिवर्तनाला अपवाद नाही. औद्योगिकीकरणाबरोबरच, लोकसंख्येचे केंद्रीकरण, दूरदर्शन, संगणकासारख्या माध्यमांमध्ये होणारे बदल पाहिले तर साठ वर्षांपूर्वीचे ठाणे ही काल्पनिक बाब वाटेल. सांस्कृतिक कार्यक्रम इतके मर्यादित राहण्याचा काळही तितक्याच वेगाने मागे पडत चालला आहे. साहित्यिक अभिव्यक्ती, सादरीकरणाच्या पद्धती बदलल्या, साहित्यकृतींच्या प्रकाशनाच्या व वितरणाच्या पद्धती बदलल्या, त्याबरोबरच रूढ असलेल्या व रूढ नसलेल्या अर्थानेही आपली साहित्यिक म्हणावी अशी निर्मिती, अभिव्यक्ती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या माध्यमांतही बदल घडून आला. १९६० साली ठाण्यात पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले तर १९८८ मध्ये दुसरे. त्या संमेलनाच्या निमित्ताने लिहिता आले असते ( व लिहिले गेलेले) सूचीवजा, नामावलीवजा लिहिण्याचे प्रयोजनही संपत चालले आहे. किंबहुना पुस्तकांच्या नावांसह बनवली जाणारी अशी सूची अपूर्ण/ अत्यल्पच ठरण्याची शक्यता अधिक आहे.
बदलती क्षितिजे
वर्षानुवर्षेच नव्हे, तर संपूर्ण जन्मच एका गावात. जिल्ह्याच्या भौगोलिक सीमेत राहणे ही संकल्पनाही बदलली. जनकवी कै.पी. सावळाराम, कांदबरीकार कै. प्रभाकर दिघे, कै. प्रभाकर अत्रे,कै. पद्माकर चितळे, श्री. शं. ना. नवरे, श्री. वि. आ. बुवा… ही साहित्यिकांची नावे आठवून पाहा. ही नावे त्यांच्या गावांशी जोडली गेली आहेत. पण अशा समीकरणांचा काळही मागे पडत चालला. मुंबईचे साहित्यिक क्लय मोठे होत होत नेरळ, कर्जतपर्यंत पसरत गेले. त्यामुळे ठाण्यातील साहित्यिक किंवा ठाणे जिल्ह्यातील साहित्यिक असा ओळखीचा शिक्का वर्षानुवर्षे वापरता येईल व सूचीचे पुनर्मुद्रण करता येईल; हे आता अशक्य बनत चालले आहे.
माध्यमाबरोबर जन्मलेली व व्यवसायाच्या निमित्ताने जगभर विखुरलेली एक पिढी आहे आणि माध्यमापूर्वीच्या काळात जन्मलेली एक पिढी आहे. या दोन पिढ्यांच्या साहित्याच्या संदर्भातील अनेक संकल्पनांमध्ये मूलभूत फरक आहे आपले कवितेच्या नाटकाच्या, कथेच्या, ललित लेखाच्या रूपांतील अभिव्यक्तीचे पुस्तक काढण्यापेक्षा इंटरनेटवरील आपल्या वा तंत्राने होणाऱ्या कविसंमेलनांमध्ये सहभाग घेतात. अशा साहित्यिकांत जन्म व शिक्षण ठाण्यात झालेले पण व्यवसायाच्या निमित्ताने ब्राझिलिया, कनेक्टिक्ट, टोकिओ येथे वास्तव्य असणारे साहित्यिक आहेत, त्यांच्या अनुभवांचे परीघ समृद्ध आहेत. पण जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात असणारी व साहित्यिक अभिव्यक्ती करणारी ही मंडळी, ठाण्याशी असणारी आपली नाळ प्राणपणाने जपतात. नेटिझन्सच्या विश्वात त्यांचे साहित्य मोठ्या प्रमाणात वाचले जाते. फॉरवर्ड केले जातेपण ठाण्याच्या भौगौलिक परिसरात ही साहित्यिक मंडळी माहीत असतातच असे नाही. ‘बॉर्न अॅन्ड ब्रॉट अप इन ठाणे’ अशी ही साहित्यिक मंडळी हा ही ठाण्याच्या साहित्य विश्वाचा एक घटक आहेच की! नावावर कथासंग्रह, काव्यसंग्रह असावा म्हणून स्वान्तः सुखाय लिहून ते लेखन पुस्तकरूपाने काढून, त्याचे प्रकाशन समारंभ घडवून आणून साहित्यिक विश्वाशी आपली नाळ जोडू पाहणारेही खूप जण आहेत यांच्या सरसकट सर्वच साहित्याची गणना ‘दुय्यम’ किंवा ‘दर्जाहीन’ अशी करता येणार नाही. वितरणाचे जाहिरातीचे तंत्र माहीत नसणारे असे अनेकजण मग आपल्या साहित्यकृती सप्रेम भेट म्हणून देतात. दृकश्राव्य माध्यम, सर्किंग करणारे नेटिझन्सचे विश्व आणि प्रत्यक्षात पुस्तक वाचले जाणे यांतील अंतर इतके मोठे आहे, की प्रामाणिक हेतू असणाऱ्या उत्तम साहित्यिकृतींची परवड होते. वितरणाची, जाहिरातीची, गाजवण्याची तंत्रे साध्य नसणारा हा साहित्यिकांचा वर्गही ठाण्याच्या साहित्यविश्वात आहे.
काही थोडी उदाहरणे
अर्थात काळाच्या ओघात नावावर पुस्तक असणे, ही साहित्यिकांची ओळखली आता कालबाह्य ठरू लागली आहे. काळानुसार अभिव्यक्तीचे मार्ग बदलल्यामुळे दूरदर्शनवरील मालिकांचे लेखन करणारे, साहित्यविषयक नियतकालिकांचे संपादन करणारे, पटकथा लिहिणारे अशी अनेक मंडळी, अनेक प्रकारांनी अनेक माध्यमांतून अभिव्यक्ती करताना दिसतात. पण वर म्हटल्याप्रमाणे या नावांची व त्यांच्या साहित्यकृतीची सूची अव्याप्तच ठरेल. त्यामुळे या काळातले हे साहित्यविश्व घडवणारी व्यासपीठे कोणती याचाही धावता आढावा घेऊ. त्यातूनही ठाण्याच्या साहित्यिक माहोल कसा घडत गेला याचा अंदाज येईल.
नाट्यक्षेत्रात मोठी कामगिरी करणारे डॉ. विजय जोशी, कविवर्य अशोक बागवे या निकांपासून, ते कै. प्रभाकर पाटणकर, श्री. अरुण टिकेकर या ठाण्याबाहेरील मंडळींपर्यंत अनेकांच्या मुलाखती, भाषणे या व्यासपीठावर झाली मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे नगर वाचन मंदिर जवाहर वाचनालय, साने गुरुजी वाचनालय अशा अनेक संस्थांचा हा चेहरा घडवण्यातला वाटा फार मोठा आहे. साहित्याचा दांडगा व्यासंग असणारे कै. स.वि. कुलकर्णी, सन्मित्रकार स.पां.जोशी यांच्या प्रेरणेने साहित्य रसिक मंडळ साठोत्तरी ठाण्यातच चालले. सध्या आचार्य अत्रे कट्टा, नीलपुष्प या व्यासपीठांनी हे काम जोमाने चालू ठेवले आहे. श्री. ल. टिळक यांच्या साहित्य स्नेही मंडळाचे सुमारे चार दशके साहित्य विश्वात योगदान दिले. अशा व्यासपीठांवर होणाऱ्या साहित्यिकांच्या-रसिकांच्या गाठीभेटी, ही या विश्वाची महत्त्वाची ठरेल अशी ओळख आहे.
सन १९७८-१९८० च्या दरम्यान कै. प्रा. म. वि. फाटक, कै. चिं. शं. जोशी आणि सहकाऱ्यांच्या मदतीने पुण्याच्या, ‘महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा ठाण्यात सुरू झाली. तसेच ९०च्या सुमारास श्री. अशोक चिटणीस, न्यायमूर्ती राजाभाऊ गवांदे, कै. स. वि. कुलकर्णी व इतर साहित्यप्रेमी मंडळांनी कोकण मराठी साहित्य परिषदेची शाखा ठाण्यात सुरु केली. पुढे या संस्थांचा शाखा विस्तार कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या शहरांतही झाला. या साहित्य परिषदांच्या शाखांच्या संमेलनाच्या निमित्ताने अनेक चांगले शोधनिबंध सादर केले गेले. व्याख्याने झाली व ठाण्याच्या साहित्य विश्वाच्या अस्तित्वाला वेगळा आयाम मिळाला. डोंबिवलीत ‘काव्यरसिक’ मंडळ चालू होते त्याच्या आगे-मागेच ७०-८० च्या दशकात ठाण्यातील तरुण मित्रांच्या, ‘प्रेरणा साहित्य समूह’, ‘कलासरगम’ या संस्थाही आपले योगदान देत होत्या.
या व उल्लेख करावयाच्या राहिला असेल अशा संस्थांप्रमाणेच आणखी एका प्रयत्नाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल तो म्हणजे अनियकालिकांचा. प्रा. रमेश पानसे यांनी फक्त कवितेला वाहिलेले ‘ऋचा’ हे अनियतकालिक काढले. श्री. सुनील कर्णिक सौ.अंजली कीर्तने व काही काळ मीही या अनियतकालिकाचे काम पाहिले होते. त्याचबरोबर ‘कलासरगम’ च्या विश्वास कणेकरांनी ‘स ला ते सला ना ते’ हे अनियतकालिक काढले. “वेणा’ या नावाचे एक चक्रमुद्रांकित अनियतकालिक काढण्यात आले. ही अनियतकालिके फार काळ चालली नाहीत, पण त्यांनीही काही योगदान दिले आहे.
नाटककार कै. श्याम फडके, कै.प्रकाश गीध, अभिनेते कै. शशि जोशी, डॉ. र. म. शेजवलकर तसेच ‘हनिमून एक्सप्रेस’, ‘राजू, तू खरं सांग’ किंवा ‘लव्ह गेम’ सारखी नाटके लिहिणारे ठाण्यातले शशिकांत कोनकर; ह्यांच्यासारख्या नाट्यप्रेमी मंडळींनी नाट्यक्षेत्रात लक्षणीय कामगिरी बजाविली आहे.
ठाणे शहरातली नाट्याभिमानी आणि मित्रसहयोग सारख्या नाट्यविषयक चळवळींना आणि नाट्यप्रयोगांना वाहिलेल्या संस्थांतर्फे, गेली अनेक वर्षे महाराष्ट्र नाट्य स्पर्धांमध्ये चांगली नाटके सादर होत आली आहेत. ‘मित्र सहयोग’ संस्थेतर्फे ठाण्यातले अॅड. संजय बोरकर आणि ‘नाट्याभिमानी’ तर्फे मकरंद जोशी आणि त्यांचे सहकारी कलावंत या क्षेत्रात चांगले काम करीत आहेत.
३५/४० वर्षांमध्ये नाव घेण्याजोगे आणि दखल घेण्याजोगे वाङ्मयीन योगदान दिले आहे, ही गोष्ट येथे मुद्दाम नमूद करावी लागेल.
कै. डॉ. वा. भा. पंडित हे व्यवसायाने नामांकित शल्यविशारद होते. ते संस्कृतभाषेचे गाढे अभ्यासकही होते. त्यांच्याच पुढाकाराने ठाण्यात ‘शब्दांगण’ नावाचे मासिक निघाले. कविवर्य म. पां. भावे, काहीकाळ त्या नियतकालिकाचे संपादन सांभाळीत होते. डॉ. अनंत देशमुख, डॉ. महेश केळुस्कर, श्री. शिरीष लाटकर, पद्माकर चितळे, गोविंद मुसळे आदी लेखक त्या काळात विविध प्रकारचे सकस लेखन करण्यात आघाडीवर होते. दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’ च्या रविवार पुरवणीमधून ठाण्यातल्या श्रीराम कृ. बोरकर ह्यांच्यासारख्या अभ्यासू टीकाकाराची ग्रंथपरीक्षणे १९६४ ते १९७८ अशा काळात नियमितपणे प्रसिद्ध होत असत. त्याकाळात बोरकरांच्या समीक्षा लेखनाचा एक चोखंदळ वाचकवर्गच तयार झाला होता, हे विसरता येत नाही.
वाचकदिनानिमित्त ‘ग्रंथाली’ तर्फे बालसाहित्यिकांची संमेलने होत. ‘जिज्ञासा’ नावाची संस्था बालवाङ्मयाला वाहिलेले ‘जिज्ञासा’ हे मासिक चालवीत असे.
थोडक्यात सांगायचे झाल्यास, गेल्या ४०/५० वर्षाच्या काळामध्ये ठाणे शहरातल्या वाङ्मयप्रेमी आणि रसिक मंडळींनी आणि लेखक कलाकारांनी साहित्यक्षेत्रात विविध प्रकारे स्पृहणीय काम करून दाखविले आहे. ठाणे शहरामध्ये लवकरच होणाऱ्या ८४व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने, अशा सर्व सारस्वतांच्या आणि कलावंतांच्या योगदानाचे आवर्जून स्मरण करावे हा या लेखाचा उद्देश आहे.
डॉ. आनंद नाडकर्णी हे मुख्यतः मानसोपचारतज्ज्ञ म्हणून केवळ ठाण्यातच नव्हे, तर महाराष्ट्रात विख्यात आहेत, तथापि, ऐन उमेदीच्या तरुण वयात त्यांनी देखील काही एकांकिका लिहिल्या होत्या आणि नाट्यक्षेत्रात थोडी पावले टाकली होती. नंतर नाटकेही लिहिली.
शब्दकोशकार आणि व्याकरणतज्ज्ञ म्हणून नावारूपास झालेले श्री. अरुण फडके हेही ठाणेकरच आहेत, ही गोष्ट अभिमानपूर्वक सांगायला हवी. याखेरीज दूरदर्शनवर मालिकांमधून आणि सूत्रसंचालिका म्हणून दररोज प्रसन्न दर्शन देणारी संपदा कुलकर्णीदेखील आपल्या ठाण्याचीच आहे. अभिनयाच्या क्षेत्रातील अशी आणखी बरीच कलाकार मंडळी म्हणजे ठाण्याचे भूषणच आहे.
विस्तार भयास्तव थांबतो आणि ठाण्यातील उपरोक्त लेखक, कलावंत मंडळीच्या लक्षणीय कामगिरीचा आढावा येथे आटोपता घेतो.
-मोहन पाठक
ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला मोहन पाठक यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत.
Leave a Reply